राधा

“गौरी , ह्या असल्या गोष्टी मुलींना लगेच कळतात. मला असे वाटते त्याने माझ्याकडे बघण्यापेक्षा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दयावे ” राधा म्हणाली. “राधा, कसली आहेस गं ? गौरी म्हणाली “नक्की म्हणायचे काय आहे तूला गौरी?” राधा म्हणाली.

कथेचे नाव -राधा  

विषय - कौटुंबिक

फेरी - राजस्तरीय करंडक कथामालिका

राधा एक गोड व्यक्तिमत्व असणारी मुलगी होती. आई भाऊ आणि ती असे तिघांचं कुटुंब होतं. वडील दोन वर्षापूर्वी हृदय विकाराचा झटक्याने देवाघरी गेले होते. आई कामाला जायची आणि भाऊ सुद्धा नुकताच कामावर रूजू झाला होता. आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे राधाचं ही स्वप्न होतं आणि ती त्यासाठी खूप मेहनत घेत होती. तशी ती लहानपणापासूनच अभ्यासात फार हुशार होती. परीक्षेत कायम अव्वल.. नव्वद टक्के मार्क्स तर ठरलेले असायचे. त्यामुळेच तिला चांगल्या कॉलेजमध्ये सहज ऍडमिशन मिळाले.

कॉलेजचा पहिला दिवस खूप छान गेला. राधा कॉलेजमध्ये नवीनच होती. कॉलेजच्या जुन्या मुली स्वतःहून तिच्याशी गप्पा मारू लागल्या. राधाला खूप बरं वाटलं. राधा दिसायला खूप सुंदर होती. टपोरे डोळे, नितळ कांती. रेशमी केस, चेहर्‍यावर वेगळीच प्रसन्नता. वर्गातल्या मुलांच्याच काय तर मुलींच्याही नजरा तिच्यावर रोखल्या जायच्या. रहाणीमान साधारण होते. ना चेहर्‍यावर कसला मेकअप ना कसला शृंगार. अबोल असली तरी ती सर्वांमध्ये सहज मिसळून जात असे. तिला जास्त बोलायला आवडायचं नाही पण चेहर्‍यावर कायम प्रसन्नता असायची. तिची वर्गात गौरी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. गौरी आणि राधा दोघी नेहमी सोबतीला असायच्या. गौरी बोलकी होती. जे वाटते ते बोलून मोकळी होणारी अशी. कॉलेजचे आठ दिवस असेच गेले. वर्गात एक नवीन मुलगा आला होता. त्याचे नाव विकास होते. विकासने पहिल्यांदा राधाला पाहीले आणि पाहतच राहीला. होतीच ती सुंदर. विकास वर्गात आला की आधी राधा कुठे आहे हे पहात असे. जिथे राधा जाई तिथे विकास. नजर चोरून तिला पाहत राहणे ह्याचाच जणू त्याला ध्यास लागला होता. ज्या दिवशी राधा येत नसे त्या दिवशी ह्याचा मुडऑफ झालाच म्हणून समजा.

गौरीच्या नजरेतून काही हे सुटले नाही. एक दिवस दोघी घरी जात होत्या तेव्हा गौरी राधाला म्हणाली,

“राधा, हा जो वर्गात नवीन मुलगा आला आहे तो सारखा तुला पाहत राहतो, तू पाहीलंस का?”

“गौरी, मला माहीत आहे, तो सतत माझ्याकडे पाहत राहतो.”

राधा शांतपणे म्हणाली.

“मला वाटलं तुला ह्याची कल्पना नाही.” - गौरी.

“गौरी, ह्या असल्या गोष्टी मुलींना लगेच कळतात. मला असे वाटते त्याने माझ्याकडे बघण्यापेक्षा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दयावे. ”

राधा तिच्याकडे पाहत म्हणाली.

“राधा, कसली आहेस गं?”

गौरी तिला चिडवण्याच्या हेतूने म्हणाली.

“नक्की तुला काय म्हणायचे आहे गौरी?”

राधा प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.

“मला म्हणायचे आहे की, तुझ्या ठिकाणी दुसरी एखादी मुलगी असती तर लगेच लाजली असती किंवा विकाससारख्या हँडसम मुलावर भाळली असती, ह्या वयात मुलीला असं वाटणं साहजिकच आहे ना.. पण तू खरंच वेगळी आहेस राधा.”

गौरी हसून म्हणाली.

“गौरी, तू बरोबर बोलतेयस. हे वयच असे असते. ह्या वयात असं वाटते की कोणी तरी आपलं हक्काचे असावे. ज्याला आपण फक्त आणि फक्त आपण आपलं म्हणू शकतो. आपली सुख दुःख त्याला सांगू शकतो. जो नेहमीच आपल्या सोबत राहील. आपली साथ देईल. मी सुद्धा अशीच आहे. पण गौरी, मला असं वाटतंय की त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्वत:च्या पायावर उभे राहणे.. स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे.. प्रेम वगैरे ह्या गोष्टी नक्कीच वाईट नाही पण ज्या वयात शिक्षण महत्त्वाचे आहे त्या वयात प्रेम करत राहिलो तर स्वत:च्या पायावर आपण कसं उभं राहणार? आपलं लक्ष्य काय हवे? हा प्रश्न स्वत:ला विचारणे महत्त्वाचे. उगाच भावनेच्या आहारी जाऊन ह्या सर्व गोष्टीत मन गुंतवणे ह्याच्यात मला खरंच रस नाही. हेच तर वय असतं स्वत:ला सिद्ध करण्याचे. हाच तर पाया असतो आयुष्याचा.. जर हा पाया कच्चा राहीला तर आपला निभाव कसा लागेल? आपण ढासळणारच ना? गौरी, मला मा‍झ्या आयुष्यात तटस्थ रहायचे आहे. मला डगमगून खरंच चालणार नाही.”

राधा बोलता बोलता क्षणभर थांबली.

“राधा, किती छान विचार आहेत तुझे. मला तुझा प्रत्येक शब्द पटला. खूप अभिमान वाटतो की तू माझी मैत्रिण आहे.”

गौरी राधाच्या बोलण्याने प्रभावित झाली होती. मैत्रिणीच्या अभिमानाने तिचा ऊर भरून आला होता.

“गौरी कसं आहे ना.. परिस्थिती,अनुभव ह्याच गोष्टी माणसाला आणि त्याचे विचार घडवत असतात. माझे वडील गेले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली की मला मा‍झ्या आयुष्यात काय हवे आहे. जगण्यासाठी फक्त प्रेम पुरेसे नसते गौरी, पैसाही हवाच असतो. वडील होते तो पर्यंत कसल्याच गोष्टीची कमी नव्हती. माझे वडील आणि आई दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. खूप छान होते आमचे कुटुंब. नजर लागावी असेच. खरंच नजर लागली गौरी..”

बोलता बोलता राधाचा कंठ दाटून आला. डोळे भरून आले. गौरीने राधाच्या पाठीवर हात ठेवला. तेव्हा तर अगदी लहान मुलीप्रमाणे रडू लागली.

“शांत हो राधा, आपण जरा गार्डनमध्ये बसूयात का?”

गौरीने तिला विचारलं आणि राधा गार्डनमध्ये यायला तयार झाली. राधा आणि गौरी दोघी गार्डनमध्ये बसल्या. राधाचे रडणे आता थांबले होते. राधा एकटक कुठेतरी पहात होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू आले. गौरी तिला काही विचारणार तोच राधा बोलू लागली,

“गौरी, मी लहान होते ना, तेव्हा मी काय करायचे माहीत आहे? बाबा ऑफिसला निघाले की त्यांना घट्ट पकडायचे आणि म्हणायचे बाबा तुम्ही घरीच रहा ना. मला तुमच्यासोबत खेळायचे आहे..”

“मग बाबा काय म्हणायचे” - गौरीने विचारलं.

“बाबा म्हणायचे, माझ्या परीसाठी मला ऑफिसला जावेच लागणार. मी ऑफिसला नाही गेलो तर तुला, दादाला खेळणी कशी घेणार? तूला आणि दादाला चांगल्या शाळेत जायचे आहे तर खूप सारे पैसे लागणार.. बरोबर ना? आणि तुम्हा दोघांची हौसमौज करायची आहे की नाही? जर मी ऑफिसला गेलो नाही तर मी माझ्या परीची स्वप्न कशी बरं पूर्ण करणार? म्हणून आता बाबाला प्लीज जावू दे परी.. गौरी, मग मी बाबाला जायची परवानगी दयायचे. बाबा मला रोज समजवायचे आणि मी रोज बाबाला ऑफिसला जाताना घट्ट पकडून ठेवायचे.”

“मी बाबाला नेहमी म्हणायचे,

“बाबा मी मोठी झाले ना, तर तुमची सर्व स्वप्नं मी पूर्ण करणार..” हे ऐकूनच बाबा खूप खुश व्हायचे आणि अगदी त्याच्या डोळ्यात पाणी यायचे. बघ ना. गौरी, आजवर बाबांनी आम्हा सर्वांची सर्व स्वप्नं पूर्ण केली आणि मी त्यांच्यासाठी काहीच काहीच करू शकले नाही. कधीच वाटले नव्हते ते असे आम्हाला एकाएकी सोडून जातील. गेले गं ते गेले.. होते तोपर्यंत आमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करत राहिले. नेहमीच आई, दादा आणि मला खुश ठेवले त्यांनी. निघून गेले कायमचे. ते नाहीत ही खंत मनाला नेहमी सतावते. एकही दिवस असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही.”

हे सर्व ऐकून गौरीचे डोळेही भरून आले. राधाचे सांत्वन कसे करावे हे तिला कळेना. राधा पुढे बोलू लागली.

“गौरी खूप काही आहे मनात साठून. मनाला समजावले आहे आता की आयुष्यभर हे दुःख घेउन चालायचे आहे. स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा आहे. मला माहीत आहे माझे बाबा शरीराने सोडून गेले तरी त्यांचा आत्मा माझ्या सोबतीला आहे. ते मला बघत आहे. मला सिद्ध करायचे आहे. बाबाची परी नक्की मोठी होणार आणि त्यांची मान अभिमानाने नक्कीच ताठ करणार. गौरी माझी आईसुद्धा बाबा गेल्यावर खूप एकटी पडली आहे. तिचा आक्रोश पाहून मन सुन्न होत होते. पूर्ण एक वर्ष गेले तिला सावरायला. मला, दादाला तर काहीच कळत नव्हते तिला कसं सावरावे? काळ एकच औषध असते सर्व दु:खावर, तसेच झाले. काळ जसा पुढे लोटला तसे आईही सावरली आणि आम्हीही.”

“गौरी, कमी वयात आलेले कटू अनुभव माणसाला वेळेआधीच समजदार बनवतात. खूप काही शिकवून जातात. गौरी, बाबा गेले हे दुःख तर खूप मोठे होते पण त्याहूनही विचित्र गोष्ट मी जी स्वतः डोळ्याने पाहिली, अनुभवली ती अजूनच काळीज चिरणारी होती.”

गौरी कान टवकारून ऐकू लागली. राधाच्या डोळ्यात एक वेगळाच अंगार होता.

क्रमश:
©अश्विनी कुणाल ओगले.
जिल्हा - रायगड रत्नागिरी

🎭 Series Post

View all