राज्ञी

शिवरायांच्या पत्नी सईबाई

५/९/१६३३, 'रेऊबाईंनी ' बाळंतिणीच्या खोलीत प्रवेश केला. खोलीमध्ये विविध देव-देवतांची चित्रे, शुभचिन्हे रेखाटण्यात आली होती. आत वैद्य, कुळंबिणी, सुईणबाईंची लगबग सुरु होती. वेळ भरत चालली. रेऊबाई राणीसरकारांना बाळांतकळा असह्य झाल्या. बाहेर जिवाभावाची माणसे उत्सुकतेने वाट पाहत होती. काही क्षणातच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तसा साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
"काय झाले??"
कुणीतरी म्हणाले, "नाईक- निंबाळकरांच्या घरी 'कन्यारत्न 'जन्माला आले!"..आनंद ओसंडून वाहू लागला.
या वार्तेने मुधोजीराजांना खूप खूप आनंद झाला. सनई -चौघडे वाजू लागले. साऱ्या नगरीत हत्तीवरून साखर वाटून ही वार्ता सांगितली गेली. फलटण मधील लोकांनी घरं -दारं सजवून या 'राजकन्येचे' स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण फलटण सजले.

रेऊबाईंना तिसऱ्या खेपेस दिवस गेले. पोटी एक तरी मुलगी हवी म्हणून त्यांनी आपल्या कुलदैवतेस साकडे घातले. राणी रेऊबाईसाहेब या वृत्तीने प्रेमळ आणि धार्मिक होत्या. त्यांना मुलीची किती हौस! आपल्या पोटी लक्ष्मी यावी म्हणून त्या आस लावून होत्या. कुलदेवतेने त्यांचे गाऱ्हाणे ऐकले आणि पोटी मुलगी देऊन त्यांची आस पूर्ण केली.

श्रमलेल्या रेऊबाईंना बऱ्याच वेळाने जाग आली. जवळच मऊ, मऊ रेशमी दुपट्यात गुंडाळलेले गोजिरे बाळ इवलेसे डोळे मिटून झोपले होते. "गोरा वर्ण , इवलुसे हात पाय, तितकीच नाजूक बोटे, नाजुकशी जिवणी, चाफेकळी नाक, भरगच्च जावळ." रेऊबाई आपल्या बाळाकडे पाहतच राहिल्या. 'निमजाईदेवीने' आपले गाऱ्हाणे ऐकले म्हणून बाई धन्य झाल्या.
मुधोजीराजे आणि त्यांच्या पत्नी राणी रेऊबाईंनी आपल्याला मुलगी व्हावी म्हणून नाईक- निंबाळकरांच्या कुलदेवतेस नवस केला होता. तो फळाला आला. मनोमन निमजाई देवीचे स्मरण करून राणी रेऊबाईंनी आपल्या बाळाला अतीव प्रेमाने जवळ घेतले. 

बाळाची पत्रिका तयार झाली. भविष्य अतिशय उज्वल ,भाग्यवंत होते.
पाळणा सजला. राजस्त्रिया, मात्तब्बर मंडळी, नगरजनांच्या उपस्थितीत बाराव्या दिवशी बारसे मोठया थाटामाटात पार पडले. राजे आणि बाईसाहेबांनी नवस फेडला. कुणी भवानी घ्या, कुणी अंबाबाई घ्या...बाळाचे नाव काय!!

"सई." "सईबाई."
इवल्याश्या सईबाईंचे रूप दागिन्यांनी सजले. त्यांना पाहताच मुधोजीराजे आणि रेऊबाईंना साक्षात निमजाईदेवी पोटी जन्मला आल्याचा भास झाला. नाईक-निंबाळकरांचा वाडा सुखसोई, समृद्धीने परिपूर्ण भरलेला होता. त्यात कमी होती ती फक्त एका कन्येची! ती सईबाईंच्या येण्याने पूर्ण झाली.

फलटणचे जुने संस्थान परंपरेने चालत आलेले  राजघराणे. फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील निंबळक गाव. निंबराज यांच्या नावावरून निंबळक हे नाव पडले. नाईक -निंबाळकर हे फलटणचे सूर्यवंशी परमार कुळातील मातब्बर घराणे आदिलशाही दरबारात प्रसिद्ध होते. मोहम्मद तुघलक बादशहा यांनी 'नाईक' हा किताब यांना दिला होता. मुधोजीराजे आणि राणी रेऊबाई नाईक -निंबाळकरांच्या सईबाई या एकुलत्या एक कन्या, तर साबाजी, जगदेवराव आणि बजाजी नाईक -निंबाळकर हे तीन पुत्र. हे घराणे जसे शिवबांचे सासर तसेच शहाजीराजे आणि जिजाबाई यांचे आजोळ.

सईबाई आता रांगु लागल्या. त्यांच्या बाळलीला पाहून रेऊबाईंना कोण आनंद होत होता! कौतुकाने त्या आपल्या लेकिकडे पाहत.. हळूहळू सईबाई पावले टाकू लागल्या, धावू लागल्या.
दिवसांमासी शांत ,हसऱ्या, चुणचुणीत ,चपळ सईबाई आपल्या तीनही बंधुंसोबत लाडाकोडात वाढू लागल्या. आपल्या सख्या, सवंगड्यांसमवेत भातुकलीचे खेळ, गजग्यांचे डाव मांडू लागल्या. त्याचबरोबर ऐकलेल्या रामायण, महाभारतातील कथांमुळे त्यांच्या मनावर उत्तम संस्कार होऊ लागले. युद्धप्रसंगी पुरुष मंडळी आपल्या कुटुंबापासून लांब असत. अशावेळी सारा कारभार राजस्त्रिया पाहत. त्यासाठी त्यांचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे होते. परिणामी सईबाईंनाही आपल्या बंधूं समवेत लिहिण्या- वाचण्याचे, घोडदौडीचे , तलवारबाजीचे शिक्षण मिळत होते. यातूनच सहनशीलता, संयम, प्रेम, सेवाभावी, त्यागशील वृत्ती, हे संस्कारही आपोआपच सईबाईंवर होऊ लागले. रेऊबाई धार्मिक वृत्तीच्या, त्यांच्या संस्कारात सईबाई प्रगल्भ होत होत्या.

बाळपणीचा काळ सरत होता. काळानुरूप सईबाई विवाहयोग्य झाल्या. आपल्या मुलीचा विवाह आपल्या घराण्यासारख्याच तोलामोलाच्या घराण्याशी व्हावा अशी मुधोजीराजांची इच्छा होती. अशातच फलटणच्या नाईक -निंबाळकरांची ही लेक आपल्या शिवबासाठी जिजाऊसाहेबांच्या  मनात भरली.
गव्हाळ रंगाच्या, शांत स्वभावाच्या, चुणचुणीत सईबाई आपल्या शिवबासाठी जिजाऊसाहेबांना अगदी योग्य वाटल्या. नाईक-निंबाळकरांचे संस्कार आणि सईबाईंच्या ठाई असलेले गुण, व्यक्तिमत्व, शिक्षण हे सारेच भोसले घराण्याशी सुसंगत होते. शिवाय सईबाई आणि शिवबा यांच्या पत्रिकाही उत्तमरित्या जुळत होत्या.

जिजाऊसाहेबांनी आपल्या पतीस, शहाजीराजांस पत्राद्वारे ही आनंदाची बातमी कळविली व लग्नास परवानगी मागितली. त्यावेळी बादशहा आदिलशहा यांनी शहाजीराजांची दक्षिणेवर पाठवणी केली होती. शहाजीराजे दक्षिणेकडील स्वाऱ्यात व्यस्त होते. त्यामुळे शहाजीराजे आपल्या पुत्राच्या, शिवबाच्या लग्नास येऊ शकत नव्हते. मात्र त्यांनी आपल्या मुलास आणि सुनबाईंस भरभरून आशीर्वाद पाठवले.

मुधोजीराजांनी आनंदाने, समाधानाने जिजाऊंच्या या मागणीस होकार दिला. कारण भोसले घराणे प्रतिष्ठित, तोलामोलाचे होतेच, शिवाय भोसले आणि नाईक -निंबाळकर यांचे जुने संबंधही होते. भोसले घराणे नाईक -निंबाळकरांस साजेसे होते. जिजाऊसाहेबांसारख्या मोठ्या मनाच्या सासूबाई आपल्या लाडक्या लेकीस लाभणार असतील तर याहून भाग्याची गोष्ट ती काय होती!

"शिवबा" स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या जिजाऊ आणि शहाजीराजांचे सुपुत्र. सुलतानांनी आपल्या मुलुखाची केलेली धूळधाण जिजाऊ आईसाहेबांना पाहावत नव्हती. त्यांना स्वतःचे राज्य हवे होते "स्वराज्य." आपल्याच स्वार्थी माणसांनी सुलतानांना केलेली मदत त्यांना बघवत नव्हती. जिजाऊ एका पराक्रमी पुरुषाच्या पत्नी होत्या. शहाजीराजांना निजामशाहीची मनात नसतानाही चाकरी करावी लागते, हे त्या जाणून होत्या. गरीब सामान्य जनताही गुलामशाहीला कंटाळली होती. हे गुलामशाही, बंधने झुगारून देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी हवा एक पराक्रमी पुरुष. अशातच जिजाऊसाहेबांना डोहाळे लागले स्वराज्याचे, पराक्रमाचे. जिजाऊ आनंदात होत्या. या आनंदाला कोणाची तरी नजर लागली. त्यांचे माहेर' जाधवराव 'उद्ध्वस्त झाले. जिजाऊसाहेबांच्या उरात पेटलेली आग जास्तच भडकली. जाधवांच्या हत्याकांडामुळे शहाजीराजे ही बिथरले. गुलामगिरीस कंटाळून शहाजीराजांनी धाडसाने पुण्याभोवतीचा मुलूख ताब्यात घेतला. तशी शिवनेरीवर जिजाऊसाहेबांची रवानगी झाली. तिकडे शहाजी राजांची बंडखोरी आदिलशहास पचली नाही म्हणून त्याने पुणे उद्ध्वस्त केले.

दिवस भरत आले, बाळंतिणीची खोली सोयी-सुविधांनी सज्ज झाली. जिजाबाई त्या खोलीत प्रवेशल्या. कुणाच्या चेहऱ्यावर आनंद होता कोणाच्या काळजी, तर कुणाच्या उत्सुकता! काही वेळातच 'पुत्र' झाल्याची बातमी सर्वत्र पसरली. किल्ल्यावर आनंद पसरला. सनई-चौघडे वाजू लागले. जणू सारी धरतीच आनंदली. जिजाबाईंना खूप..खूप आनंद झाला. जणू त्यांच्या स्वप्नांनाच पुत्र झाला असावा.
बाळाचे बारसेही अगदी थाटामाटात पार पडले. बाळाला सजवलेल्या पाळण्यात घालण्यात आले आणि नाव ठेवण्यात आले "शिवाजी"...शिवनेरी किल्ल्यावर बाळाचा जन्म झाला, म्हणून शिवाजी. जिजाऊ आपल्या बाळाकडे अभिमानाने पाहत होत्या. त्यांनी पाहिलेले 'स्वराज्याचे स्वप्न' जणू त्या इवल्याशा बाळाच्या चेहऱ्यावर त्यांना दिसत होते.

दिवस जात होते, जिजाऊ आईसाहेबांच्या, कारभाऱ्यांच्या संस्कारात,राम - कृष्णाच्या गोष्टी ऐकत शिवबा हळूहळू मोठे होत होते. त्यांशी खेळायला आता सवंगडी जमा झाले. कधी चेंडू, लपंडाव, तर कधी त्यांच्या खेळातच मातीच्या ढिगाऱ्यावर किल्ल्यांवर खोटी -खोटी लढाई चाले. शिवबा आपल्या साथीदारांसह शत्रूवर हल्ला करत आणि सरते शेवटी लढाई जिंकत.

शिवबा दहा वर्षांचे झाले. त्यांचे लग्नाचे वय झाले. फलटणच्या नाईक- निंबाळकरांची लेक जिजाऊ साहेबांच्या मनात भरली आपल्या लाडक्या शिवबासाठी. नाईक -निंबाळकरांची सर्वगुणसंपन्न लेक आपल्या भारदस्त शिवबाला शोभून दिसेल म्हणून जिजाऊंनी शिवबासाठी सईबाईंना मागणी घातली. जिजाऊसाहेब व शहाजीराजे यांची सून व शिवबाच्या पत्नीच्या स्वागतासाठी 'लाल महाल' सजू लागला.
क्रमशः

सदर कथामालिका माहिती आधारे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.





 

🎭 Series Post

View all