Radnyi part 4

Gosht shivbanchya patanichi

चौथ्या खेपेस सईबाई राणीसाहेबांना कडक, निराळेच डोहाळे लागले. अगदी जिजाऊ साहेबांना लागले होते तसेच. उंच, उंच डोंगर- किल्ले चढण्याचे, तलवार हाती घेऊन लढाया करण्याचे, सोन्याच्या तख्तावर बसण्याचे, पराक्रमाचे..
सईबाईंच्या मनात नवनवीन इच्छा निर्माण होऊ लागल्या. व्रत -वैकल्यात त्या रमून गेल्या. आता सईबाईंचे नव्याने कोड- कौतुक होऊ लागले. त्यांच्या सेवेत इतर राजस्त्रिया मग्न झाल्या. "आपल्या पोटी शूरवीर पुत्र हवा." अशी इतर स्त्रियांप्रमाणेच राणी सईबाईंचीही इच्छा होती. त्यांनी भोसल्यांच्या आराध्य दैवताला "महादेवाला", "भवानीमातेला" साकडे घातले. "निराश करू नकोस आई.. स्वराज्याचा हा डाव मांडला. राजांच्या सोबतीला नवे नेतृत्व हवे, पाठीराखा हवाच."

राणी सईबाईंना अन्न -पाणी पचेना. थकव्याने कोमेजून गेल्या त्या. तब्येत क्षीण झाली. डोळेही खोल गेले. अनेक दिवसांपासून आजारी असल्यासारखी अवस्था झाली त्यांची. सईबाईंचे हे कोमजलेले रूप पाहून सारेच काळजीत पडले. जिजाऊ त्यांची स्वतः जातीने काळजी घेऊ लागल्या. या माय -लेकीचे नातेच निराळे होते. जिजाऊंच्या मायेच्या पदराखाली सईबाई मोठ्या झाल्या होत्या. आपल्या लेकीची काळजी कोणा मातेस वाटणार नाही! जिजाऊंना सईबाईंचे हे रूप पहावेना.

दिवस भरत आले होते. प्रसूती महालाच्या भिंती रंगवल्या गेल्या. विविध देवी-देवतांची चित्रे त्यावर रेखाटली गेली. शुभ चिन्हांनी भिंती सजल्या.

सईबाईंना वेदना असहाय्य झाल्या. प्रसूती महालाबाहेर सारे काळजीने वाट पाहत होते. साऱ्यांना चिंता होती ती, सईबाईंची. जिजाऊ अस्वस्थ होत्या. "बाळंतपण सुखरूप पार पडू दे" म्हणून भवानी मातेला विनवित होत्या.
सईबाईंच्या साऱ्या धाकटया सवतीबाई चिंतेने उभ्या होत्या.
गुरुवार दि. १४/५/१६५७  सईबाई प्रसूत झाल्या. 'बाळराजे' जन्माला आले. भवानीदेवी, महादेव प्रसन्न झाले. पुरंदरगड आनंदाने न्हाऊन गेला. सईबाईंचे स्वप्न पूर्ण झाले. धन्य झाल्या त्या.
तोफा कडाडू लागल्या. नगारे घुमू लागले. खलिते रवाना झाले... "राणी सईबाईंना 'पुत्ररत्न' प्राप्ती झाली." सारी सृष्टीच आनंदून गेली.

थकलेल्या सईबाई आपल्या बाळाराजेंचे रूपडे डोळ्यात साठवत होत्या. शिवाजी राजांसारखा उभट चेहरा, नाकाचा आकारही किंचित राजां सारखाच. गोरा रंग, मोठाले डोळे, हातापायाची उंच बोटे. दाट जावळ तर अगदी पाहण्यासारखेच. 'सईबाईंचे 'आईपण' धन्य झाले.'

जिजाऊंना आनंदाचे भरते आले. सईबाईंच्या जवळ बसत त्यांनी प्रेमभराने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला.
बारा दिवस झाले. तसे बाळाच्या बारशाचा थाटमाट उडाला. पाळणा सजला. सारी जिवाभावाची माणसे, नातलग बाळाच्या बारशास जमा झाले. साऱ्या राजस्त्रिया नटून -सजून जमा झाल्या. भरजरी लुगडे नेसलेल्या राणी सईबाई फारच सुंदर दिसत होत्या. बारशाचा थाटमाट समाधानाने पाहत होत्या. "पोटी पुत्र असल्याचा आनंद निराळाच." इवलेसे बाळराजे दागदागिन्यांनी सजले. अंगावर जरीकाठाचे झबले- टोपडे किती साजिरे दिसत होते!
बाळराजांचे नाव?
"संभाजी..संभाजीराजे..शंभूराजे."

जिजाऊ आपल्या प्रथम पुत्राच्या आठवणीने गहिवरल्या. कनकगिरीच्या वेढ्यात अफजलखानाने शिवरायांच्या थोरल्या बंधूंचा, संभाजीराजांचा घात केला. त्यांचेच नाव बाळ राजांना देण्यात आले, त्यांची आठवण सदैव राहावी म्हणून.
शंभूराजांचे भविष्य सांगण्यास ज्योतिषी आले. "बाळराजे कीर्तीवान होतील. मृत्यूचे भय यांच्या ठाई असणार नाही. कुंडलीत आप्तस्वकीयांकडून फसवणुकीचा योग दिसतो. मात्र शंभुराजे यातून मार्ग काढतील. कुळाचे नाव मोठे करतील."

हळूहळू बाळराजे मोठे होऊ लागले. त्यांच्या बाळलीला पाहून सईबाईंना समाधान वाटे.
बाळराजांना पाहून सईबाईंना थोडा उत्साह जाणवत होता. शंभूराजांच्या जन्माने जणू स्वर्गच सईबाईंच्या हाती आला.

मात्र त्यांचे आजारपण सातत्याने वाढत असल्याने शरीर क्षीण होत होते. बाळंतरोग त्यांचे शरीर पोखरत होता. हा रोग कधी राजक्षम्याचे रुप धारण करू शकतो म्हणून वैद्यांनी बाळराजेंना आपल्या आईपासून दूर ठेवण्यास सुचवले.
आईपणाच्या जाणीवेने सईबाईंच्या हृदयात पान्हा फुटत होता. मात्र बाळराजांची भूक भागत नव्हती. मग जिजाऊसाहेबांनी धाराऊंना आणून बाळराजांची दुधाची व्यवस्था केली.

"बाळराजांचे आईपण अनुभवायचे राहून गेले तर? आपल्या मागे शंभूराजांचे काय?" असे प्रश्न सईबाईंच्या हृदयात हजारो वेळा उमटले असतील.

बाळराजे दूर गेल्याने सईबाईंच्या मनाला वेदना होत होत्या. आई आपल्या लाडक्या लेकरापासून किती काळ दूर राहू शकते? नाहीच..
शिवाजीराजे स्वराज्याच्या कार्यात व्यस्त असत आणि शंभूराजे जवळ असूनही दूर.

सईबाईंची प्रकृती अधिकाधिक क्षीण होत चालली होती. स्वराज्याचा विस्तार हळूहळू वाढत होता. शंभूराजे रांगू लागले, चालू लागले. सर्वांचे लाडके शंभुराजे स्वभावाने तापट, हट्टी होते.
शंभूराजांनी आपल्या पिताजींचा वसा घ्यावा, स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करावे. हीच सईबाईंची आपल्या बाळराजांकडून अपेक्षा होती. त्यांना वाटे, "शंभूराजांचे भाग्य किती मोठे! भोसल्यांच्या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांना शिवाजीराजांसारखे पराक्रमी पिता लाभले.
बाळराजांचे आजोळीही इतकेच कर्तृत्ववान! शंभू राजांनी या दोघांचाही आदर्श घ्यावा. त्यांसारखेच बुद्धिमान, कर्तबगार व्हावे. आपल्यासारखेच शंभू राजांना त्यांच्या आजी जिजाऊसाहेबांचे मार्गदर्शन मिळावे.
शंभूबाळ..आपल्या पिताजींचा 'स्वराज्य हाच संसार'. तो वाढवावा, टिकवावा, त्याच्या रक्षणार्थ आपण खंबीरपणे उभे राहावे. त्यांवर निष्ठा ठेवावी, विश्वास ठेवावा. स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूस धडा शिकवावा, त्यास नामोहरम करावे.. 'सळो कि पळो 'करून सोडावे. आपल्या पराक्रमाने शत्रूच्या मनात धडकी भरावी, असे वर्तन ठेवावे. कारभाऱ्यांस हाताशी धरून वागावे.
समस्त आया-बहिणींना संरक्षण द्यावे. त्यांचा आदर, मान राखावा आणि भोसले घराण्याचे नाव उज्वल करा. खूप मोठे व्हा."
आपल्या शूरवीर पुत्राकडून एखाद्या मातेस आणखी काय अपेक्षा असावी!
"आज आमच्या पंखात बळ असते, तर आम्ही जातीने हातास धरून तुम्हास साऱ्या गोष्टी शिकविल्या असत्या. आऊसाहेब म्हणून प्रसंगी तुमचा कान धरला असता, तितकेच भरभरून प्रेम ही केले असते. पण नियतीची चालच निराळी!  भरभरून देताना तिने आमचे पंखच छाटले." तिच्या मनात नक्की आहे तरी काय? सईबाईंना उमजणे अशक्य होते.

शंभूराजांचा विचार मनी येताच सईबाई दुःखी, कष्टी होत. "आमच्या तीनही कन्यका मोठया गोजिरवाण्या, तर बाळराजे उमदे. आऊसाहेब धीराच्या..आणि राजे! त्यांबद्दल बोलायला वाणीही फिकी पडते. त्यांच्या थोरल्या पत्नी असल्याने मुजऱ्यांचा मान आम्हास मिळाला. आता या साऱ्या मायेच्या माणसांपासून दूर जाण्याचे भय वाटते.
ईश्वराने आम्हास भरभरून सुख दिले. आमचे भाग्य थोर म्हणून आम्ही भोसल्यांची सून झालो.
इकडे राजे सतत मोहिमेवर. त्यांच्या आठवणीत मन व्याकूळ व्हायचे. मात्र नाईक निंबाळकरांचे, जिजाऊंचे संस्कार कामी आले, पतीशी एकनिष्ठ राहून आपल्या सांसारिक मोहात न अडकवता, व्यथित न होता त्यांस बळ द्यायचे. हीच खरी पतिव्रता स्त्री. आम्ही नशिबी येईल ते स्वीकारत गेलो.

आमच्या मागाहून सात सवती राजांच्या पत्नी म्हणून भोसले घराण्यात दाखल झाल्या.  राजघराण्यातील अलिखित रीतच ती. आपले कुटुंब मोठे असावे, वंश वाढावा. हा त्यामागचा उद्देश. यामुळे नवे नातेसंबंधही दृढ होत.
त्यांबरोबर वर्तन करताना आम्ही कधी मोठेपणा मिरविला नाही. तशी हौसच नव्हती आम्हास. या साऱ्या राण्या राजांना प्रिय, तशाच आम्हासही. या साऱ्याजणी आमच्याशी कायम मायेने वागत आल्या. सवती नव्हेतच त्या.. त्या तर आमच्या धाकट्या भगिनीच. मग त्यांना अंतर देण्याचा अधिकार काय आम्हास?

अलीकडे रेऊआईसाहेबांची आठवण व्यथित करते. तशा जिजाऊ आमच्या सासुबाई. पण आईची माया त्यांनी भरभरून दिली. आमच्या माहेरची उणीव भासू दिली नाही त्यांनी कधी. त्यांच्या मायेतच सुनबाई म्हणून नव्हे तर, आम्ही त्यांची लेक म्हणूनच लहानाच्या मोठया झालो.
त्यांचे माहेर मोठे पराक्रमी आणि आऊसाहेब तर आभाळाहूनही थोर. कुटुंबवत्सल, मायाळू, तितक्याच कर्तृत्ववान, सहनशील, धैर्यवान.. त्यांचे हे सारे गुण आपोआपच आमच्या अंगी भिनत गेले."
सईबाई विचाराने आणि मनाने, शरीराने शिणल्या होत्या.
"आज शरीर साथ देत नाही. आमचे काही बरे वाईट..! कदाचित ती वेळ जवळ आली असावी. पण आमचा जीव बाळराजांत अडकतो.
मात्र आमचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असतील. आई भवानी शंभूराजांचे रक्षण करील याची खात्री आहे आम्हास."

क्रमशः

🎭 Series Post

View all