आधुनिक ससा आणि कासव बोधकथा (Rabbit and Tortoise story in Marathi)
एका जंगलात एक सश्याचे आणि एक कासवाचे कुटुंबं राहत होते. ससा आणि कासव चांगले मित्र होते. एक दिवस खेळता खेळता इतर प्राण्यांनी काही वर्ष आधी ससा आणि कासवाची शर्यत झाली होती त्याबद्दल त्या दोघांना सांगितले. दोघांनाही याबद्दल काहीच कल्पना नसल्याने दोघे आपापल्या घरी गेले.
"आई आज इतर प्राणी मित्र म्हणत होते काही वर्षाआधी आजोबा आणि कासवाचे आजोबा यांच्यात शर्यत लागली होती. खरंय का हे?" छोट्या ससुल्याने विचारले.
"हो. त्यांचीही तुमच्या दोघांसारखी मैत्री होती आणि खेळता खेळता त्यांच्यात शर्यत लागली होती." सश्याच्या आईने सांगितलं.
"अगं आई पण कासव आणि ससा शर्यत म्हणजे ससाच जिंकणार ना? नक्कीच आपले आजोबा जिंकले असतील. हो ना?" ससुला उत्सुकतेने म्हणाला.
"नाही रे बाळा." सश्याची आई म्हणाली आणि तिने काही वर्षापूर्वी घडलेली गोष्ट लहान ससुल्याला सांगितली.
असेच दिवस सरत होते. रोज कासव आणि ससा खेळायचे पण हल्ली छोटा ससुला नेहमीसारखा उत्साही नसायचा. ही गोष्ट कासवाच्या लक्षात आली आणि एक दिवस त्याने विचारलेच.
"काय झालं ससोबा तू माझ्याशी आधी सारखा खेळत नाहीस. चिडला आहेस का माझ्यावर?" कासवाने अगदी शांतपणे विचारलं.
त्याच्या या बोलण्याने ससुला खरंच विचारात पडला.
'आपण खरंच असे का वागतोय? आजोबा हरले त्याचं दुःख आहे म्हणून? जर पुन्हा अशी शर्यत झाली तर मी आजोबांच्या नावापुढे लागलेला हरलेला शिक्का नक्कीच पुसून टाकेन.' ससा मनातच म्हणाला.
"काय झालं ससोबा? मी काय विचारलं? माझं काही चुकलंय का?" कासवाने त्याला पुन्हा विचारलं.
"नाही काही नाही. आपण शर्यत करूया का?" ससा म्हणाला.
"शर्यत? मध्येच काय हे?" कासवाने विचारलं.
"बघ तू तयार आहेस की नाही एवढंच सांग." ससा ठामपणे म्हणाला.
"ठीक आहे पण आपली मैत्री कायम अबाधित राहिली पाहिजे असं वचन दे." कासव म्हणाले.
ससा या गोष्टीला तयार झाला.
"आजपासून तीन दिवसांनंतर आपली शर्यत होईल. जंगलातून जो रस्ता त्या उंच टेकडीवर जातो ना तिथे जो सगळ्यात आधी पोहोचेल तो या शर्यतीचा विजेता असेल." ससा म्हणाला.
"ठीक आहे भेटूया मग शर्यतीच्या दिवशी." कासव शांतपणे म्हणाले.
शर्यतीचे ठरल्यावर कासव आणि ससा दोघेही आपापल्या घरी गेले आणि या शर्यतीची वार्ता संपूर्ण जंगलात पोहोचवण्याचे काम माकडाने केले होतेच. तीन दिवसाच्या वेळेत कासव रोज शर्यतीच्या मार्गावर जात होते. जंगलातले इतर प्राणी त्याला बघायचे.
"काय रे कासवा तुला काय वाटतंय रोज असा शर्यतीचा रस्ता बघून तू जिंकणार?" एका पोपटाने त्याची खिल्ली उडविण्याच्या स्वरात त्याला विचारले.
"हरणे किंवा जिंकणे आत्ता तरी माझ्या हातात नाही पण प्रयत्न करणे आहे. उद्या शर्यत आहेच. भेटूया उद्या." कासव शांतपणे म्हणाले आणि हळू हळू चालत आपल्या घराकडे वळले.
सगळे प्राणी त्याच्यावर हसत होते. एवढ्या हळू वेगात तर ससा एक नाही तर दहा वेळा शर्यत जिंकेल असंच इतर प्राण्यांचं म्हणणं होतं. त्यांच्याकडे लक्ष न देता कासवाने आपला रस्ता धरला.
एकदाचा शर्यतीचा दिवस उजाडला. कासव, ससा आणि जंगलातले इतर प्राणी या दोघांची शर्यत बघायला हजर झाले होते. ससा आपल्या आजोबांच्या चुकांमधून शिकला होता आणि काहीही झालं तरी हिरवं गार गवत खाऊन झोपायचं नाही हे त्याने पक्कं ठरवलं होतं. कासवाला पण नक्की माहित होतं आपला हा मित्र जिद्दी आहे यावेळी आजोबांच्या काळातील चूक होणे नाही. शर्यत जर जिंकायची असेल तर योग्य नियोजन हवं.
"तुला स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा." कासव सश्याला म्हणाले.
"तुलाही. यावेळी मी आजोबांसारखा झोपणार नाहीये त्यामुळे तू जरा जास्त जोरात पळ." ससा म्हणाला.
त्याच्या या बोलण्यावर कासव खळखळून हसले आणि दोघेही शर्यतीसाठी तयार झाले. माकडाने "एक, दोन, तीन" असं म्हणल्या बरोबर सश्याने जोरात धूम ठोकली.
कासव आपलं हळूहळू चालत पुढे निघाले. ससा आता कासवाच्या दृष्टिक्षेपात देखील नव्हता. हळूहळू चालता चालता कासव एका उताराच्या ठिकाणी आले.
'मला काळजी करून चालणार नाही. जे ठरवलं आहे तेच होणार.' कासव मनातच म्हणाले आणि अचानक त्याने आपले हात पाय कवचाच्या आत घेतले.
इतर प्राण्यांना वाटू लागलं यावेळी ससा जिंकणार आणि कासव झोपा काढणार पण काही कळायच्या आतच त्या रस्त्याच्या उताराच्या दिशेने कासवाने स्वतःचे कवच झोकून दिले. यामुळे अगदी कमी वेळेत कासवाने अर्धा रस्ता पार केला. हा रस्ता पार करून झाल्यावर आता मुख्य चढण होतं आणि ते चढून गेल्यावर वर टेकडी होती जिथे शर्यत संपणार होती. कासवाने पाहिलं तर सश्याने नुकतेच चढण चढायला सुरुवात केली होती. कसलाच वेळ न घालवता कासव बाजूला असलेल्या नदीत शिरले आणि पाण्याच्या मार्गाने वर जाऊ लागले. पाण्यातून जाताना त्याला वेग तर मिळत होताच शिवाय तो रस्ता लहान असल्याने कासव आधी वर पोहोचू शकत होते.
झालेही तसेच. जसे कासवाने ठरवले होते त्याप्रमाणे ते आधी वर पोहोचले आणि पाण्यातून बाहेर आले. ती नदी शर्यत संपणाऱ्या रेषेच्या पलीकडे असल्याने कासव अर्थातच जिंकले होते. तोवर ससा आपणच जिंकणार आहोत हे गृहीत धरूनच वर आला होता आणि कासवाला पाहून एकदम अचंबित झाला.
"तू? माझ्या आधी तू वर कसा आलास? मी तर आज झोपलोही नाही आणि वेगात पण सातत्य ठेवलं होतं." ससा आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
"आजच्या काळात फक्त सातत्य आणि वेग असून चालत नाही. मी आजूबाजूला असणाऱ्या संधींचा फायदा घेतला. तीन दिवस पूर्ण अभ्यास केला आणि म्हणून मी जिंकलो." कासव म्हणाले.
"म्हणजे?" सश्याने न कळून विचारले.
"म्हणजे गेले तीन दिवस मी इथे येत होतो. रस्त्यात चालताना माझा वेग आणि मला कुठे पोहोचायला किती वेळ लागतोय हे बघत होतो. जंगलात अर्ध्या रस्त्यात उतार आहे हे मी तेव्हाच बघितलं आणि तिथे वेगाचं नाही तर बुद्धीचं काम आहे हे माझ्या लक्षात आलं. मी घरंगळत तो उतार पार केला. या टेकडीवर येण्याचा सगळ्यात लहान रस्ता ती नदी होती. माझा जमिनीपेक्षा नदीतला वेगही जरा बरा आहे म्हणून तिथून मी तो रस्ता निवडला. तू शर्यत सुरू झाली तेव्हा खूप उत्साहात होतास आणि तूच जिंकणार आहेस हा अती आत्मविश्वास तुला मागे वळून बघण्यास तयार होऊ देत नव्हता. जर तू मागे वळून मला नदीत जाताना किंवा घरंगळत येताना बघितले असतेस तर कदाचित तू अजून जोरात धावून शर्यत जिंकली असती." कासव म्हणाले.
त्याच्या बोलण्याने ससा अचंबित होऊन फक्त त्याच्याकडे बघत होता. आपण हरलो आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली म्हणून त्याला अजूनच वाईट वाटत होते.
"आपलं काय ठरलं होतं? शर्यत कोणीही जिंकलं तरीही आपली मैत्री तुटू द्यायची नाही. वाईट वाटून घेऊ नकोस. हा फक्त एक खेळ होता." कासव म्हणाले.
कासव आपल्याला चिडवत नाहीये हे बघून ससुल्याला हायसं वाटलं आणि दोघं पुन्हा खेळू लागले.
तात्पर्य:-
१. आपल्या आजूबाजूला असलेल्या संधीचा फायदा करून घेण्यात शहाणपण आहे.
२. दुसऱ्याला कमी लेखून अती आत्मविश्वास बाळगू नये.
१. आपल्या आजूबाजूला असलेल्या संधीचा फायदा करून घेण्यात शहाणपण आहे.
२. दुसऱ्याला कमी लेखून अती आत्मविश्वास बाळगू नये.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा