पुस्तके, माझे सखेसोबती

मी आणि माझी पुस्तके


मी आणि माझे वाचन..

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने..


वाचनाची सुरुवात कशी झाली , काही आठवत नाही.. पण लहानपणीचे ठकठक, चांदोबा विसरता येत नाही, त्यामानाने चंपक अगदीच पोरकट वाटायचे पण पुस्तक हातात घेतले कि अगदीच नाईलाज असेल तरच पूर्ण न वाचता खाली ठेवायचे हा बाणा तेव्हापासूनचा? त्या वेळेस आमचे आमच्या मजल्यावर exchange चालायचे.. त्यातून भांडणे देखील झाली आहेत, आमच्या पालकांची.. पण तरिही पुस्तकांची देवघेव थांबायची नाही. त्यातला सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे उन्हाळी सुट्टीत आजोळी जाणे.. तिथे दुसर्‍या मजल्यावर हाॅलमध्ये टिपाॅयखाली पूर्ण वर्षभराचे *झी* चे मराठी अंक असायचे . तेव्हा कधी प्रश्न पडला नाही कि हे वर्ष भराचे अंक रद्दीत न देता का ठेवले आहेत? कारण तेव्हा एवढे कार्यक्रम असायचे कि हा विचारच करायला मिळाला नाही..आता वाटते कि मावशी मुद्दाम ठेवायची का? कधी दुपारी खेळायचा कंटाळा आला कि ते सगळेच अंक वाचून काढायचे.. सुट्टीत ते ही वाचून झाले कि गच्चीवर असलेल्या कपाटात अनेक कादंबर्‍या होत्या.. ययाती,अमृतवेल अशा. पूर्ण 4,5 वर्षांचे एकत्र असे किशोर चे अंक होते.. या ठळक आठवणी.. सुट्टीत भरपूर वाचन हाही एक खूप मोठा आनंद होता.. कधी तरी चिऊमावशी? कडची मराठी किंवा सविताकाकींकडे असलेली वेगवेगळ्या भाषेतली अनुवादित पुस्तके.. राधिका, अभिषेक त्यांचा शुक्रवार पेठेतला चालणारे छोटेसे वाचनालय, दिपादिदी, मन्यादिदी? यांच्याकडे असणारी लहान मुलांची पुस्तके. बापरे त्या काळात असे वाटायचे कि पुण्यातच सगळ्यांच्या घरी पुस्तके असतात.. त्यातही झुंजार आणि विजयाची ओळख वामनेकाकांमुळे झाली. आणि काळेकाकांकडे तर देवी भागवत पासून सगळे वाचले आहे.. पण या आवडीला खऱ्या अर्थाने वळण दिले आमच्या शाळेच्या ग्रंथसंग्रहालयाच्या बाईंनी.. माझ्या दुर्दैवाने त्यांचे नाव आता आठवत नाही. पण आज घेतलेले पुस्तक दुसर्‍या दिवशीच परत देत असताना , त्याच्या लेखकाचे नाव त्यात काय आवडले हे सगळे लिहित असल्यामुळे त्यांनी वेगवेगळी पुस्तके वाचायला दिली. अनेकदा दुर्मिळ किंवा फक्त शिक्षकांसाठी असलेली पुस्तकेही मला दिली. बरेचसे पुल, रणजित देसाई मी शाळेत वाचले.. स्वामीची तर इतकी भुरळ पडली होती कि दहावी पास झाल्यावर मिळालेल्या रकमेत मी स्वामी विकत घेतले.. तीच अवस्था काॅलेज मध्ये.. science student असूनही मराठीची रॅक वरील सर्व पुस्तके वाचून झाली होती. त्या मुळे कधीतरी त्यांना माझे science चे iCard परत परत पहावेसे वाटे.. अरूण साधू, रत्नाकर मतकरी हे इथे वाचलेले ठळक लेखक.. नारायण धारप या आवडत्या लेखकाची आणि धनंजय या दिवाळी अंकाची ओळख बिल्डिंग मधल्या मैत्रिणींमुळे झाली..लग्नानंतर सासरची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सासूबाईंने दिलेले दादर सार्वजनिक वाचनालयाचे अधिकारपत्र.. यावर तर बापरे काय नाही वाचले.. शिरीष कणेकर, मिरासदार, विजया वाड, सुधा मूर्ती अशा अनेकांची बहुतेक सर्व पुस्तके इथे वाचली.. गेली सतरा वर्षे ह्या वाचनालयातील पुस्तके वाचायचा प्रयत्न चालू आहे.हळूहळू लेकिलाही वाचनाची आवड लागलीच होती.. पण तिला दासावा लांब पडायचे म्हणून जवळचे वसंत वाचनालय तिच्यासाठी सुरू केले. पण या lockdown मध्ये त्याचा सगळ्यात जास्त वापर मीच केला. जेफ्री आर्चर, जाॅन ग्रिशम यांची ओळख गेल्या 4,5 वर्षांचीच.. पण हेही बरेचसे वाचून झालेले..एका दिवसात पुस्तक कसे वाचून होते हे बर्‍याच जणांना पडलेले कोडे आहे. पण ट्रेन, बस यांतून प्रवास करताना बरेचदा पुस्तक वाचून होते.. माझ्या वडिलांना जेवताना पुस्तक लागायचे, मी अजूनही आधी वाचणेबल पुस्तक शोधते मग जेवायला बसते.. मोबाईल यायच्या आधी माझ्या लेकिलासुद्धा पुस्तक जेवताना लागायचे. अजूनही एखादे नवीन , छानसे पुस्तक आले कि ती वाचते.. पण नेहमी नाही.. या सध्याच्या विचित्र काळात फक्त आणि फक्त वाचनानेच तारले आहे.. म्हणून कृतज्ञतापूर्वक हा लेख सर्व लेखकांना, लेखिकांना अर्पण ??


सारिका कंदलगांवकर

दादर मुंबई