पुस्तक माझा मित्र मराठी निबंध (Essay In Marathi)

Essay Of Pustak Maza Mitra
मित्र म्हणजे सखा, सखा म्हणजेच सोबती आणि खऱ्या अर्थानेच मित्र हा आपल्या आयुष्यभराचा सोबती असतोच. मैत्रीचं नातं असतंच निखळ आणि निर्मळ. आपली बाजू समजून घेणारं, आपलं सगळं काही ऐकून घेणारं हक्काचं कोणीतरी म्हणजे आपला जिवलग मित्र! आता हा मित्र असो वा मैत्रीण नेहमी माणसाच्या रूपातच असेल असं नाही. काहींना झाडाशी मैत्री आवडते, काहींना पक्षी तर काहींना समुद्र आणि नद्यांशी असलेली मैत्री आवडते. माझाही असाच एक खास जिगरी दोस्त आहे तो म्हणजे "पुस्तक".
पुस्तक! एक पुस्तक जे आपल्याला ज्ञान देते, चांगले वाईट शिकवते, दुःखाच्या वेळी आधार तर आनंदाच्या वेळी आनंद द्विगुणित करते असे पुस्तक मित्र म्हणून का असू नये? असं म्हणतात एकवेळ माणूस बदलेल, काहीवेळा चुकीचा सल्ला देईल पण पुस्तक मात्र आपल्याला कायम योग्य मार्गावर ठेवतं. कुठेही न जाता, स्वतः काही न अनुभवता देखील बसल्या जागी सगळे अनुभव आपल्याला पुस्तक देतं.
पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरवात केली की, त्यात घडणाऱ्या घटनांचे आपण साक्षीदार असतो. आपल्या आयुष्यात जो प्रसंग आला असेल त्यानुसार पुस्तकातील प्रसंग आपण स्वतःच्या आयुष्याशी जोडतो आणि त्यानुसार आपल्या भावना व्यक्त करतो. नैराश्य वाटत असताना पुस्तक नकळत आपल्याला सकारात्मकतेचा मार्ग दाखवतो, चुकीचे निर्णय घेत असताना अनपेक्षितरित्या पुस्तक काहीतरी वेगळाच सल्ला देते आणि पुन्हा आपली त्याच्याशी घट्ट मैत्री होते.
असेच हे पुस्तक आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मला पुस्तक वाचण्याची गोडी इयत्ता चौथी पासून लागली. घरात आणि शाळेतही वाचनासाठी प्रवृत्त करणारे वातावरण माझ्या या मित्रासाठी अजूनच पोषक ठरले. आजवर असे अनेक प्रसंग आले जिथे या पुस्तकाच्या मैत्रीने मला सावरून घेतलं आहे.
शाळेची कोणतीही परीक्षा असो, स्पर्धा असोत वा कोणताही उपक्रम असो या पुस्तक मित्रामुळे मी खूप काही मिळवले आहे. रामायण, महाभारत, पंचतंत्र, इसापनीती, अकबर आणि बिरबल कथा या पुस्तकांशी तर माझी अगदी लहानपणापासून चांगलीच गट्टी आहे. प्रत्येक पुस्तक मला काही ना काही शिकवते, सांगू पाहते आणि आता मलाही त्यांची ही भाषा समजू लागली आहे.
आपल्याला वाटतं पुस्तक निर्जीव आहे पण असं नाहीये. प्रत्येक पुस्तक त्याची कथा बोलतं, अगदी माणसासारखे पुस्तकही आपल्याशी गप्पा मारते. त्याच्या पानांची होणारी फडफड नेहमी आपल्याला काहीतरी सांगू पाहते. आपण आनंदी असू तेव्हा ती फडफड वेगळी वाटते आणि जेव्हा आपण दुःखी असू तेव्हा तेच पुस्तक अगदी शांत असते. जशी जशी ही मैत्री घट्ट होत जाते आपल्यालाही पुस्तकाच्या भावना कळू लागतात.
पुस्तक अगदी निरपेक्ष मनाने फक्त आणि फक्त आपली ज्ञानाची भूक क्षमवत असतं. प्रवासात, एकांतात, गर्दीच्या ठिकाणी आणि अगदी उठता बसतानाही पुस्तक आपली साथ देत असतं. एक पुस्तक एकाचवेळी आपला मित्र, मार्गदर्शक, गुरू आणि आपल्या सगळ्यात जवळचा असा कोणीतरी अशी अनेक नाती निभावते.
पुस्तकाच्या साथीने आपण अगदी सातासमुद्रापार असलेली ठिकाणं अनुभवू शकतो, तेथील ज्ञान संपादन करू शकतो. पुस्तक हाच एकमेव असा सखा आहे ज्याच्यावर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. प्रत्येक संकटातून, परिस्थितीतून आपल्याला "वाचवायचं" काम पुस्तक करू शकते फक्त आपल्याला पुस्तक "वाचता" यायला हवं. एकदा ही गोडी लागली की या सवंगड्याच्या सोबतीत आपण किती वेळ गुंतवला हे कळतही नाही. हो! इथे वेळ गुंतवला असंच मी म्हणेन कारण पुस्तक कधीही आपला वेळ वाया घालवत नाही.
मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी माझ्या आईने माझं आवडतं गोष्टीचं पुस्तक मला दिलं होतं त्या दिवशी ते पूर्ण वाचूनच मी बाजूला ठेवलं होतं. हा असा एक मित्र आहे ज्याच्या सानिध्यात कायम राहावं वाटतं. याने आपली आणि आपण याची साथ कधीही सोडू नये अश्याच भावना पुस्तक हातात आल्यावर येतात.
आजच्या डिजिटल युगात आपल्याला मोबाईल, टॅब, लॅपटॉप अश्या इलेक्ट्रिक साधनांवर देखील पुस्तक वाचता येते पण जी मजा हातात पुस्तक घेऊन वाचण्यात आहे ती यात नाही. नवं - कोरं पुस्तक हातात आल्यावर त्याचा येणारा तो सुगंध श्वासात साठवून, नवीन पानांचा स्पर्श अनुभवत वाचन करण्यात जी मजा आहे ती काही औरच!
बरं या पुस्तक मित्रांमध्ये सुद्धा किती ते प्रकार! अगदी माणसाच्या स्वभावानुसार पुस्तकाचे स्वभाव पण असतात बरं का! ऐतिहासिक पुस्तकांचा चिकाटी, पराक्रमी असलेला स्वभाव, वैज्ञानिक पुस्तक म्हणजे जिज्ञासू वृत्ती, विनोदी स्वभाव असलेली विनोदी कथांची पुस्तके आणि अशी बरीच पुस्तकं आपल्याला काही ना काही शिकवत असतात.
ऐकिहासिक पुस्तकातून आपण आपला इतिहास शिकतो सोबतच पराक्रमी वृत्ती देखील आपोआप आपल्यात रुजत जाते. वैज्ञानिक पुस्तक आपल्याला सतत काळाच्या बरोबर चालायला शिकवते तर जीवनातल्या सगळ्याच गोष्टींचा जास्त ताण न घेता कसं हलकं फुलकं जीवन जगायचं हे आपल्याला विनोदी पुस्तक शिकवते.
लेखन ही एक कला आहे आणि लेखक त्याची ही कला त्याच्या पुस्तकातून आपल्या समोर सादर करत असतो. आपली वाचण्याची आवड आणि अभिप्राय हाच लेखकाचा खरा मोबदला असतो. जो लेखक आपल्याला एवढं छान काहीतरी वाचण्यासाठी उपलब्ध करून देतो त्याचं साहित्य वाचून आपल्या आयुष्यात जे काही चांगले बदल होतात त्याच्या या प्रयत्नांना आणि कष्टाला न्याय मिळवून देणे म्हणजेच जास्तीत जास्त वाचन करणे.
वाचनामुळे आपण तर समृध्द होतोच शिवाय समाजही प्रगल्भ होतो. चांगले वाईट ओळखणे माणसापेक्षा पुस्तक जास्त शिकवते. एक पुस्तकच तर असे माध्यम आहे ज्यातून आपण फक्त आणि फक्त ज्ञानाचा अमाप खजिना लुटू शकतो आणि तोही कोणत्याही अडथळ्या शिवाय.
वाचन म्हणजे शब्दांच्या समुद्रात यथेच्छ पोहत राहणे. नवनवीन विषयांच्या लाटांवर स्वार होऊन मन भरेपर्यंत मुक्त संचार करत राहणे. या समुद्रात नवीन शब्द हे जणू शिंपल्यातल्या मोत्याच्या स्थानी असतात. एकाच अर्थाचे शब्द हे ऑक्टोपसचे बाहू तर लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे या सागराची अथांगता. ही अथांगता पुढे जात राहिल्यावर अजूनच खोल खोल होत जाते.
पुस्तक हा मित्र अजून खूप भारी आहे बरं का! हा असा एकमेव मित्र आहे जो आपली कोणाशीच कधीच तुलना करत नाही. हाच मित्र आपल्याला बोट धरून ज्ञानाच्या मार्गावर चालायला शिकवतो. अनेक व्यक्तींचे अनेक स्वभाव एकाच मित्राकडून आपल्याला कळतात. मनोरंजन + ज्ञान = पुस्तक एवढा सरळ सोपा अर्थ किंवा सूत्र म्हणजे आपला हा मित्र!
या मित्राच्या काही अपेक्षा सुद्धा नसतात. फक्त त्याला हातात घेऊन मायेने कुरवाळले, छान कव्हर घातले आणि मनापासून त्याचं वाचन केलं की हा मित्र खुश असतो. कधीकधी हा आपल्या मित्र - मैत्रिणींच्या (आपल्या मानवी मित्रांच्या) घरीही आनंदाने जातो आणि त्यांचाही मित्र होतो.
पुस्तक वाचन हे एक असे माध्यम आहे ज्यातून आपण एकाचवेळी अनेक पात्र स्वतः अनुभवू शकतो. प्रत्येक कथा वाचताना आपण स्वतः त्या पात्राच्या जागी स्वतःला ठेवून त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि एकाच जन्मात बऱ्याच भूमिका जगू शकतो. ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त त्या पुस्तकामुळे आणि त्याच्या लेखकामुळे मिळते.
"वाचाल तर वाचाल" ही म्हण काही उगाच नाही पडली. जेवढं आपलं वाचन प्रगल्भ तेवढेच आपले विचार आणि कृती योग्य मार्गावर राहते. विचारांच्या सीमा विस्तारण्यासाठी, आपल्या कल्पकतेला नवी उमेद देण्यासाठी पुस्तकांचे कार्य महत्त्वाचे ठरते. पुस्तक म्हणजे एक असा सखा जो फक्त आणि फक्त देत राहतो. म्हणूनच सगळ्यांना त्याच्यासारखा मित्र लाभावा असे मला वाटते.

"पुस्तकाच्या पानापानांवर प्रेम जडू दे
वाचनात सदा मन गुंतून राहूदे
मिट्ट काळोखात एक किरण दिसू दे
पुस्तकाच्या सोबतीने आयुष्य उज्ज्वल होऊ दे"