Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

पुष्पांजली

Read Later
पुष्पांजलीकथेचे नाव:- पुष्पांजली
विषय_ ती हसली
फेरी :- राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा


"सई, अगं फुले आण लवकर. आजीला उशीर होतो आहे पूजेसाठी."
पण, सईचे लक्षच नव्हते.
शेवटी शलाका गेली बघायला . तर ती एक- एक फूल चुरगाळून फेकत होती. फारच नाराज दिसत होती.
शलाका धावत तिच्या जवळ गेली आणि तिला छातीशी कवटाळून बसली.

मनात आलं ,सईला मी जन्म दिला नाही. म्हणून काय झाले ?
" सई असं वागू नये. ही छान छान फुले असतात ना. मग त्यांना असं फेकू नये. तू रोज असे का करते गं? "
"तुला माहित आहे ना की मला फुले आवडत नाही म्हणून. तरीही मला तू रोज हेच काम का सांगतेस?"

एवढे बोलून तिने रागाने मान वळवून घेतली. काहीही विचारले तरी पण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ती देत नव्हती. घरी आणल्यानंतरही सईचे वागणे जरा खटकत होते. एकही दिवस हसली नाही की आनंदी झाली नाही.
"अगं ,शलाका..."
" हो आलेच आई... "
शलाकाने पटकन फुले गोळा केली आणि सासुबाईंना नेऊन दिली. पण, तरीही सई तिथेच बसून होती.
सासुबाईंनी पुजा आटोपली आणि पडवीत आल्या. त्यांनी जे काही तोंडाचा पट्टा सुरू केला की शलाकाचा सुध्दा पारा चढला. नंतर मात्र शलाकाने सासुबाईंची माफी मागितली.

"आई, सई मुळे आपल्यात वाद नको व्हायला. "

सुशांत आणि शलाका खूपच आनंदी जोडपं होतं. एकाच कंपनीत नोकरी करीत होते. त्यामुळे दोघेही कामानिमित्त सतत भेटायचे आणि कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते कळलेच नाही.

संसार सुरू झाला. पण, काही दिवसांसाठी शलाकाने नोकरीतून ब्रेक घेतला होता. कारण, आई व्हायचंय स्वप्न ती बघत होती.

शलाका आणि सुशांतच्या लग्नाला जवळपास सात वर्षे पूर्ण झाली होती आणि घरात पाळणा हलायचे काहीच लक्षण दिसेना. अनेक ठिकाणी उपचार घेतले. पण, निराशा मात्र पाठ सोडत नव्हती.
आयुष्यात सगळ्या गोष्टी पुरक होत्या. कमी होती ती एका वरदानाची आणि नेमकं तिच्या पदरात आईचं दान टाकायला देव बहुधा विसरला असेल.
सुशांत मात्र शलाकाला कधीच दुखवत नव्हता. पण, समोर असलेल्या या कोत्या मनाच्या लोकांना कसे समजावे.

शेवटी दोघांनी मिळून एक निर्णय घेतला. मुल दत्तक घेण्याचा. पण, शलाकाच्या सासुबाईंना म्हणजे मालतीताईंना ही गोष्ट मान्यच नव्हती.

त्यांचा विरोध पत्करून काहीही करणे अशक्य होते.

पण, दिवसेंदिवस शलाका दुःखी राहू लागली. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते.

शारिरीक आजारापेक्षा तिला मानसिक आजार जास्त सतावत होता. शेवटी डॉक्टरांनी सांगितले. की जर ती यातून बाहेर पडली नाही तर मात्र आपल्या हातात निराशाच येईल.

शेवटी आईचा विरोध पत्करून सुशांत शलाकाला एका अनाथाश्रमात घेऊन गेला. तेथील वातावरणात ती आपलं दुख विसरून गेली. सुशांत आपल्या सोबत आहे, हे सुध्दा विसरून गेली.

नुकतेच पंखात बळ आलेल्या त्या अनाथ पिल्लांना बघून तिचे मन गहिवरून आले.

एवढे एवढे चिमुकले हात कसे निराधार होतात. कठोर काळजाचे लोक या देवाच्या वरदानाला कसे नाकारू शकतात. ही चूक कोणाची? वयाची चूक की फक्त शारिरीक आकर्षणाची चटक. कुटुंबात असणाऱ्या मतभेदाची की संघर्षाची?

शी! एकाही प्रश्नाचे नीट उत्तर नव्हतेच. पण, विचार करत असतांनाच सर्व मुले तिच्या जवळ आली. एका मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेली ते निरागस हात तिच्या भोवती गोळा झाले.

हातात असलेली बिस्किटे आणि चाॅकलेट बघून त्यांचा चेहरा टवटवीत फुलांप्रमाणे झाला होता. सगळ्यांना चाॅकलेट , बिस्किटे वाटून झाली. पण, त्यातही एक मुलगी मात्र एका कोपऱ्यात उभी राहून छोट्याशा बगीच्यात लावलेल्या फुलझाडांकडे ती सारखी एकटक बघत होती.

एवढीशी छोट्या छोट्या दोन वेण्या घातलेली आणि हाताची घडी घालून उभी असलेली ती मुलगी शलाकाला खूपच आवडली.

तेवढ्यात सुशांत आणि आश्रम सांभाळणाऱ्या आशा ताई आल्या.
"कसं वाटतं आहे शलाका इथे येऊन ?"

" ताई मला खूपच आनंद झाला आहे. पण, एक विचारू का? त्या झाडाजवळ असलेली ती मुलगी अशी नाराज का दिसते ? तिच्या चेहऱ्यावर ना हसू ,ना आनंद. कोणतीच भावना दिसत नाही . असे का?"

शलाका येथे येऊन खूप आनंदी झाली. हे बघून सुशांतला हायसे वाटले.

" हो, ती मुलगी आठ दिवसांपूर्वीच आली आहे. सई तिचे नाव. आई वडीलांचा एका अपघातात मृत्यू झाला आणि ही वाचली. घरी म्हातारे आजी आजोबा. पण, त्यांची तयारी नाही तिला सांभाळायची. इतर कोणीच नातेवाईक समोर आले‌ नाहीत . शेवटी तिला या आश्रमात आणून सोडले.

पाच सहा वर्षांची चिमुरडी. पण, स्वतः ला स्वतः मध्ये हरवून बसली आहे. तिला आधाराची गरज आहे. तिला एका विश्वासाची गरज आहे. मायेचा हात पाठीवरून फिरविणारी एक आई हवी आहे. बघुया कोण समोर येतंय ते",.....आशाताई

"ताई ,मी नेऊ हिला आमच्या घरी? मी काळजी घेईल तिची."

"हे बघा , तुम्ही जर तिला खरोखरच दत्तक घेणार असाल आणि आई वडिलांचे प्रेम देणार असाल . तरच आपण पुढे जाऊया. कारण, त्यांना जर तुमची सवय झाली आणि नंतर तुम्ही नको म्हणालात तर असं चालणार नाही. तिच्या निरागस बालमनावर विपरीत परिणाम नको व्हायला."

सुशांत काही बोलणार. पण, शलाकाने तिचा निर्णय सांगून टाकला आणि त्या मुलीकडे गेली.

" मिस्टर सुशांत, तुमच्या पत्नी फारच भावनिक झाल्या आहेत. पण, असे चालणार नाही. तुमचा निर्णय ठाम असला तरच आम्ही मुलांच्या जवळ जाऊ देतो. "

"हो ताई मला कळले आहे. आम्ही आमचा निर्णय कळवतो",.... सुशांत.

सुशांत शलाकाला घेऊन घरी आला. पण, घरी आल्यापासून ती सतत सईच्या गोष्टी करू लागली. तिच्या सोबत काढलेले फोटो सतत बघू लागली. तिच्यात एवढी गुंतली की शलाकाला काहीच सुचत नव्हते. ती तर सईला घरी आणण्यासाठी सुशांतच्या मागे लागली.

"सुशांत आपण सईला दत्तक घ्यायचे ना ? कधी जायचे तिला आणायला? ".... शलाका

"हो मी कागदपत्रे तयार करत आहे. दोन चार दिवसात होईल पूर्ण आणि आईलाही सांगितले आहे. त्यामुळे काळजी करू नकोस",.... सुशांत


दहा बारा दिवसांनी त्यांनी सईला घरी आणले गेले. तिच्यासाठी पायघड्या घातल्या होत्या. तिचे औक्षण करून तिचे स्वागत केले गेले.‌

सई घरात आल्यापासून शलाका तर सतत तिच्या मागेपुढे करायची. तिला प्रत्येक गोष्ट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करायची. एका आईचं प्रेम एका निराधार मुलीला देऊन तिला आपलसं केलं. पण , एवढं सगळं करूनही ती सतत दुःखी राहायची. तिच्या आनंदासाठी ती वाटेल ते करायची‌. पण, तिचे मन कशातच लागत नव्हते. मालतीताई देखील तिच्यात रमू लागल्या. तिला छोटी छोटी कामे सांगायच्या. पण, तरीही तिच्या मनातले निराशेचे मळभ दूर होतंच नव्हते.

एके दिवशी अचानक शलाकाचा पाय घसरला आणि डोक्याला मार लागला. तिचे रक्त पाहताच सई घाबरली. तिने लगेच एका रुमालाने रक्त पुसले आणि तिला चिकटली. नकळत तिच्या तोंडून शब्द निघाले.
"आई, तुला जास्त लागले नाही ना ? माझी एक आई आणि बाबा मला असेच सोडून गेले. त्यांना पण रक्त आले होते. तू नाही ना जाणार कुठे?"
"नाही गं , बाळा मला काहीच झाले नाही. पण, तू मला आई म्हटले मला फार आनंद झाला.
" हो आजपासून मी तुला आई आणि तुझ्या सोबत ते काका.... काका नाही. त्यांना मी बाबा म्हणणार. तुम्हीच माझे आई बाबा आहात. "


"आई म्हणणार ना मला मग एका प्रश्नसचं खरं उत्तर दे पाहू, तू नेहमी फुलांवर का राग काढतेस? ती तर‌ किती नाजूक असतात. फुले आपल्याला आनंद देतात. आपल्याला सुगंध देतात. "

" हो पण, एकदा आम्ही गाडीवरून पडलो. माझ्या आई बाबांना थोडेसे रक्त आले. म्हणून त्यांना दवाखान्यात नेले आणि जेव्हा ते परत आले ना. तेव्हा ती दोघेही झोपलेली होती आणि खूप सारी फुले माझ्या आई आणि बाबांच्या अंगावर देखील टाकली होती. बरेच लोक फुले चढवतच होती. खूप साऱ्या फुलांनी सजवले आणि काही लोकांनी त्या दोघांना माझ्या पासून दूर घेऊन गेले. कुठे घेऊन गेले मला माहित देखील नाही. मी त्यांची खूप वाट बघितली. पण, ते परत आलेच नाही. म्हणून ही फुले मला कधीच आवडत नाही."
सईला हुंदका दाटून आला. सईचे हे बोलणे ऐकून शलाका , सुशांत आणि मालतीताईंना मोठा धक्का बसला.

शलाका ने तिला जवळ घेतले.

" सई बेटा आपण आपल्या देवाला फुले वाहतो ना ! शिवाय तुला टि.व्ही. बघतांना दिसले असेल की ही फुले सत्कार करताना देतात. जो मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा स्पर्धेत पहिली आली, तिचा सन्मान करतांना विविध प्रकारची फुले‌ वापरून त्याचा गुच्छ बनवतात. देशासाठी ज्या लोकांनी आपले प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या शरीरावर सुध्दा फुले ठेवून सन्मान करतात. अगं ही फुले फक्त फुले नसतात तर ते विकून शेतकऱी आपले घर चालवतात . शिवाय लग्नासारखे मोठ्या समारंभात या फुलांचीच सजावट करतात की नाही. आजारी माणसाला जर एखादे फुलं दिले तरी त्याला प्रसन्न ‌वाटते बघ. आपली ही फुलांनी भरलेली ओंजळ बघ किती सुंदर दिसते.!"

शलाकाने तिला छातीशी घट्ट पकडले आणि म्हणाली "आता यापुढे असे बोलायचे नाही.
अगं, तुझे आई बाबा देवाला खूप आवडले. म्हणून ते तिकडे निघून गेले आणि त्यासाठी इथल्या लोकांनी फुले चढवून त्यांचा सत्कार केला गेला. आता ते देवबाप्पाची सेवा करणार आहे. तेव्हा तू आता बिल्कुल रडायचे नाहीस."

"हो आई आजपासून मी कधीच अशी वागणार नाही. या पुढे मी फुले चुरगळणार नाही. . . . या फुलांपासून मी कधीच दूर होणार नाही. या फुलांची मी रोज माळ बनवेल देवबाप्पासाठी." असे म्हणत ती हसली.

तिच्या हसण्याने शलाकाचे घर उजळून निघाले.
चिमुकल्या सईच्या हसण्याने परत एकदा घर जणु फुलांच्या माळांनी व आनंदाने सजले होते. फुलांची ओंजळ सुखाने भरली होती.

©®आश्विनी मिश्रीकोटकर
टीम ईरा _ संभाजीनगर (औरंगाबाद)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//