काहीवेळाने त्याचे बाबा आत आले आणि त्याला म्हणाले, "सुजय, असं संध्याकाळच्या वेळी का झोपला आहेस? ऑफिसमध्ये खूप काम होतं का? दमलेला दिसतो आहेस.""हं... अं... हो बाबा, आता मंथ एंड आहे ना त्यामुळे कामाच प्रेशर. ""आणि इथे घरी आल्यावर इथल्या प्रेशर कूकरची शिट्टी वाजली" असं म्हणत बाबा हसले आणि पुढे बोलू लागले "आजच्या सासुसूनेच्या धुमश्चक्रीच कारण माहित आहे का तुला? घरातली भांडी...""भांडी??" - सुजय"हो भांडी. घरातली जुनी भांडी सूनबाईनी काढून टाकूया , अडगळ कशाला म्हणत आपल्या मोलकरणीला द्यायला काढली तर त्यावर तुझी आई भडकली. तिने तिचा संसार उभा करताना एक एक करून जमवलेली ही भांडी ज्यात तिचा जीव अडकला आहे ती अशी देऊन टाकणं पटलं नाही. आता यात स्वातीची ही काही चूक नाही. तिला जर तिचा संसार तिच्या पद्धतीने करायचा असेल, सजवायचा असेल तर तिची ही अपेक्षा अगदीच योग्य आहे. तिला जर तिच्या आवडीची नवीन भांडी, नवीन वस्तू आपल्या स्वयंपाकघरात आणायच्या असतील तर यात काही गैर नाही. दोघीही आपापल्या जागी योग्य आहेत पण आपलं म्हणणं खरं करण्यासाठी मोठमोठ्याने बोलणं, एकमेकांवर आवाज चढवणं, रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलणं यामुळे मूळ मुद्दा बाजूला च राहतो आणि भांडण विकोपाला जाते. अशा वेळी दोघींपैकी एकीने तरी त्यावेळी शांत राहणं गरजेचं असतं पण नेमकं अशा वेळी या सासुसूना आपला अहंकार जपत माघार घ्यायला बघतच नाहीत आणि मग उगाच वाद वाढतो. आजही तेच झालं. खरंतर आज इतकं भांडण व्हावं इतका गंभीर मुद्दाच नव्हता पण शब्दाला शब्द वाढत गेला आणि भांडण झालं... त्यात आई स्वातीला रागाच्या भरात आता माझ्या सुजयला तू तुझ्या ताटाखालच मांजर करून ठेवलं आहेस असं म्हणाली आणि हे ऐकून स्वातीचा ताबा सुटला आणि मग तीही काहीबाही बोलली आईला" बाबा सांगता सांगता मध्येच थांबले.एक दिर्घ उसासा घेत बाबा कुत्सित पणे हसत पुन्हा बोलू लागले, " आणि म्हणे पुरुषप्रधान संस्कृती.... तुला सांगतो सुजय हे फक्त बोलण्यापुरतं आहे, पुरुषप्रधान संस्कृती वैगरे. खरंतर आपण पुरुष आपल्या जन्मापासून आयुष्यभर या स्त्रियांच्या आदेशावर, त्यांच्या मर्जीनुसारच वागत असतो. बघ ना!! लहान असतो तेव्हा आपल्या आईचा आदर्श मुलगा बनण्यासाठी तिची मर्जी सांभाळतो आणि मग लग्न झालं की आपला हात धरून आपल्या घरी आणलेल्या आपल्या बायकोला खुश ठेवण्यासाठी तिची मर्जी राखतो. बरं.... आणि लग्नानंतर या दोघींमध्ये कधी खडाजंगी झाली तर कुणाची बाजू घ्यायची या विवंचनेत आपण आपलं मत गुंडाळूनच ठेवतो कारण आपल्याला दोघीही आपल्या हृदयाच्या तितक्याच जवळच्या असतात. कुणालाही आपल्याला दुखवायचं नसतं. बाहेर जाऊन काम करा, तिथली टेन्शनस सांभाळा आणि घरी येऊन जर असे वाद कानावर येणार असतील आणि घरातलं वातावरण बिघडत असेल तर आपण आपलं दुःख घेऊन जाणार कोणाकडे?? या बायकांचं बरं आहे रे!! यांना दोन दोन घरं असतात. सासरी काही बिनसलं तर रुसून माहेरी निघून जायचं पण आपण??? आपल्याला हे एकच घर. आता या सगळ्यात जर आपल्या नवऱ्याला समजून घेत त्या आई आणि बायकोने त्यांच्यात होणारे हे छोटे मोठे वाद त्यांच्यातच वेळच्या वेळी मिटवले आणि मनात काहीही न ठेवता घरातलं वातावरण कसं आनंदी आणि प्रसन्न राहील यासाठी प्रयत्न केले तर या जगातले सगळे विवाहित पुरुष खऱ्या अर्थाने आनंदी होतील... हो ना!! असो... पण तू आता या सगळ्याचा जास्त विचार करत बसू नको. या कौटुंबिक गोष्टी अशा जास्त मनाला लावून नाही घ्यायच्या नाहीतर आपण सकाळी कामासाठी बाहेर पडताना चिंता, काळजी हे सगळं सोबत घेऊन कामाला जाशील आणि तिथल्या आपल्या कामावर त्याचा वाईट परिणाम होईल. आपण कुठे थांबायचं हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे. उठ, जेवायला ये आणि आज हे सगळं तुला समजावून सांगण्याचा उद्देश म्हणजे आज म्हणे जागतिक पूरूष दिवस आहे. एका पुरुषाचं हे दुःख एक पुरुष च समजू शकतो म्हणून तुला आजच्या या जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा... बरं का!!" म्हणत बाबा हसत बाहेर निघून गेले.
बाबा कित्ती खरं आणि योग्य बोलले ना?? आपण स्त्रिया सगळे फक्त आपल्या दुःखाविषयी च कायम बोलत असतो, आपल्याला काय काय आणि किती किती सहन करावं लागतं असं म्हणत कायम आपल्या नवऱ्याच्या मागे किंवा मुलाच्या मागे भुणभुण करत असतो पण या सगळ्यात त्याचं काय होत असेल याचा आपण कधी विचार केला आहे का? आपल्यासाठी सकाळ ते संध्याकाळ बाहेर दिवसभर राबून तो जेव्हा घरी येतो तेव्हा बायकोचा हसरा आणि आईंचा समाधानी चेहरा बघायला मिळावा इतकी माफक अपेक्षा असते त्याची. आपल्यात होणाऱ्या लहान मोठ्या कुरबुरी शक्यतो आपण आपल्यातच मिटवल्या आणि त्याची झळ घरतल्या या कर्त्या पुरुषाला न लागू दिली तर रोज सकाळी घराबाहेर पडताना तो आनंदी आणि प्रसन्न मनाने त्याचं काम करायला जाऊ शकेल. गैरसमज तर प्रत्येक नात्यात होतात त्यात सासू सूनेच नातं म्हणजे अगदीच नाजूक पण आई आणि बायको यात कोणाला निवडायचं यासारखा कठीण प्रश्न कुठल्याही विवाहित माणसाच्या आयुष्यात येऊ नये.. आपलं ही काही अंशी चुकत च. लग्न झाल्यावर सुरुवातीला आपण एक चांगली सून होण्याच्या नादात नको तितकं चांगलं वागतो आणि आपणच अपेक्षा वाढवून ठेवतो आणि मग काही वर्षांनी या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत म्हणून मग असे लहान मोठे वाद प्रत्येक घरात होऊ लागतात. त्यात एक आई म्हणून त्या आईने आपल्या मुलाला त्याच्या संसारात मोकळीक द्यायलाच हवी. आईंचा मुलगा आता एका बायकोचा नवरा झाला आहे हे सत्य मान्य करून त्यांना त्यांचा संसार त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्यायला पाहिजे.. आणि त्यासाठी आपण स्त्रियांनीच जरा सांभाळून घेतलं पाहिजे कारण आपण ठरवलं तर सगळं काही शक्य आहे आणि इथे प्रश्न तर आपल्याच माणसाचा आहे...