पुरुषासारखा पुरुष असून. . . ! ( भाग -५)

Struggle of a man in his life.


(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून. . . !

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

(भाग -५ )
कथा पुढे -

शोभित आधीच तणावात आहेत ते त्याला माहीत होतं ,अशी पुन्हा एखादी तणावपूर्ण गोष्ट असेल तर कशाला?

म्हणून दिलीप म्हणाला" अरे माधव अर्जंट नसेल तर राहू दे णं एवढं काय? पुन्हा कधी बोलू."

" पुन्हा कधी बोलायचं ? की बोलायचेच नाही ते माझ्या मनावर आहे, पण वाईट वाटलं तरी चालेल पण शोभित अापला यार आहे , त्याला सांगितल्याशिवाय मला राहावलं जात नाही!"

मग शोभित दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, " माध्या सांग काय ते, मोकळेपणाने. "

"आता शोभ्या नाव काय तिचं? हाँ , शर्वरी म्हणजे तुझी बायको ! सॉरी वहिनी! घरी कशा राहतात मला माहीत नाही. . . पण ऑफिसमध्ये खूप मॉड राहतात हे माहिती का तुला ?"

" माहीत आहे ना , मी सकाळी लवकर जातो व ती तिच्या ऑफिसला मी गेल्यानंतर जाते . तर सकाळी जाताना मी तिला पाहत नाही पण रात्री परत आल्यावर तर पाहतोच ना! हो , राहते ती मॉड . . . काय म्हणणार? आवडतं तिला व हा तिच्या प्रोफेशनचा भाग आहे असं ती म्हणते."

"एवढं स्पष्टीकरण वगैरे नकोरे , म्हणजे. . . नाहीरे असं काही नाही. प्रोफेशनचा भाग म्हणता नाही येणार कारण त्या कंपनीतल्या दुसऱ्या कितीतरी मुली दाखवतो ज्या तेच काम करतात पण सरळ राहतात म्हणजे सहकर्मचारी म्हणून सोबत राहतात, पण सोबर राहतात. पण वहिनीचं ?"

" म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय ? स्पष्ट सांगच!"

"शोभित , सांगायचं असं होतं की मागच्या आठवड्यात त्यांच्या सी ई ओ ने एक पार्टी दिली होती . पार्टी म्हणजे सगळीच पार्टी! ओली -सुकी सगळीच एकत्र!"

" हो, सांगितलं होतं तिने मला ."

" तिथे थोडा पंगा . . . झाला होता . . "

" काय भाषा आहे ही माध्या ? हे काय ? कसला पंगा?"

माधव व शोभितचं बोलणं ऐकून दिलीप खूप तणावात होता म्हणजे कुठल्या क्षणी बोलण्यात काहीतरी खाली वर होईल आणि शोभित दुखी होईल ही काळजी होती.

"शोभ्या , तुला नाही माहिती की काय झालं होतं ?"

"माझं सोड पण शर्वरीच्या ऑफिस मधलं तुला कसं माहीती ?" शोभित आधीच स्वतःच्या भावना सावरत होता त्यात हे काही नवीनच होतं.

" शोभित, तर ऐक , तिच्या कंपनीत म्हणजे एसपी आयटी सोल्युशन मधे माझा एक खास मित्र सिनियर टीम लीड आहे . \"तुला कसं माहिती?" तुझा प्रश्न योग्य आहे , पण मला अजून बरंच काही माहीत आहे आणि हो , जे मला ठाऊक आहे ते जर तुला ठाऊक असेल तर ठीक. . . . पण नसेल तर मात्र काळजीची गोष्ट आहे."

"माधव , प्लीज स्टॉप दिस !" शोभितच्या अगोदर दिलीपच ओरडला.

शोभित जागेवरून उठला व हॉलमधे जाऊन चकरा मारायला लागला. खेळीमेळीचं वातावरण तनावाने भरून गेलं.

दिलीपमाधवला हळूच म्हणाला की "शोभित आधीच खूप टेंशनमधे आहे , त्याला हर्ट करू नको."
"तो आपला दोस्त आहे. त्याल हर्ट नाही पण रिअलायझेशन करू देत ना की तो खूप चुकीच्या जाळ्यात अडकलाय."

"काऽऽय ? खरं आहे हे सगळं. . . ?"

" होय सगळं खरंच आहे . मला बरेच दिवसांपासून गोष्टी कळतायत पण खात्री झाल्याशिवाय नको म्हणून मी तुला काहीच बोललो नाही. लेट हिम फेस रिअॅलिटी दिलीप!"

"काय रिअॅलिटी माधव? सांग तरी!" शोभित अगतिक होवून आत आला व त्याने माधवच्या खांद्यांना पकडलं.

"तर ऐक शोभ्या , भानावर ये. ती तुझी शर्वरी म्हणजे वहिनी तुला फसवतेय . . . चिटींग करतेय. अॉफिसातल्या खुराना बरोबर अफेअर चालू आहे तिचं . . . ओपनली!"

शोभितच्या पायखालची जमीनच सरकली. काहीतरी गडबड आहे हे कळायचं त्याला पण नेमकं माहित नव्हतं .
यादरम्यान दारूच्या नशेत ती शोभितचं म्हणजे नवर्‍याचं नाव सोडून कुणाचंही नाव घेत होती. त्या आतिश किंवा खुराना हे त्याने सुद्धा खूपदा ऐकलं होतं.
पण मान्य तरी कसा करणार. .

"माध्या. . . काहीपण काय बे !" शोभित ओरडला पण त्या ओरडण्यात काहीच दम नव्हता.

" मान्य कर शोभ्या व तिचा नाद सोड , ती काही संसार वगैरे करणार नाही तुझा! तू सावरावं म्हणून सांगतोय मी तुला. तिची इमेज अतिशय हॉट व फ्लर्ट एच आर म्हणून आहे. ती आता कुठे आहे ? कल्पना आहे का?"

" हो मैत्रिणीकडे गेलीय."

" अगदी बरोबर! बॅग वगैरे नेलीच असेल की सोबत । ? कारण वीकेंड व एक सुट्टी जोडून आलीय म्हणून तिच्या सिनीयर बरोबर रिसोर्टला गेलीय ती.हो म्हणजे मैत्रिणीकडून तिकडे जाणार आहे . माझी गर्लफ्रेंड पण त्याच कंपनीत आहे. व तिची चांगली शेअरिंग आहे वहिनींबरोबर!"

आता मात्र शोभित पुन्हा त्या सकाळच्या उद्विग्न मूडमधे आला आणि रडायला लागला. दिलीपने त्याला आधार दिला.

" दिलीप . . . हे सगळ्यात वाईट दुःख आहे जे पुरुष बाहेर सांगू शकत नाही. आपली बायको दुसर्‍या बरोबर?. . . नवीन लग्न आहे रे अजून. . . आमचंच सूत जुळलं नाही असं समजत होतो पण. . . माधव मला कळालं तरीही काय तोंडाने सांगणार मी हे बाहेर? सगळे कायदे बायकांच्या बाजूने अाणि सगळी सहानुभूती पण बायकांच्या बाजूने असणार. दिलीप यार मी का रडतोय यार? . . . कसली सुंदर बायको मिळाली म्हणून नशीबावर गर्व करत होतो पण हे काय आहे यार?"

शोभित खूपच रडत होता. दोघांना कोणत्या शब्दांत सांत्वन करावे ते कळतच नव्हतं .

क्रमशः


लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - १७.११ .२२


🎭 Series Post

View all