पुरुषासारखा पुरुष असून. . . . ! (भाग -३)

Struggle of a man.


(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून. . . !

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

( भाग -३ )
कथा पुढे -

दिलीप आणि शोभित आत बेडरूम मधे असेच पलंगाला टेकून बसले होते. शोभित कुठेतरी हरवला होता आणि दिलीप मोबाइल स्क्रोल करत बसला होता. दिलीप खूप बेचैन होता कारण नेमकं शोभित ला काय झाले ते त्याला माहीत करून घ्यायचं होतं, पण शोभित मोकळेपणानं बोलत नव्हता.
लग्न होण्यापूर्वी कसं सगळेच सगळ्यांना जे आहे ते सांगायचे. . . मनातलं, मोकळं व्यक्त करायचे. मग ते प्रेम असो, राग असो, द्वेष असो की उदासी!

पण गेल्या सहा महिन्यांमध्ये अचानक ही फूट पडली होती . शोभितचं लग्न झालं व त्याने वेगळा फ्लॅट घेतला .

इतक्यात दिलीपचा फोन वाजला.
फोनवर माधव होता .दिलीपला तो विचारत होता की नाश्ता केला का ?

दिलिपने इशारा केला व शोभितला नाश्तयाला थांब असं सांगितलं.

" तुझ्यासाठी काय आणु रे ? " माधव तिकडून

"काहीही घे आपल्या आवडीचं पण ते पार्सलच आण खायला. आणि हो तिघांसाठी आण!"

" तिघांसाठी ? कोण आलंय ब्बाॅ?"

"कुणी नवीन नाही रे . . शोभित आलाय. ये लवकर !\"

" अरे व्हा व्हा . . . सुट्टीच्या दिवशी आपल्या वाटय़ाला आला म्हणायचा, नाश्ता घेऊन येतो अर्ध्या तासात , त्याला थांबायला सांग बरं!" माधव आनंदात.

दिलीप, शोभित आणि माधव तिघेजण याच घरी तर एकत्र राहायचे .
तिघे तीन ठिकाणचे असले तरीही नोकरीच्या निमित्तानं सोबत झाल्यामुळं चांगली मैत्री होती.

शोभित व माधवची पूर्वीपासून म्हणजे इंजिनियरिंग कॉलेज पासून ओळख होती पण इथे सोबत राहिल्यामुळे ती मैत्री झाली होती.

परंतु मनाचे धागे दिलीपशी जास्त जुळलेले होते. नेहमी मनातले सांगण्यासाठी दिलीप जवळचा वाटायचा. माधवला आयुष्याबद्दल विशेष गंभीरता नव्हती व तो खोलात जायचा पण नाही. त्यामुळे माधव येण्यापूर्वी काहीतरी बोलावं असं शोभितच्या मनातही चाललं होतं. पण हे सांगावं की नाही ? असाही प्रश्न पडलेला होता.

दिलीपलाही वाटत होतं की कदाचित माधवसमोर शोभित नॉर्मल वागेल आणि नाश्ता करुन निघून जाईल म्हणून त्याने सगळी मनातली भडास आताच काढावी . . . व सांगावं की त्याला सकाळी का जीव द्यावासा वाटला? का तो ढसाढसा रडला?

"शोभ्या काय झालं सांगणार आहेस का? की मनातलं दुख मनातच ठेवणार आहेस? तुझ्यासारख्या स्ट्राँग मुलाला रडताना नाही पाहिलं रे कधीच !" दिलीपने सरळच विचारलं.

"सांगण्यासारखं असं खूप आहे अन लपवण्यासारखं पण खूप आहे पण असं का झालं हे अजूनही मला कळत नाहीय. सहा महीने यार. . . सहा महिने वाट पाहिली मी तिच्या एका मिठीसाठी. . बाकीचं तर लांबच! लग्न झाल्यावर सुद्धा इतका काय  ऍटीट्यूड कळत नाही!"

"बाप रे हे सगळं अवघडच झालं. पण तू बोलायचं ना मग सांगायचं , समजवायचं. . . नाहीतर मोठ्या माणसांना सांगायचं !"

"काय बोलतोस दिल्या ? या गोष्टी कशा ? म्हणजे खूप खाजगी असतं रे हे सगळं पण . . . खूप महत्वाचं! या सगळ्या तिच्या विचित्र वागण्याने माझं ऑफिसमधे सुद्धा लक्ष लागत नाहीय! त्याचा परिणाम माझ्या कामावर होतोय. म्हणजे यार कमवायचंच कशासाठी ? अन कुणासाठी असं वाटायला लागलंय मला. "

शोभितचे डोळे पुन्हा पाणावले. दिलीपने त्याला मिठी मारली अन पाठीवर थोपटलं

"दिलीप आपण कशा घरातून आलोय , टिपीकल मिडलक्लास नाही का?  तर भाड्याच्या दोन खोल्यात आईबाबांनी अर्ध आयुष्य काढलंय. अरे त्या दोघांना कधी जवळ जवळ खेटून बसलेलं सुद्धा  मी पाहिलं  नाही तर हे सगळे विषय कसे बोलणार कुणाजवळ?"

"ते बाकी खरँच म्हणा , आपण नाही स्पष्टपणे बोलू शकत. . . तसे संस्कारच नाहीत. पण मग तिलाच विचारायचं स्पष्ट ?"

"तेच तर झालं ना काल. कंटाळून वैतागून काल हेच तर विचारलं मी तिला ? मला सांग काय प्रॉब्लेम आहे तुला स्पष्ट सांग. तर ती म्हणाली की  'माझा प्रॉब्लेमच तू आहेस. . . माझा प्रॉब्लेम हे मंगळसुत्र आहे. . . हे लोढणं नको म्हणाले होते तर नाही ऐकलं आईने. ' हे वाक्य होतं तिचं "

"अरे यार शिट्ट . . .हे काय आणि? लग्नात तर किती आनंदाने वागत होती, खरेदीला पण आलेली इथे तर आम्हाला किती भारी वाटली ती. तुझ्या नशीबावर जळलो यार आम्ही. पण हे भलतच! काय खरं आहे मग ?"

"तोच तर संभ्रम आहे ना! ते खरं रूप होतं की हे खरं ? मलाच कळत नाहीय. रात्रीच बॅग पॅक करून ठेवली, मी रात्री जाऊ नको म्हणून रिक्वेस्ट केली रे, काळजी पोटी ! बे भान असताना काहीच्या काही होऊन बसेल म्हणून. मी किती प्रेमाने व तळमळीने तिला शांत करण्यासाठी न राहवून मिठी मारली तर कसलं झिडकातलं मला . . . काल तर मला म्हणाली की स्वतःला आरशात पाहिलंस का कधी? तुझ्याकडे असं काय आहे की मी तुझ्या जवळ येईन ?"

आणि शोभितला हुंदका फुटला.

दिलीपला आता हळूहळू लक्षात आलं होतं की इतकी सुंदर , स्मार्ट व नोकरी करणारी बायको मिळाली तरीही शोभित का उदास दिसत होता. तो मित्रांनाही टाळत होता.

मग त्याने समजावलं व त्याला शांत केलं.

"एक गोष्ट आहे शोभ्या. . . तुला बाहेर कुठेच रडता येणार नाही त्यामुळे रडावं वाटलं तर रडून घे. . . मला कळतीय तुझी तगमग. आपल्या समाजात रडणं हा जणु बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे पण पुरुषांचा नाही. काय पोरीसारखा रडतो बे! या वाक्याला भिऊन आपण खरच रे रडत नाही. मी तर पाहतोय की मुलीसुद्धा कुठे रडतायत हल्ली , एरवी तर नाहीच पण लग्नातसुद्धा आईवडिलंच रडतात, मुली नाही. पण मुलगा किंवा माणूस रडला की मात्र पुरुषासारखा पुरुष असून रडतोस काय ? हा प्रश्न नक्की येतो. म्हणजे पुरुष असून तो कुठल्याक्षणी रडतोय तर त्याचं दुखं किती मोठं असेल असा विचार नाही करत कुणी?"

"तेच तर म्हणतोय ना दिल्या, तुलं बरोबर कळतं मला काय म्हणायचंय . पहाटे जेव्हा ती गेली व मला घरात असं खूप च बेचैन , उद्विग्न , उद्ध्वस्त असं काय काय वाटायला लागलं. . . त्यावेळी एवढ्या शंभर कलीग अन पन्नास मित्रांमधे मला तू आठवलास. आपला हा फ्लॅट मला त्या घरापेक्षा जास्त जवळचा वाटतो रे! मस्त दिवस घालवलेत मी इथे. . . किती आनंदी होतो. किती कौतुक होतं माझ्या यशाचं. मला काळा -सावळा असण्याचं किंवा हँडसम नसण्याचं कधीच दुख वाटलं नाही रे.. . . म्हणजे त्याने काय फरक पडतो असं वाटायचं. पण आता न्यूनगंड आलाय रे त्याच गोष्टीचा!" तो पुन्हा हमसून रडायला लागला.

दारावरची बेल वाजली , बहुतेक माधव नाश्ता घेवून आला होता.

क्रमशः

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

🎭 Series Post

View all