पुरुषासारखा पुरुष असून. . !(भाग -७)

struggle of a man.


(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून. . . !

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

(भाग -७ )
कथा पुढे -

त्यामुळे शोभितला त्यांना एकटं भेटावं नाही वाटलं पण त्यांना भेटायला नाही गेला तरी त्यांना अपमानास्पद वाटेल, म्हणून तो दिलीप ला म्हणाला "दिल्या तूच फोन करून त्यांना काहीतरी सांग आणि काहीही करून त्यांना इथे बोलाव , यायला सांग. . . म्हणजे नम्रतेने बोल व येण्यासाठी त्यांना विनंती कर!"

"इतका कसा चांगला आहेस रे शोभ्या तू ? त्यांच्या पोराीने तुझी वाट लावली तरीही तू त्यांच्याशी नम्रतेने बोल म्हणून बजावतोयस. बरं करतो कॉल."

मग दिलीप ने पुन्हा त्यांना कॉल बॅक केला आणि सांगितलं "एक काम करा, बघा शर्वरी चा फोन लागतोय का ? कारण शोभित खूपच बिझी आहे."

"शर्वरी पण नाहीय ना घरी आणि ती फोन उचलत नाहीय. आता तर तिचा फोन आऊट ऑफ रेंज येतो आहे. मग काय करावं? "

"अच्छा ती पण नाहीय का घरी? मग एक काम करा. येता का ईकडेच घरी तोपर्यंत त्याची मीटिंग पण संपेल. नाहीतरी आमचा जुना फ्लॅट तुम्हाला माहीतच आहेच ना म्हणजे बॅचलर्स आम्ही तिघे रहायचो ना तेव्हा!"

"तिकडे का बरं. . . येतो मग त्यांची तरी भेट होईल."

"तसं काकू तुम्हाला यावंच लागेल कारण शोभित कडची घराची किल्ली हरवली आहे. त्यामुळे तो उद्यापर्यंत इकडेच आहे."

दिलीप शोभितच्या फोनवरून शर्वरीच्या त्या भावाशी व तिच्या आईशी आरामात व नम्रतेने बोलत होता.

त्याच्या या बोलण्यानुसार त्यांनी तिथे भेटायला येण्याचं कबूल केलं.
त्यांनी दिलीपला सांगितलं की शर्वरी फोन उचलत नाही आणि म्हणून त्यांना असं वाटलं की दोघेजण सोबत असतील, रविवारचे कुठेतरी फिरायला गेले असतील. त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण जमलं नाही! त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी त्यांनी असं केलं होतं वगैरे.

दिलीपने सगळं शोभितला सांगितलं.

तो अर्धा तास शोभितसाठी खूप कठीण गेला अगदी शर्वरीशी लग्न ठरवताना गेला जोता त्यापेक्षाही कठिण!

म्हणजे त्यांना हे सगळं काही सांगावं की नाही म्हणजे सांगावं तर त्यांच्याशी सगळं कसं बोलावं ? ते चिडतील म्हणून मग बोलावं की नाही बोलावं ?

त्याला काहीच समजत नव्हतं .

"हे पुरुष असणं किती अवघड आहे लेका. . . बायका नाहीतर पोरी पटकन सांगून , रडून मोकळ्या होतात व समोरच्यालाही त्यांची बाजू पटते बघ!" शोभित वैतागून मित्रांना म्हणाला .

त्यावेळेला माधव जवळ आला त्याने हिम्मत दिली आणि म्हणाला, "दोस्ता तू मला खास मित्र मानत नसलश तरीही कॉलेज पासून मी तुला खूप जवळचा मित्र मानतो. तुझ्या एवढी बौद्धिक पातळी माझी नाही किंवा मी अभ्यासात तेवढा हुशारही नव्हतो पण एक व्यवहाराची गोष्ट तुला सांगतो. . . ऐक! त्यांच्याशी काय बोलायचं असेल ते बोल पण एकदा तुझ्या आईला सांग म्हणजे तुझ्या आईशी फोनवर बोल आणि तुझी आई जे म्हणेल तसं तू कर. शोभित हे पण सांगतो, तुझी आई तुला कधीच चुकीचे मार्गदर्शन करणार नाही."

शोभितला हे मनातून पटलं .
त्याने माधवला कडकडून मिठी मारली.

डोळे पुसून हिम्मत एकवटली .
अगोदर त्याने शर्वरीला दोनदा तीनदा कॉल केला.

एकदा तिचा कॉल लागला नाही आणि दोन वेळा तिने उचलला नाही .
मग त्याने तिला व्हाट्सअप वरती मेसेज टाकला की \" तुझे आई बाबा आलेले आहेत आणि माझी घराची चावी हरवली आहे. तू संपर्क कर .\"

हे करण्यामागे हेतु होता की जर उद्याला तिला काहिच माहित नव्हतं असं ती म्हणू शकू नये.
व त्याने काहीही त्यांना सांगितले तर तिला कळावे. काही प्रॉब्लेम होऊ नये!

मग त्याने शांत चित्ताने व मानसिक हिमतीने आईला फोन लावला.

त्याचा आवाज ऐकताच आई म्हणाली, "का रे शोभित बाळा, तब्येत बरी आहेना ? आवाज खोल गेलाय. कुठे आहेस? घरीच की बाहेर ?"
आईच्या मायेच्या स्वराने त्याला जणू रडूच आलं.

त्याच्या आईने त्याला लहानपणापासून स्वतःसाठी आदर शिकवला होता.

तो किती चांगला ,तो किती आदर्श आहे, तो किती सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, भावनिक आहे आणि प्रचंड हुशार आहे , अशी जाणीव करून दिली होती आणि त्यामुळे तो स्वतःला खूप मान देत होता. त्याच्या रंगाचा किंवा दिसण्याचा त्याला कमीपणा वाटायचा नाही.

परंतु शर्वरी शी लग्न झाल्यापासून त्याला सारखा एक प्रकारचा न्यूनगंड येत होता.
कुणीतरी आपल्याला कमी लेखतंय ही भावना सतत मनात डोकावत होती पण सगळं तो आईजवळ काही बोलला नाही कारण हे लग्न व्हावं ही मोठ्या माणसांची इच्छा होती.
शर्वरीचे वडिल आईचा मावस भाऊ होता .

शोभितची हुशारी पाहून तो सतत लहानपणापासून त्याला जावई जावई असं बोलवायचा त्यामुळे कधीतरी भेट झाली तेव्हा तीच मुलगी घरी सून म्हणून घेऊन येईल असं आईला नेहमी वाटायचं . तरीही त्याने पुन्हा पुन्हा विचारलं होतं . . लग्न ठरताना की \"शर्वरीने होकार दिलाय का ?\" तर उत्तर हो आलं होतं.


फोन कनेक्ट झालेला होता , आई शांतता ऐकत होती. . . बोल बाळा ?

"आई एक महत्त्वाचं सांगायचं होतं. आमच्या लग्नाला सहा महिने झालेत पण आमच्यात काहीही बरं चाललेलं नाही. त्यामुळे तुम्ही सगळे या गैरसमजात राहू नका की मी खूप सुखाने संसार करतोय आणि मजेत आहे वगैरे!"

एका दमात बोललेलं ऐकून आई तर हादरलीच.

"अरे शोभित काय बोलतोयस हे? काय झालं? ती काही बोलली का ? दुसरे कोणी काही बोललं का ? भांडू नकोस रे तिच्याशी . . तरुण पोरगी आहे. तू पण थोडं तिच्या कलानी घे."

आता मात्र त्याला कळेना की त्याची आई पण तिची बाजू का घेतीय?

मग तो म्हणाला "आई. . . तू तरी दमजून घे ना मला! केवळ या भीतीपोटीच मी कुणाला काही सांगितलं नाही. आई, ऐक तिची वागणूक माझ्यासोबत बिलकुल चांगली नाही या गोष्टीवर किमान तू तरी विश्वास ठेव. मी कंटाळून गेलोय गं आई! आज तर खूप रडलोय मी !"

" शोभित ? काय बोलतोस? कशाला बाळा ?काय करतेय ती असं ? दादा वहिनीशी बोलू का मी? की आम्ही यावं तिथे ?"

"नाही आई , खूप गोष्टी आहेत भेटेन तेव्हा सांगेन आणि आई हो मामा - मामी इकडे आलेले आहेत. त्यांना मी माझ्या जुन्या फ्लॅट वरती मित्राच्या घरी बोलावलंय. बस झालं आज जे आहे ते सगळं त्यांना सांगून टाकणार आहे ."

"अरे पण ? अरे पण! असं काय आहे ? म्हणजे घरात की बाहेर ? कुठे वागणून बरी नाही तिची ?"

"नाही आई , ते सगळं फोनवर बोलता येणार नाही . पुढच्या आठवड्यात मी येतोच आहे तेव्हा तुझ्याशी विस्ताराने बोलेन. काळजी घे तब्येतीकडे लक्ष दे!"
" बेटा तू काळजी घे. माझा जीव आता टांगणीला लागला. पुन्हा बोल मग. तुला ठीक वाटेल ते कर !"
फोन ठेवला अन त्याच्या मनावरचं बरच दडपण कमी झालं .


क्रमशः
लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक १९. ११. २२

🎭 Series Post

View all