पुरुषासारखा पुरुष असून. . !(भाग -६)

The Struggle of a man

(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )


कथेचे शीर्षक - पुरुषासारखा पुरुष असून. . . !

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी


पूर्वसुत्र-

" दिलीप . . . हे सगळ्यात वाईट दुःख आहे जे पुरुष बाहेर सांगू शकत नाही. आपली बायको दुसर्‍या बरोबर?. . . नवीन लग्न आहे रे अजून. . . आमचंच सूत जुळलं नाही असं समजत होतो पण. . . माधव मला कळालं तरीही काय तोंडाने सांगणार मी हे बाहेर? सगळे कायदे बायकांच्या बाजूने अाणि सगळी सहानुभूती पण बायकांच्या बाजूने असणार. दिलीप यार मी का रडतोय यार? . . . कसली सुंदर बायको मिळाली म्हणून नशीबावर गर्व करत होतो पण हे काय आहे यार?"

शोभित खूपच रडत होता. दोघांना कोणत्या शब्दांत सांत्वन करावे ते कळतच नव्हतं .
क्रमशः

(भाग -६ )
कथा पुढे -

असल्या टॉपर स्टुडंटला आणि आयडीयल एम्पलॉयी ला तुटून गेल्याप्रमाणे रडताना पाहणं खूपच वाईट अनुभव होता. तसा दिलीपने त्याला खूप आधार देण्याचा प्रयत्न केला, पण जणू पुन्हा पुन्हा आठवणींचा उमाळा येऊन तो रडत होता.
त्याला ते सगळे प्रसंग आठवत होते जेव्हा जेव्हा लग्नझाल्यापासून त्याच्या पत्नीने त्यसला जवळ येण्यापासून रोखले होते. ते सगळे अपमानास्पद प्रसंग जेव्हा त्याची पत्नी शर्वरीने त्याला झिडकारले होते.

सुरूवातीला ते खूप खटकलं पण त्याला तो नवखेपणा समजून किंवा त्याच्याशी जुळवायला वेळ लागेल असं समजून शांत बसला होता.

यादरम्यान तर तिने कसं दुसर्‍या बेडरूम मधे स्वतःला वेगळा करून पर्सनल रूममध्ये ठेवून घेतलं होतं.

परंतु आश्चर्य हे होतं की पूजा किंवा कुठल्या पार्टीच्या कार्यक्रमाच्या वेळी मात्र ती सर्वांसमोर अशी वागायची जणू त्यांचीच जोडी सर्वात बेस्ट आहे आणि त्यामुळे लग्नानंतर यादरम्यान सर्वांचा असा समज झाला होता की तिने लव मॅरेज केलं आहे आणि ते दोघे खूपच आनंदी जोडपं आहेत.

त्या आनंदाची ही दुखरी, व कडवट किनार कुणालाच माहीत नव्हती.

शोभित पुन्हा पुन्हा लहानपणापासूनची तिची पाहिलेली रूपं आठवत होता. शाळेतली शर्वरी मग कधीतरी अकरावी बारावीतली शर्वरी आणि शेवटी ती एम बी ए करण्यासाठी बेंगलोरला आलेली शर्वरी!

आता जे काही माधवने सांगितलं ते खोटं असेल असं त्याला अजिबात वाटलं नाही कारण त्याने स्वतः गेल्या दोन महिन्यात कितीदा तरी तिला पार्टीहून उशिरा आलेलं पाहिलं होतं , ती खूप जास्त ड्रिंक घेऊन यायची आणि तिला सावरण्यासाठी शोभितने आधार दिलेला किंवा हात दिलेला देखील तिला आवडायचं नाही.

विशेषता कुठल्याही पार्टीतून परत आल्यावर ती मात्र ती त्याचा अपमान करायची की तो सोबत नेण्यासारखा हँडसम पार्टनर नाही, कधी खुराना कधी हितेश तर कधी शुभम नावाच्या कलिगशी त्याची तुलना करायची. ते कसे फिट व मस्क्युलर वगैरे आहेत, त्यांचा ड्रेसिंग सेन्स कसा भारी आहे. ते किती रोमँटिक वगैरे आहेत.
हे ऐकून शोभितचा त्रागा व्हायचा. पण सकाळी तिला हे काहीच आठवायचं नाही. उलट हँगओव्हर उतरावा म्हणून त्याने लिंबूपाणी द्यावं अशी तिची अपेक्षा असायची.
आणि मग गेल्या महिनाभरात तर ती विकेंडला पार्टीला गेली तरीही तो त्याच्या नियमित वेळेवर झोपून जायचा. आताशा त्यालाही तिला सावरावं असं वाटेणासं झालं होतं.

पण हे सगळं कुणाला आणि कसं सांगावं हेही त्याला कळत नव्हतं.

इकडे नोकरीत कामाचं प्रचंड प्रेशर होतं.

त्याच्या हुशारीमुळे त्याला खूप लवकर प्रमोशन मिळालं होतं आणि ऑफिसमध्ये त्याला खूप मान होता. त्याच्या वरिष्ठांकडून त्याच्या बुद्धीला व कल्पकतेला इतका मान असताना शर्वरीसमोर अगदी झुकुन राहणही त्याला शक्य होत नव्हतं . यादरम्यान हे घराकडे दुर्लक्ष व याने एकट्यानेच घर सांभाळणे खूपच व्हायला लागलं होतं. सगळे विचार मनात पिंगा घालत होते.

अचानक शोभितचा फोन वाजला, तो त्यावेळी इतका भावनिक होता की डोळ्यातल्या अश्रूंमुळे त्याला तो नंबरही धूसर दिसायला लागला.

त्याची ती अवस्था पाहून दिलीप ने पटकन फोन घेतला आणि बाजूच्या खोलीत जाऊन उचलून म्हणाला," हॅलो"
तिकडून कोणीतरी म्हणालं," शोभितच बोलताय ना? घरी नाही आहात का तुम्ही अन शर्वरी?"

मग दिलीप ने सांगितलं की शोभित वॉशरूम मध्ये आहे आणि तो त्याच्या मित्राकडे आलेला आहे . तो पुन्हा फोन करेल पण कोण बोलतंय वगैरे?

माधव बाजूलाच उभा होता. तेव्हा त्या संभाषणावरून माधवला हे कळालं की तो शर्वरीचा गावातला आतेभाऊ बोलत होता व शर्वरीचे आई-वडील अचानक न सांगता या दोघांना भेटण्यासाठी आले होते. परंतु घराला कुलूप पाहून त्यांच्या सरप्राईज देण्याचा आनंद मावळून गेला होता. पुन्हा करायला लावतो असं सांगून दिलीपने वेळ मारून नेली व त्यांनी तिकडून फोन ठेवला.

दिलीप आणि माधव पुन्हा शोभित कडे आले आणि म्हणाले की "तुझे सासू-सासरे आलेले आहेत, हीच वेळ आहे. शर्वरी पण घरी नाहीय. तुला खूप त्रास आहे जो तू आम्हाला सांगत नाहियेस. त्यांना तरी स्पष्टपणे सांग ."

पण शोभितला हा विश्वास नव्हता की तो त्यांच्यासमोर एकटा बोलू शकेल आणि ते त्यावर विश्वास ठेवतील कारण ते नेहमी त्यांच्याच मुलीची बाजू घ्यायचे. लग्न ठरल्या पासून तेच की ती कशी सुंदर आहे, तिला त्यांनी कसं कष्टाने शिकवलं ,ती किती चाणाक्ष आहे, नोकरी करते वगैरे सगळी उदाहरणं ती ऑलरेडी देऊन झाली होती.

क्रमशः 

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

🎭 Series Post

View all