Feb 25, 2024
पुरुषवादी

पुरुषासारखा पुरुष असून!(अंतिम ) ( भाग -१०)

Read Later
पुरुषासारखा पुरुष असून!(अंतिम ) ( भाग -१०)
(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून . . !

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

पुरुषासारखा पुरुष असून!(भाग -१०)
(अंतिम भाग)

शोभित गावी परत आला खरा पण तो दिवस सगळा तणावातच गेला.
अचानकच घरातलं वातावरण एकदम वेगळं झालं होतं, एक स्वाभाविक मोकळेपणा मावळला होता. विशेषतः आईचा चेहरा जास्तच तणावात होता. आपल्या मुलावर अन्याय होतोय ही भावना कुठल्याही आईला क्लेशदायकच आहे.

वडिलांना अजूनही खोलात काहीच माहित नव्हतं , त्यामुळं ते सामान्यच हिते पण शोभित एकटाच कसं काय आला ? एवढाच प्रश्न त्यांनी विचारला होता.
मग दुपारच्या वेळी जेव्हा तो आणि आई एकटी होती तर तिने हळूच विषयाला सुरुवात केली ,पण तो टाळू लागला.
तो विचारपूर्वक म्हणाला "आई मी बोलणारच आहे मोकळं , पण आज मूड नाही. आज एक दिवस मला पूर्वीसारखं आपल्या घरात रिलॅक्स राहू दे. माझ्या शाळकरी बालमित्रांना , गल्लीतल्या मित्रांना वगैरे भेटू दे."

तो दिवस त्यांने खरंच मजेत घालवला. आईच्या हातचं आवडतं जेवण खाऊन, गावात चक्कर मारून, जुन्या मित्रांना भेटून मस्त आनंदी दिवस घालवला.
दुसऱ्या दिवशी मात्र आईला राहावेच ना मग तिने त्याच्या मावस बहिणीला दिप्तीला फोन केला जी त्याच्याबरोबरीचीच होती आणि नेमकीच माहेरी आलेली होती, तिला बोलावून घेतलं.
दिप्ती आणि त्याची आई दुपारी एकत्र असताना मात्र आईने पुन्हा विषय काढला आणि म्हणाली "बेटा आता तरी मन मोकळं कर ,म्हणजे आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल ."

मग शोभितनी सगळंच स्पष्ट सांगितलं, जो जो त्रास झाला सगळा तो आईला सांगत गेला.

काही गोष्टीत तो अगदी स्पष्ट नाही बोलू शकला पण आईच्या ते लक्षात आलं.

दिप्ती पटकन म्हणाली "अरे तुम्ही तर फिरायला गेला होतात ना, गोव्याला ? मग त्यावेळी तरी? तुम्हाला पुष्कळ एकांत होता . समजून घ्यायला व बोलायला वेळ होता."
"अग ताई प्रश्न एकांताच नाहीय. तिथेही घरी आम्ही दोघेच असतो ना . तिने जेव्हा लग्न झाल्यापासून सतत हे दाखवलं की मी तिला आवडतच नाही, अंतरच ठेवत राहिली तर तेव्हा काय हिमतीने मी . . . ? म्हणजे आमच्या दोघात नातं बनलंच नाही. आम्ही जे फिरायला गेलो होतो ना गोव्याला , तिने तिची सगळी हौस भागवली. शॉपिंगला जाणे, बाहेर हॉटेलमध्ये जेवणे, बीचवर फिरणे, ड्रिंक्स घेणे, फोटो काढणे. . "

"बाप रे . . हे सगळं पण करती का ती? अरे देवा ! किती साधी वाटली रे पाहिल्यावर. दिसायला गोड ?" आई थक्कच झाली.

"ताई तिने तिचा ट्रिपचा पूर्ण आनंद घेतला अन मी फक्त एक फोटोग्राफर आणि एटीएम म्हणून तिच्यासोबत गेलो होतो. फक्त बिल भरायचं अन तिचे फोटो काढायचे. ती अकडूनच रहात होती."

" मग हे का नाही बोललास आल्यावरती?" दिप्तीने विचारलं.

" नवीन नवीन होतं सगळं ! तरुण मुलगी आहे, शहरात राहिलेली आहे समजून घे असं आईव मामी म्हणलेल्या, किंवा मामाची मुलगी आहे पूर्वीचे नाते वेगळं होतं तर तिने थोडा वेळ मागितला माझ्याकडे. तिला रुळायला वेळ वगैरे लागेल असं म्हणून मी तिला वेळ देत गेलो. पण जेव्हा पूजा वगैरे असताना समारंभाला सगळ्यांसमोर मात्र ती हसून खेळून राहायची. सगळ्यांना हेवा वाटायचा. माझ्यासारख्या काळ्या सावळ्या सामान्य मुलाला एवढी सुंदर बायको मिळाली म्हणून. . . आणि एकट्यामध्ये मात्र ती मला खूप कमी लेखायची.
आई मी माझा सगळा कॉन्फिडन्स हरवून बसलो आहे गं! सतत आपल्यातच काहीतरी कमी आहे या भावनेतून मी कसलीच हिम्मत करू शकलो नाही ."

"शोभित कसं रे व्हायचं, मला अवघडच वाटतंय सगळं. बरं जेवायला खायला तर वाढती का नाही?" आईने चिंतेने विचारलं.

"काय सांगू आई , परवाच तिच्या आई बाबा्ना सांगितलंय मी की मी काय काय करतो ते. पण ते किती विश्वास ठेवतील माहित नाही. नाहीच गं ताई घराशी तिचं काही देणं घेणं नाही असं राहते. बायका जसं घर संसार सांभाळतात तशी आवड देखील नाही तिला.बरं नाही म्हणून किती गोष्टींवर तिला टोकणार मी ? तिला काही प्रेमानं सांगायला गेलं की ती माझ्या रंगावरती किंवा माझ्या दिसण्यावरती काहीतरी बोलणार आणि मग माझं तोंड बंद होऊन जायचं. "

आई विचारत राहिली व बराच वेळ तो छोट्या छोट्या गोष्टी आणि प्रसंग सांगत राहिला.

आईच्या हे लक्षात आलं की ही गोष्ट खूप गंभीर आहे आणि नक्की काहीतरी करावंच लागेल.

संध्याकाळी शोभित मावस बहिणीला, दिप्तीला सोडायला तिच्यस घरी गेला तेव्हा दोघेजण चहा घेवून गच्चीवर उभे होते.

त्या दोघांमध्ये बहिण भावंडात लहानपणापासून चांगली शेअरिंग होती.
तेव्हा दिप्ती म्हणाली," शोभित मावशी समोर काही म्हणाले नाही पण एक सांगू का जनरली दोघांत रिलेशन बनताना पुरुष माणसं पुढाकार घेतात, कदाचित ती त्याची वाट पाहत असेल आणि बघ तू इनिशिएटिव घेतला नाहीस हे काहीतरी वेगळ्याच रूपात पुन्हा आपल्या कानावरती येईल ."

तो म्हणाला की "नाही. मलाही असंच वाटलं मित्रांनी पण हेच सांगितलं म्हणून एक दिवस तिच्या जवळ गेलो. जवळ जवळ ३ महिन्यानंतर तिचा हात हातात घेवून जवळ गेलो तर अक्षरशः रात्री दीड वाजता गोंधळ केला तिने. अपार्टमेंट मध्ये ती आरडाओरडा करत होती आणि म्हणाली तू जर पुन्हा माझ्या जवळ आलास किंवा मला हात लावलास तर मी डोमेस्टिक व्हायलंस मध्ये तुला मध्ये टाकू शकते, हे लक्षात ठेव! पुरुष माणूस भितो गं कायद्याला , म्हणजे भिडस्त स्वभाव ना माझा !"

" अरे शोभित पण आपल्याच बायकोला हात लावण्याची भीती? काय होऊन बसलय यार हे ?" दिप्ती काळजीतच पडली.

"ताई तुला सांगतो की तिने नंतर बेडरूमच वेगळी केली. दोघं दोन खोल्यात असतो आम्ही. मला तर. . . आता तर माझ्या डोक्यात इतकी तिडीक बसली आहे की तिच्याकडे, चेहऱ्या कडे सुद्धा पहावं वाटत नाही. "

"अगदी स्वाभाविक आहे अरे सवयीने माणसं आवडायला लागतात अन तुझं तर उलटच झालं. बाहेर वगैरे जातच नाहीत का तुम्ही? नवीन लग्न झालंय तर. . .वेळ घालवायला पाहिजे ना सोबत."

"ताई, नाही. आम्ही जात नाही पण जेव्हा जेव्हा ती पार्ट्यांना जाते, एकटीच ,अर्ध्या रात्री परत येते. काहीतरीच ड्रेसिंग असतं , सोडायला कोण येतं ते पण सांगत नाही. मग खूप घेतलेली असते, बडबड करते . मला समजत नाहीये मी कसं समजावु तिला ? ताई मी कधीच कल्पना केली नव्हती ग , माझी होणारी बायको अशी असेल !"

" बरोबर आहे शोभित. शिकलेली नसेल, नोकरी करणारी नसती तरीही चाललं असतं . पण तू जे एवढं कमवतोस ,ते गोडीनं सांभाळून घेणारी हवी होती."

"ताई गं पण नाही. . .गं ! माझ्या आयुष्याचा डावच फसला. माझ्या नशिबात कदाचित सुख नाहीय !" शोभितच्या डोळ्यात अश्रूंची दाटिो झाली होती.

" अरे काय हे ! असं म्हणू नकोस . वाटलं तर मोकळं बोल माझ्याशी. सांग मनातलं."

"ताई तू तर मॅरीड आहेस ,तुझ्यापासून काय लपवू ? आता मागच्या आठवड्यात एक दिवस न राहून मी तिला घट्ट मिठी मारली, वाटलं आता तर ही नॉर्मल वागेल पण कशाचं काय ? तिने एकदमच मला खूप विचित्र झिडकारलं , वेड्याच काढलं आणि नाही नाही ते बोलली. आणि हीच शर्वरी ऑफिसमध्ये पुरुष माणसांसोबत, कलिग सोबत खूप बोल्ड राहते. घरी सांगू नकोस पण ती बाहेरगावी जाते ३-४ दिवस , टूरच्या नावाखाली फिरून येते आणि मी काहीच म्हणू शकत नाही."

"एक सांग ह्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या घरी कशा सांगितल्यात ? त्यांना माहित आहे की नाही ?" दिप्तीने काळजीने विचारलं.

"आता बघ! याची सुद्धा मला शंकाच आहे. ती खोटारडी आहे , नाटक करते त्यामुळे आईवडिलांना काय सांगितलंय कल्पना नाहीय. "

" पाहुयात शोभित! आपण एक प्रयत्न तर करून बघू , नाही तर मग ? नाहीतर योग्य निर्णय घेऊयात!" असं म्हणून दिप्तीने त्याला रिलॅक्स केलं आणि काही सल्ला दिला.

शोभित घरी परत आला पण याच विचारात होता की तो आल्यावर काय झालं कल्पना नव्हती. त्याने तर इकडे आल्यावर तिला ब्लॉक च केलं होतं.

दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने शर्वरीच्या आईला म्हणजे वहिनीला फोन केला की त्यांना भेटायचं आहे.

नेमके ते आपल्या गावी परत आलेले होते. त्यांनाही काळजी लागून होतीच . त्या म्हणाला की "आम्हीच येतो, भेटायला."

शर्वरीचे आई वडील शोभितच्या घरी आले.
शोभितच्या आईने कितीही काय काय बोलण्याचं ठरवलं होतं मनात परंतु वेळेवरती वेगळाच प्रसंग घडला.
ते दोघेजण ( शर्वरीचे आईवडिल) आले आणि यांच्या वरतीच तुटून पडले. शोभितच्या वडिलांना जुजबी कल्पना दिली होती.

शोभितच शर्वरीला चांगलं वागवत नाही , कामात मदत करत नाही, तिच्याकडे लक्ष देत नाही शिवाय त्याला तिची कदरच नाही. ाशे आरोप तर केलेच सदिवाय तो जर असाच राहिला तर आम्ही पुन्हा शर्वरीला त्याच्याकडे पाठवणार नाही. अशी भाषा !

मग मध्यस्तांनी पण सहभाग घेतला. बराच वेळ चर्चा चालू राहिली.

शोभितच्या आईने त्यांचे मुद्दे सांगितले आणि आणि त्यांनी त्यांचे, परंतु दोन्हीही गोष्टीत एकदम विरोधाभास होता.

तरीही मोठ्या आजी व मामा मावशी या लोकांनी मध्ये पडून "ठीक आहे एक महिना त्यांना राहू द्या एकत्र त्यानंतर बघूया !" असा ठराव दिला.

तो आठवडा असाच गेला.

शर्वरी आई-वडिलांकडे घरी मात्र अगदी आदर्श मुलगी असल्यासारखी राहत होती.

तिने पण सगळं मान्य केलं, म्हणून मग शोभितनेही पडतं घेतलं आणि दोघेजण सोबतच आपल्या घरी परतले.

परत आल्यावर तेवढा एक दिवस ती त्याच्याशी व्यवस्थित बोलली वगैरे पण ती मनात खूप राग घेऊन परत आली होती कारण त्याने इथल्या बर्‍याचशा गोष्टी सगळ्यांसमोर सांगितल्या होत्या ज्या तिने लपवल्या होत्या.

दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा तिने तेच सुरू केलं आणि म्हणाली की "मी माझी स्वतंत्र आणि तू तुझा स्वतंत्र! यापुढे मोठ्या माणसांना मध्ये आणायचं नाही. जगासमोर आपण नवरा-बायको आहोत ना , राहू येत ना ! तुझा तुला कशाला आदर्श संसार हवा आहे? तू काही महत्वाचा आहेस का? मी पण कमवते आहेच ना! पण आपण पूर्वी राहत होतो, तसंच राहायचं आहे. माझ्या वागण्यात काहीही बदल होणार नाही."

असं निर्वाणीचं बोलल्यावर त्याला कळून गेलं की हिला लग्नाच्या नावाखाली स्वैराचार हवाय पण तिकडे घरी लग्नाचं कवच दाखवायचंय! तिला बंधन नकोय! म्हणजे शोभितला ती वापरून घेतीय फक्त नावापुरतं !

पंधरा दिवस शोभितनेही कसे बसे काढले, मग त्याने आईला फोन केला की " आई ती मला धमकी वरती संसार करायला भाग नाही पाडू शकत. ती तर माझ्या मनातून आता पूर्ण उतरलीय. जगासाठी ती पुष्कळ नटी सारखी सुंदर असेल पण ती माझ्या मनातून उतरलीय त्यामुळे मी तिच्यासोबत राहू शकत नाही. आणि एक तितक्या सहजासहजी ती मला सोडणारही नाही, अशी मला खात्री वाटते."

एक महिन्यानंतरही परिस्थितीमध्ये विशेष फरक पडला नाही.

शोभितने ठरवून टाकलं की आता जे होईल त्याने त्याचीच बदनामी होणार!

आज दिलीपकडे आला होता पुन्हा एकत्र राहण्याचं प्रपोजल घेवून. विषयावर बोलताना तो म्हणाला, " दिलिप प्रत्येक वेळी मुली घर सोडून सासरी आल्या म्हणून सगळेजण त्यांच्या बाजूने असतात, तिची सगळेजण काळजी घेतात, घरचे कसे आहेत , चांगलं वागवतात की नाही म्हणून तिला विचारतात . पण बघ ना लग्न झालेल्या मुलाला कोणीच विचारत नाही , तुझी बायको व्यवस्थित रूळली आहे का ? तुझ्याशी चांगली राहते का? तुमचं जमतंय का ? बरं कुठं दोघांचं जमलं नाही म्हणजे नक्की मुलाचीच चूक असणार ! का रे असं ? नेहमी पुरुषच वाईट आणि स्त्री चांगलीच! बाई वरतीच अन्याय व अत्याचार होतो, पुरुषांवरती झालेले अत्याचार बाहेर येतच नाहीत. "

" तसं नाही शोभ्या , ते प्रमाण कमी आहे म्हणून असं आहे. एक तर पुरुष सहन करतो आणि त्याला रडण्याची पण मुभा नसते. त्याने कर्मठ व खंबीरच रहावं अशी मान्यताच आहे. " दिलीपला कळत होतं. जर हे वेगळे झाले तर तो घर काढणार व इथेच रहायला येणार हे माहित होतं.

हे सगळं दिलीप ला सांगितल्यानंतर मित्रांशी बोलून वगैरे , एका महिन्यानंतर त्यांने व्यवस्थित शर्वरीला सांगून टाकलं की "मी परत खोलीवर चाललोय , तू ही तुझी राहण्याची सोय करून घे."

ते विभक्त रहायला लागले. घरातली व वकिलाची बोलणी होत राहिली. मग तिने घटस्फोट देण्यासाठी तयारी दाखवली पण घर संसार ,वस्तु ,दागिने व ज्या ज्या मागण्या ठेवल्या त्या त्याने मान्य केल्या.

ती रहायला तयार होती पण शोभितच लग्न मोडतोय असा आव शर्वरीने आणला. कारण खूपच वैयक्तिक सांगितलं होतं. . . त्यामुळे त्यांनी लग्नाचा अर्धा खर्च परत मागितला तर तो सगळा पण त्याने मान्य केला कारण त्यावेळी त्याला फक्त तिच्या पासून कायद्याने सुटका हवी होती.

वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. आईचं मावस भावाशी नातं तुटलं. मनं तुटली.

अशी शोभित सारखी कितीतरी मुलं समाजात दिसतील जी स्त्री अत्याचाराचे बळी आहेत पन ते बाहेर सांगू शकत नाहीत, रडू ही शकत नाहीत कारण पुरुषासारखा पुरुष असून रडयोस काय? आणि हिंमत काय हरतोस असं म्हटलं जातं.

शोभितला लग्नाची दुसरी स्थळं आली तरीही तो लग्नाला धजावणार नाही कारण त्याने आत्मविश्वासच गमावलाय मग पुन्हा असं होणार नाही हे कशावरून ? अशी भितीही बसलीय मनात!

इति पुरुष व्यथा युक्त पुरुषवादी कथामालिका संपूर्ण संपन्न!

समाप्त

लेखिका - लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक २५.११ .२२

( प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत!)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//