Login

पुरुषासारखा पुरुष असून ! (भाग -८)

struggle of a man.


(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरुषासारखा पुरुष असून. . . !
( भाग-८)

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
पूर्वसुत्र-

"नाही आई , ते सगळं फोनवर बोलता येणार नाही . पुढच्या आठवड्यात मी येतोच आहे तेव्हा तुझ्याशी विस्ताराने बोलेन. काळजी घे तब्येतीकडे लक्ष दे!"

" बेटा तू काळजी घे. माझा जीव आता टांगणीला लागला. पुन्हा बोल मग. तुला ठीक वाटेल ते कर !"
शोभितने फोन ठेवला अन त्याच्या मनावरचं बरंच दडपण कमी झालं .

कथा पुढे-

( भाग-८)


शोभित आता वाट पाहत होता त्याच्या मामा मामीची ,म्हणजे सध्याच्या नात्याने त्याच्या सासू सासर्‍यांची. अर्ध्या पाऊण तासात ते पोचले आणि त्यांच्या वागण्यात एकदम बदल आला होता .
जणू त्यांच्यापासून शोभितच काहीतरी लपवत आहे किंवा काहीतरी चुकतंय असं!

सगळं माहित असूनही माधव दिलीपने खूप नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला.

चहापाणी झालं आणि तो पाया पडला.

" बोला जावईबापू? काय म्हणतोय नवीन संसार!"

"मामी , आमचं बरं चालू आहे किंवा मजेत आहोत असं काही म्हणणार नाही मी यावेळी. . . नेहमीसारखं!"

"अरे , काय हो भांडलात का आमच्या शर्वीशी?"

"नाही हो मी काय भांडण करतोय? खरंतर मी तेव्हाच हे सगळं सांगायला पाहिजे होतं, पण मी वाट पाहत होतो की शर्वरी मध्ये काहीतरी बदल होईल."

" काय बोलताहात तिच्या बद्दल? नवीन संसार थोडी खटपट व्हायचीच . मजेत आहात ना तुम्ही दोघेजण ? आम्हाला तर वाटलं रविवार बघून कुठे फिरायला वगैरे गेलात की काय ?"

शोभित खूपच विचित्र हसला स्वतःशीच, त्या हसण्याला पाहून मामाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

" काय झालं चेहरा पडला म्हणून विचारतोय?" मामांनी विचारलं.

दिलीप काहीतरी सांगणार ,इतक्यात शोभितने नको असा इशारा केला आणि म्हणाला की" असू द्या! मी आत मध्ये बसून बोलतो मामा-मामी शी!"

त्याचा मावस मामा मामी व आणि शर्वरीचा एक शहरात राहणारा अाते भाऊ आतल्या खोलीत बसले.

आता मात्र वातावरण थोडसं गंभीर झालं होतं. काहीतरी आहे जे आपल्याला माहित नाही याचा अंदाज तर त्यांना आला होता, परंतु शर्वरी असं कधीच काही म्हणाले नव्हती त्यामुळे शोभित जे सांगतोय ते काय असेल ? तो असं काय सांगतोय याकडे लक्ष लागून होतं.

आता शोभित बऱ्यापैकी सावरला होता आणि त्याने ठरवून टाकलं होतं हीच ती करेक्ट वेळ आहे आता बोलायलाच हवं.

तो सरळ म्हणाला की," मामा- मामी ज्या विचारांनी तुम्ही आणि माझ्या आईने हे लग्न ठरवलं ते काही टिकण्याची चिन्ह मला तर दिसत नाहीयेत!"

" अहो शोभित काय हे ? असं काय बोलताय? काय झालं? काही चुकलं का आमच्या मुलीचं?"
मामी पटकन म्हणाल्या.

शोभित हसून म्हणाला," चुकलं ना, खरं तर चुकलं माझंच? मी केवळ तिच्या दिसण्यावरती सहा महिने तिची मर्जी सांभाळत राहिलो. यापुढे माझ्याच्याने हे फार दिवस होणार नाही.!"

" अहो हे काय आणि? काय झालं सांगा तरी?"

" तसं विशेष काही झालं नाही, जसं इथे मित्रांसोबत राहत होतो हॉस्टेल वरती राहायला सारखा आता ही तिथे आम्ही दोघजण तसेच राहत आहोत."

"आता बाई? हे तुम्ही काहीही बोलताय? कसं शक्य आहे ? " मामी हादरल्याच. त्यांना विश्वासच बसेना.

"अहो खरं सांगायचं तर , . . . लग्न करूनही, बघा ना , एकट्याने संसार करतो आहे.
सांगतो ना - मी म्हणजे काय सकाळी लवकर उठतो, घर झाडतो, तिच्यासाठी चहा करतो, आंघोळ करून देवाची पूजा करतो आणि मला जमेल तेवढा स्वयंपाक करून डबा घेऊन जातो. तिची मर्जी असेल तर ती डबा नेते नाही तर तेही नाही. संध्याकाळी मी लवकर येतो, हात पाय धुऊन चहापाणी करतो देवाजवळ दिवा लावतो आणि टीव्ही पाहत बसतो. ती तिच्या हिशोबाने तिच्या वेळेला येते, कधी खूप उशीराही येते. जॉब तर आहे, तसा त्या व्यतिरिक्तही तिच्या पार्टी चालू असतात. मी तिची वाट पाहत असतो अंदाज घेवून संध्याकाळचा स्वयंपाक करतो . कधी बाहेरून मागवतो , कधी मेस मध्ये जेवतो. . . हे असंच चालू आहे.!"

"पण हे असं ? माझा नाही विश्वास!" मामी जेव्हा असं म्हणाली तेव्हा शोभितला खूप राग आला.


क्रमशः
लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक २२. ११. २२

🎭 Series Post

View all