पुरूषार्थ ....( टीम अमृतवेल )

"तू आई मी बाबा होणार आहोत..."...तिला आपल्या हातांवर उचलून घेत गोल फिरवत तो बोलत होता.. त्याच्या चेह??


 

पुरुषार्थ

"ये पोरी चल दूर हो...वांझोटी कुठली..."....कमलाबाई  रागात ओरडल्या...आणि बडबड करत होत्या.तसे सगळ्या बायका गौराईकडे बघून लागल्या.

"गौराई तुझ्या सासूबाईंना  करू देत  औक्षण,तू जरा बाजूला जाऊन बस......".....मनीषामावशींनी गौराईच्या हातातून औक्षणची प्लेट काढून घेतली आणि  डोळ्यांनी कविताला काही  इशारा करत बोलल्या.तिला खूप वाईट वाटत होते पण येव्हणा आता तिला या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती आणि ती बाजुला झाली.

"कविता तुला माहिती ना माझ्या घराच्या लोकांचा स्वभाव...का गौराईला पुढे करतेस??...खरे तर तिला नसते आणले तरी चालले असते"....मनीषा

"अग प्रिया आणि गौराई नंदाभावजया कमी आणि मैत्रिणी जास्ती आहेत..दोघींचा एकमेकांवर जीव आहे...म्हणून घेऊन आले...एकमेकींना भेटून आनंद झाला बघ....."..कविता

मनीषा कविता बहिणी,गावाकडील घरी आज मनिषाच्या नातावाचा नामकरण सोहळा सुरू होता.त्यात गौराईला औक्षावन करायला पुढे आलेले बघून प्रियाची आजी,मनिषाच्या सासूबाई कमलाबाई जरा जास्तीच रागवल्या होत्या.सोबत प्रियाच्या सासरच्या काही बायका सुद्धा काही काही बोलत होत्या.

"वांझोट्या पोरीने स्वतःच अशा समारंभात जाऊ नये...येवढे समजण्याजोगी काही अडाणी नाही तू"....एक बाई

"हिला नाय पण हिच्या सासूला समजया नग...."दुसरी बाई

कमलाबाईंची कुरबुर अधिकच सुरू झाली होती..हळूहळू बायकांमध्ये बोलाचाली चांगलीच वाढत होती.सगळ्याच गौराईला घेरून बसल्या होत्या....मनाला टोचेल असे त्या सगळ्यांचे बोलणे सुरू होते....त्यांचे बोलणे ऐकून गौराईच्या डोळ्यात पाणी तरळू लागले होते,तिला आता तिथे खूप एकटे वाटत होते.श्रीनिकेत बाहेरून हे सगळं बघत होता.

"बाळ न होण्यात गौराईचा काहीच दोष नाही आहे,ती एकदम सुदृढ आहे....दोष माझ्यात आहे...."....तिथे आपल्या बायकोला एकटे पडलेले बघून श्रीनिकेत आतमध्ये गौराईजवळ येत तिचा हात पकडत बेधडक बोलला.

त्याचे बोलणे ऐकून सगळे अवाक होत त्याच्याकडे बघत होते,आता तर बाहेर बसलेल्या पुरुषमंडळींचेसुद्धा लक्ष आतमध्ये गेले.श्रीनिकेतची आई तर डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती.

"अहो,हे काय......."...गौराई बोलतच होती की श्रीनिकेतने तिला डोळ्यांनीच चूप रहायला सांगितले.

"आजी-मावशी,गौराईमध्ये काहीच दोष नाही,सो तिच्यामुळे इथे काहीच अपशकून होणार नाही,आणि मी तर तिकडे दूरच बसलोय...तर तुम्ही निर्धास्त रहा"....श्रीनिकेत.

"श्रीनिकेत,अरे तू हे काय बोलतो आहेस...इथे सगळे आहेत"...मनीषा मावशी

"लग्नात अग्नीच्या  आणि  आपल्या थोरामोठ्यांच्या साक्षीने घेतलेल्या शपथा आणि  तिला दिलेल्या वचनांचे पालन करतोय.."....श्रीनिकेत

"श्रीनिकेत,आपला पुरुषार्थ असा सगळ्यांसमोर घालवायला निघाला आहे तू?"....मनीषामावशी

"इथे सगळ्या स्त्रिया असून सुद्धा एका स्त्रीत्वाला दोष देण्यात तुम्ही धन्यता मानत आहात,मग माझ्यातला पुरुषार्थ जागायला नको?संसारात काही कमीजास्त झाले तर फक्त बाईलाच का वेठीस धरले जावे,तिची चूक नसताना सुद्धा??मूल होणे,न होणे तर माझ्या हातात नाही,पण जे माझ्या हातात आहे ते तर मी नक्कीच करू शकतो.चारचौघात जर माझ्या बायकोचा अपमान होत असेल आणि तो मी निमूटपणे बघत बसावं,हा नक्कीच माझा पुरुषार्थ नाही.आपल्या बायकोच्या मागे खंबीरपणे उभे राहणे,तिच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणे याला सुद्धा पुरुषार्थच म्हणतात.

"बाई बाई....काय काय बोलायला लागलं हे पोरगं?"...एक बाई

"मला खंत आहे तुम्ही एक स्त्री असून सुद्धा एका स्त्रीला समजून घेत नाहीत.चुकीच्या जुन्या चालीरीतीना तुम्ही इतके जकडून बसले आहात की तुम्हाला योग्य काय काहीच कळत नाहीये.प्रिया-गौराई एकमेकींना जीव लावतात... प्रियाला मुलगा झाला तर गौराईला किती आनंद झाला,बाळासाठी काय करू अन् काय नको असे तिला झाले होते.किती कौतुकाने आणि प्रेमाने तिने हे सगळं आपल्या हाताने बनवले आहे.आणि तुम्हाला वाटते तिच्या स्पर्शाने बाळाचे वाईट होईल?आपण इतके शिकलेले...समाज कुठे चालला आहे आपला??"...श्रीनिकेत

"श्री....शांत बस...."...आई.

"Sorry...मला कोणाचा अपमान नव्हता करायचा,मला फक्त एवढेच म्हणायचे आहे ज्यात गौराईचा दोष नाही,त्याची शिक्षा तिला का??".....श्रीनिकेत गौराईचा हात पकडत तिथून बाहेर पडला.

"काय कविताताई पोरगा सूनबाईच्या मुठीत दिसतो??"...एक बाई

"नाही तर काय,असे खुलेआम कोणी पोरगं बोलत असते काय?"...दुसरी बाई

"नवीन विचारसरणीचा मुलगा आहे तो...बाकी काही नाही"...कविता

उंच,दिसायला देखणा गोरापान,शांत,सुस्वभावी बघताक्षणी कोणीही प्रेमात पडावं असाच श्रीनिकेत सुंदर,नाजूक,गहू वर्णीय,बडबड्या पण तेवढयाच हळव्या  गौराईच्या पाणीदार डोळ्यात हरवून जाई....एकच कंपनीमध्ये जॉबला असताना तो तिच्या प्रेमात पडला......

श्रीनिकेतच्या आईला गौराईचे स्थळ तेवढे आवडले नव्हते,पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना नमते घ्यावे लागले होते आणि मग श्रीनिकेतने  स्वतःहून गौराईच्या घरी तिची मागणी घातली होती.

चुटुक लाल शालूमधल्या गौराईवरून सुटबुटातल्या श्रीनिकेतची नजर हटेना...सनई चौघडा वाजला...मंडप दारी सजला...फुलांची-रंगांची  उधळण झाली...अग्नीच्या साक्षीने...सप्तपदी चालत,मंत्रांच्या सुरात,मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्नाच्या पवित्र बंधनात  लक्ष्मीनारायणचा या जोडीचे गृहस्थाश्रमात पदार्पण झाले.

सासूबाई  गौराईवर थोडी नाराजी होतीच....त्यांचे अधूनमधून टोचणे सुरू असायचे सोबतीला  आजीसुद्धा असायची,त्यांच्या जुन्या रुढी,चालीरीती,सणवार भरपूर असायचे,त्यावरून सुद्धा बरेच बोलणे व्हायचे..पण श्रीनिकेतच्या प्रेमापुढे तिला हे सगळे गौण वाटायचं....त्याच्या मिठीत एकदा विरघळली की ती हे सगळं विसरून जायची आणि परत उत्साहाने नवीन दिवसाची हसत सुरुवात करायची.श्रीनिकेतसुद्धा तिला खूप जीव लावायचा.   

आपल्या सालस,लाघवी स्वभावाने हळूहळू घरातल्या सगळ्यांसोबत तिचे छान जमायला लागले होते.गौराईच्या साथीने श्रीनिकेतची उत्तरोत्तर प्रगती होत होती.दोघांनी जोडीने एका छोट्या घराचे रूपांतर आता बंगल्यामध्ये केले होते.सौख्य घरात पाणी भरत होते,नजर लागावी इतकं सगळं छान सुरू होते.

दोघांच्या लग्नाला आता जवळपास 4-5वर्ष झाली होती,पण दोघांच्याही संसार वेलीवर अजूनही फुल उमलले नव्हते.दोघांनीही मेडिकल चेकप केले होते,दोघेही आई बाबा बनण्यासाठी एकदम सुदृढ होते.आजी,सासूबाईंच्या सांगण्यानुसार सगळे उपासतापास सुरू होते,नवस बोलल्या जात होते तरीसुद्धा फळ काही मिळेना.शरीराला पाहिजे तसा आराम मिळत नाहीये...नोकरीमुळे दगदग होते आहे कारण पुढे करून गौराईला सासूबाईंनी नोकरी सोडायला लावली होती.गौराईने पण चांगलं काही होईल या आशेने नोकरी सोडली होती.

आता तर त्यांच्या लग्नाला 8-9 वर्ष उलटून गेली होती पण ते दोघे अजूनही आईबाबा झाले नव्हते.त्यामुळे गौराईला अशा ओटी भरणे,बारसे,किंवा इतर कुठल्या शुभ समारंभात नेहमीच बोलणी खावी लागायची आणि आजही मनीषामावशीकडे तेच घडले होते....

कार्यक्रमातून श्रीनिकेत गौराईचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला होता.गावातला वाडा तो तसा मोठाच,मागच्या बाजूला गायीच्या गोठ्याच्या बाजूला पडवी होती तिथेच श्रीनिकेत गौराईला घेऊन आला..

"श्रीनी,अहो हे सगळं असे स्वतःवर घ्यायची गरज होती काय?तुमचा काहीच दोष नाही आहे ना यात......"....गौराई

"तुझा तरी काही दोष आहे का राणी?तुझ्या पण सगळ्या मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत,मग तू एकटीनेच का सगळं सहन करायचं?किती काय बोलत होते सगळे,मला अजिबात नाही आवडले"...तो

"अहो पण तुम्ही असे सगळ्यांपुढे बोललात,लोकं काय विचार करतील?मला सवय झालिये या सगळ्यांची...तुम्हाला कोणी काही बोललेलं मला नाही सहन होत"....गौराई

"मग तुला कोणी काही बोललं मला कसं काय चालणार?बोलू दे जे बोलायचं...तसे पण ही लोकं कुठे आपली आहेत??....आपले लोकं सगळ्यांसमोर आपला असा खेळ नाही मांडणार.."....श्रीनिकेत,त्याचे बोलणे ऐकून गौराईच्या डोळ्यातले अश्रू तिच्या गालांवर ओघळले.

"नाही गौराई....तुझे हे अश्रू एवढे स्वस्त नाहीये...असे कोणाहीसाठी हे वाया घालवायचे नाही."...तो तिचे डोळे पुसत बोलला.

"वाह पोरा...तुझ्यासारखा नवरा मिळाला ना तर कोणत्याच बाईला वांझोटी म्हणून कोणी हिणवायची हिम्मत करणार नाही.सगळ्यांसमोर एका पुरुषाला असे बोलायला खूप मोठी हिम्मत लागते,बावनकशी सोनं आहे पोरी तुझा नवरा...जप त्यासनी.".....बाजूलाच एक आजोबा त्या दोघांचे बोलणे ऐकत होते,त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत होता..ते त्या दोघांजवळ येत बोलले.

"हो आजोबा....."...गौराई

"असेच एकमेकांची साथ कधी सोडु नका....खुश रावा जोडीने...."...आजोबा श्रीनिकेतच्या डोक्यावर हात ठेवत बोलत निघून गेले....

.........................................................................

मूल होत नाहीये म्हणून घरात आता वातावरण थोडं तणावपूर्ण राहू लागले.आई,आजीचा नातूसाठी तगादा सुरू झाला होता.स्पेशालिस्ट डॉक्टर्स,वेगवेगळ्या ट्रीटमेंट,हार्मोन्सचे इंजेक्शन्स,टेस्ट सगळंच सुरू होते.पाण्यासारखा पैसा खर्च केल्या जात होता.शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावे लागत होते ते वेगळे.कधी होणाऱ्या काही मेडिकल टेस्टमध्ये गौराई अक्षरशः रडून द्यायची,कधीतर वेदना तिला असह्य होत.

एक दिवस ती झोपली असता तिच्या अंगावरचे पांघरून नीट करायला गेला तेव्हा श्रीनिकेतचे लक्ष तिच्या पायांकडे गेले....तिच्या मांड्यांवर हिरवे-निळे,इंजेक्शनचे खुप डाग,छोट्या छोट्या जखमा त्याला दिसल्या.....ते सगळं बघून त्याचे हृदय पिटाळून निघाले.....

"गौराई........आपण एखाद दत्तक मूल घेऊ...थांबवूया हे सगळं,आता नाही बघवत त्रास..."....श्रीनिकेत

"घरी सगळ्यांना आपलं रक्ताच बाळ हवे आहे....असं खचून कसे चालणार श्रीनी....पुढे मिळणाऱ्या आनंदपुढे हा त्रास विसरूनसुद्धा जाऊ "...गौराई

"हो पण.....मला नकोय  हे सगळं.....मला नाही सहन होत आहे तुला होणाऱ्या वेदना आता...."....श्रीनिकेत,त्याचा आवाज जड झाला,आणि एक अश्रू त्याचा गालांवर ओघळलाच....त्याचा तो आवाज तिच्या हृदयाला चर्र करून गेला...त्याला असे असह्य झालेले बघून तिला हृदयात खूप दुखल्यासारखे वाटत होते....ती त्याच्या जवळ जात आपल्या ओठांनी त्याच्या गालावरचे  अश्रू टिपले..तिच्या स्पर्शाने त्याचे डोळे अलगद मिटल्या गेले.

"तुमच्या मिठीत सगळ्या वेदांनाची/अश्रूंची   सुंदर फुले होऊन जातात"...तिने त्याच्या मानेला पकडत त्याचा ओठांवर आपले ओठ टेकवले....तिच्या त्या गोड स्पर्शाने तिच्या भोवतीची त्याची मिठी घट्ट झाली....तिच्या वेदना वाटून घेत आता तो तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करू लागला....त्याच्या त्या मोरपीसासारख्या मखमली स्पर्शात ती विरघळून गेली.

......................................................................

"गौराई sssss.........".....श्रीनिकेत आनंदाने ओरडतच घरात आला होता....

"श्रीनी.....सगळं ठीक आहे ना??".....गौराईची धडधड वाढली होती...

"तू आई मी बाबा होणार आहोत..."...तिला आपल्या हातांवर उचलून घेत गोल फिरवत तो बोलत होता..

त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळंच सांगून गेला...त्याला इतके खुश बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले....

"गौराई....रडायचं नाही राणी आता....सगळ्यांच्या मनासारखं झालंय आता......"...त्याने तिला  उतरवले....आणि तिच्या कपाळावर किस करत आपल्या मिठीत घेतले.

आज दहा वर्षनंतर सगळे वाट बघत होते ती गोड बातमी आली होती....घरात आनंद सळसळत होता.

.....................................................................

डॉक्टरांनी आराम सांगितला...सुरुवातीचे दिवस नाजूक म्हणून गौराई आईकडे आरमासाठी  गेली....चार महिन्यांनंतर आईच्या सांगण्यावरून श्रीनिकेत गौराईला घरी घेऊन आला होता..डिलिव्हरी नॉर्मल व्हावी म्हणून आजी-आई गौराईला छोटीमोठी कामं सांगत....डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे वारंवार सांगूनही आई-आजी ऐकत नसत...'डॉक्टरांना काय आहे..ते तसेच सांगतात....आम्हाला काय मूल झालेच नाही काय...'....असले डायलॉग्ज मारायचे....छोट्या छोट्या कुरबुरी सुरच असायच्या.तरीसुद्धा श्रीनिकेत त्यांना समजावत गौराईची जास्तीत जास्त काळजी घ्यायचा...पण याच दरम्यान गौराईचा बीपी कमीजास्ती व्हायला लागला....

गौराईचे सहा महिने भरले...आता सातव्या महिन्यात डोहाळ जेवणाची जय्यत तयारी सुरू झाली...श्रीनिकेतने आपल्या आवडीने गौराईसाठी हिरवी कांजीवरम..हिरवा चुडा आणला........ते बघून गौराई आनंदाने मोहोरली.

श्रीनिकेतची बहिण परदेशातून सुट्टींसाठी आली होती...त्याच दरम्यान गौराईचा वडिलांची तब्बेत बिघडली.....गौराईला भेटायची इच्छा होत होती..पण नणंदबाई खूप वर्षांनी आल्या आहेत,बाळंतपणानंतर जायचेच आहे  म्हणून सासूबाईंनी जायला परवानगी दिली नाही.....गौराईला खूप दुःख झाले..पण श्रीनिकेतला नको सांगायला,मग तो घरात वाद घालेल म्हणून ती गप्प बसली...पण मनातल्या मनात कुढत होती.......

.....................................................................

डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला आता चार दिवस बाकी होते...आणि अचानक गौराईचा बीपी शूट झाला...तिला चक्कर आली......डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन सांगितले....

"अहो आपलं बाळ??काय झाले...मुलगा की मुलगी??..."...गौराई

"मुलगी......"...गौराईला शुद्ध आल्यावर श्रीनिकेत रूममध्ये आला....तिला सुखरूप बघून तो सुखावला....डॉक्टरांनी तिच्या जीवाला धोका आहे सांगितल्यावर तो खूप घाबरला होता...त्याचे प्राण कंठाशी आले होते.......तिच्या जवळ जात तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत कपळवर किस केले....

"अहो......बाळ कुठे आहे??आणा ना तिला इथे...मला माझ्या कुशीत घ्यायचं आहे....."..

तो बेडवर तिच्याजवळ जाऊन बसला....पण गौराईला उठता येईना.....तिला आपल्या मिठीत घेत तिच्याजवळ झोपला.....त्याच्या स्पर्शात तिला खूप असहायत्ता जाणवत होती....ती खूप घाबरली...

"अहो......बाळ......आणा ना......"....तिचा आवाज कापरा झाला होता...तिच्या आवाजाने त्याची मिठी आणखीच घट्ट झाली...

"आपलं बाळ खूप गोड होतं"......श्रीनिकेत

"होतं म्हणजे??....."...ती त्याच्या मिठीतुन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती....पण त्याने तिला आपल्याजवळ पकडुन ठेवले होते....

"ते देवाघरी गेलंय...".......श्रीनिकेत

"तुम्ही हे काय बोलत आहात??....असे काही नाही झाले आहे.... असं काही नाही आहे....आईssssबाबा sssss"....ती ओरडत होती.......असह्यापणाने रडत होती....तो तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता...तिचा आक्रोश त्याला सहन होत नव्हता...त्याचा जीव पिटाळून निघत होता....

थोड्या वेळाने ती शांत झाली.....औषांधांमुळे तिला झोप लागली...तिला नीट झोपवुन बाहेर पडला...सगळ्यांच्या नजरा चुकवून हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये जात ढसाढसा रडला.....त्याचेपण इतक्या वर्षांचं गोड स्वप्न तुटले होते....तिच्यासमोर त्याला खचून चालणार नव्हते........एक पुरुष म्हणून सगळ्यांसमोर त्याला तटस्थच राहावे लागत होते.पण त्याच्याही मनाला खूप वेदना झाल्या होत्या...

……...............................................................

गौराईला हाई बीपीचा त्रास सुरू झाला होता...त्यामुळे बाळाला placentaद्वारे मिळणारा ब्लडफ्लो कमी झाला...ऑक्सिजन कमी झाले...आवश्यक ती जीवनसत्व कमी पडले...बाळाची वाढ खुंटली....आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळे बाळ पोटातच दगावले होते...त्याचेच विष गौराईच्या शरीरात पसरत होते...त्यामुळे गौराईच्या जीवाला धोका निर्माण झाला होता....

........................................................................

या घटनेला घडून आता चार महिने झाले होते.....घरात त्याचे नकारात्मक पडसाद उमटत होते...श्रीनिकेत तर सावरला होता.....गौराई मात्र शांत झाली होती... स्वतःतच राहत होती....ना हसत होती ना रडत होती.....डिप्रेशनचा शिकार झाली होती....झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नव्हती....श्रीनिकेत तिला आनंदी ठेवायचा खूप प्रयत्न करत होता....पण तिच्यात काही बदल होत नव्हता...

........................................................................

"श्री.....मला वाटते तू दुसरे लग्न करावे...."...आजी

"काय...??....तुम्हाला कळते आहे काय तुम्ही काय बोलत आहात??........"....श्रीनिकेत

दाराच्या पलीकडून गौराई हे सगळं बोलणे ऐकत होती.

"भ्रमिष्टासारखी करते कधीकधी.....पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काय उपयोग झाला?....मूल तर सोड पण आता बायको-सून सारखी पण नीट वागत नाही"....आई

"वाह......छान आहे हा तुमचं......आता ती तुमच्या कामाची नाही म्हणून सोडून द्यायची....मग जेव्हा तुम्ही आमच्या कामाचे नसणार तेव्हा आम्ही तुम्हाला सोडायचं काय???".......श्रीनिकेत चिडला.

"तोंड सांभाळ......तुझ्या सुखासाठीच बोलतोय आम्ही"....आई

"माझं सुख फक्त तिच्यासोबत आहे...."... श्रीनिकेत

त्यांच्यामध्ये आता दोन दोन शब्द वाढत होते....तो वैतागून रूममध्ये आला तर गौराई त्याला झोपलेली दिसली...तिच्या त्या शांत रुपाकडे बघून वैतागलेला तो शांत झाला...तिच्याजवळ येऊन बसला तर बाजूला औषध खाली पडलेली होती.....गौराईने झोपेच्या जास्ती गोळ्या खाल्ल्या आहेत त्याचा लक्षात आले......गौराईने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता.....डॉक्टरांची ताबडतोब ट्रीटमेंट झाली.

श्रीनिकेतच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते...तिच्याजवळ बेडवर बसला होता...गौराई रडत होती.

"तुमचं बरं असतं हा...तुम्ही रडून,बोलून मोकळ्या होता....मी काय करायचं?.......कसं जगायचं होत मी,सांगून तरी जायचं होते....नाही तर मला तरी सोबत घेऊन जायचं होते..."...आयुष्यातले हे सगळे रंग बघून आता तो थकला होता.....

"सॉरी.......मला माफ करा....मी परत अशी नाही वागणार"....

"प्रॉमिस???"....

"हो......मला फक्त तुमचे सुख हवे आहे...."...

"माझं सुख फक्त तुझ्या आनंदात आहे.....आपण मुलगी दत्तक घेतोय...."...

"खरंच....??मी आई धर्म निभावू शकेल ना??"...

"मातृत्वाचे वरदान जन्मतः स्त्रीला असते....यशोदामाताच श्रीकृष्णाची आई म्हणून पुजल्या जातात".....श्रीनिकेत

"मी आई होणार......मी आता आई होणार...."...तिचे डोळे आनंदाश्रुनी भरले होते......

"आजोबा खरं बोलले होते....तुम्ही बावनकशी सोनं आहात....मीच तुम्हाला जपण्यात हरले....."....ती त्याच्या मिठीत शिरली....त्याने तिला आपल्या श्वासात सामावून घेतले कधीच ना दूर होण्यासाठी.

..............................................

नमस्कार मित्र/मैत्रिणींनो

आज अशी परिस्थीत बऱ्याच घरात दिसून येते...बाळ न होणाऱ्या बाईला अजूनही बऱ्याच ठिकाणी अशुभ मानल्या जाते....अशा अनेक चुकीच्या परंपरा/चालीरीतींना आपण खतपाणी घालायला नको.

बाळ होणे आपल्या हातात नाही...तरी सायन्सने खूप प्रगती केली आहे त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी शक्य होत आहेत..पण त्या एका सुखासाठी त्यांच्यावर शरिरक-मानसिक-भावनिक  असे खूप आघात होत असतात..हे सगळे ज्यांचे तेच भोगत असतात पण आपण दोन शब्द प्रेमाचे बोलून नक्कीच भावनिक आधार देऊ शकतो.

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीतून जात जीवनाची कठीण परीक्षा देत असतो.

आपले कडू  शब्द एखाद्या व्यक्तीला  डिप्रेशनमध्ये,मरणापर्यंत पोहचवू शकतात हे आपण विसरायला नको...

आपला व्यक्ती आपल्यालाच जपायला हवा.

आनंद वाटूया,आनंदी राहूयात!

काळजी घ्या!!!धन्यवाद!!!

समाप्त...............................................

©मेघा अमोल(टीम अमृतवेल)