लहानश्या झोपडीतून मोठ्या वाड्यात आलेलं त्यांचं देशमुख कुटुंब. आयुष्यात पहिल्यांदाच वाडा पाहून हरखून गेलेली ती दोघं भावंडं. बाबाराव मोठा तर दादाराव छोटा.हळू हळू त्यांची परिस्थिती सुधारलेली. त्यांचे वडील निष्णात ज्योतिषी. सोबतच वेद ग्रंथांसोबतच गुढ विद्यांचे उत्तम जाणकार. वाडवडिलांपासूनच पिढानपिढ्या चालत आलेली ही परंपरा त्यांनी जोपासलेली. त्यांचे पूर्वज पेशवाईची चाकरी करणारे. असं असतानाही मधल्या काही पिढ्यांमध्ये त्यांची ही दुरावस्था झालेली. जमिनी, वाडा हातातून निसटलेला आणि झोपडीत राहण्याइतकी परिस्थिती कफल्लक झालेली. लक्ष्मी निघून गेली तरी सरस्वती अजून टिकून होती. याच विद्येच्या जोरावर आज हा सुदिन त्यांना प्राप्त झाला होता पण म्हणतात ना लक्ष्मी एकटी येत नाही. ती तिच्यासोबत येताना कितीतरी गोष्टी सोबत घेऊन येते.
तांडव गणेशाची विधिवत पूजा, अनुष्ठान जाणणारं हे एकमेव कुटुंब होतं. पेशवे पदाच्या लालसेत रघुनाथरावांनी कर्नाटकाहून कोत्रेकर नावाच्या तंत्रविद्या जाणणार्या पंडितास पाचारण केले होते. याच पंडिताच्या अधिपत्याखाली पेशवाईच्या चाकरीतील इतर पंडितही होते. त्यापैकी एक होते देवशास्री देशमुख. देशमुख घराण्याचे मुळ पुरूष. यांनी समक्ष पाहिलेली ती विधी, अनुष्ठाने, तंत्र, मंत्र, मुर्तीबद्दल सविस्तर माहिती इतकंच नव्हे तर याची मिळणारी फळे ,दुष्परिणाम सर्व काही हस्तलिखित स्वरूपात जतन करून ठेवलं होतं. या प्रमाणेच आणखीही काही गुढ विद्यांचे हस्तलिखित या घराण्याकडे होते. ही माहिती खुप कमी लोकांना माहीत होती. याच माहितीच्या आधारे यांचा माग काढत जहागीरदार कुटुंबाने यांना गाठलं आणि तिथूनच हे शुल्ककाष्ठ देशमुख कुटुंबाच्या मागे लागलं. जहागीरदार कुटुंबही राजसी घराणं. गडगंज संपत्ती चे मालक. जहागीरी मध्ये भेटलेल्या जमीनी आणि त्यासोबतच भेटलेल्या दोन हवेल्या.बडी हवेली आणि छोटी हवेली. एकमेकांच्या प्रतिकृती असणार्या या दोन वास्तू. हे घराणंही पेशवाईशी नातं सांगणारं. मस्तानी बाईसाहेबांचा पुत्र असणार्या समशेर बहादूर च्या वंशविस्तारातील एक शाखा. जन्माने मुस्लिम पण कर्माने चित्पावन ब्राह्मण. यांच्याच परिवारात आणखी धनलालसेने कुणीतरी तांडव गणेश ची स्थापना गुपचूप पणे केली आणि एक एक घडणार्या घटनेने हे कुटुंब हैराण झाले. यावर तोडगा काढण्यासाठी भटकत असताना देशमुख कुटुंबाकडे याचा खात्रीशीर इलाज केला जाईल याची त्यांना माहिती मिळाली आणि ते देशमुखांकडे आले. देशमुख कुटुंबाचा कारभार त्यावेळी बाबाराव आणि दादाराव यांचे वडील मनोहरपंतांकडे होता. मनोहरपंतांचे वडीलही त्यावेळी हयात होते. म्हणजेच समीरचे बाबाराव हे मोठे काका, वडील दादाराव, आजोबा मनोहरपंत आणि पणजोबाही हयात होते. जहागीरदार कुटुंब देशमुखांची इत्यंभूत माहिती काढूनच तिथे हजर झाले होते. त्यांची हलाखीची परिस्थिती ही दुखरी नस त्यांनी ओळखली होती. पुर्नवैभव मिळवून देऊ पण आमची पिडा दूर करा ही अट त्यांनी घातली होती. तांडव गणेशाची स्थापना मोठ्या हवेलीच्या तळघरात करण्यात आली होती. जोपर्यंत माहित नव्हते तोपर्यंत सर्व आलबेल चालले होते मात्र एक एक घडणार्या घटना, संकटं, अपमृत्यू यांना कंटाळून अक्षरक्षः हे कुटुंब हैराण झाले होते. इकडे गरीबीला कंटाळलेले देशमुख कुटुंब जिवावर उदार होऊन हा धोका पत्करण्यास तयार झाले होते. मनोहरपंतांनी हा विडा उचलला. त्यांच्या वडिलांचं मार्गदर्शन पंतांना होतंच . या सर्वात उग्र तंत्रदेवतेची उपासना साध्या व्यक्तिचं काम नव्हतंच. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे संतान वेडी निपजणे किंवा संपूर्ण निर्वंश होणे. हवेलीवाले हेच परिणाम भोगत होते. यातून सुटका करण्यासाठी देशमुखांनी दफ्तरखान्यातील जुनी हस्तलिखितं काढली आणि त्याचदिवशी देशमुखांच्या घरात सर्पदर्शन झाले. सरसरून भितीचा काटा आला तरी गरीबीपुढे हतबल झालेल्या मनोहररावांनी हस्तलिखितातील उपाय अवलंबण्यात सुरूवात केली. आता आता तर त्यांचा मुक्काम हवेलीतच असायचा. सलग चाळीस दिवस वेगवेगळ्या प्रकारची अनुष्ठानं अविरत सुरू होती. शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष हवेलीत स्थापित मूर्तीचं विसर्जन जवळच असणार्या बारवेत करायचं होतं. आपला मुलगा कोणतं अग्निदिव्य करतोय याची कल्पना मनोहरपंतांच्या वडिलांना होतीच. इकडे त्यांनीही त्यांच्यापरीने प्रयत्न चालवले होते. पुण्यकर्म संचय म्हणा किंवा यांची सद्वृत्ती हे कार्य निर्विघ्नपणे पार पडले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ठरल्याप्रमाणे जहागीरदार आपल्या दिलेल्या शब्दाला जागले आणि देशमुखांना त्यांचा वाडा आणि जमिन परत मिळाली. इकडे हवेलीमध्ये घडणार्या घटना मंदावल्या असल्या तरी एकप्रकारचं भयानक औदासिन्य त्या वास्तूत भरलं गेलं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा