Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

।। पुर्णाहुती भाग ४।।

Read Later
।। पुर्णाहुती भाग ४।।
।। पुर्णाहुती ( भाग 4) ©® समीर खान ।।

एकटा असला तरी समीर भित्रा तर अजिबात नव्हता. ASI चा अधिकारी होता. अशा वास्तूंभोवती कितीतरी रम्य, भितीदायक कथा जोडलेल्या असतात हे तो जाणून होता. वरच्या मजल्यावरील तो माणूस अत्यावस्थ का झाला होता याची त्याने चौकशी काढायला सुरुवात केली. त्याला ज्या हाॅस्पिटलला त्याने अॅडमिट केलं होतं तिथेही त्याने चौकशी केली. खरंतर अगदी आयसीयू मध्ये अॅडमिट करूनही त्याला कुठल्याच आजाराचे निदान झाले नव्हतेच. अगदी शुगर, बीपी ही नाॅर्मल होता त्याचा. त्या सदनिकेचा मालक असणारी ती व्यक्ती सदनिका विकल्यावर आश्चर्यकारकरित्या बरी होऊन घरी परतली होती.
या माहितीने समीर अगदीच चक्रावला गेला. त्यांनी ती सदनिका अर्ध्या किंमतीत कुणाला विकली याचीही त्याने चौकशी केली. खरंतर यानंतर जे त्याला समजलं यावरून तो स्वतः काळजीत पडला. आता या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावायचाच याचा चंग त्याने बांधला. कसंही करून तो राहत असलेल्या परिसरातच असणारी, त्या जुन्या तटबंदीच्या आत असणार्‍या छोट्या हवेलीत प्रवेश मिळावणं समीर साठी खूप आवश्यक झालं होतं. तिथे राहणारे मुळ मालकच आता याबाबत बरीच माहिती देऊ शकतात याविषयी त्याला पक्की खात्री होती. छोटी हवेलीत रोजची चक्कर असणारा इसम समीरने हेरला होता. त्याच्या येण्याजाण्याच्या वेळा त्याने माहित केल्या होत्या. अशाच एका कातरवेळच्या संध्याकाळी त्याने त्या इसमाची वाट रोखून धरली. काहीवेळ तो इसम बावरला पण पुढच्याच क्षणी सावध झाला. चकचकीत सफारी सुट, पायात बुटं असणारा तो मध्यमवयीन गृहस्थ बराच पोहोचलेला वाटत होता. मात्र समीरही काही कमी नव्हताच. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा तो माणूस समीरने तिथल्या डिएसपी आणि कलेक्टर शी मैत्री असल्याचे सांगताच पोपटाप्रमाणे बोलू लागला. इतकं होऊनही समीरच्या हाती काहीच लागलं नाही. पाचपाचशेच्या बऱ्याच नोटा समीरने त्या माणसाचं तोंड बंद रहावं या ऊद्देशाने त्याच्या खिशात कोंबल्या. त्या दोघांची काहीतरी मसलत झाली होती आणि येणारा पुढचा दिवस समीर पुढे काय हालचाल करेल याची रूपरेषा ठरवणार होता.

दुसर्‍या दिवशी ठरलेल्या वेळी समीरनेही तसाच सफारी सुट आणि बुटं असा त्या माणसाशी मिळताजुळता पेहराव केला. इतक्या दिवसांची त्याची ईच्छा आज पुर्ण होणार होती. तो माणूस आला तसा त्याने त्याच्या हातातलं बास्केट समीरला सोपवलं आणि तो स्वतः समीरच्या सदनिकेत निघून गेला. घाबरत नसला तरी समीरने धडधडत्या अंतःकरणानेच छोट्या हवेलीत प्रवेश केला. तिथून समीर रहात असलेली वास्तू बरीच लांब दिसत होती. जवळच असणारी पाण्याने तुडुंब भरलेली दगडी बारव तिथली भेसूरता आणखीनच वाढवत होती. तरी नशीब की साफसफाई करणारं ते जोडपं आणि माळीकाका यांनी तो परिसर अत्यंत स्वच्छ ठेवला होता. चौकोनी काळया दगडात बांधलेला तो मोठा चौथरा जवळून खूपच ऊंच भासत होता. त्याच्या मधोमध असणार्‍या पायर्‍या चढून समीर चौथर्‍यावर आला. वीस एक फुट उंच असणारी ती दुमजली वास्तू तिच्या गतकाळातल्या वैभवाची साक्ष देत उभी होती. पुरातत्व चा अधिकारी असलेल्या समीरने क्षणात हे हेरले की ही वास्तू पेशवेकालीन आहे. मोबाईल मध्ये तिथली काही छायाचित्रे त्याने घेतली. हातातलं बास्केट सांभाळत त्याने मुख्य दरवाजाच्या आत प्रवेश केला. बाहेरून स्वच्छ, सुंदर दिसणारी ही वास्तू आतून निर्मनुष्य आणि विराण होती. आतमध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून कुणी तिथे रहात असावं याच्या एकही खाणाखुणा तिथे दिसत नव्हत्या. मग त्या बास्केटमध्ये असणारं गरमागरम जेवण? मोठ्या निश्चयाने तो तिथल्या प्रत्येक वस्तूचे निरीक्षण करत होता. कित्येक किमती अँटीक वस्तू त्याच्या नजरेत भरत होत्या. असं करता करता कधी तो हवेलीच्या दुसर्‍या टोकापर्यंत आला हे त्यालाही समजलंच नाही. हातातलं बास्केट तो तिथेच एका नक्षीदार टेबलावर विसरला होता. तो जिथे आला होता तो भाग बराच पडझड झालेला दिसत होता. समोरच आणखी एक अत्यंत बारीक कलाकुसर असलेला लाकडी दरवाजा होता. त्याने जोर देत तो दरवाजा उघडला.
करकर करकर करत धडाड कन दरवाजा उघडला गेला. नक्षीदार स्तंभ, ऊंच घुमटाकार छताला लटकवलेले जाळयांनी वेढलेले असले तरी मोठे झुंबर त्या हवेलीची गुढता अजून वाढवत होते. एक अनामिक शक्ती त्याला स्वतःकडे खेचत होती. थोडे पुढे जाताच एका भव्य तसबीरीवर त्याची नजर खिळून राहीली. पुर्ण भिंतच काय तर आसपासचा परिसर ही त्या तसबीरीच्या प्रभावाखाली आहे की काय असा भास होऊ लागला.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sameer Khan

Writer

मी समीर खान या टोपणनावाने लिहितो, लिहितो म्हणण्यापेक्षा व्यक्त होतो हे म्हणणे अधिक सोयिस्कर होईल.लिहिणे हा माझा छंद आहे आणि माझं लेखन वाचकांना आवडतं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.

//