Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

।। पुर्णाहुती भाग १।।

Read Later
।। पुर्णाहुती भाग १।।


।। पुर्णाहुती . (भाग १ )©® समीर खान ।।

तो नुकताच त्या आलीशान फ्लॅटमधे रहायला आला होता. उंचापुरा, गोरा, दाट कुरळे केस, कोरीव दाढी तर गुलाबी ओठांवर रूलणार्या भरगच्च मिशा. व्यायामाने शरीर फक्त कमावलेच नव्हते तर एखाद्या शिल्पकाराने पौरूषी सौंदर्याची साक्षात देवता ऊभारावी तशी काया. रूंद खांदे, बलदंड बाहू, सिंहकटी कंबर, मजबूत मांड्या, अवयव न अवयव निहाळत बसावं असं रूपडं. ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागाचा नुकताच जाॅईन झालेला एक हुशार अधिकारी. समीर देशमुख . त्या फ्लॅट मध्ये त्याचे रहायला येण्याचे कारणही तितकेच खास होते. एक तर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा प्रकल्प ऊभारला होता. अद्ययावत जिम पासून ते स्विमिंग पूल पर्यंत सर्व सुखसोयींनीयुक्त असा हा भव्य प्रकल्प होता . ते ही मोजक्याच फ्लॅट सोबत. एका संपूर्ण मजल्यावर फक्त एकच फ्लॅट अशी विभागणी होती. प्रकल्प पूर्ण होण्याआधीच तिथल्या सदनिका, दुकानं विकली गेली होती . त्यामुळे शहरभर हा चर्चेचा विषय होता. कित्येक दुकानं तळमजल्यावर तर वरचे पाच मजले आलिशान सदनिकांसाठी होते. म्हणजे संपूर्ण वास्तूमध्ये केवळ 5 सदनिका असणारा हा आगळावेगळा प्रकल्प असूनही तो पुर्णपणे बुक झाला होता. यापैकी एक सदनिका समीर देशमुख खरेदी करण्यात यशस्वी झाला होता. पार्किंग एरिया दुरवर पसरलेला होता. त्यावर बसवलेली महागडी पार्किंग टाईल्स लक्ष वेधून घेत होती. पुर्ण ईमारतीला असलेला खास राजेशाही लुक व जागोजागी बसवलेल्या महागड्या काचा तिच्या वैभवात आणखी भर पाडत होत्या.तब्बल सात एकरांपेक्षाही मोठ्या जागेत पसरलेला हा महागडा, आधुनिक, सर्व सुखसोयीयुक्त भव्य प्रकल्प ते ही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर साकार झाला होता. तिथल्या एक एक सदनिकेची किंमत कोटीच्या घरात होती आणि तिथे रहायला येणारी सगळीच कुटुंबं लक्ष्मीपुत्र होती. हा प्रकल्प उभारतानाच नेमकं याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं होतं की हा प्रकल्प फक्त अतीउच्चभ्रू नव्हे तर \"राजेशाही \" म्हणून ओळखला जावा. आगाउ बुकिंमध्येही अशाच लोकांची निवड केली गेली होती.

असं असतानाही एक विचित्र कुजबूज सुरू होती. हा पुर्ण परिसर शापित, बाधित असण्याची. शहरापासून जवळच असला तरी कितीतरी वर्षे ही जमिन पडिक होती. पुर्ण परिसराला अजूनही जुन्या काळातील असलेली भक्कम तटबंदी घेरून होती. तर नविन इमारतीपासून थोड्या लांबवर पण तटबंदीच्या आतच महालवजा छोटी हवेली दिमाखात मिरवत होती. त्यासोबतच असणारी पाण्याने तुडुंब भरलेली दगडी बारव अजूनही आपले मूळ स्वरूप राखून होती. त्यामुळे या वदंतांचे गुढ आणखी वाढत होते. वास्तू जुनी झालेली असली तरी नविन ईमारतीला ती फिकी पाडत होती. विशेष म्हणजे अजूनही त्या छोट्या हवेलीत, हवेलीचे शेवटचे वारसदार एकटेच राहत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना कुणीही पाहिले नव्हते. मात्र ते तिथे राहत होते हे मात्र नक्की. कारण हा नविन प्रकल्प ऊभा राहतानाच त्यांनी बिल्डरला प्रस्तावच असा दिला होता की या जागेला असणारी तटबंदी आणि छोटी हवेलीचा परिसर यास धक्का लागू दिला जाणार नाही. तो भाग केवळ आणि केवळ मूळ मालकांचाच असेल. आधी जेथे बडी हवेली अस्तित्वात होती त्याच जागेवर हा नविन प्रकल्प ऊभा करण्यात आला होता. कितीतरी वर्षांच्या प्रयत्नांनंतर बिल्डरला ही जागा हस्तगत करण्यात यश आल्याने नाईलाजाने का होईना त्याने ह्या अटी स्विकारल्या होत्या. अत्याधुनिक, सर्वसुखसोयीयुक्त, भव्य, महागडा व ऊद्घाटनाआधीच पुर्णपणे बुक झालेला असला तरी गंमतीचा भाग म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी दुकानं व पाच मजल्यांपैकी केवळ दोनच मजल्यांवर राहण्यास लोकं आले होते. त्यांपैकीच एक होता समीर देशमुख .
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sameer Khan

Writer

मी समीर खान या टोपणनावाने लिहितो, लिहितो म्हणण्यापेक्षा व्यक्त होतो हे म्हणणे अधिक सोयिस्कर होईल.लिहिणे हा माझा छंद आहे आणि माझं लेखन वाचकांना आवडतं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.

//