Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

।। पुर्णाहुती अंतिम भाग ७ ।।

Read Later
।। पुर्णाहुती अंतिम भाग ७ ।।


।। पुर्णाहुती ( अंतिम भाग 7) ©® समीर खान ।।


एक एक करत त्यांचा परिवार विखुरला गेला. इकडे काळ पुढे सरकत गेला. देशमुख कुटुंब सधन संपन्न झालं. पंतांचे आणि त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. बाबाराव परदेशातच रमू लागले तर दादारावांकडे सर्व सूत्रे हाती आली. आता तर हवेलीचे शेवटचे वारसदार एकटेच उरले होते. जहागीरदारांचा निर्वंश झाला होता. हस्तलिखितात सांगितलेला शेवटचा उपाय म्हणून देशमुखांनी हवेलीचं हुबेहूब चित्र अभिमंत्रीत करण्यासाठी वाड्यात आणलं होतं. इकडे हे अनुष्ठान सुरू असतानाच वार्ता कानी आली की मोठी हवेली आगीत धडधडून पेटली. नशीब की यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही. दादारावांनी त्याच क्षणी तो विधी तिथेच आटोपला आणि वाड्यातली ती खोली कायमची बंद करण्यात आली. कालांतराने समीरसोबत जेव्हा तो प्रसंग घडला तेव्हा त्यांना हे कळून चुकलं की आता पुढचा बळी समीरच आहे. त्याच वेळी त्यांनी तो वाडा रिकामा केला मात्र इतक्या वर्षानंतरही योगायोग म्हणा किंवा कर्मफल, समीरपुढे त्यांच्याच पुर्वजांचा इतिहास उभा ठाकला. या पुर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट विचारात घेण्यासारखी होती. ज्यांनी ज्यांनी लोभ केला त्यांना धनप्राप्ती झाली मात्र त्याचे दुष्परिणाम ही भोगावे लागले. समीर यातून आश्चर्यकारकरित्या वाचला कारण त्याने कुठलीही बेइमानी केली नव्हती. तो निरपेक्ष भावनेने केवळ कुतुहल म्हणून तिथे गेला होता. आता यावर काय उपाय केला पाहिजे हे बाबारावांना पक्कं ठाऊक होतं आणि याचसाठी ते हवेलीवर गेले होते.
नवीन वास्तू बांधतांना जागा निर्दोष असावी लागते. इथे मात्र ही संपूर्ण नवीन वास्तू एका अशा जागेवर बांधली गेली होती जिथे आधीपासूनच एक एक भयंकर घटना घडून गेल्या होत्या. हाच सर्वात मोठा वास्तूदोष तिथे निर्माण झाला होता. वरच्या मजल्यावरील त्या माणसाला झालेला त्रास याच दोषाचा परिणाम होता. समीरही तिथेच रहात असला तरी त्याला अजूनतरी काही त्रास झाला नव्हता कारण तो अजूनतरी कुठल्याही लोभाला बळी पडलेला नव्हता. ईमानदार आणि सचोटीने वागणारा होता.

अंधश्रद्धा पाळणारे नसले, पॅरानाॅर्मल एक्सपर्ट असले तरी बाबाराव नास्तिक नव्हते. जिथे विज्ञान संपते तिथे ईश्वरी हद्द सुरू होते हे ही ते जाणून होते. या जागेत आल्यापासून अनेक अतृप्त आत्म्यांची स्पंदनांसोबतच अतिशय उग्र देवतेचा प्रकोपही त्यांना जाणवत होता. ही स्पंदने नकारात्मक नसली तरी अत्यंत तीव्र आणि त्याच्या तेजानेच सामान्य माणसाला भस्म करू शकेल इतकी प्रखर होती. ज्याप्रमाणे सुर्यदेवता सृजनाची देवता आहे, आपल्या शक्तिने ते प्रकाश, उष्णता, सोबतच ऊन, वारा, पाऊस या निसर्गचक्राला कारणीभूत ठरतात मात्र हेच सुर्यदेवता अगदी काही ईंच जरी अजून पृथ्वीच्या जवळ आल्यास संपूर्ण पृथ्वी भस्म करण्याचीही ताकद ठेवतात असंच काहीसं तांडव गणेश या देवतेबाबतही होतं. सुखकर्ता, दुःखहर्ता विघ्ननायकाचं हे अत्यंत उग्र असं रूप होतं जे तंत्रदेवता म्हणून ओळखलं जात होतं.

सर्वात आधी ती विसर्जित मूर्ती पाण्याबाहेर काढणं गरजेचं होतं मात्र बाबारावांचं मन हे करण्यास धजावत नव्हतं. या संकटावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या पुर्ण आयुष्याची तपश्चर्या त्यांनी पणाला लावली आणि एक आगळा वेगळा उपाय केला. हवेलीचे शेवटचे वारसदार मरणाला टेकलेले होते. त्यांना त्या ही अवस्थेत सोबत घेत त्यांच्या पितरांना आवाहन करत ते तांडव गणेशाला शरण गेले. दोन्ही कुटुंबांकडून झालेल्या चुकांची माफी मागतानाच ते विशिष्ट मंत्रांनी ते करूण प्रार्थना करू लागले. तंत्रदेवता, उग्र देवता असली तरी शेवटी ते गणेशाचेच रूप होते.इकडे बाहेर अखंड अथर्वशीर्ष पठणाने हवेलीचा परिसर दणाणून गेला. या कार्याला दिड दिवस उलटून गेला होता. वयोमानाप्रमाणे बाबारावांची गात्रे थकली होती. मात्र अखंड जाप असल्याने त्यांना तिथून हलणं शक्य नव्हतं. इकडे जहागीरदारांचा शेवटचा वारसदार असणारे त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत होते. अखेर शेवटच्या तिसर्‍या दिवशी होमाच्या वेदीत समिधेची अखेरची आहुती पडली आणि बाबारावांनी तिथेच प्राण सोडला. जहागीरदारांचाही काही वेळाच्या अंतराने अंत झाला. उरलेले हे दोन अखेरचे दुवे आज निखळले होते. पुढच्या पिढीला जिवनदान देण्यासाठी. अनुष्ठान पुर्ण झाल्याने पुर्ण वास्तू दोषमुक्त झाली होती. विसर्जित मुर्ती काढण्याची घोडचुक न करता आपल्या प्राणांची आहुती देत बाबारावांनी या समस्येवर तोडगा काढला होता. पेशवेकाळापासून सुरू झालेल्या या अखंड यज्ञात कितीतरी प्राणांच्या आहुत्या पडल्या होत्या. मात्र बाबारावांनी आपल्या प्राणांची पुर्णाआहुती देत हे प्रकरण संपवलं होतं.

इकडे समीरच्या दुःखाला पारावर राहिला नाही. बिल्डरलाही त्याच्या कृत्यावर पश्चात्ताप झाला. सरकारी आदेशाने पुर्ण परिसर शासनाने आपल्या ताब्यात घेतला आणि संपूर्ण परिसर खाली केलं गेलं. मोठमोठ्या साखळदंडाने आवळत तिथला मुख्य दरवाजा बंद करण्यात आला आणि सरकारी लाल मोहर लावत ही जागा सिल करण्यात आली. कधीही न उघडण्यासाठी.

समाप्त.

आपलाच समीर खान. ©®

( कथा संपूर्ण पणे काल्पनिक आहे. याचा कुठल्याही व्यक्तिविशेष, धर्मसमुदायाशी,देवतेशी कसलाही, काहीही संबंध नाही. ऐतिहासिक पात्रांविषयीही लेखक ही कथा प्रमाण आहे असा दावा करत नाही. तांडव गणेश विषयी माहिती घेऊनच ही कथा लिहिली आहे.(संदर्भ -पेशवे घराण्याचा ईतिहास. लेखक श्री प्रमोद ओक) लेखक सर्व देवतांचा संपूर्ण आदर करतो, मुस्लिम लेखक असल्याने याविषयी कसलाही वाद करू नये. माझ्या कितीतरी कथा मराठी संस्कृतीशी नातं सांगणाऱ्याच असतात. ही कथा अष्टपैलू लेखक महासंग्राम मध्ये असल्याने आपला अभिप्राय नक्की नोंदवा ??)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sameer Khan

Writer

मी समीर खान या टोपणनावाने लिहितो, लिहितो म्हणण्यापेक्षा व्यक्त होतो हे म्हणणे अधिक सोयिस्कर होईल.लिहिणे हा माझा छंद आहे आणि माझं लेखन वाचकांना आवडतं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.

//