पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

.
" थांबा. श्रीमंत देवपूजा करत आहेत. " भालेदार एका इसमास अडवत म्हणाला.

" ठीक आहे. पण देवपूजा संपल्यावर निरोप द्या. गंगोबा तात्यांचा महत्वाचा खलिता आलाय म्हणून. " तो इसम म्हणाला.

राघोबादादांची देवपूजा आटोपली. तो इसम राघोबादादाला भेटला. गंगोबातात्यांचे नाव ऐकताच त्यांनी तातडीने खलिता वाचायला घेतला. त्या खलित्यात मजकूर काहीसा असा होता ,

" सुभेदार मालेरावांचे निधन झाले आहे. होळकरांचे राज्य बेवारस झाले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर अबला आहे. तेव्हा ही अमृतसंधी सोडू नये. इंदौरचे राज्य जप्त करावे. "

हा खलिता वाचून राघोबादादा गालातल्या गालात हसले. त्यांनी फौजेला माळव्याकडे जाण्याचा हुकूम दिला.

***

हेरांनी आणि काही स्वामिनिष्ठ मंडळींनी ही खबर महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे पोहोचवली. ही खबर ऐकून त्या अस्वस्थ झाल्या. महाराणी अहिल्याबाई खोलीत एकांतात बसल्या होत्या. मनात विचारांचे काहूर माजले. पुत्राला गमवून वर्षही झाला नाही की ही खबर यावी ? ज्या होळकरांनी अटकेपावेतो तलवार तळपवली त्यांच्या सुनेला अशी वागणूक ? इतक्या खालच्या थराचे असते का राजकारण ? मग भूतकाळातील आठवणी नेत्रांसमोर आल्या. कुंभेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पावलेले वीर पती खंडेराव होळकर आणि सती जाऊ नये म्हणून अडवणारे सासरे मल्हारराव होळकर.

" सुनबाई , सती जाऊ नका. प्रजेचे हित साधा. त्यांचे कल्याण करा. तुमची गरज आहे या राज्याला. " हे सासरे मल्हारराव होळकर यांचे शब्द पुन्हा कानात घुमू लागले.

सारी मरगळ झटकून पडली. स्वतःसाठी नाही तरी किमान रयतेसाठी आपल्याला समाजाची बंदीस्त चौकट मोडावी लागेल. महाराणी अहिल्याबाईंनी तातडीने दरबार बोलावला. एव्हाना सर्वांपर्यंत खबर पोहोचली होती. पांढरीशुभ्र साडी घातलेल्या , मुखावर विलक्षण तेज आणि नेत्री असामान्य निर्धार असलेल्या महाराणी अहिल्याबाई काय म्हणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

" गणोजी , तातडीने भोसले , गायकवाड , शिंदे यांना पत्रे लिहायला घ्या. त्यांना लिहा , आज जी वेळ आमच्यावर आली आहे ती वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. एकीतच सर्वांचे हित आहे. " महाराणी अहिल्याबाई म्हणाल्या.

" जी आईसाहेब. " गणोजी म्हणाला.

" होळकरांची पुण्याई अजून संपलेली नाही. तुकोजीरावांना खलिता धाडा. फौजेची जमवाजमव करायला सांगा. आम्हीही फौजेची उभारणी करू. " महाराणी अहिल्याबाई गर्जल्या.

" आपली फौज ?" गणोजीने विचारले.

" आम्ही महिलांना शस्त्र चालवायचे प्रशिक्षण दिले आहे. महिलांची पाच हजारांची फौज घेऊन आम्ही राघोबादादांना सामोरे जाऊ. " महाराणी अहिल्याबाई म्हणाल्या.

***

ठरल्याप्रमाणे राघोबादादा महेश्वरजवळ नर्मदा नदीच्या काठी फौज घेऊन उभे राहिले. तिकडे महाराणी अहिल्याबाईंनीही सर्व महिलांना बोलावले.

" सखींनो , हे लोक आम्हास अबला समजतात. पती , पुत्र , पितातुल्य सासरे या सर्वांचे मृत्यू होऊनही वैयक्तिक दुःख गिळून आम्ही रयतेची सेवा करत राहिलो. न्याय प्रस्थापित केला. मंदिरांची पुनर्बांधणी केली. विधवा स्त्रियांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. एवढे सर्व करूनही केवळ आम्ही स्त्री आहोत म्हणून आमचे राज्य गिळंकृत करण्यासाठी फौजा उभ्या ठाकल्या आहेत. सर्वजण हे का विसरले की हे स्वराज्य एका थोर स्त्रीच्या संस्कारावर आधारित आहे. त्या थोर स्त्रीचे नाव राजमाता जिजाऊ. आपण सर्व त्या जिजाऊच्या लेकी. बांगड्या घालणारे हात जेव्हा हाती तलवार घेतात तेव्हा रणांगणावर कसे थैमान माजते हे दाखवायचे आहे. दुर्दैवाने लढा परकीयांशी नसून स्वकीयांशी आहे. तुम्ही आहात आमच्या सोबत ?" महाराणी अहिल्याबाईंनी विचारले.

" आईसाहेब , तुम्ही फकस्त आदेश द्या. कंबरडे मोडू सर्वांचे. " एक स्त्री म्हणाली.

" व्हय. जिवंत आहोत तोपर्यंत हे राज्य दुसऱ्याच्या घश्यात जाऊ देणार नाही. " दुसरी स्त्री म्हणाली.

सर्वजण महाराणी अहिल्याबाईंच्या नावाचा जयघोष करू लागले.

***

बघता बघता महिलांची फौज राघोबादादांच्या फौजेसमोर उभी राहिली. राघोबादादा घोड्यावर स्वार होऊन पुढे जाऊन पाहतात तर समोर ढाल-तलवार घेऊन साक्षात रणचंडी उभी दिसते.

" आम्ही अबला नाही दादासाहेब. हे राज्य आमच्या पूर्वजांनी रक्त गाळून आणि तलवार तळपवून मिळवले आहे. सहजासहजी तुमच्या घश्यात जाऊ देणार नाही. होळकरांचा वारस ठरवायचा अधिकार होळकरांचाच. आता लढाई करूनच हे राज्य जिंका. " महाराणी अहिल्याबाई गर्जल्या.

राघोबादादांच्या पायाखालची जमीनच सरकली. गंगोबा तात्या धावत राघोबादादांच्या जवळ आले.

" दादासाहेब , अनर्थ झाला. भोसले गायकवाड शिंदे तुकोजी सर्वजण फौजा घेऊन आलेत. " गंगोबातात्या म्हणाले.

" काय ? अचानक ही एकी कशी उफाळून आली ? असो. आम्ही युद्धच करणार नाही. समोर उभी असलेली महिलांची फौज बघा. जर आम्ही महिलांसोबत युद्ध केले तर महिलांवर शस्त्र चालवले म्हणून आमची अपकीर्ती होईल. जिंकलो तरीही याच वीरांगना म्हणून गौरविल्या जातील आणि हरलो तर बायकांकडून हरलो म्हणून तोंड काळे करावे लागेल." राघोबादादा म्हणाले.

***

राघोबादादांनी स्वतःचा वकील पाठवला. महाराणी अहिल्याबाईंना छावणीत बोलावले. महाराणी अहिल्याबाई दादासाहेबांच्या छावणीत आल्या.

" आईसाहेब , आपण चुकीचा ग्रह करून घेतलात. मल्हारबा आम्हास पितातुल्य. त्यांचे राज्य गिळंकृत करायला आम्ही का नाही धजावे ? आम्ही तर सांत्वन करायला आलो होतो. " राघोबादादा म्हणाले.

" सांत्वन करायला फौज ? आपण एकटे आला असता. असो. माळवा आपलेच घर आहे. आम्ही स्वतः आपला पाहुणचार करू. " महाराणी अहिल्याबाई होळकर म्हणाल्या.

***

गणेश महालात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मसनदीवर विराजमान होते. समोर नाना फडणीस आणि न्यायाधीश रामशास्त्री हजर होते.

" श्रीमंतांनी काय निर्णय घेतला आहे ? आता एका बाईकडे सुभेदारीचे वस्त्रे जाणार ?" नानांनी विचारले.

" का नाही ? या स्वराज्याचे अंकुर सर्वप्रथम ज्यांच्या हृदयात फुटले त्या राजमाता जिजाऊही एक बाईच. महाराणी येसूबाई , उमाबाई दाभाडे , ज्यांच्या आशीर्वादाने पेशवाईची वस्त्रे स्वीकारली त्या औरंगजेबाला झुंजवत ठेवणाऱ्या ताराऊ , कोल्हापूरची गादी सांभाळणाऱ्या महाराणी जिजाबाई या सर्व बाईच आहेत. म्हणून सुभेदारीचे वस्त्रे देताना आम्ही स्त्रीपुरुष भेद मानणार नाही. न्याय काय म्हणतो रामशास्त्री ? " श्रीमंत माधवराव पेशवे यांनी न्यायाधीशाकडे नजर रोखून धरत विचारले.

" पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे केवळ स्त्री म्हणून अधिकार डावलले गेले तर घोर अन्याय होईल श्रीमंत. मग आपणास इतिहास कधीच माफ करणार नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तर पुरुषांहूनही वरचढ आहेत. त्या होळकरांच्या मसनदीवर बसल्या तर रयतेचे कल्याण होण्यावाचून राहणार नाही. " रामशास्त्री परखडपणे बोलले.

" आम्ही निर्णय घेतलाय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरच राज्य सांभाळतील. सर्व प्रशासकीय अधिकार त्यांच्या हाती असतील. तुकोजीराव होळकर सेनापती या नात्याने लष्कराची जबाबदारी पार पाडतील आणि आईसाहेबांच्या सल्ल्यानेच वागतील. " श्रीमंत माधवराव पेशवे म्हणाले.

***

श्रीमंत माधवरावांनी बनवलेली ही व्यवस्था पुढे 28 वर्षे चालली. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी रयतेला सुखी केले. आजही माळव्यात त्यांना देवीसमान पुजले जाते. विधवांना संपत्तीत आणि मूल दत्तक घेण्याचा अधिकार , न्यायदान , धर्मशाळा , मंदिर पुनर्बांधणी , पाणपोया , घाट बांधणे , दरोडेखोरांचे पुनर्वसन अशी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली. जेव्हा युरोपात वुमन इम्पॉवरमेंटची संकल्पनाही अस्तित्वात नव्हती तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी प्रस्थापित सामाजिक चौकट मोडून समस्त मानवजातीसाठी नवीन आदर्श निर्माण केला. आईसाहेबांचे कर्तृत्व युरोपात पोहोचले आणि तिथल्या स्त्रीमुक्तीचळवळीला प्रेरणा भेटली.

अश्या या थोर राणीला मानाचा मुजरा. ?

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all