आरुषी शून्यात बघत बसून होती. अर्ध आयुष्य संपलं होतं. कितीदा तरी ती मेली होती आणि अनेकदा पुन्हा नव्याने जन्मली होती. तिच्या आयुष्याचा जन्म मरणाचा फेरा किती वर्ष असाच सुरु राहणार हे तिला कळत नव्हतं.
"अगं ! अशी बसून राहू नको."
"काही तरी बोल. रड तरी."
"मनात असेल ते बोलून मोकळी हो."
वेगवेगळ्या तऱ्हेचे सूर उमटत होते. ती टकामका बघत होती. तिच्या मनात आलं.
' मी रडू तरी कशा कशासाठी?
'बोलू ?तर कोण आहे माझं? '
'मनात असलेल्या भावनांचा पूर कसा दाखवू?'
आणि आयुष्याचा पट सरसर तिच्या डोळ्या पुढून सरकून गेला.
वयाच्या सात वर्षा पर्यंत ती खूप आनंदात होती. आई, बाबा नातेवाईक,आजूबाजूचे, सगळेच तिचं कौतुक करायचे. होतीच ती तशी. गुलाबी रंग, काळेभोर मोठे डोळे, गोबरे गाल, कुरळे केस, हसताना एकाच गालात पडणारी खळी आणि गोड मधाळ बडबड. घरात,वाडीत धुमाकूळ घालायची. लाड आणि फक्त लाड होत असायचे तिचे. पण नियतीला हे बघवलं नाही.
आई बाबां बरोबर फिरायला गेलीली आरुषी, अचानक एका झटक्यात अनाथ झाली. एका ट्रकने आई बाबांना उडवलं आणि तिचं बाल्यपण चिरडून टाकलं.
" आई." ही एकच किंकाळी आसमंतात विरून गेली.
रस्तेतच जमलेल्या लोकां पैकी कोणीतरी तिला आपल्या वासनेचा शिकार बनवून परत रस्तेवर आणून सोडलं. ते बाळ घाबरून, काय झालं ते न कळून फक्त विव्हळत, रडत राहिलं.
कोणीच तिला आपलं म्हटलं नाही म्हणून तिची रवानगी अनाथाश्रमात झाली.
"मला आई हवी."
"माझे बाबा कधी येणार?"
हळूहळू ती पुटपुटत असायची. पुरुष दिसताच अंग आखडून घ्यायची.आश्रमाच्या संचालिकां मेधा ताईंनी तिच्या बरोबर काय घडलं असेल ह्याचा अंदाज घेतला. त्या तिला बरेचदा थोपटून, प्रेमाने जवळ करत असत.
"किती सुंदर बाळ हे."
"देवाने मन लावून हिला घडवलं आहे."
वगैरे गोष्टी तिच्या कानी पडायच्या. हळूहळू ती आश्रमात रुळू लागली. हुशार असल्याने सगळ्याच गोष्टी ती पटकन आत्मसात करायची. ती नव्याने जगायला शिकू लागली.
"पुढल्या आठवड्यात आपल्या कडे आश्रमप्रमुख येणार आहेत. तेव्हा काही कार्यक्रम त्यांच्या समोर सादर करायचे आहेत बरं का?" मेधा ताई म्हणाल्या.
"ताई! मी सुंदर पोस्टर तयार करते."
"ताई ! मी रांगोळी काढते."
" ताई! मी गाणं म्हणते."
सगळेच उत्साहात होते. आरुषीला रांगोळीत प्राविण्य होते. तिला रांगोळी काढायचं आणि पाहुण्यांचे स्वागत करण्याचं काम मिळालं.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आश्रमात एकच गडबड होती. उत्साह ओसंडून वाहत होता. प्रमुख पाहुणे आले. मंचासीन झाले. आरुषी स्वागताला पुढे झाली. आता आरुषी तेरा वर्षांची झाली होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. तिचे ते अनाघ्रात सौंदर्य, प्रमुख पाहुण्यांना विचलित करून गेलं.
कार्यक्रम संपला.
"आरुषीला भेटायचं आहे."
म्हणत प्रमुख पाहुण्यांनी तिला बोलवून घेतलं. आपल्या जवळ बसवून ते तिच्या केसांवरून हात फिरवत चौकशी करू लागले. आरूषीचा चेहरा कावरा बावरा झाला. तिने आपलं अंग आखडलं. मेधा ताईंच्या लक्षात आलं.
"आरुषी! तू सगळ्यांच्या चहा पाण्याचं बघणार होतीस ना? मग? सर प्रत्येकाला काम सोपलं आहे. तिचं काम झालं की तिला परत बोलवायचं का? "
म्हणत मेधाताईंनी तिची तात्पुरती रवानगी केली.
आणि मेधाताईंची बदली दुसऱ्या आश्रमात झाली. आरुषी परत एकदा नरक यातनातून गेली. श्वास होता म्हणून जिवंत होती इतकंच.
आश्रमात तिच्या सौंदर्याचा लिलाव होऊ लागला. पण एक देवा माणूस भेटला आणि आरूषी मेधाताईंकडे पोहोचली. त्यांच्या घरात ती सुरक्षित होती.काळ सरकत होता. आरूषी पुन्हा नव्याने उभी राहिली. फाईन आर्टस ची पदवी मिळवली होती. पण आता ती एका गर्ल्स हॉस्टेल वर रहात होती. मेधा ताई सतत तिच्यावर लक्ष ठेवून असायच्या.
आरूषीला एका शाळेत नोकरी लागली आणि ती आनंदाने वेडीच व्हायची राहिली.
पण खरा तर आनंद पुढे होता.
त्या दिवशी आरुषी शाळा संपल्यावर घरी जायला निघाली आणि तिला तिच्या वर्गातील एक मुलगी, शिल्पा शाळेच्या गेट जवळ भेटली.
" अगं तू गेली नाहीस अजून. तुला कोण घ्यायला येतं रोज?"
आरुषीने विचारताच, शिल्पा काही बोलणार इतक्यात समोरून एक रुवाबदार, स्मार्ट तरुण आला आणि त्या मुली समोर बसत आपले कान धरत
"सॉरी मुन्नू !"
म्हणाला. त्याला बघताच शिल्पा आनंदाने त्याच्या गळ्यात पडली.
"इट्स ओके! काका" म्हणत ती आरुषीकडे वळली आणि म्हणाली
" काका! ह्या माझ्या आर्ट्स घ्या मॅडम. आमच्या सर्वांच्या फेवरेट."
आता त्या तरुणाचे लक्ष आरुषीकडे गेले आणि तो हात जोडून, आ वासून तिच्या कडे पहात राहिला.
"काका!" म्हणत शिल्पानेन त्याचा की शर्ट ओढला. तो भानावर येत
"सॉरी! तुम्हाला भेटून छान वाटलं. म्हणत परत उभाच राहिला.
"नेताय ना आपल्या पुतणीला?" आरुषीचं वाक्य ऐकून, लाजतच
"हो! हो ना." म्हणत आपल्या पुतणीचा हात धरला आणि चालू लागला.
आरुषीला खूप गंमत वाटली. तिला हसू आवरत नव्हतं.
तो दिवस तिचं भाग्य पालटणारा ठरला. त्या तरूणाला म्हणजे 'जय'ला आरुषीने भुरळ टाकली होती. ती दोघं परत परत भेटू लागली. माहित नाही का? पण आरुषीला जयच्या बाबतीत ते जाणवलं नाही जे तिला पुरुष म्हणताच इतरांच्या बाबतीत जाणवायचं, पण आरुषी सारखी एका मानसिक दबावा खाली असायची. जय परत परत विचारायचा
"तुला काही होतंय का?"
"माझ्या बरोबर तू कंफर्टेबल नाही का?"
"तुला काही बोलायचं किंवा सांगायचं आहे का?"
शेवटी एक दिवस मनाचा पक्का निश्चय करून तिने जयला आपला भूतकाळ सांगून टाकला.जय दोन मिनिटं गप्प राहिला आणि तिला जवळ घेत म्हणाला
"किती सहन केलंस तू. पण आता नाही. मी माझ्या प्रेमाने सारं तुला विसरायला लावेन. आता फक्त सुख आणि सुखच मिळणार तुला"
एका महिन्यातच लग्न बंधनात अडकली ती दोघं.
जय दुबईत नोकरी करायचा. तो इंजीनियर होता. घरात मोठा भाऊ, वहिनी, पुतणी आणि आई असे सगळे होते.
लग्न ठरवताना मेधाताईंनी काही ही हातचं राखून न ठेवता तिची जीवन गाथा घरच्यांना सांगितली होती. तरीही ते सगळे लग्नाला आनंदाने तयार होते.
लग्न सोहळा साधाच पण आनंदाने पार पडला. सासरी जाताना आरुषी संभ्रमावस्थेत होती. पुढे होणार ते सगळं चांगलं होणार हे तिचं मन सांगत होतं आणि जुने अनुभव तिला घाबरवत होते.
सासरी सगळ्यांनी आनंदाने तिचं स्वागत केलं. आरुषीच्या पासपोर्ट आणि वीजाचे काम झाले आणि ती जय बरोबर दुबईला गेली.
दिवस महिने आणि वर्ष बनून सरकत होते. आरुषी सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती. ती नव्याने सुखाचं
आयुष्य जगायला लागली होती आणि तिच्या संसारवेलीवर 'यश' नावाचे एक गुबगुबीत फूल उगवलं. भारतातच तिचं बाळंतपण झालं. सासूबाई अतिशय खुष होत्या. काही दिवस आनंदाने पार पडले आणि थोड्याश्या तापाचं निमित्त होऊन आरुषीचे मोठे दीर वारले. घरात दु:खाचं सावट पसरलं. जय ही आला. ह्या सगळ्यात यशचे काहीच करता आले नाही. बाराव्या दिवशी पाळण्यात टाकून नाव ठेवलं होतं बस.
आरुषीला क्षण भर वाटलं यशचं सगळं चांगलं होईल ना? माझ्या सारखं भाग्य घेऊन तो जन्माला आला नसेल ना? तिने आलेले विचार लगेच झटकून टाकले. काही महिन्याने सासूबाईंना घेऊन ती दुबईला परतली. जाऊबाई माहेरी गेल्या.
जयला वाटायला लागलं आता आपण भारतात परतायला हवं. आई, वहिनी आणि शिल्पाची जवाबदारी उचलण्यासाठी परत जायलाच हवं. त्याने आरुषीला आपला विचार सांगितला. तिला मी ते पटलं. जयने भारतात नोकरी शोधायला सुरुवात केली.आरुषी,यश आणि आई ह्यांना त्याने भारतात पाठवलं.सगळं सामान घेऊन तिघं भारतात परतले.
सासूबाई, जाऊबाई,शिल्पा आणि यश ह्या सर्वां सोबत आरुषी तशी मजेत होती पण जयची आठवण तिला सतत येत असायची. रोज व्हीडिओ कॉल करून ही तिला चैन पडत नसे. अशात सात महिने संपले होते.एक दिवस जयने आनंदाची बातमी दिली त्याला भारतात एका चांगल्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती आणि तो पंधरा दिवसांत आपलं बस्तान आवरून परतणार होता. घराचं वातावरण आनंदी झालं होतं. आता व्हिडिओ कॉलवर भविष्याची स्वप्नं रंगवणं सुरू झालं होतं. मोठं घर विकत घ्यायचं ठरलं. तसं घर बघून ते घ्यायचं नक्की झालं.जय दोन दिवसाने निघणार होता.
आणि रात्री अचानक आरुषीचा मोबाईल खणखणला. जयच्या मित्राचा फोन होता दुबईहून.
" वहिनी! एक वाईट बातमी. जय आपल्याला सोडून गेला. काय झालं हे रिपोर्ट आल्यावर कळेल.पण तब्येत बरी नाही म्हणून त्याने मला तातडीनं बोलवून घेतलं आणि दवाखान्यात गेल्या गेल्या सगळं संपलं. त्याची बॉडी दवाखान्यात ठेवून घेतली आहे. आता तेच भारतात पाठवण्याची व्यवस्था करतील.
आरुषी किंचाळली."आई…."
सगळे धावत आले. वर्षभराचा यश दचकून जागा झाला. हे स्वप्न होतं असंच आरुषीला वाटलं. पण फोन चालू होता. जाऊबाई फोनवर बोलू लागल्या. मित्राने तेच सगळं परत सांगितलं. बातमी खरी होती. आरुषी सारखी रडतच होती.
"देवा! तू परत मला मरणाच्या दारात लोटलं. किती माझी परीक्षा घेणार? काय कोणाचं वाईट केलं मी? का परत परत मला ह्या यातना मिळाव्या?"
उत्तर कोण देणार? वय झालेल्या सासूबाई आणि लहानसा यश ह्यांच्याकडे बघून ही ती आपलं दुःख आवरू शकत नव्हती. भेटायला येणारे सांत्वन तरी काय आणि कसं करणार होते?
रोज डेड बॉडी येण्याची वाट बघणं सुरू झालं. दुबईला काय चालू होतं हे कळण्याचा मार्ग फक्त तो मित्र. आरुषीचा दुबईचा वीजा संपला होता.आता भारतातच रहायचं म्हणून त्यांचे नवीनीकरण ही केलं नव्हतं. त्यामुळे आरुषीला जाता येईना. दूतावासात संपर्क करणं चालू होतं. सात महिन्यांच्या वनवासा पेक्षा हे असलं वाट पाहणं अतिशय वेदनादायक होत होतं.
आज येते उद्या येते करता करता शेवटी तेराव्या दिवशी आरुषीच्या शहरात एका दवाखान्यात जयची डेड बॉडी आली. ती डेड बॉडी आरुषीच्या घरच्यांना सोपविण्यात आली. जणू जय झोपलाच आहे असं वाटतं होतं. पण जयला बघितलं आणि त्यांच्या आईंना सहन न होऊन त्यांनी बसल्या ठिकाणी प्राण सोडले. घरात एकच गोंधळ उडाला. सासूबाईंचे चुलत भाऊ आले होते. त्यांनीच धीर एकवटला आणि पुढचे सगळे विधी पार पाडले.
पंधरा दिवसांपूर्वी पाहिलेलं स्वप्न पार संपलं होतं आणि खरखरीत वास्तव समोर उभं होतं.
आरुषीला काय करावं सुचत नव्हतं. जेवायला बसली की चिवडत बसायची. आंघोळीला गेली तर तासन्तास तिथेच बसून असायची. भिरभिरत्या डोळ्यांनी टकमका बघत बसायची. यश रडला की स्वतः ही रडायला लागायची. हळूहळू आलेले नातेवाईक परत आपापल्या घरी निघून गेले आणि उरली घरात चार माणसं. आरुषी, यश, शिल्पा आणि जाऊ.
अशातच कसेबसे दोन महिने गेले आणि एक दिवस जाऊबाई म्हणाल्या
" आरुषी! जरा मला समजून घे. तू तुमच्या साठी बघून ठेवलेल्या घरात जा रहायला. तुला ते घर तरी आहे. पण मला हे एकच घर आहे. जर तू ह्यात हिस्सा मागितला तर माझं आणि शिल्पाचं काय होईल? गैरसमज करून नकोस. मला समजून घे."
आरुषीने मन घट्ट केलं आणि ती ते मोठं घर विकून एका लहान घरात राहू लागली. नाही तरी तिचं होतं कोण जे तिच्याकडे येऊन राहणार होतं? मेधाताई कधीच वारल्या होत्या.
जयची नोकरी चांगल्या पगाराची असल्यामुळे आर्थिक स्थिती जरा बरी होती. आरुषीने परत नोकरी शोधण्यास सुरुवात केली. खूप ठिकाणी अर्ज केल्यानंतर एका शाळेत आर्ट टीचर म्हणून तिला नोकरी लागली.
यश दोन वर्षांचा झाला होता. त्याला बरोबर घेऊन आरुषी शाळेत जायची. त्याच शाळेत यश शिकू लागला. दोन वर्षांचं पोर इतर मुलांबरोबर रुळायला, रमायला लागला. आरुषी ही थोडं दु:ख विसरून शाळेत आणि यशाच्या बाललीलेत रमू लागली.
यश हुशार होता, आणि बोलका ही. त्यामुळे तो जिथे जाईल तिथे सगळ्यांचा लाडका व्हायचा.
मध्यंतरी दहा वर्षं गेली. यश आता बारा वर्षांचा झाला होता. कुणाचे बाबा दिसले की हिरमुसून जायचा. पण तरी ही आरुषी आणि यश हे एकमेकां सोबत जगायला शिकले होते.
यश क्रिकेट खूप छान खेळायचा. शाळेच्या टीम मध्ये ही तो होता. घरा समोरच्या मैदानात रोजच तिथल्या मुलां बरोबर संध्याकाळी क्रिकेट मॅच चालू असायची. अगदी अंधार पडे पर्यंत मुलं खेळायची.
त्यादिवशी असाच खेळ चालू असताना एक मुलगा धावतच आरुषीकडे आला आणि म्हणाला
" काकू यशला डोक्यात बाॉल लागली तो खाली पडला आणि उठतच नाहीये. लवकर चला. "
आरुषी धावतच मैदानावर पोहोचली. यश निपचित पडला होता. ती खूप घाबरली होती तिने यशाच्या नाकापुढे बोट ठेवलं पण?
रिक्षात घालून ती यशला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी खाली बघत मान हलवली.आरुषी नुसती बघत होती. मुलांनी लोकांच्या मदतीने कसंबसं त्या दोघांना घरी आणलं. आसपासची लोकं जमा झाली, पण आरुषी नुसती बसून होती.
लोकं तिला काय सांगत आहेत काय बोलत आहेत ह्याकडे तिचं लक्षच नव्हतं.
"मी रडू कशा कशासाठी? जगू कोणासाठी? " ही वाक्यं बोलत ती घरा बाहेर चालू लागली.
अनेक वर्षा पासून ती नुसती दवाखान्यात फिरत असते.अनेकदा रुम मध्ये जाऊन वाकून बघते पण तोंडातून एक चकार शब्द काढत नाही.
ती खऱ्या मरणाची वाट बघत जगते आहे,जगते आहे.
राधा गर्दे
कोल्हापूर