पुन्हा विसावू या वळणावर... 2

प्रेम


पुन्हा विसावू या वळणावर...2



   


     एकच जात असल्याने नकाराचा काही प्रश्न नव्हता... पण आईला म्हणजे लताबाईला, शरदच्या मामाची मुलगी वंदना सून म्हणून हवी होती... वंदना बारावी झाली आणि शिक्षणात रस नसल्याने ती पुढे न शिकता पार्लर चा कोर्स करत होती... आत्याची लहान पणापासून लाडकी होती, त्यामूळे भावा कडे आधीच मागणी घालून ठेवली होती... आणि होतकरू, कमावता, आईची काळजी घेणारा शरद कोणालाही पसंत पडेल असा होताच, शिवाय बहीणी च्याच घरी म्हटल म्हणजे मुलीची चिंता करायची गरजच नव्हती...
         
          शरद आणि वंदनाच्या वयात जवळ जवळ नऊ वर्षाचे अंतर होते... मामा आपली मुलगी द्यायला तयार होता, पण शरद ला मात्र नात्यात लग्न करायचं नव्हतं...   त्यातल्या त्यात वंदना शी तर नाहीच...   



   आईने खूप समजावले, वंदना सोबत लग्न करण्याबाबत... आजवर शरदने आईला कधीही नाराज केले नव्हते पण आपल्या लाईफ पार्टनर बद्दल त्याची काही मते होती. त्यात वंदना कुठेही बसत नव्हती... दोघांची विचार करण्याची, वागण्या बोलण्याची पद्धत वेगळी होती... शिवाय लहान पणापासून त्याने आपली मामे बहीण याच नात्याने तिच्या कडे पाहिले होते. त्यामुळे बायकोच्या रुपात तिला पाहणे हे त्याच्या साठी थोडे अवघडच होते...

       आईने पुन्हा पुन्हा समजावून पाहिले मात्र शरद  आपल्या हट्टावर कायम होता... शेवटी लग्न करेल तर अनन्या शी, नाहीतर नाही ....असा पवित्रा घेतला तेव्हा कुठे आई तयार झाली... शेवटी आपल्या मुलांच्या सुखासाठी आईला माघार घ्यावीच लागते... आणि त्याचे सुख जर अनन्यात होते, तर आईला हो म्हणावेच लागले...


    शरद ने पवनच्या मध्यस्थीने लग्नाची मागणी घातली अनन्याला....
         
          
शरद सारखा स्मार्ट आणि उच्च शिक्षित असलेला, चांगल्या पगाराची नोकरी असलेला मुलगा स्वतःहून मागणी घालतोय म्हटल्यावर अनन्याच्या कुटुंबाने होकार देत धुमधडाक्यात त्यांचे लग्न लावून दिले...
          
           शरद आणि त्याची आई, दोधेच घरात... बाबा शरद दहावीत असतानाच अपघातात गेले. ... त्यांचे पेन्शन आणि बाजूला असलेल्या दोन खोल्यांचे येणारे भाडे यात काटकसरीने शरदचे इंजिनिअरिंग झाले आणि लगेच कॅम्पस प्लेसमेंट मध्ये चांगल्या पगाराची नोकरी ही लागली...
          
****



  " काय केलेस मग टिफीन ला..!" दुपारी जेवतांना आईंनी विचारलें..

   "अं.. ते.. आई आज संकष्टी ना.. मग भुर्जी नको, म्हणून वाफवलेल्या गीलक्याच्या वड्या केल्या आणि त्याचीच भाजी केली.. खाऊन बघा ना कशी झालीय..?"

   'हम्म.. मस्त झालीय भाजी.. हाताला चव आहे तुझ्या..!" सासू ने कौतुक केले तसे आनंदली अनन्या..
 
 " नॉनव्हेज बनवता येते ना तुला..? माझ्या शरुला खूप आवडते... ते तर मी खात नाही, म्हणून बनवत पण नाही.. त्याला नेहमी बाहेरच खावे लागते..!"

  " हो.. येते मला सर्व बनवता!"

    "बनवून देत जा मग त्याला कधी कधी..! हां पण भांडी वेगळी ठेव हं... रोजची स्वयंपाकाची भांडी वापरायची नाहीत त्यासाठी...!"

   "हम्म...!"

  "त्याच्या साठी बनवत जा पण, आठवड्यातून एखादया वेळेस..."

  " हो आई.. पण तुम्ही का नाही खात?"

   "अग.. लहानपणा पासून कधी खाल्लं च नाही.. माझ्या माहेरचे माळकरी.. त्यात तुझे सासरे ही खात नव्हते.. शरू मित्रां सोबत राहून खायला लागला... त्यात व्यायाम करायचा मग रोज उकडलेली अंडी खायचा.. त्यामुळे अंडी असतात घरात.. पण ते पण तोच उकडतो, मी नाही हात लावत..! तू खातेस ना?"

 " अं.. हो..!"

   "आमच्या वेळेस मांस मच्छी खाणे म्हणजे कमी पणाचे समजले जायचे.. त्यातल्या त्यात बायका तर नाहीच खायच्या.. आत्ता मात्र मुली पण बिनधास्त खातात...!" आई तिच्या कडे पाहत म्हणाल्या.. त्यावर काय उत्तर द्यावे सुचले नाही तीला.. तिच्या माहेरी खाण्या पिण्यावर बंधन नव्हते काहीच..


  
          
           अनन्या ही आता रुळली होती शरदच्या घरात... होतेच कोण घरी ? ते दोघं राजाराणी आणि सासूबाई .... सासूबाई प्रेमळ होत्या, पण थोड्या आत्मकेंद्री होत्या... सर्वांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे असे त्यांना वाटे... कधी कधी शरद वैतागायचा आईच्या वागण्याला, पण दुखावत नव्हता तो... आईच्या कष्टांची जाणीव होती... पण लग्न झाल्यावर मात्र आई आणि बायको दोघींना सांभाळताना त्याची कसरत होत होती...
          


******************************************

   

     


      "दोघांनी जाणे गरजेचे आहे का शरू? किराणा च आणायचा आहे ना... मग तू एकटाच आणू शकतोस.... अशीही तीला पण एकच दिवस सुट्टी असते घरात रहायला..."

      "अहो... तुम्ही जाऊन या ना एकटे... तेवढ्या वेळात माझी घरातली कामं पण होतील...."

      "ठीक आहे जातो मी एकटाच...."


     
      शरद काहीसा रागातच घराबाहेर पडला... आणि इकडे आईंची बडबड ऐकत अनु आपली कामे आवरू लागली....

      "काय बाई आजकालची मुलं... बायकोचं एकेक कौतुक.... आमची पण लग्न झाली पण आम्ही नाही असे फिरलो नवऱ्यासोबत छोट्या छोट्या कामांसाठी.... इथे तर सदा न कदा बायको पाहिजे जवळ.. तरी बरं इथेच आहे नोकरी ला.. नाहीतर मला म्हातारीला एकटीला ठेवून गेले असते शहरात राजा राणी.. माझी वंदू असती तर अशी मागे मागे नसती फिरली हो नवऱ्याच्या.."

      हल्ली नेहमीच असे ऐकावे लागायचे अनुला.. वंदू असती तर असे केले असते, वंदू असती तर तसे केले असते.. बऱ्याच वेळेस,' द्या मग मला माहेरी पाठवून आणि आणा तुमच्या वंदुला.. '  नाहीतर,' केले असते मग वंदुलाच सून.. मला कशाला मागणी घातली?' असे तोंडावर फटकारावे असे वाटायचे तीला.. पण हे सगळे मनातल्या मनात.. ओठांच्या बाहेर कधी यायचे नाही..

      नव्या नवलाईचे आठ महिने जरा कुठे सरले संसाराचे आणि घरात अशा अनेक छोट्या छोट्या कुरबुरी सुरू झाल्या होत्या...

      अनु कोचिंग क्लासेस मध्ये शिकवायला जायची गेले दोन महिने...... तेवढाच अनुभव म्हणून........ दुपारी 1ते 5ची बॅच घेतली होती तिने... जेणे करुन घरातले सारे आवरून जाता येईल......

      दोघांना रविवारी सुट्टी म्हणून आठवड्याची कामे दोघे मिळून करायचे.... बाजार हाट ... किराणा सामान खरेदी.... कधी कधी हॉटेलिंग..... त्यात अनु आग्रहाने सासू बाईंना पण आग्रहाने सोबत घेऊन जायची....
         
         
         
        
     
       क्रमशः

कथा आवडत असेल तर रेटिंग नक्की द्या आणि दोन शब्दांची का होईना समिक्षा जरूर लिहा...