Feb 26, 2024
प्रेम

'पुन्हा एकदा'

Read Later
'पुन्हा एकदा'

बस पकडताना झालेल्या गर्दीतून तिला कुणाचा तरी धक्का बसला आणि ती शेवटच्या पायरीवरून तोल जाऊन खाली पडणार इतक्यात कुणीतरी तिला आत ओढलं. ती कशीबशी आत आली नि सावरून खांबाला टेकून उभी राहिली. भानावर आली तशी 'आपल्याला वाचवलं कुणी', म्हणून इकडे- तिकडे पाहू लागली.
पण ओळख पटेना म्हणून अंदाज घेत तिने मागच्या सीटवर बसायला थोडी जागा मागितली.

बस् भरधाव वेगाने पुढे जात होती आणि तिचे विचारही धावत होते. "आज आपल्याला काही झालं असतं तर? आपल्या दोन्ही मुलांच काय झालं असतं? शिवाय घरी म्हाताऱ्या सासुबाई आहेत. त्यांचं..?" तिला कल्पनाही करवेना.

इतक्यात बेल वाजली तशी बस थांबली. तसे दोन डोळे तिचा वेध घेत खाली उतरत तिच्याकडे पाहून हसले, अगदी क्षणभरच. तशी ती भरकन उठली.

"एक्सक्युज मी?"

पण तो कधीच खाली उतरला होता आणि आत्ता कुठे तिच्या हातावर रेंगाळणारा आधाराचा त्याचा स्पर्श तिला जाणवू लागला. तिने मनातूनच त्याचे आभार मानले आणि पुढच्या स्टॉपला तिचे ऑफिस असल्याने ती उठून उभी राहिली, तसा कंडक्टर खेकसला, "ताई आता मागेच उभ्या रहा. स्टॉप आला की गाडी थांबणारच आहे. उगीच नसतं लफडं नको."

आज ऑफिसमध्ये कीर्तीचे मन लागेना. राहून- राहून सकाळचा प्रसंग तिला आठवत होता. कामात मन लागेना म्हणून अर्धी सुट्टी घेऊन ती घरी पोहोचली. तिच्या सासुबाई देवळात जायच्या तयारीत होत्या. पण तिला पाहून त्या घरीच थांबल्या.

सासुबाईंना पाहून ती एकदम त्यांच्या कुशीत शिरली आणि मन मोकळं होईपर्यंत रडली. त्यांनी ही तिला मनसोक्त रडू दिलं. कारण समीर, तिचा नवरा गेल्यानंतर आजपर्यंत तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले त्यांनी कधीच पाहिले नव्हते.
आपल्या मुलांसाठी आणि मुलाविना 'पोरक्या' झालेल्या आईसाठी स्वतः ला सावरून ती खंबीरपणे उभी राहिली होती. सासुबाई तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, "काय बिनसलं ते तरी सांगशील?" तसा सकाळचा प्रसंग तिने कसाबसा त्यांच्या कानावर घातला.

"अगं, एकटी स्त्री खंबीर असतेच. पण तिला आधाराची तितकीच गरज असते. मग ती आयुष्याच्या कुठल्याही पायरीवर का असेना! म्हणूनच म्हणते, दुसऱ्या लग्नाचा विचार कर. तू आणि तुझी दोन्ही मुलं सुखी, समाधानी आयुष्य जगा.
मी काय आज आहे तर उद्या नाही. बाळा ऐक माझे, अशी एकटी किती दिवस राहणार?
अजून अख्ख आयुष्य काढायचं आहे पुढे तुला. मुलांनाही हक्काचे बाबा हवेतच ना? मग आता त्यांचाही विचार कर. हळूहळू मोठी होत आहेत ती. काळ हेच औषध आहे दुःखावर. परिस्थिती नुसतं बदलायला हवंच ना आपल्याला? 'माझ्या समीरला विसरून जा' असे म्हणत नाही मी, पण तो आता आपल्यात नाही हे सत्य पचवायला हवंच ना?"

समीर नेहमी म्हणायचा, "आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असली की आयुष्यच बदलून जातं ग. नकळत स्वतः वरही खूप प्रेम करू लागतो आपण आणि विरहातही खूप प्रेम असतं बरं.. जे जवळ असूनही जाणवत नाही ना ते!" समीरच्या आठवणीत तिचे डोळे भरून आले.

कीर्ती आणि समीरचे अरेंज मॅरेज. हे लग्न घरच्यांच्या पुढाकाराने पार पडलं. दोघांना एकमेकांविषयी सहवासाने प्रेम निर्माण झालं, एकमेकांची ओढ वाटू लागली. दोन वर्षांत जुळी मुलं झाली. हे प्रेम अधिक फुलण्याऐवजी समीरच्या अचानक जाण्याने ते कोमेजून गेलं. कीर्ती मनातून फार खचली. पण चेहेऱ्यावर दुःख न दाखवता सासुबाई आणि आपल्या दोन गोंडस मुलांसाठी ती मन घट्ट करून पुन्हा उभी राहिली. खटपट करून तिने नोकरीही मिळवली.

तिच्या सासुबाईही आता थकत चालल्या होत्या. त्यांची एकच इच्छा होती, 'कीर्तीने आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करावी.' पण किर्तीने समीरच्या आठवणीत राहणे पसंत केले आणि तिच्या हट्टापुढे त्या नमल्या.

पण आजच्या प्रसंगाने कीर्ती घाबरली. "आपल्याला काय झाले असते तर आपल्या माघारी सासुबाई आणि मुलांचे काय झाले असते?" हा विचारही तिच्या मनाला कधी शिवला नव्हता. "जशी आपल्याला जोडीदाराची, आधाराची गरज आहे, तशीच आपल्या मुलांना वडिलांची आणि एका आईला मुलाची गरज आहेच की. आपण केवळ आपलाच विचार करत होतो इतके दिवस! आपल्या दुःखात रमून जाणं किती सोपं आहे, पण दुःख बाजूला ठेऊन, ते पचवून खंबीर होणं, हे मात्र अवघड आहे."

जीवनातले असे छोटेसे प्रसंगही खूप काही शिकवून जातात. कीर्तीच्या मनातील चलबिचल काहीशी कमी झाली आणि तिने दुसऱ्या लग्नाचा विचार करायचे ठरवले, 'स्वतः साठी नाही निदान आपल्या मुलांसाठी तरी!

दुसऱ्या दिवशी कीर्ती ऑफिसला जाताना 'तो' ही तिच्यासोबत बसमध्ये चढला,अगदी योगायोगाने. तिला पाहताच त्याने हलकीशी स्माईल दिली..ओळखीची.

काही दिवसांतच हळूहळू दोघांची ओळख झाली आणि त्याने मैत्रीचा हात पुढे केला. तिनेही विश्वासाने त्याची मैत्री स्वीकारली.
तेव्हापासून कीर्तीमध्ये खूपच बदल जाणवू लागला. आता पूर्वीसारखी हसतमुख असायची ती. कुठेतरी मनात समाधानाची भावना निर्माण झाली होती तिच्या. तिला असे पाहून सासुबाईही खुश झाल्या.

पहिल्या लग्नामुळे पोळलेला सागर, आता कीर्तीच्या सहवासात खूपसा सावरला होता. पूर्वीसारखाच अगदी मनमोकळा वागू लागला होता. आधीपासूनच तसा एकटाच होता तो..'अनाथ.'
कष्टाने उच्च शिक्षण घेऊन एका कंपनीत कामाला लागला होता. पगार बऱ्यापैकी असल्याने छोटेसे घरही घेतले होते त्याने. किर्तीकडे पाहून त्याला संसार मुलं-  बाळ मनापासून पुन्हा हवीशी वाटू लागली.  नकळत कीर्तीची ओढ वाटू लागली त्याला.
अचानक एक दिवस त्याने घरी येऊन कीर्तीला लग्नासाठी मागणी घातली. मुलांची सारी जबाबदारी घेण्याचे वचनही दिले तिला.

कीर्तीने थोडा वेळ घेऊन, खूप विचार करून त्याला आपला होकार कळवला. मुलंही खुश झाली. 'नवीन 'बाबा' येणार म्हणून!' आणि सासुबाईही खुश झाल्या, 'तिच्या आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात होणार म्हणून.'

कीर्ती आणि सागरचे लग्न रजिस्टर पद्धतीने पार पडले. जाताना आपल्या सासुबाईंना बिलगून ती खूप रडली. मुलांना कळतच नव्हते 'आई आणि आजी का रडत आहेत ते!'
ती दोघे कावरी -बावरी होऊन आपल्या नव्या बाबांना बिलगली आणि आम्हालाही आजी सोबत हवी म्हणून रडू लागली. अखेर सागरने खूप आग्रह करून कीर्तीच्या सासुबाईंना आपल्या घरी नेले. आता सर्वांच्याच चेहेऱ्यावर आनंद होता, समाधान होते, कारण 'पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात' झाली होती.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//