पुन्हा बरसला श्रावण भाग ९९

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग ९९


दिवस वाऱ्यासारखे भुरर्कन उडून जात होते. ईश्वरी आणि शिवराज दोघांनी मिळून शिरवळच्या ब्रँचची जबाबदारी घेतली होती. शिरवळच्या ब्रँचचं काम वेगाने पुढे जात होतं. नवीन धंद्यात जम बसू लागला होता. ईश्वरी आणि शिवराज जीव ओतून काम करत होते. त्यांच्या कष्टांना यश येऊ लागलं. नवीन ऑर्डर्स पूर्ण करण्यात वेळ जाऊ लागला. कामाचा व्याप वाढू लागला. शिरवळ ब्रँच, पुणे ऑफिस दोन्हीकडे काम करण्याने त्या प्रवासाने ईश्वरीची दमछाक होत होती; पण ध्यासाने पछाडलेल्या ईश्वरीला कामाच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं.

एक दिवस ईश्वरी आपल्या कामात गर्क होती. इतक्यात टेबलवरचा इंटरकॉम खणाणला. केळकरसरांचा आवाज आला.

“हॅलो नंदिनी, जरा कॉन्फरन्सरूममध्ये ये आणि हो, येताना शिवराजलाही यायला सांग.”

“हो सर.. आलेच..”

असं म्हणत तिने फोन ठेवला. शिवराजला फोन करून तिने कॉन्फरन्सरूममध्ये यायला सांगितलं. टेबलवरची डायरी उचलून ती सरळ कॉन्फरन्सरूममध्ये आली.

“मे आय कम इन सर?”

“ओह्ह एस प्लिज..”

केळकरसरांनी तिला आत यायला सांगितलं. समोर कंपनीचे सर्व डायरेक्टर्स बसले होते. तिच्या मागोमाग शिवराजही आत आला. केळकरसरांनी दोघांना खुणेनेच बसायला सांगितलं. ते दोघे खुर्चीत बसले आणि केळकरसरांनी बोलायला सुरवात केली.

“नंदिनी आणि शिवराज, आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मिटिंगमध्ये एक निर्णय झालाय. त्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलंय. सो, शिवराज तुला आमच्या इथे जॉईन करून सहा महिने पूर्ण झालेत. इतर सर्वांकडून तुझ्या कामाचा आढावा घेतलाय. आणि सर्वांनी तुझ्या कामाची प्रशंसा केलीय. खुद नंदिनीनेही त्यासाठी अनुमोदन दिलंय. तू तुझा प्रोबेशन पिरियड उत्तम रितीने सर्व्ह केला आहेस. म्हणून तुला आम्ही प्रमोट करत आहोत. खरंतर योगिनी तुला प्रमोशन लेटर देऊन सांगणारच होती; पण मग आम्ही ठरवलं तुम्हा दोघांना एकत्र बोलवून सरप्राईज द्यावं. म्हणून तुम्हा दोघांना एकत्र बोलावलंय. शिवराज, आजपासून तुम्ही अकाउंट्स अँड फायनान्स हेड म्हणून काम पहाल. तुझं खूप अभिनंदन..”

त्यांचं बोलणं संपताच पटकन ईश्वरीने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तिचं पाहून सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. आपल्या मित्राच्या प्रगतीमुळे ईश्वरीला खूप आनंद झाला होता. थोडं थांबून केळकरसरांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“दुसरी आनंदाची बातमी म्हणजे नंदिनी तुझ्यासाठी आहे. आजवर तू जे काम केलंस. शिरवळच्या ब्रँचची पूर्ण जबाबदारी नीट सांभाळलीस. आज तिथला बिजनेस उत्तम रितीने सुरू आहे. कंपनीच्या प्रगतीमध्ये तुझ्या कौशल्यपूर्वक कामांमुळे फायदाच झाला आहे. आणि म्हणून तुझ्या कामाची सर्व डायरेक्टर्सनीं दखल घ्यायची ठरवलंय. नंदिनी, ही गोष्ट पुढच्या महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलनात जाहीर होईलच पण तरीही तुला आधीच सांगतो. तुला आम्ही सीईओ म्हणून प्रमोट करतोय आणि त्याचबरोबर आम्ही शिरवळ ब्रँच पूर्णपणे तुझ्या ताब्यात देत आहोत आणि डायरेक्टर्सच्या टीममध्ये तुला सभासद म्हणून सहभागी करत आहोत. तुझं या टिममध्ये खूप स्वागत आणि खूप अभिनंदन नंदिनी..

शिवराजने पुढे येऊन हात मिळवून ईश्वरीचं अभिनंदन केलं. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा आनंद द्विगुणित केला होता. नंदिनीसाठी ही मोठी आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट होती. खूप मोठं सरप्राईज केळकरसरांनी तिला दिलं होतं. सर्वांचे आभार मानून ती दोघे कॉन्फरन्सरूम मधून बाहेर पडले. ईश्वरी तिच्या केबिनमध्ये आली. ती खुर्चीत बसली. आजचा दिवस तिच्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस होता. समोर ठेवलेली गणेशाची बालमूर्ती जणू तिला पाहून मंद हसत होती. तिने हात जोडून देवाचे आभार मानले. स्वराजच्या आठवणीने पुन्हा एकदा तिचे डोळे पाण्याने डबडबले. इतक्यात केबिनच्या दारावर टकटक झाली आणि केबिनचं दार अर्धवट उघडत शिवराजने विचारलं,

“मे आय?”

“अरे ये ना.. ”

डोळे पुसत ईश्वरी म्हणाली.

“अरेच्या! पुन्हा डोळ्यात पाणी? इतकी आनंदाची गोष्ट घडलीय. अभिनंदन नंदिनी.. आता पार्टी हवीय तुझ्याकडून. समजलं? पण काहीही बोल, तू तुझं कामच इतक्या निष्ठेने, प्रामाणिकपणे, जीव ओतून करतेस ना, यश मिळणारच होतं. आपल्या मॅनेजमेंटने त्याची दखल घेतली. खरंच खूप आनंद झालाय मला. माझी मैत्रीण आता मॅनेजमेंट कमिटीची सभासद झाली. अभिनंदन डायरेक्टर मॅडम..”

शिवराज हसून म्हणाला. त्याला हसून प्रतिसाद देत ती म्हणाली,

“तुझेही खूप अभिनंदन.. आता तू हेड ऑफ दि डिपार्टमेंट झालास. पार्टीतर तुझ्याकडूनही हवी. माझं प्रमोशन पुढच्या महिन्यात सर्वांसमोर येईल पण तुझं आताच झालंय. याचाच अर्थ पहिली पार्टी तुझ्याकडूनच मिळायला हवी.”

“हो देईन ना.. मी पार्टी द्यायलाही घाबरत नाही आणि घ्यायलाही.. कधी जायचं बोल?”

शिवराज मिश्किलपणे म्हणाला. इतक्यात मंजिरी आत आली आणि हसून विचारलं,

“काय, कोण कुठे चाललंय?”

“अगं काही नाही पार्टीचा विषय सुरू आहे.”

ईश्वरीने उत्तर दिलं.

“अरे व्वा! पार्टी? कोण शिवराज पार्टी देतोय का? आणि कारण काय?”

तिच्या प्रश्नावर ईश्वरीने काही वेळापूर्वी घडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला. ते सर्व ऐकून मंजिरीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ईश्वरीची प्रगती पाहून मंजिरीला आश्चर्यमिश्रित आनंद होता. तिच्या कर्तृत्वाचं तिला प्रचंड कौतुक वाटत होतं. ती उत्साहाने म्हणाली,

“खरंच आनंदाची बातमी आहे. म्हणजे याचा अर्थ मला तुमच्या दोघांकडूनही पार्टी मिळणार आहे. कसलं भारी! एनी वे, शिवराज तू तुझ्या पार्टीचं काय ते बोल पटकन.. कधी जायचंय? मी येणार आहे हं..”

“हो गं मंजिरी, तुला घेतल्याशिवाय आम्ही जाणार आहोत का? तुच तर उत्सवमूर्ती आहे गं..”

शिवराजच्या वाक्यावर सर्वांत एकच हशा पिकल्या. ईश्वरीच्या आयुष्यातला दुःखाचा काळ हळूहळू सरत चालला होता. तिच्या आयुष्यात सुखाने, यशाने पदार्पण केलं होतं. ईश्वरी नव्या जोमाने कामाला लागली. आता शिरवळची ब्रँचचा सारा कारभार ती एकटी समर्थपणे सांभाळत होती. शिवराजनेही त्याचा नवीन पदाचा चार्ज स्वीकारला होता. दोघेही आपापल्या कामात अजून नीट लक्ष केंद्रित केलं.

इकडे अर्पिताचे दिवस भरत आले होते. तिची अवस्था खूपच नाजूक झाली होती. अनघा तिच्या अर्पिताच्या दिमतीला होतीच. तिच्या नाजूक काळात अनघाने अर्पिताची आई होऊन तिची खूप काळजी घेतली. पोटच्या मुलीप्रमाणे तिचं सारं केलं. आणि एक दिवस रात्री अर्पिताला बाळंतकळा सुरू झाल्या. तिच्या पोटात प्रचंड दुखत होतं. आदित्य विनायक यांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला घेऊन आले. आणि काही वेळातच अर्पितला जुळी मुलं झाली. लक्ष्मीच्या रूपाने मुलगी आणि घराण्याचा वंश मुलगा जन्मास आले होते. सर्वांना खूप आनंद झाला होता. आदित्यने संपूर्ण वार्डमध्ये मिठाई वाटली. इतकी चांगली बातमी ईश्वरीला सांगावी म्हणून तिने ईश्वरीला कॉल केला.

“हॅलो ईशू, अभिनंदन बाळा, तू आत्या झालीस आणि बरं का? एक नाही दोन दोन बाळांची आत्या झालीस. अर्पिताने जुळ्या मुलांना जन्म दिलाय. एक मुलगा आणि मुलगी.. किती मोठं टेन्शन कमी झालं माझं! तू येतेस ना, तुझ्या भाचेकंपनीला भेटायला?”

अनघा आनंदाने सांगत होती. ईश्वरी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. ईश्वरीलाही फार आनंद झाला.

“अरे व्वा, खूपच छान गं आई.. खूप अभिनंदन आई, तुमचं प्रमोशन झालं. आता तुम्ही फक्त सासूबाई नाही तर आजीबाई सुद्धा झालात. खूप खूप काँग्रेट्स आई.. बरं सांग आई आणि बाळ या दोघांची तब्येत ठीक आहे ना? आणि दादा? तो कुठे गेलाय? आई, आता दादाकडून पार्टी हवीय हं.. काही सबबी नकोत आई..”

आईच्या बोलण्यातून तिचा आनंद ओसंडून वाहताना तिला जाणवत होता. ईश्वरीनेही तिच्या प्रमोशनची गोष्ट अनघाला सांगितली. अनघालाही खूप आनंद झाला होता.

“खूप अभिनंदन बाळा.. असंच यश मिळो.. ”

अनघाने ईश्वरीला मनापासून आशीर्वाद दिला. थोड्याच दिवसांत ईश्वरी आपल्या भाच्यांना भेटायला आली. त्यांच्यासाठी कपडे सोन्या चांदीच्या दागिने, अर्पिताला साडी खाण्यासाठी पौष्टिक लाडू सुंठवडा घेऊन आली. दोन चार दिवसांची सुट्टी काढून ती निवांत आपल्या भाच्यांमध्ये ती रमणार होती. आदित्य अर्पिता आईबाबा झाले, विनायक अनघा आजी आजोबा झाले. माई आता पणजी झाली होती. बाळांच्या येण्याने देशमुखांच्या घराचं गोकुळ झालं होतं. हसऱ्या आवाजाने दुडूदुडू चालीनं सारं घर हसू लागलं. आता आनंदाच्या, सुखाच्या पर्वाची ही एक नांदी होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all