Login

पुन्हा बरसला श्रावण भाग ९८

पुन्हा बरसला श्रावण
पुन्हा बरसला श्रावण भाग ९८

शिवराजने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला फार हळवं करत होतं.

“नंदिनी, आता पुरे झालं. डोळे पूस बरं.. मला ती बॉसिंग करणारी नंदिनी, ती मिस फुलझडी आवडते. तिचा तो कॉन्फिडन्स आवडतो. अशी मुळूमुळू रडणारी नंदिनी आवडत नाही आणि केळकरसरांनाही ती डॅशिंग नंदिनी हवी आहे. समजलं? सो आता उठा.. जेवून घेऊ पटकन. बँकेत जायचंय आपल्याला. मीटिंग आहे ना?”

ईश्वरीने मान डोलावली आणि ती जागेवरून उठली.

“एक्सक्यूज मी शिवराज. मी आलेच.”

ईश्वरीने वॉशरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं. आरश्यात स्वतःकडे पाहत ती पुटपुटली.

“आता घाबरायचं नाही. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. ही माझी लढाई आहे. काही झालं तरी मला हरायचं नाही. संकटांना तोंड द्यायचं.”

ईश्वरीने मनाशी पक्का निश्चय केला आणि केबिनमध्ये आपल्या जागी येऊन बसली. त्यानंतर तिने तिचा टिफिन उघडला आणि मग शिवराज आणि ती बँकेच्या मीटिंगचे पॉईंट्सविषयी बोलत जेवू लागले. जेवण झाल्यावर थोड्याच वेळात शिवराज आणि ईश्वरी बँकेत जाण्यासाठी निघाले. तिचं लक्ष शेजारच्या टेबलकडे गेलं रागिणी आणि काही सहकारी मैत्रिणींमध्ये कुजबुज सुरू झाली. पुरुषांच्या भुवया उंचावल्या गेल्या. शिवराजला पाहून तर एकमेकांना चिडवणं सुरू झालं; पण यावेळीस ईश्वरीने सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मीटिंगसाठी ती शिवराजसोबत गाडीत बसून निघून गेली. तिची मनःस्थिती ठीक दिसत नव्हती म्हणून शिवराज तिच्याकडे पाहून म्हणाला,

“नंदिनी आज मी तुझी गाडी चालवतो. तू फक्त शेजारी बसून रहा. बघ तरी.. मला नीट गाडी चालवता येते का ते?”

ईश्वरीने मान डोलावली आणि गाडीची चावी त्याच्या हातावर ठेवली. दोघे गाडीत येऊन बसले. स्टेअरिंग हातात धरत शेजारी बसलेल्या ईश्वरीला पाहत तो म्हणाला,

हं.. मी आता गाडी चालवतोय; पण तू शांत बसायचं, नाहीतर ड्रायविंगच्या सूचना देत राहशील. माझं गाडी चालवण्यावर असलेलं लक्ष तू भरकवटून टाकू नकोस. समजलं? आता माझं सगळं लक्ष समोर रस्त्याकडे असणार आहे. मला माहित आहे तुम्ही बायका फार घाबरट असता. उगीच सूचना देत राहता.”

“बरं आता निघूया का?”

ईश्वरीने हसून विचारलं. त्यानेही हसून मान डोलावली आणि गाडी स्टार्ट केली.

“हसताना किती छान दिसतेस तू! फक्त माझ्यावर जास्त रागवत जाऊ नकोस. चिडचिड करू नकोस.. किती तो राग!”

तो मिश्किलपणे हसत म्हणाला. तिच्याही ओठांवर हसू फुटलं. ते लपवण्यासाठी तिने पटकन तोंड फिरवलं आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. आता गाडीने तिचा वेग पकडला होता. ईश्वरीच्या डोक्यातले विचार काही केल्या जात नव्हते. तिला विचारात गढलेलं पाहून शिवराज म्हणाला,

“कसला विचार करतेस नंदिनी? आज ऑफिसमध्ये जे झालं त्याचा?”

“हं.. काही केल्या तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाहीये. लोकांच्या वागण्याचं नवल वाटतं मला.. एखादी स्त्री रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करते, एकटी राहते, स्वतः कमावून खाते तर ती वाईटच असते का? मग हाच प्रश्न पुरुषांना विचारला जातो का? त्यांच्या एकटे राहण्यावर कोणी आक्षेप घेतलाय का? त्याच्या स्वैर वागण्याला आजवर कोणी जाब विचारलाय का? तो अविवाहित वा विदुर आहे म्हणून कोणी त्याचा उपहास केलाय का? त्याला नसेल का अपूर्णत्वाची जाणीव? की मलाच सगळे प्रश्न? का मला द्यावी लागते अग्निपरीक्षा सीतेसारखी? का माझ्या अब्रूचे धिंडवडे द्रौपदीसारखे? का माझ्या चारित्र्यावर शिंतोडे? एकटी ‘स्त्री’ म्हटली की सगळे लचके तोडायला तयार असतात; पण खरंच प्रत्येक घराला पुरुषाचं संरक्षण हवंच का? स्वतःचं रक्षण करण्यासाठी मी तितकी सक्षम नाही? मी स्वतःसाठी जगायचं ठरवलं तर काय चुकलं माझं? का माझ्या हसण्यावर निर्बंध? का आनंदावर विरजण? माझं छान राहणं, माझं असणं, माझं दिसणं का डोळ्यांत खुपतंय साऱ्यांच्या?”

तिचे डोळे पुन्हा वाहू लागले. गालावर आलेले ओघळ पुसत ती पुढे म्हणाली,

“ही ‘का’ च्या प्रश्नांची मालिका काही केल्या संपत नाहीये. मनातल्या विचारांचं वादळ शमत नाही, हा प्रश्नांचा ससेमिरा काही केल्या संपत नाहीये.”

“संपेल.. हे दिवस जातील. त्यासाठी तुला सर्वांत आधी तुला तुझं लक्ष बाकीच्या गोष्टींकडून, त्यांच्या विचारांपासून परावृत्त केलं पाहिजे. तुला तुझं अस्तित्व निर्माण करायला शिकायला हवं. ही जी तुझ्या उमेदीची वर्षे आहेत, ती अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वाया घालवू नकोस. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवं. तू तुझ्या कामावर, तुझ्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून, एकाच क्षेत्रात अडकून न राहता नवनवीन क्षेत्रातली प्रगत कौशल्ये शिकायला हवीत. अकाउंट्स अँड फायनान्ससोबत तू इम्पॉर्ट, एक्स्पोर्टच्या प्रक्रिया शिकून घे. कस्टम डिपार्टमेंटची कामे, ते कम्पलायन्स शिकून घे. त्यासाठी मी तुला मदत करेन. नवीन कौर्सेस असतील तर त्याची माहिती देईन. दुसरी गोष्ट म्हणजे शिरवळच्या ब्रँचचा सेटअप अजून व्हायचा तू तिकडे लक्ष दे.. ऑर्डर मिळवण्यापासून ते डिस्पॅच करण्यापर्यंतची जबाबदारी तू घे फक्त अकाउंटिंग करत बसून प्रगती होईल का? मला तुला सीईओ झालेलं पाहायचं आहे. सगळं तू एकटीने सांभाळावं असं मला वाटतं. तू जर स्वतःला या कामात बिझी ठेवलंस तर तुला ”

“अरे पण तू मला.. सॉरी म्हणजे तुम्ही..”

तिच्या तोंडी शिवराजशी बोलताना एकदम अरेतुरे आल्याने ती मधेच अडखळली.

“काही हरकत नाही. तू आजपासून मला अरेतुरे म्हणालीस तरी चालेल किंबहुना आवडेल. तू स्ट्रिक्ट बॉस असण्यापेक्षा एक छान मैत्रीण म्हणून आवडेल मला. नंदिनी आपण…दोघे.. म्हणजे…. छान फ्रेंड्स होऊ शकतो का गं?”

शिवराजने थोडं अडखळतच विचारलं. ईश्वरीने त्याच्याकडे पाहिलं.

“काय हरकत आहे? असंही आपल्या पूर्ण ऑफिसमध्ये मला समजून घेणारा तो एकटाच तर आहे. मंजिरी सोडली तर दुसरं कोण आहे आपल्या सोबतीला?”

ती स्वतःशीच बडबडली.

“हो चालेल. आपण नक्कीच चांगले मित्र बनू शकतो.”

ईश्वरीने हसून त्याला उत्तर दिलं. थोड्याच वेळात ते बँकेच्या आवारात पोहचले. ईश्वरीने बाहेर रिसप्शनला तिचं विझिटिंग कार्ड देत मीटिंगची कल्पना दिली. रिसप्शनिस्टने इंटरकॉमवर कॉल करून त्या दोघांना आत पाठवून दिलं. मीटिंग उत्तमरित्या पार पडली. दोघेही हसतमुखाने बँकेतून बाहेर पडले.

ईश्वरीने पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली. एका नवीन प्रवासाचा शुभारंभ झाला होता. भूतकाळाला मागे सारून भविष्याच्या दिशेने आगेकूच करत होती. आताशीक कुठे ती मोकळा श्वास घेऊ लागली होती. तिने सारख रडणं आत्ता सोडुन दिल होतं. तिचं विश्व बदलत होतं. सतत होणारी तिची चिडचिड कमी झाली होती. तिने आपलं सर्व लक्ष तिच्या कामावर केंद्रित केलं. शिवराजच्या सोबत असण्याने
तिच्यामध्ये एका नवा आत्मविश्वास जागा झाला होता. तो आत्मविश्वास तिच्या कामात, बोलण्या वागण्यात दिसत होता. जणू एक नवीन चैतन्य आलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या खळखळून हसण्यात दिसू लागला होता. तिच्यातला बदल सर्वांनाच जाणवत होता; पण पौर्णिमेच्या चंद्राला जसा अमावस्येच्या शाप असतो तसा खळखळून हसण्याला सुद्धा असतो. दुसर्‍याचा आनंद सहन न होणारी, दुसऱ्यांच्या सुखावर जळणारी अशी काही माणसं तिच्या आनंदावर विरजण पाडायला आजुबाजूला होतीच. तिच्या वेदनेचा प्रवास अजून संपला नव्हता. अजून तिला खूप काही पाहायचं होतं., खूप काही सहन करायचं होतं.

शिवराज आणि ईश्वरीच्या नात्याची बातमी साऱ्या ऑफिसभर पसरली होती. चर्चेला उधाण आलं. तिच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्यासाठी जणू तिच्या माथी ʼसहज उपलब्ध' असा शिक्का बसला होता. सोसायटीतल्या बायकांना दुसऱ्यांच्या घरात जास्त इंटरेस्ट होता. त्यांचे चर्चेचे चे विषय तर एकदम भन्नाट असायचे. ‘अमक्याचा मुलाचं तमक्याच्या मुलीसोबत सूत जमलंय. शेजारची रीना लिव्ह इन रेलेशनशिपमध्ये राहते.’ असं काहीबाही चर्चा रंगायच्या. माझे सासू सासरे दीर नणंद नवरा कसे वाईट आहेत हे त्यांच्या अगदी रंगवून चघळण्याचे विषय असायचे. ईश्वरीला हे मुळीच आवडायचं नाही. नवरा हा विषय निघाला की तिला त्रास व्हायचा. त्यांचं एकमेकींच्या नवऱ्यावरून ऐकमेकींना चिडवणं तिला अपूर्णत्वाची जाणीव करून द्यायचं. सगळं असूनही रितेपणाची जाणीव व्हायची. हळदीकुंकू, मंगळागौर सुवासिनींच्या प्रत्येक शुभकार्यात तिला मुद्दाम टाळलं जायचं. म्हणून मग ईश्वरीने तिचं कव्हरेज क्षेत्रच बदलून टाकलं. ती तिच्या विश्वात रमत होती. तिने आता मार्केटिंगच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली. तिच्या कल्पकतेमुळे कंपनीलाही भरपूर नवीन ऑर्डर्स मिळत होत्या. कंपनीच्या व्यवसायाची उलाढाल वाढली होती. ईश्वरीच्या कामाचा व्याप वाढला होता. शिवराज मदतीला होताच पण तरीही दिवसरात्र काम करूनही वेळ पुरत नव्हता.

आणि एक दिवस केळकरसरांच्या कंपनीने तिच्या कामाची दखल घेतली. आणि तिच्यासाठी अजून एक सरप्राईज वाट पाहत होतं.

काय असेल ते सरप्राईज? पाहूया पुढील भागात..