पुन्हा बरसला श्रावण भाग ९३
“काय मुलगी आहे ही? इतक्या तुसडेपणाने कोण वागतं का? हिच्यासोबत काम करणं म्हणजे निव्वळ अशक्य. मी आजच साहेबांशी बोलून घेतो. आता पुन्हा तिच्याशी बोलायलाच जाणार नाही.”
शिवराज पाय आपटत पुटपुटत आपल्या जागेवर येऊन बसला. इतक्यात त्याच्या टेबलवरचा इंटरकॉम वाजला.
“शिवराज जरा केबिनमध्ये ये..”
“हो सर, लगेच आलो.”
केळकरसरांनी त्याला आतमध्ये बोलावलं होतं. शिवराज पटकन केळकरसरांच्या केबिनमध्ये आला. समोर मंजिरी बसली होती. केळकरसरांनी शिवराजला बसायला सांगितलं.
“शिवराज, ही मंजिरी, आपल्या कंपनीची मार्केटिंग हेड. ही तुला मार्केटिंग आणि ग्लोबल बिझनेस याबद्दल याबद्दल माहिती सांगेल. तू तिच्याकडून समजून घे. बाकी अकाउंट्स अँड फायनान्सबद्दल तुला नंदिनी सांगेलच. ती तुला व्यवस्थित ट्रेनिंग देईल.”
“हो सर, काही वेळापूर्वीच मंजिरी आणि माझी ओळख झालीय. आताच नंदिनीच्या केबिनबाहेर भेट झाली. गेल्या आठ दिवसांत इंडक्शनमध्ये मी सर्व डिपार्टमेंटची ओळख करून घेतली होती. मंजिरी आज आली. त्यामुळे ते बाकी राहिलं होतं. तेही पूर्ण करतो. पण सर एक सांगू का? मला बाकीच्या डिपार्टमेंट्सची काही चिंता नाही. सर्व स्टाफमेंबर्स खूप चांगले आहेत. सगळे मला सहकार्य करतील यात शंकाच नाही; पण मला अकाउंट्स अँड फायनान्स बद्दल थोडं कठीण वाटतंय.”
शिवराज अडखळत म्हणाला.
“अरे, काय झालं? नंदिनी काही बोलली का तुला?”
“फारच शिष्ट आणि खडूस आहे ती.. नीट बोलत नाही. तिच्याशी कितीही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा ती फटकूनच वागते. जिभेवर जणू विस्तवच ठेवलेला असतो. नाही सर, मी स्पष्टच सांगतो, तिच्याबरोबर काम करणं अशक्य आहे. मी बाहेरून क्लासेस लावून शिकेन; पण तिच्या हाताखाली काम करणं नको. प्लिज सर..”
शिवराजचं बोलणं ऐकून मंजिरी आणि केळकरसर दोघांनाही आश्चर्य वाटलं. ईश्वरीबद्दलचं त्याचं हे असं विचित्र मत ऐकून त्यांना थोडं वाईटही वाटत होतं.
“शिवराज, मी तुला या आधीही सांगितलं होतं; आता पुन्हा एकदा सांगतो, तुझ्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुला ज्या डिपार्टमेंटच्या कामाची जबाबदारी दिली आहे, ती तुला यशस्वीपणे पार पाडायची आहे. त्या त्या डिपार्टमेंटमधली माहिती घेऊन तरबेज व्हायचं आहे. यासाठी तुझ्याकडे सहा महिन्यांचा कालावधी आहे. तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुझ्या सिनियर्सकडून तुझ्याबद्दल, तुझ्या कामाबद्दल चांगले रिपोर्ट्स सादर केल्यावरच तू आपल्या कंपनीसाठी योग्य उमेदवार आहेस हे सिद्ध होईल. मग त्यानंतर योगिनीकडून तुला अपॉइंटमेंट लेटर देण्यात येईल. तुझ्या हातात अपॉइंटमेंट लेटर येण्यासाठी तुला या सर्व परीक्षेत पास व्हावंच लागेल. आणि या सिनियर्समध्ये नंदिनीसुद्धा आहे हे विसरू नकोस. त्यामुळे नंदिनीच्या स्वीकृतीशिवाय तुझी नोकरी कन्फर्म होणार नाही. तुला तिच्यासोबतच काम करावंच लागेल. नाहीतर मग तुझा तू डिसिजन घेऊ शकतोस.”
केळकरसर त्यांच्या करड्या आवाजात स्पष्टपणे म्हणाले.
“पण सर? ती इतकी विचित्र..”
शिवराजचं बोलणं मधेच तोडत केळकरसर म्हणाले,
“पण बिन काही नाही. पहिल्याच दिवशी तू तुझ्या सिनियरबद्दल कंप्लेंट करतोयस? मग इतरांशी कसं जुळवून घेशील? आपल्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लहानतल्या लहान एम्प्लॉयीपर्यंत पोहचता यायला हवं. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, काम करण्याची पद्धत वेगळी, विवंचना वेगळ्या. आपल्याला प्रत्येकाशी जुळवून घेता यायला हवं. तरच तू पुढे जाऊ शकशील. तुला तुझी स्वतःची कंपनी सुरू करायची म्हणतोस तर मग तुला या गोष्टी शिकाव्याच लागतील. ठीक आहे? यू मे गो नाऊ.”
“ओके सर.. मी प्रयत्न करेन. थँक यू सर..”
शिवराज नाराजीच्याच सुरात खुर्चीतून उठत म्हणाला आणि केबिनमधून बाहेर पडला. थोड्याच वेळात मंजिरीही केळकरसरांना अपडेट्स देऊन केबिनच्या बाहेर आली. शिवराज पुढ्यात टेबलवर फाईल्स मांडून बसला होता.
“हेय, राज.. म्हणजे तुला राज म्हटलेलं चालेल ना?”
मंजिरी हसून म्हणाली.
“हो गं चालेल. काहीही म्हण. आवडेल मला.”
त्याने हसून उत्तर दिलं.
“राज, आता केळकरसरांसमोर जे झालं ते मी ऐकलंय. पण एक सांगू? इतक्या लवकर कोणाबद्दल जजमेंट देऊ नये रे.. आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल फारसं माहित नसताना आपण त्याच्याविषयी चुकीचं मत बनवण्यापेक्षा थोडं शांत राहून फक्त पाहत राहावं. समोरच्याचा वागण्याबोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ती व्यक्ती अशी का वागतेय हे जाणून घेतलं पाहिजे ना?”
शिवराज विचार करू लागला. मंजिरीचं म्हणणं त्याला पटलं. फाईल बाजूला ठेवत तो तिच्याकडे पाहून म्हणाला,
“खरं बोलतेयस मंजिरी. इतक्या लवकर कोणाबद्दल आपलं मत बनवणं चुकीचंच. थोडा वेळ घेतला पाहिजे आणि समोरच्यालाही दिला पाहिजे.”
“हेच तुला सांगणार होते मी. एकत्र काम करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत जातात. हो नं?”
मंजिरीच्या बोलण्यावर शिवराजने मान डोलावली. थोडं बोलून मंजिरी आपल्या जागेवर निघून गेली. आणि शिवराज पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. ईश्वरीही कामात गढून गेली होती. आठ दहा दिवसांचा कामाचा पसारा उरकायचा होता. वेळ लागणारच होता. कामाच्या नादात संध्याकाळ झालेली तिच्या लक्षातही आलं नाही. घरी परतण्याची वेळ झाली तरी ती फाईल्समध्ये डोकं खुपसून बसली होती. इतक्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.
“येस कम ईन..”
तिच्या परवानगीने तो केबिनमध्ये आला.
“अरे व्वा! चक्क दार नॉक करून आलात तुम्ही! कमालच म्हणायची! ”
तिच्या टोमण्यावर त्याने काहीसं नाराज होत दिवसभराच्या कामाचे अपडेट्स दिले. आणि त्याने विचारलं,
“मी निघू?”
“काम अजून संपलेलं नाहीये. मी काम करतेय ना? दिसत नाहीये का?”
तिने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं.
“ओके मग मी तुला काही मदत करू का?”
“हो, ती खुर्ची पुढे ओढून बसा आणि ही फाईल चेक करा.”
त्याने मान डोलावली आणि तो तिला मदत करू लागला. एक तास उलटून गेला असेल इतक्यात ईश्वरीच्या मोबाईलची रिंग वाजली. मंजिरीने कॉल केला होता. फाईल चेक करता करता ईश्वरीने कॉल घेतला.
“हं.. बोल मंजू..”
“अगं कुठे आहेस? आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना?”
पलीकडून मंजिरीने विचारलं. स्वतःच्या डोक्यावर टपली मारून जीभ चावत ईश्वरी म्हणाली,
“अरेच्या! कामाच्या नादात विसरलेच होते बघ. ही फाईल संपवते आणि लगेच निघते.”
“हो, निघ लवकर आणि आजची पार्टी माझ्या घरी आहे. नवरोबा म्हणाला, आपण नंदूला ट्रीट देऊया. तिच्याकडून पुन्हा केंव्हातरी मोठी पार्टी घेऊ. तेंव्हा तू लगेच माझ्या घरी ये..”
मंजिरीने फर्मान सोडलं.
“अगं पण..”
“आता पण बिन काही नाही. तू लवकर तयार होऊन ये. नाहीतर माझ्याकडेच ये. मी तुला तयार करते. आणि हो केळकरसरांनाही आमंत्रण दिलंय. बहुतेक तेही येतील. त्यामुळे ऑफिसमधून लगेच निघ. समजलं?”
“बरं बाई, निघते लगेच. चल बाय..”
असं म्हणत ईश्वरीने कॉल कट केला आणि शिवराजकडे पाहून म्हणाली,
“शिवराज, बाकीचं काम आपण उद्या पाहूया. आता मला निघावं लागेल. तुम्हीही निघा आणि उद्या थोडं लवकर या. मी तुम्हाला आपल्या बँकेत घेऊन जाणार आहे. तिथल्या आपल्या कंपनीचं बँक अकाउंट सांभाळणाऱ्या बँक ऑफिसर्सची मी तुम्हाला ओळख करून देईन; जेणेकरून यापुढे तुम्हीच त्यांच्याशी बोलू शकाल.”
त्याने होकारार्थी मान डोलावली. थोड्याच वेळात दोघंही ऑफिसच्या बाहेर पडले. ईश्वरीने ऑफिसच्या पार्किंगमधून कार बाहेर काढली आणि ती तिच्या घराच्या दिशेने निघाली. कार चालवताना तिचं लक्ष ऑफिसजवळच्या बसस्टॉपकडे गेलं. शिवराज बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबला होता. ती तशीच पुढे गेली. पुन्हा तिला काय वाटलं कोण जाणे ती पुन्हा कार मागे फिरवली आणि बसस्टॉपजवळ थांबवत तिने शिवराजला विचारलं,
“मी तुम्हाला ड्रॉप करू का? बराच उशीर झालाय म्हणून म्हटलं. बस कधी येईल कोणास ठाऊक!”
“नको मी जाईन, बस किंवा ऑटो मिळेलच. असंही मुली सुरक्षित गाडी चालवतात याबद्दल माझं मन जरा सांशक आहे.”
ती पुन्हा मिश्किलपणे हसला तसं तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं.
“येणार असाल तर सांगा नाहीतर मी निघाले.”
तिने रागातच गियर टाकून गाडी स्टार्ट केली. तो पटकन गाडीचं दार उघडून आत बसला.
“नंदिनी, गाडीचा इन्शुरन्स आहे ना? मी माझा काढलाय म्हणून विचारलं.”
तो खळखळून हसला. तिने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहिलं तसा तो हसू आवरत शांत झाला. आता गाडी वेगाने धावू लागली.
“तुम्हाला कुठे ड्रॉप करायचं आहे?”
“चांदणीचौकात सोड. तिथून पुढे जाईन मी..”
“का? घरापर्यंत सोडलं तर काही प्रॉब्लेम आहे का? घरचे रागावतील का?”
“नाही तसं.. पण मी जाईन.. पण हं.. तुझी माझ्या घरी येण्याची इच्छा असेल तर मग…”
तो तिला चिडवण्याच्या हेतूने म्हणाला.
“मुळीच नाही.. मला तशी हौस नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. तुम्हाला एवढ्या उशिरा बस किंवा ऑटो मिळाली नसती म्हणून फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने लिफ्ट दिली. बाकी काही नाही. उगीच तुम्ही गैरसमज…”
ती त्याला फटकारून म्हणाली आणि दुसरा गियर टाकत गाडीचा स्पीड वाढवला.
“नंदिनी, एक विचारू?”
पुढे काय होतं? शिवराज ईश्वरीला काय विचारेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©अनुप्रिया..
©अनुप्रिया..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा