पुन्हा बरसला श्रावण भाग ८५
श्लोक ईश्वरीवरचं त्याचं प्रेम व्यक्त करत होता. इतक्या वर्षांपासून ईश्वरीला माहित नसलेल्या प्रेमाची कबुली देत होता.
“मग आता काय झालं? की आता तुला सहानुभूती वाटतेय म्हणून हे सगळं बोलतोयस? नक्की तुझ्या मनात काय चालू आहे?”
ईश्वरीने श्लोककडे पाहून प्रश्न केला. त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि बोलायला सुरुवात केली.
“ईशू, मी तुला सहानुभूती दाखवत नाहीये. मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.”
“का? माझ्याशीच का? माझ्याशी, एका विधवेशी लग्न करून समाजप्रबोधनाचं महान काम करण्याची इच्छा आहे का? की लोकांच्या नजरेत महान बनण्याचा विचार करतोय?”
ईश्वरी चिडून म्हणाली.
“मला कोणासमोर महान बनण्याची इच्छा नाही. तसं करण्याची मला गरज तरी काय? माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मला माझं पुढचं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. प्लिज ईश्वरी नाही म्हणू नकोस गं! किती वर्षे मी तुझी वाट पाहिलीय! मला तुला सुखी झालेलं, आनंदी पाहायचंय. पती पत्नीच्या नात्यात राहून तुला सुख द्यायचं आहे. तुला तुझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुझी साथ द्यायची आहे. प्लिज ईशू, माझ्याशी लग्न करशील? मला साथ देशील?”
आता मात्र श्लोकच्या डोळ्यात पाणी तरळलं. अर्चनाही भावुक झाली होती. तिनेही ईश्वरीच्या होकारासाठी मोठ्या आशेने तिच्याकडे पाहिलं. ईश्वरी थोडा वेळ शांत बसली होती. काय बोलावं तिला काहीच सुचत नव्हतं. तिच्यासाठी श्लोकने असं काही विचारणं म्हणजे आश्चर्याचा धक्काच होता. सारं काही अनपेक्षित होतं. मैत्रीत प्रेमाने कधी प्रवेश केला हे तिलाच कळलं नाही. ईश्वरीने काही वेळ जाऊ दिला आणि बोलायला सुरुवात केली.
“श्लोक, मी याआधी कधीच तुझ्याशी वा अर्चूशी खोटं बोलले नाही आणि आता आपण देवाच्या दारात बसलोय. त्यामुळे आता मी जे सांगेन ते सत्यच सांगेन. श्लोक, तू आणि अर्चू माझे सगळ्यात जवळचे मित्र आहात. तुम्ही होतात म्हणून तर मी इथवर येऊ शकले. तुमच्या साथीनेच इथवरचा रक्तबंबाळ खडतर प्रवास करू शकले. अजूनही करतेय रे.. श्लोक, मी तुझ्या मनातल्या भावनांचा आदर करते पण तू माझा फक्त एक मित्र आहेस, खूप चांगला मित्र आहेस. मी कधीच तुला त्या नजरेने पाहिलं नाही. एक मित्र म्हणून मी तुझा आदर करते आणि कायम करत राहीन पण श्लोक तुला जे वाटतं ते कदापिही शक्य नाही.”
“पण का ईशू? का शक्य नाही? मी चांगला नाहीये का? की मी सध्या फारसं कमवत नाही म्हणून तुला माझ्याबद्दल खात्री वाटत नाहीये?”
श्लोक व्याकुळ झाला.
“तसं काही नाही रे, पहिली गोष्ट तर तू खूप चांगला आहेस आणि कमवण्याचं म्हणशील तर माझ्या गरजा फार नाहीत त्यामुळे तों प्रश्नच नाही. तुटपुंज्या कमाईचाही मला काही प्रॉब्लेम नाही. पण श्लोक, मी माझ्या आईवडिलांच्या दादाच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आमच्याकडे दुसऱ्या लग्नाला परवानगी नाही.”
ईश्वरीला मध्येच थांबवत श्लोक म्हणाला,
“म्हणजे काय? दुसरं लग्न वगैरे चालत नाही, परवानगी नाही हे काय आहे? आपण एकवीसाव्या शतकात वावरतो आहोत अगं.. प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष त्याला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. कोणीही संपूर्ण आयुष्य असं रडतखडत, दुःखात जगण्याची गरज नसते. मी माझ्या आईला माझा तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय सांगून टाकलाय आणि तिने तो आनंदाने मान्यही केलाय. ईशू, माझी आईसुद्धा जुन्या वळणाची आहे. तिला जर माझा विचार आवडला असेल मान्य केला असेल तर तुझ्या घरचेही नक्की ऐकतील. मी समाजावेन. मी आईसोबत येतो आणि तुला रीतसर मागणी घालतो म्हणजे कोणालाच काही प्रॉब्लेम असण्याचं कारणच नाही. मग तर झालं?”
“श्लोक, मला तुझ्या भावना समजताहेत. मला तुझा खूप आदरही वाटतोय. तू मागणी घालशील. माझ्याशी लग्न करून मला सुखातही ठेवशील. याची मला पूर्ण खात्री आहे पण श्लोक मी लग्न करू शकत नाही. माझ्या घरातले ऐकणार नाहीत हे मला माहित आहे पण समजा त्या उपरही जाऊन मी तुझ्याशी लग्न केलं असतं पण श्लोक, माझं स्वराजवर खूप प्रेम आहे. मला त्याला विसरता येत नाही.”
ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अर्चना आणि श्लोक दोघांनी गलबलून आलं.
“ईशू, तुला जिजुंची आठवण येणं साहजिक आहे. इतक्या लवकर अशी मनावर खोलवर झालेली जखम कशी भरून येईल? पण मला सांग, तुला पुढे चालावं तर लागेलच ना? फक्त आठवणींच्या आधारावर संपूर्ण आयुष्य असंच एकट्याने काढता येणार नाही ना? जोडीदार हवा असतोच गं. श्लोक म्हणतो ते अगदी बरोबर आहे. तू श्लोक सोबत लग्न करावं असं मलाही वाटतं. जो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. ज्याला आयुष्यभर तुला सुखात पाहायचं आहे. तुला सोबत द्यायची आहे तो फक्त आणि फक्त श्लोकच असू शकतो. मला मनापासून वाटतंय की श्लोकच तुला आयुष्यभर साथ देईल. तुला आनंदात ठेवेल. माझी खात्री आहे श्लोक तुझ्या घरच्यांनाही तुमच्या लग्नासाठी तयार करेल.”
अर्चना ईश्वरीला समजावणीच्या सुरात म्हणाली. ईश्वरी खाली मान घालून टिपं गाळत होती. ती पुढे काही बोलणार इतक्यात तिला थांबवत श्लोक म्हणाला.
“थांब अर्चू.. मी बोलतो. ईशू, आय एम सॉरी.. मी इतक्यात तुला हे सांगायला नको होतं. मला हे कळायला हवं होतं. ईशू, मी तुझ्या निर्णयाची वाट पाहीन. तुला हवा तितका वेळ घे आणि मग मला सांग. मी आयुष्यभर तुझी वाट पहायला तयार आहे. आता मी जे बोललो त्याचं तू जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि त्याचा परिणाम आपल्या मैत्रीच्या नात्यावर करू नकोस. ईशू, फक्त एकच करशील आता डोळ्यात पुन्हा पाणी आणू नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. कधीही आवाज दे. मी नक्की येईन.”
पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने ईश्वरीकडे पाहिलं. मावळतीची किरणं आता मंदिराच्या कळसावर रेंगाळू लागली होती. कामानिमित्त बाहेर गेलेली पाखरं पुन्हा आपल्या घरट्याच्या ओढीने परतू लागली होती.
“चला निघूया.. रात्र होण्याच्या आत आपल्याला घरी परतायला हवं.”
असं म्हणत श्लोक आपली सॅक खांद्याला अडकवत उभा राहिला. अर्चना आणि ईश्वरीही त्याच्या मागोमाग निघाल्या.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा