पुन्हा बरसला श्रावण.. भाग ८२

पुन्हा बरसला श्रावण..

पुन्हा बरसला श्रावण भाग ८२


शालिनीताईंच्या येण्याने घर पुन्हा हसू लागलं. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसू लागला होता. शालिनीताईंची प्रकृती सुधारू लागली होती. त्या पूर्वीसारख्या हसू बोलू लागल्या. रोज सकाळी ईश्वरी आणि त्या एकत्र चहा आणि नाष्टा करायच्या. ईश्वरी सकाळी लवकर उठून त्यांच्या दुपारच्या जेवण्याची तयारी करायची. सकाळचा नाष्टा, दुपारचा स्वयंपाक करून जायची. घरात गप्पांचे, बोलण्याचे, हसण्याचे आवाज निनादू लागले. स्वराजची कमतरता जाणवायची पण आता दोघींच्याही दुःखाची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली. गाडी पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली होती. शालिनीताईना पुण्याला येऊन महिना उलटून गेला होता. आता शालिनीताई पूर्वीसारख्या बोलू लागल्या होत्या. ईश्वरीसुद्धा आता थोडी शांत झाली होती.

दिवस छान सरत होते. शालिनीताईंच्या सोबत असण्याने तिला तिच्या दुःखाचा थोड्या फार प्रमाणात विसर पडत चालला होता. आणि एक दिवस शालिनीताईंच्या मुंबईला परतण्याचा दिवस येऊन ठेपला. सरदेसाई शालिनीताईंना परत घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. डॉक्टरांनी फॉलोअप साठी बोलावलं होतं. त्या जाणार म्हणून ईश्वरीचे डोळे राहून राहून भरत होते.

“आता मुंबईला जावं लागेल नं नंदिनी, डॉक्टरांनी बोलावलंय नं बाळ.. मी पुन्हा येईन ना.. असा भरल्या डोळ्यांनी तू मला निरोप देणार आहेस का? तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहून मी कशी जाऊ शकेन? माझा या घरातून पाय तरी निघेल का?”

शालिनीताई ईश्वरीला कुशीत घेत म्हणाल्या. त्यांचेही डोळे पाणावले होते. ईश्वरीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती हसून म्हणाली,

“आई, तुम्ही निर्धास्तपणे जा.. मी ठीक आहे.. माझी बिलकुल काळजी करू नका.. तुम्ही वेळेवर औषधं घ्या.. प्रॉपर ट्रीटमेंट घ्या.. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या.. मी अधूनमधून कॉल करून चौकशी करेनच.. ”

“तुही तुझी काळजी घे बाळ, वेळेवर जेवत जा.. लवकर घरी येत जा.. आणि आता सारखं डोळ्यातून पाणी काढायचं नाही.. कधीही मला कॉल कर मी कायम तुझ्यासोबत आहे हे कधीच विसरू नकोस हं.. मी लवकर येईन.. पोहचल्यावर कॉल करेन..”

शालिनीताईंनी ईश्वरीचा निरोप घेतला आणि सरदेसाई त्यांना घेऊन मुंबईला आले. शालिनीताई मुंबईला परत घरी गेल्या आणि ईश्वरी पुन्हा एकटी झाली. घर उदास वाटू लागलं. पुन्हा एकदा ते भीषण एकटेपण तिच्या अंगावर धावून आलं.

“पुन्हा एकदा तेच आयुष्य.. तेच श्वास कोंडणारा एकाकीपणा.. जीवघेणा.. आई मुंबईला परत गेल्या.. आता एकटीला हे घर खायला उठतंय.. आई होत्या तेंव्हा जरा बरं वाटलं होतं.. हसू बोलू लागले होते मी.. पण आता पुढे काय? पुन्हा तेच न सरणारं एकाकी जगणं.. काय करावं कळत नाही? स्वराज, कसं जगू मी?”

डोळ्यातलं तळं रितं होऊ लागलं. आणि अचानक तिच्यातल्या ईश्वरीने तिला साद घातली.

“ईश्वरी, आता तुला जगावचं लागेल.. तूला लढावं लागेल.. एकटीलाच.. किती दिवस तू असा आधार शोधत राहणार? किती दिवस तू दुसऱ्यांवर अवलंबून राहणार? आईंची तब्येत ठीक नसते.. तिकडे आई अर्पिता वहिनीचं बाळ येणार म्हणून बिझी.. मग आपण तरी त्यांच्याकडून का आणि किती अपेक्षा करणार? आता मला स्वतःलाच सावरावं लागेल.. माझा मलाच आधार द्यावा लागेल.. असं हताश होऊन मला चालणार नाही.. उठ ईशू.. डोळे पूस आणि तुझ्या कामाला लाग.. अजून खूप करायचंय तुला.. खूप खूप मोठं व्हायचंय..”


ईश्वरीने डोळे पुसले. सगळी मरगळ झटकून टाकली. आणि नव्या जोशाने तिने कामाला सुरुवात केली. दिनेश आणि मंजिरी तिच्या सोबतीला होतेच. मंजिरीच्या सांगण्यावरून दिनेशने ईश्वरीला कार ड्राइविंगच लायसन्स काढून दिलं. त्याच्या मित्राच्या ओळखीने तिच्यासाठी एक दोन वर्ष वापरलेली सेकंडहॅन्ड सँट्रो कार हप्त्यावर घेऊन दिली. ईश्वरीने स्वतःला कामात झोकून दिलं. दिवसाचे बारा बारा तास ती काम करू लागली स्वतःसाठी स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा करू लागली. बाहेरचं काहीतरी स्नॅक्स खाऊन ती भूक शमवत होती. . जेवणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. रात्रीच्या झोपेच्या गोळ्यांचं प्रमाण वाढू लागलं.

आणि एक दिवस तिच्या मोबाईलवर श्लोकचा नंबर झळकला. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. त्याने हॅलो म्हणताच ईश्वरीने बोलायला सुरुवात केली.

“अरे श्लोक, कसा आहेस? इतक्या दिवसांनी कॉल?”

“मग काय? तू काही काही कॉल करत नाहीस म्हटलं आपणच करावं.. विचारावं तुला.. कशी आहे आमची मैत्रीण?”

“कशी असणार श्लोक? ठीक आहे.. श्वास सुरू आहे बघ.. म्हणजे जगतेय.. मरण येत नाही म्हणून.. ”

ती निराशपणे किंचित हसून म्हणाली.

“असं काय बोलतेस यार.. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर.. असं बोलू नकोस.. कधी काही वाटलं तर कधीही कॉल कर.. मी आहे अगं..”

श्लोक काकूळतीला येऊन म्हणाला.

“हो रे बाबा, तुम्हीच तर आहात माझ्यासोबत.. रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली असली तरी मैत्रीच्या नात्यांनी मला आधार दिलाय.. अधूनमधून तुम्ही कॉल करता, माझी चौकशी करता.. तू, अर्चना, श्रद्धा, आस्था आणि राज तुम्हीच तर माझ्या संपर्कात आहात.. बाकी कोणी नाही रे..”

ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. डोळ्यातलं पाणी आवरत ती म्हणाली,

“बरं सोड ते.. मला सांग कसे आहात सगळे? अर्चना, आस्था?”

“सगळे मस्त आहेत.. मी तुला यासाठी कॉल केलाय की एमकॉमच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा जवळ येताहेत.. अभ्यास सुरू करायला हवा.. ”

“अरे हो रे.. कधीपासून सुरू होताहेत? मला टाईमटेबल सेंड कर.. अभ्यासाला सुरुवात करावी लागेल..”

“हो.. मी पाठवतो तुला.. आणि नोट्स पण कुरियर करतो.. तुझा अभ्यास तसा झालाय नं.. मागे आपण बोललो होतो..”

“हो रे.. फक्त एकदा थोडं रिव्हीजन करावं लागेल.. आधी ऑफिसमध्ये सुट्टी घ्यावी लागेल. बघू कसं होतंय?”

थोडा वेळ परीक्षेसंदर्भात बोलून ईश्वरीने फोन ठेवून दिला.

“एकटी सगळं हॅन्डल करतेय बिचारी.. मी तिचा क्लोज्ड फ्रेंड आहे. इतकी चांगली मैत्री असूनही तिच्यासाठी काही करू शकत नाही.. मी तिला मदत करायला हवीय.. तिला या दुःखातून बाहेर काढायला हवं.. मला काहीतरी करायलाच हवं..”

ईश्वरीच्या विचारांनी श्लोकचा गळा भरून आला.

“मला तिच्याशी बोलायला हवं.. काहीतरी मार्ग काढायलाच हवा.. तिच्या आजवरच्या दुःखावरचं औषध मिळायलाच हवं.. आधी मला अर्चनाशी बोलायला हवं..”

अखेरीस श्लोक एका निर्णयापर्यंत पोहचला. उद्या सकाळी अर्चनाशी बोलण्याचा विचार करून तो रात्री झोपी गेला.

एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे एमकॉमच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू झाली. ईश्वरी घरी आल्यानंतर रात्रभर अभ्यास करू लागली. अधून मधून श्लोक ईश्वरीला कॉल करून तिची विचारपूस करत असायचा. अभ्यास, कॉलेज नोट्स याबद्दल बोलणं व्हायचं. एक दोन दिवसांत श्लोकने ईश्वरीला नोट्स कुरियर केलं. परीक्षा तोंडावर आली होती. ईश्वरीने परीक्षेसाठी आठ दिवसांची सुट्टी टाकली होती. जोरदार परीक्षेची तयारी सुरू झाली आणि ती लवकरच परीक्षेसाठी मुंबईला येणार होती.

एक दिवस श्लोक आणि अर्चना आपला अभ्यास संपवून कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये येऊन बसले होते.

“अर्चू, बऱ्याच दिवसांपासून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मी काही ठरवलंय..”

“बोल नं रे.. काय झालं?”

पुस्तकात खुपसलेलं डोकं बाहेर काढत अर्चना म्हणाली.

“ईशूला मला एक..”

तो अडखळला. शब्दांची जुळवाजुळव करत त्याने बोलायला सुरुवात केली.

“अरे असं काय अडखळतोयस? सांग पटकन काय बोलत होतास?”

अर्चनाने त्याच्याकडे पाहिलं.

“अर्चू, आपण सगळे लहानपणापासूनचे मित्र.. एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहिलो आणि कायम असूच.. ”

“श्लोक, उगीच लांबसडक प्रस्तावना नको रे.. शॉर्टमध्ये मुद्याचं बोल आधीच मला अकाउंटंचं सम सॉल्व होत नाहीये.. उगीच बडबड करू नकोस..”

अर्चना थोडं त्रासून म्हणाली..

“बरं ठीक आहे.. मी मुद्द्याचंच बोलतो..”

त्याने बोलायला सुरुवात केली.

पूढे काय होतं? श्लोक अर्चनाला काय सांगणार होता? ईश्वरी आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल का? अजून तिला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all