पुन्हा बरसला श्रावण.. भाग ८१

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण भाग ८१


थोड्याच दिवसांत ईश्वरी कामात व्यस्त झाली.. दिवसभर काम असायचं. वेळ भुर्रकन निघून जायचा पण रात्रीचं जागणं काही संपत नव्हतं. स्वराजच्या आठवणींनी सारी रात्र अशीच सरून जायची. अशा कितीतरी रात्री तिने जागून काढल्या होत्या याची गणतीच नव्हती. डोळ्यातला श्रावण पुन्हा पुन्हा बरसत राहिला. ती कणाकणांनी ती झुरत होती. जागरणाने तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. ईश्वरी सारखी आजारी पडू लागली. मंजिरी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टर मेघना शहा यांच्या क्लिनिकमध्ये त्या पोहचल्या. डॉक्टर मेघना खूप चांगल्या सुप्रसिद्ध गायनिक होत्या. त्यांनी तिला तपासलं. तिच्याकडून तिची मेडिकल हिस्ट्री समजावून घेतली आणि मग काही टेस्ट करायला सांगितल्या. औषधं लिहून देत त्या म्हणाल्या,

“नंदिनी मॅडम, प्राथमिक चेकअप वरून आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या सध्याच्या लाईफ स्टाईलवरून असं वाटतंय, एकतर तुमचं जेवण वेळेवर होत नाही. झोप पूर्ण होत नाहीये.. बाकी मी ज्या टेस्ट लिहून दिल्यात त्याचे रिपोर्ट्स आले की आपल्याला ट्रीटमेंटची योग्य दिशा मिळेल.. मी काही औषधं लिहून देते ते वेळेवर घ्या. जेवण वेळच्यावेळी करा.. भरपूर पाणी प्या.. भरपूर फळं खा.. तुमची झोप पूर्ण होण्यासाठी मी काही मेडिसिन देते. त्या गोळ्यांनी तुम्हाला झोप चांगली लागेल पण या गोळया काही दिवसांसाठीच घ्यायच्यात.. तुम्हाला रेग्युलर झोप यायला लागली की आपण ती औषधं बंद करू.. रिपोर्ट्स आले की ते सोबत घेऊन या.. मग पाहूया ठीक आहे?

ईश्वरीने मान डोलावली. मंजिरीने डॉक्टर मेघनाशी अजून काही गोष्टींची चर्चा केली आणि थोड्या वेळात त्या दोघी तिथून निघाल्या. मेडिकल स्टोर्स मधून औषधं घेतली आणि त्या तिथून निघाल्या. दोन तीन दिवसांत ईश्वरीचे रिपोर्ट्स आले आणि त्या आधारावर डॉक्टर मेघना यांच्याकडे ईश्वरीची ट्रीटमेंट सुरू झाली. त्यांच्या औषधांनी तिला बरं वाटू लागलं होतं. झोपेच्या गोळ्यांनी तिला रात्री झोप येऊ लागली. पण हळूहळू त्या गोळ्यांची तिला सवय होऊ लागली. आणि आता गोळ्यांशिवाय तिला झोप येणं बंद झालं होतं.

नोकरीतही बरेच चढउतार येत होते. केळकर सरांनी शिरवळला नवीन प्रोजेक्ट सुरू केला होता त्यामुळे तिच्या शिरवळच्या फेऱ्या वाढल्या होत्या. शिरवळचा प्रोजेक्ट नवीन असल्याने बऱ्याच अडचणी येत होत्या. ईश्वरी प्रत्येक संकटाला तोंड देत खंबीरपणे उभी राहण्याचा प्रयत्न होती. रात्रंदिवस काम सुरू होतं.

इकडे शालिनीताईंची प्रकृती सुधारण्याचं नाव घेत नव्हती. स्वराज गेल्यानंतर त्यांनी जे अंथरुण धरलं ते धरलंच.. सरदेसाईंनी सारे दवाखाने पालथे घातले पण त्यांना काही बरं वाटत नव्हतं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली होती. सरदेसाई शालिनीताईंच्या आजारपणामुळे खचून गेले होते. एक दिवस शालिनीताई आपल्याला खोलीत पलंगावर आराम करत पडून होत्या. पलंगावर गोळा होऊन पडलेला त्यांच्या कृष देहाकडे पाहून सरदेसाईंना गलबलून आलं. शालिनीताईंच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले,

“शालू, आता पुरे नां.. किती दिवस असं दुःख करत राहणार आहेस? अगं सर्वजण आपापल्या मार्गी लागले.. तो गेलाय म्हणून कोणाचंच आयुष्य थांबलं नाही अगदी त्याच्या बायकोचंही नाही.. मग तूही आता या दुःखातून सावरायला हवं नां? बघ., आपण इतके उपचार करतोय पण तुझ्या तब्येतीत अजिबात सुधारणा होत नाहीये कारण तू मनाने तसं ठरवत नाहीयेस.. शालू, तुला बरं व्हायचंय नां.. निदान माझ्यासाठी तरी.. मला सांग मी काय करू तुझ्यासाठी? तुला कशाने बरं वाटेल? मी सगळं करतो.. कुठे फिरायला जायचं का आपण दोघेच?”

शालिनीताईंनी नकारार्थी मान हलवली आणि एकदम क्षीण आवाजात त्या म्हणाल्या,

“तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय मला.. पण मी आई आहे ओ.. माझा पोटचा तरुण मुलगा ऐन उमेदीत गेलाय.. कसं सहन करू? समजत नाहीये.. खूप प्रयत्न करते पण त्याला विसरता येत नाहीये.. काय करू? मलाही बरं व्हायचंय.. मी मुद्दाम करत नाहीये ओ..”

त्या हळव्या झाल्या. डोळ्यातलं पाणी वाहू लागलं.

“अगं, तसं कुठं काही म्हणालो मी? तू लवकर बरी व्हावीस हीच माझी इच्छा आहे म्हणून म्हटलं तू म्हणशील तसं करतो पण तू मला लवकर बरी व्हायला हवी..”

“मग माझी एक इच्छा पूर्ण कराल?”

“मला सांग मी काय करू तुझ्यासाठी?”

“मला नंदिनीकडे घेऊन चला.. मला तिच्याजवळ राहायचंय.. निदान काही दिवस तरी तिला सोबत करायची आहे.. स्वराज गेल्यानंतर आपण तिच्याकडे पाठ फिरवली. काय वाटत असेल स्वराजला? त्याच्या माघारी आपण त्याच्या बायकोची साधी विचारपूस सुद्धा केली नाही.. प्लिज मला तिच्याकडे घेऊन जा.. ”

शालिनीताईंचे डोळे पाण्याने गच्च भरले. सरदेसाईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. रागाने चेहरा लालबुंद झाला.

“अगं, तिच्यामुळे आपण आपला पोटचा मुलगा गमावून बसलो नां? तरी तुला तिचाच पुळका येतोय? तिचा आणि आपला आता काही संबंघ नाही. स्वराजबरोबर तीही मेलीय आपल्यासाठी.. परत या घरात तिचं नाव नकोय मला.. समजलं तुला?”

“तुम्हाला तसं वाटतंय नां तर मग ठीक आहे.. पण मी तुम्हाला सांगते, आपला मुलगा अपघातात गेला.. तिचा यात काहीही दोष नाहीये.. ती गायत्री आणि तिच्या आईने तुमचे कान भरलेत.. दुसरं काही नाही.. ठीक आहे., तुम्हाला मला तिच्याकडे घेऊन जायचं नसेल तर काही हरकत नाही पण उगीच तिला बोल लावू नका.. नाही भेटायचं मला कोणाला मग माझा जीव गेला तरी चालेल मला..”

शालिनीताई बोलता बोलता थांबल्या. त्यांना चांगलीच धाप लागली होती. मधेच त्यांना खोकल्याची उबळ आली. त्या खोकू लागल्या. सरदेसाईंनी घाईने उठले आणि पाण्याचा ग्लास त्यांच्या तोंडाला लावला. पाणी प्याल्यावर शालिनीताई थोड्या शांत झाल्या. सरदेसाई विचार करू लागले.

“सगळे उपचार करून झाले, देवधर्म करून झाला तरी शालूला बरं वाटत नाहीये. एकदा हेही करून बघूया का? तिच्याकडे जाण्याने जर शालूला बरं वाटत असेल तर हे पण करून पाहूया.. ”

त्यांनी शालिनीताईंकडे वळून पाहिलं आणि म्हणाले,

“शालू, अशी रागावू नकोस.. चिडचिड करू नकोस.. बघ तुला त्रास होतो की नाही.. आता शांत झोपून रहा. कसला विचार करू नकोस.. मी तुला नंदिनीकडे घेऊन जातो.. आपण उद्याच जाऊया.. पण मी तिथे थांबणार नाही. त्या घरात माझ्या मुलाच्या आठवणी असतील. मला नाही जमणार.. तुझी काळजी घेण्यासाठी आपण शांता मावशींना सोबत घेऊन जाऊया..”

“काय! आपण खरंच नंदिनीकडे जायचं? तुम्ही मला घेऊन जाणार? थँक्यू ओ..”

सरदेसाईंचं बोलणं ऐकून शालिनीताईंना खूप आनंद झाला होता.

“हो.. हो.. मी तुला तिच्याकडे घेऊन जातो.. मी तुला सोडून परत येईल पण तू तुला हवे तितके दिवस खुशाल रहा.. मावशींना तुझी बॅग भरायला सांगून ठेवतो.. तू आता आराम कर हं..”

असं म्हणून ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. गायत्रीला त्यांचा निर्णय मुळीच रुचला नव्हता पण सार्थकच्या दबावामुळं ती शांत बसली होती.

दुसऱ्या दिवशी सरदेसाईं डॉक्टरांच्या परवानगीने शालिनीताईना घेऊन पुण्याला निघाले. सोबतीला शांतामावशी होत्याच. तीन चार तासांचा प्रवास होता पण तरीही शालिनीताईंना त्रास होत होता. दोन चार तासांचा प्रवासानंतर अखेरीस ते पुण्यात पोहचले.

रविवारचा दिवस होता. ईश्वरी घरातली कामं उरकून कुठलीशी कादंबरी वाचत बसली होती. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“यावेळीस कोण आलं आता?”

असं म्हणून ती सोफ्यावरून उठली आणि दार उघडलं.

“आई तुम्ही?”

आश्चर्याने तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. समोर शालिनीताईंना पाहून तिला खूपच आनंद झाला होता. तिने पटकन वाकून नमस्कार केला आणि त्यांना घट्ट मिठी मारली. दोघीही निःशब्द होत्या. फक्त डोळ्यातली आसवं बोलत होती.

“अगं मला आत तरी येऊ देशील की नाही?”

त्या हसून तिच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या.

“ओह्ह सॉरी! या.. या नां आई.. बाबा या नां..”

शालिनीताई आत आल्या. सरदेसाई सुद्धा नाईलाजाने आत आले. शालिनीताईंनी सभोवताल एक नजर फिरवली. स्वच्छ, टापटीप अगदी मोजक्याच वस्तूंनी सजलेलं.. त्या घरातल्या प्रत्येक वस्तू स्वराजच्या प्रेमाची आठवणीची साक्ष देत होत्या. त्यांचे डोळे पुन्हा पुन्हा भरत होते.

“आई मला तुम्हाला पाहून इतका आनंद झालाय म्हणून सांगू! किती वाट पाहत होते मी तुमची..”

“मग यायचं होतंस आणि घेऊन जायचं होतंस.. उगीच प्रेमाचा दिखावा.. शालिनी इतकी आजारी होती.. तू एकदा तरी आलीस? नाही नां? मग आता का प्रेम ऊतू चाललंय? नाटकं नुसती..”

सरदेसाई चिडून म्हणाले. ईश्वरी काहीच बोलली नाही.

“बरं.. आता आल्या आल्या तेच बोलायचं का? सोडा ते सगळं.. कशी आहेस नंदिनी?”

“मी ठीक आहे आई.. खूप छान वाटलं तुम्ही आलात ते.. आता मस्त राहू आपण..”

ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.. थोड्या वेळाने सरदेसाई शालिनीताईंचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघाले शालिनीताईच्या घर पुन्हा एकदा हसू लागलं होतं.

पुढे काय होतं? ईश्वरीच्या आयुष्यातला आनंद असाच टिकून राहील का? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all