पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७९

पुन्हा बरसला श्रावण..


पुन्हा बरसला श्रावण भाग ७९

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, स्वराजच्या कायमचं सोडून जाण्याने ईश्वरीवर दुःखाचा डोंगर कोसळला. लोकांचे खरे चेहरे समोर आले. सरदेसाई, गायत्रीने स्वराजच्या मृत्यूला ईश्वरीलाच कारणीभूत ठरवलं. पुण्यातल्या राहत्या घरावर आपला हक्क सांगितला पण स्वराजने घर ईश्वरीच्या नावावर केलेलं असल्याने कायदेशीररित्या तिला कोणीही त्या घरातून बाहेर काढू शकलं नाही. ईश्वरीच्या माहेरी अर्पिताने तिची जबाबदारी घेण्यास नकार दिला. त्यामुळे ईश्वरीने पुण्याला राहण्याचा आणि नोकरी करण्याचा निर्णय घेतला. शालिनीताई तिच्या बाजूने उभ्या राहिल्या. अखेरीस ईश्वरीला पुण्याला जाण्यासाठी सर्वांनी परवानगी दिली आता पुढे..

पुन्हा बरसला श्रावण भाग ७९

काही तासांच्या प्रवासानंतर ईश्वरी पुण्यात पोहचली.

“आधी ऑफिसला गेलं पाहिजे.. बरीच कामं पेंडिंग राहिलीत. ती पूर्ण करायला हवीत.. कामात बिझी राहिले तरच मला सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला मदत होईल.. काम करत राहिलं की बाकीच्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही.. कामात गुंतून राहिलं पाहिजे..

तिने मनातल्या मनात पुटपुटली.

“दादा, पुढे जाऊन डावीकडे टर्न घ्या.. मी सांगते तुम्हाला..”

तिने कॅबवाल्या ड्राईव्हरला मार्ग बदलायला सांगितला. ड्राईव्हरने मान डोलावली आणि तो डावीकडे वळला. कुठेही न थांबता ईश्वरी सरळ ऑफिसमध्ये पोहचली. घरात घडलेल्या घटनावळीना मनातून हद्दपार केलं आणि नव्या जोमानं कामाला सुरुवात केली. तिने तिच्या टेबलवरच्या फाईलमध्ये आपलं डोकं खुपसलं. कोण काय बोलतंय, कोण तिच्याकडे पाहतंय याकडे तिचं मुळीच लक्ष नव्हतं.

“सगळं काही ठीक आहे.. मला काहीही झालेलं नाहीये. सारं काही पूर्वीसारखंच आहे. काही बदललेलं नाही.. मी पूर्वीचीच ईश्वरी आहे. माझ्यात काही वेगळा बदल झालेला नाहीये..”

ईश्वरी स्वतःच्याच मनाला बजावून सांगत होती. ही एका नवीन पर्वाची नांदी होती. तिची वाट इतकी सरळ सोप्पी नव्हतीच मुळी. बरेच चढउतार येणार होते. अनेक अडचणींना तिला सामोरं जायचं होतं. तिला स्वतःची लढाई स्वतःच एकटीने लढायची होती. हा एक नवा शुभारंभ होता ईश्वरीच्या आयुष्याच्या प्रवासाचा.. हीच खरी वेळ होती तिच्या सत्त्वपरीक्षेची..

दिवसभराचं काम संपवून ईश्वरी घरी परतली. दारावरचं कुलूप काढून आत आली. एक उदास वारा झपकन अंगावर आला. घरात एक विचित्र मरगळ तिला जाणवत होती. ईश्वरी फ्रेश झाली आणि तिने दिवापुढे दिवा लावला. दिव्याच्या मंद प्रकाशाने सारं देवघर उजळून गेलं होतं. तिने स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली आणि सोफ्यावर बसली. कॉफीचा एक घोट पोटात गेला.

“स्वराज असता तर.. त्यानेच कॉफी बनवून दिली असती.. माझ्यापुढे कॉफीचा मग धरत आपल्या फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला असता,

“मॅडम, आपकी खिदमतमे ये बंदा हाजीर है! ये लिजिए आपकी फेव्हरेट कॉफी.. सिर्फ आपके लिए..”

तिच्या ओठांवर खुदकन हसू आलं आणि डोळ्यात पाणी साठू लागलं.

“इतके दिवस आई होती तेंव्हा फारसं काही वाटलं नाही.. एकटेपणा फारसा जाणवला नाही पण आता हे एकटं आयुष्य अंगावर येऊ लागलंय.. आई होती तर तिच्यासोबत वेळ निघून जायचा पण आता एकेक क्षण युगासारखा भासू लागलाय.. एकटीला कसं सांभाळता येईल? दिवस कामात निघून जाईलही पण या काळ्याकुट्ट रात्रींचं काय करायचं? त्या कश्या सरतील? काय करू मी?”

तिचे डोळे झरू लागले. स्वराजच्या आठवणींनी ती व्याकुळ झाली. तिने कॉफीचा मग टीपॉयवर ठेवला आणि तशीच डोळे बंद करून सोफ्याला टेकून पडून राहिली. डोळ्यासमोर स्वराजचा हसरा चेहरा दिसू लागला. त्याच्या देखण्या राजबिंड्या रूपाला पाहून ती हरकून गेली. स्वराज अलगद तिच्या बाजूला येऊन बसला. तिच्या चेहऱ्यावर येणारी केसाची बट त्याने अलगद तिच्या कानाआड नेली. खूप जवळून तिला तो न्याहाळत होता. केसांवर हात फिरवत त्याने ईश्वरीला आवाज दिला..

“ईशू.. असं काय करतेय बच्चा? आता हे रडणं थांबव नं शोना.. किती रडशील राणी?”

“काय करू स्वराज? तुमच्या आठवणींनी डोळे आपोआप ओसंडू लागताहेत.. तुमची आठवण मला खूप बेचैन करते.. मला माहितीये तुम्हाला हे खोटं वाटतंय.. पण स्वराज, मला तुम्हाला हे खूपदा सांगायचं होतं पण तेंव्हा धीर झाला नाही. कदाचित माझा इगो मधे आला असेल. एक स्त्री असून आपण कसं बोलायचं या विचाराने मी कधी बोललेच नाही. पण आज मनापासून सांगावंसं वाटतंय, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे ओ..”

“मला माहित आहे ईशू.. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते..”

तिची हनुवटी अलगद वर उचलत स्वराज तिच्या कानाशी येऊन कुजबुजला तशी ती मोहरली. त्याचे श्वास तिला तिच्या खांद्यावर जाणवू लागले. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला तशी ती त्याच्या कुशीत शिरली.

“स्वराज, तुम्ही माझा आधार झालात.. माझे चांगले मित्र झालात.. खुप छान आहे आपलं नातं.. मित्र म्हणून जगताना मी आताशी कुठे तुम्हाला ओळखू लागले होते. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? हा प्रश्न मी कधीच तुम्हाला विचारला नाही. का माहिती? प्रेम थोडी न कधी मोजून मापून करायची गोष्ट आहे? ती तर मनापासून जोपासची, हळुवारपणे रुजत जाण्याची गोष्ट.. प्रेमालाही वेळ हवाच ना थोडसं रुजायला.. मनात फुलायला.. मी असाच विचार करत राहिले. स्वराज, तुम्हाला आठवतं? एकदा माझ्या नोकरी करण्यावरून घरात थोडा वाद झाला होता आणि बाबा खूप चिडले होते. मी खूप घाबरले होते तेंव्हाही तुम्ही असाच माझा हात तुमच्या हातात घेतला होतात. मी तुम्हाला विचारलं होतं. नाही ना सोडून जाणार तुम्ही मला? कायम माझ्यासोबत राहाल नं? आणि समजा, कुठे गेलात तरी मला सोबत घेऊनच जायचं तुम्ही! मला नाही काही माहीत, आईबाबांना काय सांगायचं ते. तुम्ही ठरवा.. मी कायम तुमच्याच सोबत राहणार. समजलं तुम्हाला? आठवतं का ओ?”

“कसा विसरेन गं राणी? सारं आठवतंय..”

आता स्वराजच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होऊ लागल्या.

“तेंव्हा तुम्ही हसून म्हणाला होतात, "अगं येडू, कुठे जाऊ तुला सोडून? सात जन्मासाठी मला मागून घेतलंस ना? आता तुझ्या पाशातून माझी सुटका नाही बरं.. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. कायम तुझ्यासोबतच असेन. एक काम कर.. मला नं तुझ्या कमरेला दोरीने घट्ट बांधून ठेव.. मग तर झालं? असंच म्हणाला होतात नं? पण स्वराज, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात.. गेलात नं मला सोडून?”

आता मात्र तिच्या आसवांचा बांध फुटून वाहू लागला. तिचे हळवे शब्द त्याच्या हृदयावर घाव घालत होते. ईश्वरी दुःखाने कळवली. व्याकुळ होऊन म्हणाली,

“कसं जगू स्वराज? तुमच्याशिवाय जगण्याची मला कल्पनाच करवत नाहीये ओ.. तुम्ही श्वास आहात माझा.. माझं सर्वस्व आहात.. मला तुमच्याशिवाय नाही जगता येणार किंबहुना मला तुमच्याशिवाय जगायचंच नाहीये..”

स्वराजने तिला जवळ घेतलं. तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवत तो म्हणाला,

“ईशू, मी कुठे गेलोय गं? इथेच आहे तुझ्या आसपास.. तुझ्या असण्यात.. तुझ्या दिसण्यात.. तुझ्या हसण्यात.. तुला सोडून मी कुठेच गेलेलो नाहीये.. खरंतर मी तुला सोडून कुठेच जाऊ शकत नाही.. माझा जीव तर तुझ्यातच गुंतलाय नं.. कसा जाऊ तुला सोडून?”

ईश्वरीला कवेत घेत तो म्हणाला,

“ईशू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव बच्चा, तू एकटी नाहीयेस.. मी तुझ्याजवळच आहे.. तुझं संरक्षण करायला., दुःखात तुला सावरायला.. हसताना तुझ्या हास्यात सामील व्हायला मी असणार आहे. तुझ्या हातून कधीच काहीच चुकीचं घडणार नाही कारण काही चुकीचं घडत असताना तुला अडवायला, तुझं चुकलेलं पाऊल थांबवायला मी कायम तुझ्यासोबत असणार आहे.. पण ईशू, तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं नां तर नाही गं आवडत मला.. तू रडताना अजिबात छान दिसत नाहीस. तुला कायम हसताना पहायला आवडेल मला.. माझ्यासाठी एक करशील? आता यापुढे तू कधीच डोळ्यात पाणी आणू नकोस.. मला प्रॉमिस कर तू रडणं थांबशील. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेशील.. आय रियली लव्ह यू डिअर.. ऐकशील नं माझं? नाही नं रडणार आता?”

“हो स्वराज, मी ऐकेन तुमचं.. सगळं ऐकेन.. पण मला सोडून तुम्ही कुठे जाऊ नका हं.. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे स्वराज.. आय लव्ह यू टू स्वराज..”

“आय लव्ह यू ईशू.. लव्ह यू..”

ईश्वरी दचकून उठली. डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. तिची नजर स्वराजला शोधू लागली पण समोर कोणीच नव्हतं.

“माझा भास होता तर.. स्वराज, तू मला सोडून गेलायस हे मला मान्य का होत नाहीये? माहीत आहे मला, आता फक्त तुझ्या आठवणीतच जगायचं. त्याला आठवत राहायचं आणि मनात साठवत राहायचं तुझ्या मधुर आठवणी..

भेट तुझी रे ओढ मनाची
समजूत कैसी घालू जनाची
तुझी आठवण तुझी साठवण..

साथ तुझी रे आस मनाची
सजवू कशी रे भेट जीवाची
तुझी आठवण तुझी साठवण..


पूढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all