Login

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७५

पुन्हा बरसला श्रावण..



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७५


दिनेशची कार वेगाने मार्ग कापत पुढे जात होती. थोड्याच वेळात सोसायटीच्या आवारात दिनेश गाडी येऊन थांबली. ते दोघेही ईश्वरीला सोडण्यासाठी तिच्या घरापर्यंत आले होते. ईश्वरीने दारावरची बेल वाजवली. अनघाने दार उघडलं.

“अरे आलात? या.. बराच वेळ लागला..”

त्यांना आत घेत अनघा म्हणाली. अनघाने सर्वांना बसायला सांगितलं आणि किचनमधून पाण्याच्या ग्लासचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिने सर्वांना पाणी दिलं.

“कशी झाली मिटिंग? तुझं जे काम होतं ते झालं का?”

अनघाने ईश्वरीला प्रश्न केला.

“हो आई.. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.. आता मन शांत झालंय. मनावरचं सगळं मळभ दूर झालंय.. त्यासाठी दिनेश भावोजी आणि मंजिरीचे खरंच खूप आभार.. तुम्ही होतात म्हणून तर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.. आई..”

“बरं, ठीक आहे. आपण त्यावर नंतर बोलूया. आधी जेवून घेऊ.. मंजिरी, ईश्वरी चला उठा.. पानं वाढायला घ्या..”

ईश्वरीचं बोलणं मधेच थांबवत अनघा म्हणाली.

“नको काकू.. आम्ही घरी जाऊन..”

“नाही.. इथेच.. घरी जाऊन कधी बनवशील?”

अनघाने मंजिरीला प्रेमाने दटावून सांगितलं. मंजिरी ईश्वरी दिनेश अनघा यांनी एकत्र बसून जेवण केलं. थोड्याच वेळात मंजिरी आणि दिनेश त्यांच्या घरी जायला निघाले.

“नंदू, चल आम्ही निघतो आता.. खूप उशीर झालाय.. काकू, जेवण मस्त झालं होतं. पोटभर जेवलो बघा.. अजूनही जिभेवर चव रेंगाळतेय.. खूप यम्मी होतं..”

“हो नं? मी असेपर्यंत जेवायला घरी येत जा की मग.. आम्हालाही तेवढीच सोबत..”

नको काकू, इतकं लाडावू नका तिला.. नाहीतर ती आळशी होईल आणि मग मला..”

दिनेशच्या या वाक्यावर मंजिरीसकट सर्वजण खळखळून हसले.

“नंदू, उद्या सकाळी लवकर आवरून बस.. एकत्रच जाऊ ऑफिसला..”

मंजिरी सोफ्यावरची तिची पर्स उचलत म्हणाली.

“अगं नको.. जाईन मी.. रोजच काय? उद्या तू टूरवर गेलीस तर काय करायचं मग?”

तेंव्हाच तेंव्हा बघू.. पण जोपर्यंत मी पुण्यात असेन आणि टूरवर नसेन तोपर्यंत मीच तुला माझ्यासोबत घेऊन जाणार. समजलं?”

“हो.. बरं बाई.. रागवू नकोस.. उद्या तयार राहते.”

ईश्वरी मंजिरीचा हात हलकेच थोपटत म्हणाली. थोड्या वेळाने मंजिरी आणि दिनेश त्या दोघींचा निरोप घेऊन त्यांच्या घरी निघून गेले. अनघाने किचन आवरलं आणि झोपण्यासाठी ती बेडरूममध्ये आली. ईश्वरी पलंगावर आडवी झाली होती. डोळे बेडरूमच्या छताकडे लावून एकटक रूमच्या सिलिंगकडे पाहत होती. ती मंजिरीच्या बोलण्याचाच विचार करत होती. स्वराजच्या आठवणींनी मन भरून आलं होतं. अनघा तिच्याजवळ आली. तिला मायेने जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवत अनघा म्हणाली,

“ईशू, आता विचार करणं कमी कर बाळा.. चल झोप बरं.. उद्या ऑफिस आहे नं?”

“हो आई.. पण झोपच येत नाहीये गं.. माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी इतक्या पटपट घडत गेल्या की सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि आता हे असं भीषण आयुष्य समोर आलं. एका क्षणात सारं बदलून गेलं. काय करावं गं? कसं जगावं गं?”

“बाळा, तू काही करू नकोस.. सगळं वेळेवर सोडून दे.. तुला सांगू ईशू, जेंव्हा आपल्याला काही कळत नाही ना आणि सर्वत्र अंधार दिसत असेल तर नं एकदम शांत रहावं.. ते कठीण प्रश्न तसेच राहू द्यावेत.. खरंतर त्यांची उत्तरं शोधण्याच्या नादात आपण त्यांच्यामागे धावत राहतो आणि मग आपली दमछाक होते.. त्यामुळे तू फक्त त्या प्रश्नांना सामोरं जा.. तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ते कर.. कधी ना कधी आपल्याला त्या प्रश्नांची उकल नक्की मिळेल.. समजलं का वेडाबाई..”

ईश्वरी आईच्या कुशीत शिरली. खूप मोठ्याने आक्रोश करावं असं तिला वाटून गेलं. अनघा तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. आईच्या कुशीत तिला कधी झोप लागली तिचं तिलाच समजलंच नाही. अनघाने तिला आपल्या कुशीतून खाली पलंगावर झोपवलं आणि तिही ईश्वरीशेजारी झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने लवकर उठून घर आवरलं. इतर स्नानादी उरकून देवपूजा आटोपली आणि तिने ईश्वरीला उठवलं. ईश्वरीही अंघोळ वगैरे आटोपून पटकन आवरून तयार झाली. अनघाने दोघींसाठी कॉफी आणि नाष्टा बनवला आणि डायनींग टेबलवर आणून ठेवला. ईश्वरी कॉफीचा एक घोट घेणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आई, मंजिरी आली वाटतं.. चल मी निघते..”

असं म्हणत ईश्वरीने दार उघडलं. पाहते तर, समोर दारात सरदेसाई, सार्थक आणि गायत्री उभे होते.

“बाबा, भावोजी तुम्ही! या ना.. वहिनी.. ”

त्या तिघांना असं अचानक समोर उभं ठाकलेलं पाहुन ईश्वरीला खूप आश्चर्य वाटलं. ते तिघे आत आले. ईश्वरीने पटकन वाकून तिघांना नमस्कार केला. अनघाने पटकन त्या सर्वांसाठी पाणी आणलं. सरदेसाईंनी खुणेनेच नको म्हणून सांगितलं. इतक्यात ईश्वरीचा मोबाईल वाजला. मंजिरी तिला कॉल करत होती. ईश्वरीने पटकन कॉल कट केला.

“मंजिरी, तू पुढे जा.. मी मागाहून येते.. थोडा उशीर होईल. माझे दीर, जाऊबाई आणि सासरे आलेत.. सॉरी..”

ईश्वरीने मंजिरीला मेसेज केला.

“ओके..”

मंजिरीने मेसेज वाचून तिला रिप्लाय दिला आणि ती ऑफिससाठी पुढे निघून गेली. ईश्वरी सर्वांसाठी चहा घेऊन आली. तिने टीपॉयवर चहाचा ट्रे ठेवला. एकेक करून तिने सार्थक, गायत्री आणि सरदेसाई सर्वांना चहा दिला. थोडा वेळ शांततेत गेला. कोणीच काही बोलत नव्हतं.

“आई कशा आहेत वहिनी?”

ईश्वरीने आस्थेने सासूबाईंची चौकशी केली.

“स्वतःच्या तरुण मुलाला गमावल्यानंतर त्या माऊलीकडून काय अपेक्षा आहेत तूझ्या?”

गायत्री खोचकपणे प्रश्न केला.

“तसं नाही वहिनी.. पुत्रविरहाचं दुःख एक आईच समजू शकते..”

ईश्वरीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. सर्वांचा चहा घेऊन झाला. पुन्हा एकदा बोचणारी शांतता पसरली. सरदेसाईंनी गायत्रीकडे पाहिलं. गायत्रीने मान हलवली आणि तिने बोलायला सुरुवात केली.

“नंदिनी, आम्ही एका महत्वाच्या कामासाठी इथं आलोय..”

अनघा आणि ईश्वरीने तिच्याकडे पाहिलं.

“स्वराज भावोजीनी मोठ्या कष्टाने त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. नोकरी मिळवली होती. पुण्यासारख्या अनोळखी शहरात येऊन स्वतःचं करियर बनवलं. स्वतःचा इतका मोठा थ्री बीएचके फ्लॅट घेतला. तुलाही त्यांनी तुझ्या शिक्षणासाठी, करियरसाठी खूप मदत केली..”

“खरंय वहिनी..”

ईश्वरीने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. तिच्या डोळ्यातून आसवांचा पाऊस कोसळू लागला. सरदेसाईंच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. अनघा आणि सार्थकलाही गलबलून आलं. गायत्री पुढे बोलू लागली.

“पण आता या साऱ्या गोष्टींचा काय उपयोग? स्वराज भावोजी तर नाही राहिले. ते हे जग सोडून गेले. मग त्यांची प्रॉपर्टी तरी कशाला ठेवायची? आम्हाला पुण्यातली स्वराज भावोजीनी घेतलेली ही प्रॉपर्टी विकायचीय. ती विकून आलेल्या रक्कमेतून तुझा तुला हिस्सा देण्यात येईल. असंही तू तुझ्या आईवडिलांकडेच जाणार असशील आणि तुझे आईबाबा, भाऊ भावजय तुला काही वाऱ्यावर सोडणार नाहीत. तरीही आम्ही तुझा विचार करतोय. म्हणून तुला तुझा हिस्सा देतोय.. हो ना बाबा?”

गायत्रीने सरदेसाईंकडे पाहिलं.

“हो बरोबर बोलतेय ती.. एक दोन दिवसांत एजेंट येईल त्याला घराची चावी दे.. तो गिऱ्हाईक पाहील आणि लवकरात लवकर डील फायनल होईल. म्हणजे आम्ही मोकळे आणि तुही.. समजलं तुला?”

ते करड्या स्वरात म्हणाले. ईश्वरीला काय बोलावं समजेना. तिने अनघाकडे पाहिलं. अनघाही अवाक होऊन त्यांचं बोलणं ऐकत होती.

“काय माणसं आहेत ही! स्वराजला जाऊन अजून महिनाही झाला नाही तर लगेच यांच्या मालमत्तेच्या गोष्टी सुरू झाल्या! किती स्वार्थी विचार! माझी लेक कसा सामना करणार या अशा स्वार्थी लोकांशी?”

अनघा आपल्याच विचारात गढून गेली. इतक्यात ईश्वरी म्हणाली,

“बाबा, वहिनी मला हे घर विकायचं नाहीये. स्वराजची ही एकमेव निशाणी माझ्याकडे आहे. त्याच्या या घरारातल्या आठवणी तरी पुसून टाकू नका. प्लिज बाबा..”

“म्हणजे? तू आम्हाला विरोध करणार? आमच्याच मुलाची प्रॉपर्टी विकायला तू थांबवणार? काय संबंध? तुला कळतंय का तू काय बोलतेयस? मान देतोय तर डोक्यावर बसायला लागलीस. आम्ही विकणार ही प्रॉपर्टी.. काय करशील? बघू कोण अडवतंय आम्हाला?”

सरदेसाई रागाने चवताळून म्हणाले.

“पण बाबा, तिची इच्छा नसेल तर आपण का तिला फोर्स करतोय? ती नको म्हणतेय तर..”

सार्थक सरदेसाईंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं बोलणं मधेच थांबवत गायत्री म्हणाली,

“तुम्ही शांत बसा.. बाबा बरोबर बोलताहेत..”

“पण वहिनी, मी घर विकू देणार नाही किंबहुना तुम्ही मला न विचारता हा फ्लॅट विकूच शकणार नाही..”

ईश्वरी शांतपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून गायत्रीच्या रागाचा पारा चढला होता. सरदेसाईंनी चिडून ईश्वरीला विचारलं.

“म्हणजे?”

“बाबा, हा फ्लॅट स्वराजच्या नावावर नसून माझ्या नावावर आहे. तो विकण्याचा अधिकार माझ्याशिवाय कोणालाच नाही. स्वराजनेच तो अधिकार मला देऊन ठेवलाय. बाबा, या घरात स्वराजच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मला त्या आठवणीसोबत जगू द्या. प्लिज बाबा, हा फ्लॅट नका विकू.. मी माझं घर कोणालाच विकू देणार नाही..”

ईश्वरीच्या या ठाम निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सरदेसाईंचा पारा खूप चढला होता.

“पाहिलंत ना बाबा.. कधीही तोंडातून ब्र शब्द न काढणारी माझ्या सासूबाईंची लाडकी सुन बघा कशी तोंड वर करून बोलतेय.. तिचा निर्णय सांगतेय.. बरोबर तिने हे घर भावोजीना गंडवून स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि आता तिला पैश्याची हाव सुटलीय.. म्हणून आता तिला हे घर सोडायचं नाहीये.. दुसरं काय! पटलं ना तुम्हाला बाबा ही दिसते तितकी साधी गरीब मुळीच नाही..आतल्या गाठीची बाई आहे ही.. अप्पलपोटी!”

“वहिनी, तुम्ही काहीही म्हणा, पण मी माझं घर विकणार नाही. स्वराजची आठवण आहे ती.. मला दुसरं काहीही नकोय.. तुमची संपत्ती, जमीन जुमला काहीही नकोय.. मला फक्त माझं घर हवंय..”

“बघतोच कशी घर विकत नाहीस ते.. चला.. मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाही.. गरीब समजलो होतो हिला.. पण बरीच पुढची निघाली.. पण इतक्या सहजासहजी मी माझ्या मुलाचं हे घर तुझ्या घश्यात जाऊ देणार नाही.. समजलं तुला?”

ईश्वरीच्या या निर्णयाने सरदेसाई प्रचंड चिडले होते. त्यांचा स्वर गगनाला भिडला होता. ते सर्वजण एक क्षणही न थांबता तडक घरातून बाहेर पडले. अनघाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते काहीही न ऐकता तिथून निघून गेले. ईश्वरी शांत बसून होती. डोळ्यातलं तळ रितं होऊ लागलं होतं.


पूढे काय होतं? ईश्वरीचा घर न विकण्याचा निर्णय योग्य होता? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

0

🎭 Series Post

View all