पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७३

पुन्हा बरसला श्रावण..



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७३


ईश्वरीने तिचा निर्णय अनघाला सांगितला. ती आईकडे मोठ्या आशेने पाहत म्हणाली,

“सांग नां आई, माझा निर्णय तुला योग्य वाटतोय ना? तू आहेस ना माझ्यासोबत? देशील ना मला साथ?”

अनघा थोडा वेळ शांत बसली होती. थोडा विचार करून तिने किंचित हसत ईश्वरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली,

“ईशू बाळा, मला माहित आहे, आदी आणि तुझे बाबा सहजासहजी तुझा निर्णय मान्य करणार नाहीत पण तू तुझ्या पायावर उभं राहणं, स्वावलंबी बनणं गरजेचं आहे. आम्ही दोघं जिवंत असेपर्यंत आम्ही तुला पाहू, सांभाळू पण आमच्यानंतर काय होईल तुझं? त्यापेक्षा कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः खंबीर होणं गरजेचं.. बाळा, तुझा निर्णय पटला मला.. तुला जे योग्य वाटतं ते कर. ज्याने तुला आनंद मिळणार असेल ते कर.. मी तुला अडवणार नाही. आदीला मी समजावून सांगेन आणि तो तुझ्या बाबांना.. फक्त मला एक सांग, तू एकटी राहू शकशील? तू तितकी खंबीर आहेस?”

“हो आई, मी नक्की प्रयत्न करेन.. जमेल मला.. आणि नाहीच जमलं तर येईन परत पण मला एकदा प्रयत्न तरी करू दे..”

ईश्वरीने आईला विनंती केली. अनघाला ईश्वरीचं म्हणणं पटलं तिने ईश्वरीला पुढे नोकरी करण्याची परवानगी दिली.

“थँक्यू आई..”

ईश्वरीने आईच्या पोटाला घट्ट मिठी मारली.

“चला मॅडम, स्वयंपाकाची तयारी करायला हवी ना.. की असंच गप्पा मारत बसायचं?”

ईश्वरीने आनंदाने मान डोलावली.

“चल, मी पण येते.. दोघी मिळून छान स्वयंपाक करूया..”

असं म्हणत ईश्वरी जागेवरून उठणार इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर दिनेशचं नाव झळकलं. तिने हॅलो भावोजी म्हणताच दिनेशने बोलायला सुरुवात केली.

“वहिनी, मी मघाशी मिस्टर एडवर्ड यांच्याशी बोललो. तुम्हाला त्यांना भेटायचंय हेही सांगितलं पण ते खूप घाईत आहेत. वहिनी ते आज रात्रीच्या फ्लाईटने परत यूएसला जाणार आहेत..”

“मग ओ भावोजी.. कसं करायचं? स्वराज आणि त्यांचं काही ऑफिशल बोलणं झालं असेल तर काही हरकत नाही पण का कोणास ठाऊक! मला थोडी शंका येतेय, स्वराजला मला नेमकं काय सांगायचं होतं? ते खूप महत्वाचं आहे. मला त्यांना काहीही करून भेटायचंय भावोजी..”

“बरं वहिनी, मग आपण असं केलं तर? ते एअरपोर्टला जाण्याआधी दहा मिनिटं भेटले तर? मी विचारून बघू का? तुम्हाला जमेल का? हवं तर मी आणि मंजिरी आम्ही दोघे तुमच्यासोबत येतो.”

“हो, चालेल भावोजी.. तुम्ही त्यांना विचारून घ्या.. मी येईन.. किती वाजता आणि कुठे यायचं ते सांगाल मला..”

“हो, मी तसं कळवतो तुम्हाला.. नंतर आम्ही दोघं, मी आणि मंजिरी तुम्हाला घेऊन जायला येतो..”

“हो, ठीक आहे भावोजी..”

असं म्हणून ईश्वरीने कॉल कट केला. थोड्याच वेळात पुन्हा दिनेशचा कॉल आला. त्याने मिटिंग फिक्स केली होती. दिनेश आणि मंजिरी तिला घेवून जाण्यासाठी घरातून निघाले.

“पटकन आवरून घेते.. मंजिरी आणि भावोजी येतीलच इतक्यात..”

असं म्हणत ईश्वरी तिच्या बेडरूममध्ये गेली. साधा सलवार कुर्ता अंगावर चढवला. पटकन आवरून तयार होऊन बाहेर येत तिने अनघाला आवाज दिला.

“आई, मला थोडं बाहेर जायचंय.. थोडं अर्जंट आहे.. मला उशीर झाला तर तू जेवून घे.. वाट पहात बसू नकोस..माझी अजिबात काळजी करू नकोस.. मंजिरी आणि दिनेश भावोजी सोबत आहेत..”

“ते आहेत ना तुझ्यासोबत? मग ठीक आहे.. सांभाळून जा.. आणि लवकर ये..”

किचनमधून बाहेर येत अनघा सूचना देत होती.

“बरं, मी येते हं आई..”

असं म्हणत ईश्वरीने टेबलवरची पर्स उचलली. पायात चप्पल अडकवली आणि ती खाली आली. पार्किंगमध्ये दिनेश मंजिरीसोबत गाडी घेऊन थांबला होता. मंजिरीने गाडीचं दार उघडलं. ईश्वरी आत येऊन बसली. गाडी भरधाव वेगाने गेस्टहाऊसच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात गेस्टहाऊसच्या समोर येऊन थांबली.

“वहिनी, मी येऊ का तुमच्यासोबत? किंवा मंजिरीला सोबत घेऊन जाता?”

“नको भावोजी, मीच जाऊन येते.. काही वाटलं तर मी कॉल करते तुम्हाला..”

“अगं नंदिनी, एकटी नको जाऊ.. काही प्रॉब्लेम झाला तर?“

मंजिरी तिच्या काळजीपोटी म्हणाली.

“काही प्रॉब्लेम होणार नाही. मिस्टर एडवर्ड एक सभ्य गृहस्थ आहेत आणि आता त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस पण असतील. मी आलेच..”

असं म्हणून ईश्वरी गाडीतून खाली उतरली आणि ती गेस्टहाऊसच्या दिशेने चालू लागली. तिने दारावरची बेल वाजवली. दरवाजा उघडला. तिला समोर नंदिनी उभी असलेली दिसली.

“ये.. आत ये..”

नंदिनीने ईश्वरीला आत घेतलं.

“ये.. बस.. स्वराजविषयी ऐकून…”

“मिस्टर एडवर्ड? मला त्यांच्याशी काही महत्वाचं बोलायचंय..”

नंदिनीचं बोलणं मध्येच तोडत ईश्वरी म्हणाली.

“आधी बस तर.. काय घेणार चहा की कॉफी?”

“नको काही.. एडवर्ड यांना बोलव प्लिज..”

ईश्वरी सोफ्यावर बसत म्हणाली.

“काय महत्वाचं बोलायचंय तुला?”

“ते तुला सांगणं मी गरजेचं समजत नाही.. कुठे आहेत मिस्टर एडवर्ड?”

ईश्वरीने तिला प्रश्न केला.

“ते आराम करताहेत.. संध्याकाळ पासून त्यांची तब्येत थोडी खराब झाली म्हणून मग मी त्यांना मेडिसिन दिलंय. ते आत बेडरूममध्ये झोपलेत. रात्रीच्या फ्लाईटने आम्हाला यूएसला परत जायचंय..“

नंदिनीच्या बोलण्याने ईश्वरी हिसमूसली.

“पण त्यांनी मला वेळ दिली होती.”

“हो बरोबर आहे पण आता त्यांना झोपेतून उठवू शकत नाही. तू मला सांगू शकतेस तुझं त्यांच्याकडे काय काम आहे ते..”

“नाही.. ठीक आहे. मी त्यांची वाट पाहते.. बाहेर थांबते.. ते बाहेर आले की बोलव मला..”

ईश्वरी बाहेर जाण्यासाठी उठून उभी राहिली.

“तुला काय जाणून घ्यायचंय राजनंदिनी? स्वराजविषयीच ना? मी सांगू शकते..”

नंदिनी शांतपणे म्हणाली. ईश्वरीने तिच्याकडे पाहिलं.

“काय सांगणार आहेस तू? स्वराज आणि एडवर्ड यांच्यामधलं बोलणं तुला माहित असणार आहे का? ते मिस्टर एडवर्डच सांगू शकतील.”

“त्या दिवशी तो मला भेटायला आला होता.. त्याची माझी ती शेवटची भेट..”

नंदिनीच्या वाक्यासरशी ईश्वरी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली.

“काय बोलतेयस तू? स्वराजच्या मोबाईलमध्ये शेवटचा मेसेज एडवर्ड यांचा होता. स्वराजने त्यांना कॉल केला होता पण..”

ईश्वरीचं बोलणं मध्येच थांबवत नंदिनी म्हणाली,

“त्यादिवशी तो मलाच भेटायला आला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम सांगायला आला होता. तो मेसेज, तो कॉल निव्वळ एक बहाणा होता.. कळलं तुला? त्याचं फक्त माझ्यावरच प्रेम होतं.. त्या दिवशी आम्ही.. त्या रात्री.. खूप गप्पा मारल्या.. खूप जवळ..”

“व्हॉट नॉनसेन्स.. हे असं बोलताना तुला काहीच वाटत नाही का गं? एक विवाहित स्त्री असून तू इतकी खालची पातळी कशी काय गाठू शकतेस? निदान स्वतःच्या नवऱ्याचा, ऍडवर्डचा तरी विचार करायचा होतास..”

नंदिनी छद्मी हसली.

“त्यात काय विचार करायचा? आमचं प्रेम होतं.. मनाने तर आम्ही एक होतोच शरीराने एकत्र आलो तर कुठे बिघडलं? ऍडवर्ड आणि तुला अंधारात ठेवण्यासाठीच तो मेसेज, कॉलचा बनाव केला होता. सी राजनंदिनी, माझं ऍडवर्डशी आणि स्वराजचं तुझ्याशी झालेलं लग्न ही केवळ एक ऍडजस्टमेन्ट होती. त्याचा आमच्या प्रेमावर कसलाच बदल झालेला नव्हता. आमचं प्रेम कधीच बदललं नव्हतं..”

“व्वा रे व्वा.. प्रेम होतं म्हणे.. काय केलंस त्या प्रेमासाठी? ते मिळवण्यासाठी? अगं त्याच्या अंतिम दर्शनाला तू इथे पुण्यात असतानाही येऊ शकली नाहीस. तू काय सांगणार त्याच्याविषयी? काय ते तुझं प्रेम? स्वराजचं तुझ्यावर प्रेम होतं. त्याने ते माझ्यासमोर निदान मान्य तरी केलं होतं पण तू काय केलंस? तुझं प्रेम तू कोणाला सांगू शकली नाहीस कधीच.. अगं तू तर त्याला भेटायला सुद्धा आली नाही.. शेवटच्या दर्शनालाही यावंसं वाटलं नाही.. तू काय प्रेमाच्या गोष्टी करतेस?”

ईश्वरी रागाने थरथरत होती.

“शटअप.. तू नको सांगुस मला प्रेमाबद्दल.. त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं हेच सत्य आहे समजलं तुला? मला त्याला भेटायला यायचं होतं. तुला काय वाटलं त्याच्या आईबाबांनी मला त्याला भेटू दिलं असतं? चारचौघात अपमान केला असता.. त्याची आई, त्याची वहिनी यांचा आधीच माझ्यावर रोष होता मग तर सगळ्यांनी मिळून मलाच हाकलून दिलं असतं आणि ते मला नको होतं..”

नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं.

“याचा अर्थ तो मेसेज, तो कॉल याच्याशी ऍडवर्ड यांचा काही संबंध नाही. हा सगळा तुमचा प्लॅन होता तर.. मग आता त्यांना विचारण्यात काही अर्थच नाही.. निघते मी..”

ईश्वरी तडक घराबाहेर पडली. तिच्या मनातला भ्रमाचा भोपळा फुटला होता. ती गेस्टहाऊसच्या बाहेर गार्डनमध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या बाकावर जाऊन बसली. डोळ्यातला अंगार बरसत होता.

“म्हणजे स्वराज शेवटचं नंदिनीला भेटला होता. हीच गोष्ट त्याला मला सांगायची होती? म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं? सारा बनाव होता? नाटक होतं? मग त्याचे ते शब्द फसवे होते? देवा! काय रे हे? त्याचं माझ्यावर प्रेम आहे हा माझा भ्रम होता. मग राहू द्यायचं ना देवा मला त्या भ्रमात? खूष होते मी.. स्वराजचं माझ्यावर प्रेम आहे ही भावनाच मला सुखावत होती पण हे जीवघेणं सत्य आता आयुष्यभर छळत राहील. ही सल मनात घेऊन मी कसं जगू?”

पुढे काय होईल? ईश्वरी कोणता निर्णय घेईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all