पुन्हा बरसला श्रावण.. भाग ६९

पुन्हा बरसला श्रावण..



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ६९


ईश्वरीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलं होतं. आदित्य सर्वांना घेऊन आपल्या घरी परतला. शेजारचे माणसं गोळा होऊ लागली. सर्वजण ईश्वरीचं सांत्वन करत होते. तिच्या मित्रमैत्रिणींना ती घरी आल्याची बातमी समजली तसे अर्चना, आस्था, श्लोक, राज आणि तिच्या बाकीच्या मैत्रिणी तिला भेटायला आले. ईश्वरीला इतक्या लहान वयात आलेलं वैधव्य पाहून जो तो हळहळत होता. समोर अर्चनाला पाहताच ईश्वरीला अश्रू अनावर झाले. ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. आपल्या जिवलग मैत्रिणीला याअवस्थेत पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते.

“ईशु, सांभाळ स्वतःला.. डोळे पूस बरं.. असं सारखं रडायचं नाही.. आम्ही सगळे आहोत ना..”

बोलता बोलता अर्चनाच्या गळ्यात उमाळा दाटून आला. श्लोक तिला धीर देत म्हणाला,

“ईशु, एक सांगू तुला? आपल्या आयुष्यात वाईट घटना घडतात. आपल्यावर संकटं येतात कारण त्या संकटांशी लढताना आपण कसे वागतो, कसा सामना करतो याचीच परीक्षा होत असते. देव आपली परीक्षा घेत असतो. कदाचित या वाईट घटनेनंतर पुढे जाऊन अजून काहीतरी चांगलं घडणार असेल.. देवाचीच योजना असेल ती..”

“यानंतर काय चांगलं घडणार आहे श्लोक? आणि यापुढे घडणाऱ्या कोणत्याही चांगल्या घटनेत स्वराज असणार आहे का? त्याच्याशिवाय मी कसा आनंद साजरा करू? कसं जगू रे?”

ईश्वरी रडू लागली आस्थाने श्लोककडे पाहिलं. श्लोकच्याही डोळ्यात पाणी उभं राहिलं. तो निरुत्तर झाला. त्याला काय बोलावं समजेना.आस्थाने त्याचा हात हलकेच थोपटला आणि म्हणाली,

“पण ईशु, आता तुला स्वतःला सावरायला हवं.. या दुःखातून बाहेर पडायला हवं. असं किती दिवस चालणार आहे गं? पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू?”

“माहित नाही गं.. काही समजत नाहीये.. डोळ्यापुढे सगळा अंधःकार आहे बघ.. काही सुचत नाहीये मला.. बघू.. घरचे ठरवतील काय ते..”

पुन्हा तिचे डोळे भरू लागले.

“बरं ठीक आहे.. तू जास्त त्रास करून घेऊ नकोस.. शांत रहा. नंतर ठरवता येईल काय करायचं ते?”

श्लोक डोळ्यातलं पाणी आवरत म्हणाला. थोडा वेळ थांबून सर्वांनी ईश्वरीचं सांत्वन करून तिचा निरोप घेतला. अनघाने ईश्वरीला आवाज दिला.

“ईशु, उठ बाळा.. फ्रेश होऊन ये.. मीं तुझ्यासाठी कॉफी बनवते.. थोडी कॉफी घेतली की बरं वाटेल..”

तिचं बोलणं ऐकून ईश्वरी बाथरूममध्ये गेली. शॉवरच्या पाण्याखाली उभी राहिली. त्या पाण्यासोबत डोळ्यातल्या पाण्याचा निचरा होत होता. जिवाच्या आकांताने ओरडावं क्षणभर तिच्या मनात येऊन गेलं. मिटलेल्या डोळ्यासमोर स्वराजचा चेहरा फेर धरू लागला. ती बराच वेळ शॉवरखाली उभी होती.

“ईशु, आवरलं का बाळा?”

अनघाने पुन्हा एकदा ईश्वरीला आवाज दिला तशी ती भानावर आली. शॉवर बंद करत तिने आतूनच ”आले आई..” म्हणून आईला उत्तर दिलं. कपडे बदलून ती टॉवेलने केस पुसत बाहेर येत होती इतक्यात आदित्यचा बेडरूम ओलांडून पुढे येत असताना तिच्या कानावर अर्पिताचे शब्द पडले. आदित्य आणि अर्पिता त्यांच्या बेडरूममध्ये बोलत होते.

“आता ईशु इथेच राहणार का?”

अर्पिताने प्रश्न केला.

“हो.. काय करणार? नाईलाज आहे..”

आदित्य उत्तरला. त्याच्या वाक्यावर नाराज होत अर्पिता म्हणाली,

“अरे पण तुला कोणी सांगितलं होतं त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये पडायला? ईशुने बघितलं असतं ना काय ते! तुझे बाबा एका शब्दाने तरी बोलले का? मग तुला काय गरज होती त्यांच्यामधे बोलायची?”

“अगं पण सगळे तिलाच दोष देत होते. माई फक्त बोलली. बाकी कोणीच काही बोलत नव्हतं. ते आपण त्यांना फसवलं असं म्हणाले मग कसा शांत राहू?”

आदित्य चिडून म्हणाला.

“मग आता भोगा आपल्या कर्माची फळं! सांभाळा तिला आयुष्यभर.. आधीच तीन माणसं घरात बसून होती आता अजून त्यात एकाची भर.. मी आहेच सर्वांची उष्टी खरखटी काढायला..”

अर्पिता चिडून बोलत होती.

“अगं पण ऐकून तर घे..”

आदित्यचं बोलणं मध्येच तोडत अर्पिता म्हणाली,

“मला काही माहित नाही. आधीच किती गर्दी आहे घरात आणि आता हिची भर.. आपल्याला प्रायव्हसी तर मिळतेय का आदित्य? हेच आपले मौजमज्जा करण्याचे दिवस आहेत. पुन्हा आहेच की सगळं घरदार, प्रपंच जबाबदाऱ्या.. की आता लगेचच आपण जबाबदारीच्या ओझ्याखाली चिरडून जायचं? यांच्यासाठी आपण खस्ता खायच्या? आपलं म्हणून असं काही आयुष्य आहे काही नाही आदित्य? उद्या आपल्यालाही मुलंबाळं होतील. त्यांचं संगोपन, शिक्षण कसं करणार आहोत आपण? आपल्या भविष्याचा विचार करणार नाहिसच का तू?”

अर्पिता संतापून म्हणाली.

“अगं तिचा नवरा गेलाय.. तिच्यावर किती मोठं संकट कोसळलंय.. थोडा तरी विचार कर.. थोडे दिवस जाऊ दे.. मग ठरवू काय करायचं ते..”

आदित्य तिला समजावणीच्या सुरात म्हणाला,

“हे बघ आदित्य, जे घडलं ते तिचं नशीब.. आपण काय करू शकणार आहोत? नशिबात जे घडणार असेल ते होणारच.. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ईश्वरीचं मोठ्या थाटामाटाने लग्न करून दिलं. आपलं कर्तव्य आपण पार पाडलंय. एकदा का मुलीचं लग्न करून दिलं तर माहेरच्यांची जबाबदारी संपते आदित्य.. तिथून पुढे ती ज्या घरी जाईल त्यांची म्हणजेच तिच्या नवऱ्याची, सासरच्यांची जबाबदारी होते. म्हणूनच तुला सांगतेय
ईशुचं पुढे काय करायचं हे तिच्या सासरच्यांनी ठरवायचं.. आपण नाही. तिच्या आयुष्याची मदार आता तिच्या सासरच्या लोकांच्या हाती आहे. ते काही नाही आदित्य, बाबांशी बोलून तिचा काय तो बंदोबस्त करून टाक.. तिची लवकरात लवकर दुसरीकडे सोय कर.. इथली गर्दी कमी कर.. नाहीतर मी हे घर सोडून निघून जाईन..समजलं तुला?”

दोघांचं बोलणं ईश्वरीच्या कानावर पडत होतं. कोणीतरी शिसे वितळवून त्याचा गरम रस तिच्या कानात ओततंय असं तिला वाटलं. ते जहाल शब्द ऐकून तिचे कान गरम झाले. कोणीतरी लोखंडी सळई कडकडीत गरम करून काळजावर डाग देताहेत असं तिला वाटलं. ईश्वरी तिच्या खोलीत आली. खोलीचं दार बंद करून घेतलं. मोठ्यानं आक्रोश करावा असं तिला वाटलं.

“आज मला इथे माहेरच्या घरी येऊन एक दिवसही झाला नाही आणि वहिनी असं बोलतेय? इतक्यातच कंटाळून गेली? माझी दुसरीकडे सोय करायला सांगतेय? इतक्या लवकर मी या घरासाठी परकी झाले? मग कशावरून हे मला संपूर्ण आयुष्यभर सांभाळतील? स्वराजच्या जाण्याने सासर तुटलं आणि आता माहेरचेही असं वागताहेत?”

ईश्वरीच्या डोळ्यात राग संताप साठू लागला. ती विचार करू लागली. इतक्यात अनघा कॉफी घेऊन खोलीत आली. कॉफीचा मग तिच्या हातात देत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि ती रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला निघून गेली. सर्वजण रात्री जेवणाच्या टेबलवर एकत्र बसले होते. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अर्पिताने आदित्यला विनायकशी बोल म्हणून खुणावलं. आदित्यने बोलायला सुरुवात केली.

“बाबा, आता ईशुचं पुढे काय करायचं? आपल्याला तिच्या भविष्याचा विचार करावा लागेल ना? आयुष्यभर तर अशी बसून राहू शकत नाही?”

“अरे पण इतक्यात कशाला हा विषय? आजच तर ती आलीय.. थोडे दिवस जाऊ दे.. वेळ हे सगळ्या दुःखावरचं औषध आहे.. तिचं दुःख थोडं ओसरलं की पाहू काय करायचं ते?”

माई आदित्य आणि विनायककडे पाहत म्हणाली. आदित्यने होकारार्थी मान डोलावली.

“अहो माई, विचार तर करावाच लागेल ना? तिच्यासमोर उभं आयुष्य आहे.. तिला काहीतरी ठरवावं तर लागेलच.. मला काय वाटतं, आपण तिच्या सासरच्या लोकांशी एकदा बोलून पाहिलं असतं तर?”

अर्पिता माईकडे पाहत म्हणाली.

“काही गरज नाही त्यांच्यापुढे नाक घासायची..”

विनायक चिडून म्हणाला.

“अहो बाबा पण..”

अर्पिता तसंच जबरदस्तीने तिचं घोडं दामटवत म्हणाली.

“अर्पिता या विषयावर आपण नंतर बोलू.. आता नको.. समजलं तुला?”

माई तिला करड्या आवाजात म्हणाल्या. तशी ती शांत झाली. सर्वांची जेवणं झाली. ईश्वरी तिच्या खोलीत आली. जेवणाच्या टेबलवरचं सगळ्यांचं बोलणं आठवून तिला रडू फुटलं.. डोळ्याचं बरसणं सुरू झालं. स्वराजची तिला खूप आठवण येत होती.

“ईशु, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू ईशु..”

स्वराजचं फोनवरचं शेवटचं वाक्य तिला पुन्हा पुन्हा आठवू लागलं. त्याच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण तिला आठवून डोळे भरू लागले. आभाळ बरसू लागलं.

“काय होऊन बसलं हे? आताशिक कुठे त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. आयुष्याला सुरुवात झाली होती आणि इतक्यात सगळं संपलं? मलाही तो आवडू लागला होता. त्याचं हसणं, मस्करी करणं, माझी काळजी घेणं, माझं मत जाणून घेणं सगळं सगळं आवडत होतं मला.. त्याच्यावर मी प्रेम करू लागले होते आणि अचानक तो हात सोडून निघून गेला? मांडलेला डाव अर्ध्यावर टाकून?”

आसवांचं बरसणं सुरू झालं. एकदम तिला काहीतरी आठवलं. तिने पटकन उठून पर्स उघडली आणि आतून मोबाईल बाहेर काढला.

“स्वराजचा मोबाईल..”

ती पुटपुटली.

“नंदिनी, हा मोबाईल ठेव तुझ्याकडे.. स्वराजची आठवण म्हणून..”

सरदेसाईंच्या घरातून बाहेर पडताना सार्थकने कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा रितीने गुपचूपपणे स्वराजचा मोबाईल ईश्वरीच्या हातात आणून दिला होता.

“गाडीचा चक्काचूर झाला पण मोबाईल सेफ राहिला. गाडीच्या पुढच्या लॉकरमध्ये ठेवला असेल म्हणून सुरक्षित राहिला असेल..”

मोबाईल स्विचऑफ झाला होता. तिने मोबाईल चार्जिंगला लावला. थोड्या वेळाने मोबाईल थोडा चार्ज झाल्यानंतर तिने मोबाईल ऑन केला. मोबाईलला पासवर्ड होता.

“काय पासवर्ड असेल? स्वराजचं नाव?”

तिने त्याचं नाव टाकून पाहिलं. रॉंग पासवर्ड असं डिस्प्ले झालं. मग तिने आई-बाबांचं, सार्थकचं सर्वांची नावं टाकून पाहिली. चुकीचा पासवर्ड सांगत होतं. मोबाईल ओपन होत नव्हता.

“आता काय करायचं? काय असेल पासवर्ड?”

ती विचार करू लागली. एकदम तिला नंदिनीची आठवण झाली. तिने तिचं नाव टाकून पाहिलं तरी चुकीचा पासवर्ड सांगत होतं.

“ISHU0906”

तिने स्वतःचं नाव टाकलं आणि काय आश्चर्य! मोबाईल ओपन झाला. मोबाईलच्या स्क्रीनवर तिला त्याचा हसरा चेहरा दिसला. तिच्याही ओठांवर अलगद हसू उमटलं. तिने मोबाईलमधली गॅलरी उघडली. स्वराजचे कितीतरी सुंदर हसरे फोटो पाहून तिला थोडं बरं वाटत होतं. ती पुढे स्क्रोल करत फोटो पाहत होती अचानक एका फोटोवर तिची नजर खिळून राहिली. स्वराजच्या कंपनीचे डायरेक्टर आणि मिस्टर अँड मिसेस एडवर्ड यांच्यासोबत स्वराजच्या कार्यक्रमाचा फोटो होता.

“अरे हा तर त्या दिवशीचे फोटो, किती छान, रुबाबदार दिसत होता स्वराज!”

त्या फोटोकडे पाहताना एकदम तिला आठवलं.

“असं कसं झालं? काय कारण असेल?”

ईश्वरी विचार करू लागली.

पुढे काय होतं? ईश्वरीला नेमकं काय आठवलं? स्वराजला जी गोष्ट सांगायची होती ती ईश्वरीला समजेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all