पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५४

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५४

स्वराज आणि ईश्वरी घरी परतले. फ्रेश होऊन ते दोघं बाहेर आले. ईश्वरी शालिनीताईंना मदत करण्यासाठी किचनमध्ये आली.

“अगं, सगळं झालंय बाळ.. काही करायचं नाहीये..”

गायत्री आणि ईश्वरीने जेवण डायनिंग टेबलजवळ आणलं. सर्वजण जेवायला बसले. ईश्वरी सर्वांचं ताट करू लागली. तिला अडवत शालिनीताई म्हणाल्या,

“नंदू, आज तुझा दिवस आहे. तू वाढणार नाहीस. तू आमच्यासोबतच जेवायला बसणार आहेस..”

“नको आई.. मी नंतर बसते. तुमचं झाल्यावर जेवेन मी..”

ईश्वरी अडखळत म्हणाली. आईने सांगितल्याप्रमाणे ती घरातल्या मोठ्या वडिलधाऱ्या माणसांची जेवणं उरकल्यावर जेवायला बसायची. शालिनीताईंनी कितीतरी वेळा तिला सांगून झालं होतं पण ईश्वरी ऐकायची नाही. अनघाच्या संस्कारात वाढलेली ईश्वरी आईने सांगितल्याप्रमाणेच वागत होती. मग घरातली धाकटी सुन सर्वांबरोबर कशी जेवायला बसेल? पण सरदेसाईंच्या घरी तसा काही नियम नव्हता गायत्री सर्वांसोबतच जेवायला बसायची पण ईश्वरी मात्र सर्वांचं झालं की जेवायची.

“नाही अजिबात नाही. मी तुझं काही ऐकणार नाही. आज तू माझ्या सोबत बसायचं.”

त्यांनी ईश्वरीला आपल्या शेजारी बसवलं आणि स्वतःच्या हाताने तिला वाढू लागल्या. शालिनीताईंनी सर्व पदार्थ ईश्वरीच्या आवडीचे बनवले होते. शालिनीताईंनी स्वतःच्या हाताने तिला एक घास भरवला. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी तरळून गेलं. तिला तिच्या आईची खूप आठवण आली.

“आई, आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हा जेवणाचा घाट घातला. आईंनी स्वतःच्या हाताने मला घास भरवला. मी खूप नशीबवान आहे आई, माझ्या सासूबाईंच्या रूपाने तुझ्या इतकीच माझी काळजी घेणारी दुसरी आई मला इथे भेटली. असाच स्नेह कायम राहू दे रे देवा..”

ईश्वरीच्या डोळयातलं पाणी शालिनीताईंच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी हलकेच तिच्या डोक्यावरून मायेने गोंजारलं. सर्वजण जेवू लागले. आपल्या धाकट्या जाऊ वर सासूबाईंचं इतकं प्रेम पाहून गायत्रीचा जळफळाट होत होता. सरदेसाईंनाही शालिनीताईचं वागणं फारसं पटलेलं नव्हतं. स्वराज मात्र दोघींचं प्रेम पाहून खूप खूष होता.

“किती कमी वेळात ही आईच्या इतकी जवळची झाली! आईची लाडकी सुन झाली. बरोबर आहे.. सर्वांना आपलंसं करणं बरोबर जमतं तिला..”

दोघींना असं आनंदात पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर पसरली. सर्वांची जेवणं उरकली. सर्वजण बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. ईश्वरी स्वयंपाकघर आवरत होती. गायत्रीने सर्वांच्या हातावर बडीशेप ठेवली आणि ती सार्थकच्या शेजारी येऊन उभी राहिली. ईश्वरी किचनमधून बाहेर आली आणि तिने शालिनीताईंच्या हातात त्यांची औषधं आणि पाण्याचा ग्लास दिला. इतक्यात स्वराजने आईकडे पाहत विषय काढला.

“आई, एक गोष्ट सांगायची होती.”

सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. ईश्वरीच्या मनात धाकधूक वाढली होती.

“इतका छान जेवण झालंय.. सर्वजण आनंदात आहेत. आता स्वराजच्या बोलण्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडायला नको..“

ती मनोमन देवाच्या धावा करू लागली. तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं होतं.

“बोल ना..”

शालिनीताईं स्वराजकडे पाहून म्हणाल्या. स्वराजने बोलायला सुरुवात केली.

“आई, तुझ्यामुळे नंदिनीचं पुढचं शिक्षण सुरू झालं आणि ती त्यात यशही संपादन करतेय. खरंच, ही आनंदाची गोष्ट आहे पण आई, फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही त्यासाठी, त्या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी प्रॅक्टिकली तिने काम करायला हवं. जोपर्यंत ती प्रत्यक्ष अनुभव घेणार नाही तोपर्यंत ती परफेक्ट होणार नाही. जे ती शिकलीय त्यात तिला पारंगत व्हायचं असेल तर तिला त्या क्षेत्रात काम करावंच लागेल.. म्हणजे मला असं वाटतंय तिने अकाउंटिंग क्षेत्रात जॉब करावा..”

सर्वांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

“हे काय आता नवीनच.. प्रत्येकवेळी भावोजी तुम्ही नंदिनीविषयी आगळंवेगळं सांगत असता.. एवढे दिवस शिक्षण महत्वाचं म्हणून तिला शिकू दिलं आणि आता तिला जॉब करायचा म्हणताय..काय बाई..ऐकावं ते नवलच..”

गायत्री चिडून म्हणाली. सरदेसाईंचा पारा चढला. शालिनीताईंकडे पाहत ते म्हणाले,

“शालिनी, इतके दिवस तुझ्याकडे, तुझ्या प्रकृतीचा विचार करून तुझे सगळे हट्ट पुरवले पण आता हे अति होतंय.. हे कसले भिकेचे डोहाळे.. सरदेसाईंना भीक नाही लागली की घरच्या सुनांना नोकरी करण्याची वेळ यावी.. नंदिनी जॉब करणार नाही. तिने शिक्षण पूर्ण करावं आणि घर सांभाळावं. एवढं केलं तरी पुरेसं आहे..”

सरदेसाईंचा रागाचा पारा शिगेला पोहचला होता. वडिलांनी एका छोट्या गोष्टीचं विनाकारण इतकं रामायण, महाभारत केलं याचा त्यालाही खूप राग आला होता. तरीही तो शांतपणे म्हणाला,

“बाबा नंदिनीला ही नोकरी गरज म्हणून करायची नाही तर तिला त्या क्षेत्रात पारंगत व्हायचं आहे म्हणून ती नोकरी करायचं म्हणतेय. तुम्ही छोट्याश्या गोष्टीचा बाऊ करताय. आपल्याला काही कमी आहे म्हणून ती जॉब नाही करणार तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका आणि काहीही बोलू नका प्लिज..”

“व्वा.. म्हणजे आता तुम्ही आम्हाला शिकवणार काय बोलायचं आणि काय नाही? शाब्बास सुनबाई, चांगलं केलंत बापलेकात फूट पाडलीत..”

त्यांनी रागाने ईश्वरीकडे पाहिलं आणि तिने अगतिकपणे, मोठ्या आशेने आपल्या सासूबाईंकडे दृष्टिक्षेप टाकला.

“तुम्ही थोडं शांत होता का? थोडं माझं ऐकता का?”

शालिनीताई त्यांना समजावत म्हणाल्या.

“काय ऐकायचं बाकी राहिलंय आता.. तुमचा मुलगा आपल्या जन्मदात्याला कसं बोलायचं हे शिकवू लागलाय म्हटल्यावर काय?”

सरदेसाई चिडून म्हणाले.

“म्हणूनच म्हणतेय थोडं शांत व्हा.. थंड डोक्याने विचार करा. आपली मुलं आता लहान नाही राहिली. मोठी झालीत ती. मला सांगा, आपल्या लग्नानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या बाबतीतले सर्व निर्णय तुमचे तुम्हाला घेऊ दिले की नाही? तुमच्या निर्णयात त्यांनी कधीच आडकाठी आणली का? नाही नं? आपलं लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकत आले. तुम्ही जसं ठेवाल तसं राहिले नां? मग आता आपल्या मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या ना.. तुम्ही कशाला मध्ये आडकाठी आणताय?अहो, एकदा का आपली चप्पल मुलांच्या  पायात येऊ लागली की समजायचं मुलं आपल्या बरोबरीला आली. त्यांच्या निर्णयात आपण भाग नाही घ्यायचा.. त्यांचं त्यांना ठरवू द्या. आपण त्यांना बाहेरून सपोर्ट करूया. नंदिनीला शिकवण्याचा, आणि जॉब करू द्यायचा का नाही? हा सर्वस्वी त्या दोघांचा प्रश्न आहे. तुम्ही मध्ये नका पडू.. आणि वयात आलेल्या मुलाला असं रागावून बोलणं बरं दिसतं का? आपणच त्यांचा मान ठेवला नाही तर ते का ठेवतील.. आपला आब आपणच राखायला हवा..”

शालिनीताईंनी त्यांना समजावून सांगितलं तेंव्हा कुठे स्वराजचे बाबा शांत थोडेफार शांत झाले आणि खाली सोफ्यावर बसले. शालिनीताईंनी त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत त्या गालातल्या गालात हसल्या.

“अहो पण सासूबाई.. बाबा कुठे चुकीचं बोलताहेत? तुम्ही उगीच नंदिनीला पाठीशी घालत आहात.. तुमची लाडकी सुन आहे ना ती.. तिच्यासाठी तुम्ही काहीही कराल पण मोठ्या सुनेचं जरा चुकलं की तुम्ही घर डोक्यावर घ्याल.. बरोबर आहे म्हणा, नावडतीचं मीठ आळणीच असणार ना..”

गायत्री खोचकपणे म्हणाली.

“शांत रहा गायत्री.. तू उगीच आगीत तेल ओतू नकोस.. मी कोणालाही पाठीशी घालत नाही. कोणीही माझ्या जास्त जवळची किंवा नावडती वगैरे नाही समजलं तुला?”

शालिनीताई गायत्रीला दरडावत म्हणाल्या तशी ती वरमली. त्यांनी स्वराज आणि सार्थककडे पाहिलं.

आणि सार्थक, स्वराज तुम्ही दोघांनीही एक गोष्ट लक्षात ठेवा.. तुम्ही आता मोठे झाले आहात. तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेवू शकता. उगीच आम्हाला आमच्या सुनांसमोर वाईट ठरवता. यापुढे तुमचं तुम्ही ठरवा, परिणामांची जबाबदारी घ्या. काही चुकलं तरी घाबरू नका. चुकांतूनच माणूस शिकत जातो, घडत जातो आणि तरीही काही वाईट घडलंच तर आम्ही आहोतच. आता हा तुमचा संसार तुमच्या मर्जीने चालायला हवा. काही अडलं तर आम्ही दोघं आहोत नां? आता तुम्ही तुमच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी घ्या आणि आम्हाला या जबाबदारीतून निवृत्ती द्या..”

शालिनीताई मुलांना समजावून सांगत होत्या. त्यांचं असं निर्वाणीचं बोलणं ऐकून स्वराजला भरून आलं.
त्याने पटकन पुढे येऊन आईला मिठी मारली.

“आई, असं निर्वाणीचं बोलू नकोस गं.. तू मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंबहुना माझ्यानंतरही माझ्या अवतीभोवती हवी आहेस. तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस..”

त्याने आईला घट्ट मिठी मारली. ईश्वरीही आपल्या आधुनिक विचारांच्या ग्रेट सासूबाईंकडे कौतुकाने पाहत होती. मोट्या हुशारीने शालिनीताईंनी स्वराजच्या बाबांकडून परवानगी मिळवली होती आणि सरदेसाई यांचा रागही आता निवळला होता. त्यांच्याकडून तिला अर्धवेळ नोकरी करण्याची परवानगी मिळवली होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all