“कॉल रिसिव्ह करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? कधीची कॉल करतेय मी.. किती मिसकॉल्स पडलेत बघ जरा..”
नंदिनी त्याच्यावर बसरली.
“अगं, सगळे बाहेर बोलत बसले होते आणि विषयही गंभीर होता. मोबाईल माझ्या खोलीत चार्जिंगला लावला होता. माझ्या लक्षात नाही आलं. पण तू इतके कॉल्स का करत होतीस?”
समजावणीच्या सुरात स्वराज म्हणाला. त्याच्या प्रश्नाने ती अजूनच उखडली.
“का करत होते म्हणजे? महत्वाचं काम असू शकतं ना? की टाईमपास म्हणून मी कॉल करतेय? राज, तू माझा कॉल घेत नाहीयेस. मला इग्नोर करतोयस. काय समजायचं मी? बायकोच्या नादात आता मलाही तू विसरणार का? राज तू खूप बदलला आहेस. पूर्वीसारखा नाही राहिलास..”
ती बहुधा रडत असावी त्याला फोनवर तिचं मुसमुसणं ऐकू येत होतं. स्वराज तिला पुन्हा समजावत म्हणाला.
“अगं तसं नाही काही.. मी तुला का इग्नोर करू.. विषय महत्वाचा होता. ईश्वरीच्या कॉलेजला पाठवण्यावरून घरात थोडं वादळ उठलं होतं. आता सगळे गेलेत झोपायला. आईने तिला कॉलेजला जाण्यासाठी परवानगी दिलीय. उद्यापासून ती कॉलेजला जाईल.. त्या गोंधळात मी कॉल नाही घेऊ शकलो. समजून घे नां जरा..”
“अच्छा, म्हणजे तिच्यासाठी तू माझे कॉल्स घेत नव्हतास तर.. आता ती तुला माझ्यापेक्षा जास्त महत्वाची झाली तर..”
“असं कधी म्हणालो मी? तू आधीही माझ्यासाठी महत्वाची होती कायम राहशील. तूच माझी पहिली प्रायोरिटी असणार आहेस. हे लक्षात ठेव.”
तो तिला निक्षुन म्हणाला.
“हो का? मग ठीक आहे. आताच्या आता तू मला माझ्या इथे हवा आहेस. मला तुला भेटायचं आहे.”
नंदिनी त्याला म्हणाली.
“आता, इतक्या रात्री? नंदू कळतंय का तुला तू काय बोलतेयस? नाही येऊ शकणार मी.. आता शक्यच नाही. उद्या सकाळी येतो लवकर.., आता तू झोप.. बरीच रात्र झालीय.. उद्या सकाळी बोलू..”
असं म्हणत तो कॉल कट करणार इतक्यात नंदिनी जोरात ओरडून म्हणाली,
“नाही राज, तू आज आता इथे मला हवा आहेस.. लगेच निघून ये.. नाहीतर मी येते तुझ्या घरी.. बोल काय करतोस? तू येतोस का मी येऊ?”
नंदिनीने जणू त्याला धमकीच दिली.
“येतो मी..”
असं म्हणून त्याने कॉल कट केला. त्याने ईश्वरीकडे पाहिलं. ती झोपण्याची तयारी करत होती. स्वराजच्या बोलण्यावरून त्याला आता बाहेर जावं लागणार हे तिने ओळखलं होतं. स्वराजला अपराध्यासारखं वाटत होतं पण त्याचा नाईलाज झाला.
“ईशू.. मी जरा..”
तो बोलताना अडखळला.
“हो तुम्हाला जायचंय ना? सावकाश जा. गाडी सावकाश चालवा.. उद्या सकाळी माझ्यासोबत नाही आलात तरी काही हरकत नाही. मी रिक्षाने जाईन.. काळजी करू नका. तुम्ही नंदिनीची काळजी घ्या. तिची अवस्था मी समजू शकते. तिला माझ्यामुळे असुरक्षित वाटणं साहजिकच आहे. आपल्या प्रेमाला दुसऱ्या कोणासोबत शेअर करणं इतकं सोप्पं नसतं..”
ईश्वरी टेबलवरचं पुस्तक घेत म्हणाली. स्वराज काहीही न बोलता मान खाली घालून खोलीच्या बाहेर पडला.
“आपल्या प्रेमाला दुसऱ्यासोबत शेअर करणं सोप्पं नसतं..”
ईश्वरीला तिनेच बोललेलं वाक्य पुन्हा पुन्हा आठवू लागलं.
“किती खरं बोलून गेलो आपण.. अनाहुतपणे का असेना पण आपलीच व्यथा तर सांगत नव्हतो? खरंय नां.. ज्याच्याशी आपलं लग्न झालंय. ज्याला आपण आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं. नाही म्हटलं तरी आपल्यालाही तो आवडला होताच नं.. मग तो, त्याचं प्रेम फक्त माझ्यासाठी असायला हवं होतं. त्याला असं शेअर करणं माझ्यासाठीही सोप्पं नाहीये..”
मनात विचारांचं वावटळ थैमान घालू लागलं. नाही म्हटलं तरी तिच्या मनाला त्रास होत होताच. बरीच रात्र उलटून गेल्यावर विचार करता करता तिचा डोळा लागला.
इकडे स्वराज भरधाव वेगाने गाडी चालवत होता. नंदिनीचा त्याला प्रचंड राग आला होता. तो नंदिनीच्या घरी पोहचला. तिची मैत्रीण सायलीने दार उघडलं. तो रागातच आत आला. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याचा तो रौद्र अवतार पाहून सायली घाबरून आतल्या खोलीत गेली. नंदिनी हातांच्या बोटांच्या नखांना नेलपॉलिश लावत बसली होती.
“काय हे नंदिनी? काय हा ड्रामा? का तू इतक्या तातडीने बोलवून घेतलंस. मी तुला नीट सांगतोय असं प्रत्येकवेळी इमोशनल ब्लॅकमेल करणं बंद कर.. तुझ्या या नाटकांमुळे मला किती त्रास होतोय माहितीय का तुला?”
स्वराज तिच्यावर जोरात कडाडला.
“चिल राज, शांत हो.. मला आज तू माझ्याजवळ हवा होतास म्हणून मी तुला कॉल करत होते. बस्स इतकंच..”
हातांच्या बोटांच्या नखांवर फुंकर मारत ती म्हणाली.
“मग तुला म्हटलं होतं ना.. उद्या भेटून बोलू.. काय घाई होती? कश्यासाठी इतका हट्ट नंदू? तुझ्या वाट्याचं सुख ती अजिबात घेत नाहीये उलट तिनेच मला तुझ्याकडे जायला सांगितलं. मग का नंदू अशी वागतेस? का इतकी सैरभैर होतेय? का नंदू का?”
तो वैतागून बोलत होता.
“कारण तू माझा आहेस राज..फक्त माझा.. तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे. दुसऱ्या कोणाचा नाही समजलं तुला?”
नंदिनीने त्याच्या शर्टाची कॉलर पकडून तिच्याजवळ ओढलं आणि त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले. स्वराज प्रचंड चिडला होता. त्याने नंदिनीला रागाने दूर लोटलं.
“नंदू, फक्त अधिकार गाजवणं म्हणजे प्रेम नव्हे.. थोडा समजूतदारपणाही दाखवावा लागतो जो तुझ्यात अजिबात नाहीये.. काय गरज असते गं प्रत्येकवेळी असं इमोशनली ब्लॅकमेल करायची? मी कितीवेळा तुला सांगतोय मी फक्त तुझा आहे. ईश्वरी फक्त लग्नाची बायको आहे आणि लवकरच मी तिला या नात्यातून मुक्त करणार आहे. थोडा संयम दाखव. जे काही थोडे फार दिवस असतील ते तिला तिच्या इच्छेप्रमाणे आनंदाने जगू दे.. मी कुठे पळून चाललेलो नाहीये. नंदू, ईश्वरी आपल्या घरी असे पर्यंत तरी आनंदात, सुखात राहायला हवी. नंतर घटस्फोट झाल्यावर आपण दोघे एकत्र असू पण तिच्या वाट्याला काय असेल याची कल्पना केली आहेस तू? नंदू, नाती जपायला शिक.. इतकंही ताणू नकोस की नातंच तुटेल.”
स्वराज चिडून म्हणाला. त्याचा तो राग पाहून नंदिनी रडू लागली.
“आय ऍम सॉरी राज.. माझं चुकलं पण तू असा चिडू नकोस. मी पुन्हा असं नाही वागणार. तुला माहित आहे ना मी तुझ्यासाठी किती पजेसिव्ह आहे ते.. कोणी तुझ्या जास्त जवळ असलेलं मला मुळीच आवडत नाही राज.. मी काय करू तूच सांग.. मुळात तुझं लग्नच मला मान्य नाही. का स्विकारू मी? तुझ्या घरच्यांना मी पसंत नव्हते यात माझा काय दोष? तू माझ्यावर प्रेम केलंस. मी जशी आहे तसं स्विकारलं होतंस मग तेंव्हा का नाही तू घरच्यांचा विचार करून नकार दिलास? तेंव्हाच नाही म्हणाला असतास तर आपण इतके पुढे गेलो नसतो ना.. आणि आता घरच्यांचं कारण सांगून तू तिच्या सोबत लग्नाला तयार झालास.. मला इग्नोर करतोयस. आता तुला तुझे घरचे आठवले का? राज, तू मला फसवू शकत नाहीस. तू माझा आहेस आणि कायम माझाच असायला हवा. त्यामुळे तुला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते.. बिकॉज आय कान्ट लिव्ह विदाउट यू.. आय लव्ह यू राज..”
नंदिनी पोटतिडकीने बोलत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून स्वराजला वाईट वाटलं.
“नंदू, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, अजूनही करतोय कायम राहील पण मला सांग.. प्रेम असं ठरवून करता येतं? आईवडिलांना विचारून प्रेमात पडतो का आपण? ते आपसूक होतं. मी घरच्यांचं कारण सांगून तुला फसवत नाहीये. कधीच फसवणार नाही. पण तुला माहित आहे ना, आई माझा वीक पॉईंट आहे. तुझ्याइतकं माझं तिच्यावरही खूप प्रेम आहे गं.. ती आजारी असताना मला तिला कोणताच मानसिक त्रास द्यायचा नाहीये. प्लिज समजून घे.. तुझ्या लक्षात येतंय का? ईश्वरीचा काही दोष नसताना ती यात भरडली जातेय. घटस्फोटासाठी ती तयार झालीय. कायद्यानुसार या घटस्फोटासाठी निदान पाच सहा महिने तरी जावे लागतील. तोपर्यंत तरी प्लिज समजून घे..”
तो समजावणीच्या सुरात म्हणाला.
“ठीक आहे.. मी शांत राहीन. यानंतर निदान पुढचे पाच सहा महिने तरी मी तुला त्रास देणार नाही पण तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझ्याजवळ रहा.. मला सारखं टेन्शन राहतं तू तुझ्या बायकोबरोबर मस्त असशील. मला विसरून जाशील. तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होईल. मी खूप इनसिक्यूर फील करते. मला तुला गमवायचं नाही राज.. प्लिज समजून घे..”
नंदिनीच्या बोलण्याने स्वराज विरघळला. त्याने तिला जवळ घेतलं. नंदिनी त्याच्या कुशीत शिरली. डोळे वाहू लागले. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत त्याने प्रेमाने तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत घेतला. तिच्या नाजूक थरथरणाऱ्या अधरांवर त्याने अलगद आपले ओठ टेकवले. त्यांच्या हळुवार स्पर्शाने ती मोहरली. श्वासांची गती वाढली आणि तिने तिची मिठी अजूनच घट्ट केली. थोडा वेळ असाच शांततेत गेला. नंदिनी बऱ्यापैकी शांत झाली होती. त्याने तिला अलगद उचलून घेतलं आणि तिच्या खोलीत बेडवर आणून झोपवलं. अंगावर चादर पांघरली आणि तिच्या उशाशी बसून तिच्या माथ्यावरून, केसांवरून हात फिरवत राहिला. त्याच्या आश्वासक स्पर्शाने तिच्या मनाला उभारी मिळाली होती. राज तिला सोडून जाणार नाही ही खात्री वाटू लागली. नंदिनीने त्याचा एक हात घट्ट तिच्या हृदयाशी धरून ठेवला होता. हळूहळू तिचे डोळे मिटू लागली आणि थोड्याच वेळात ती गाढ झोपी गेली.
बघता बघता पहाट झाली होती. स्वराजही तिच्या उशाशी बसून पेंगत होता. त्याने पाहिलं नंदिनी गाढ झोपलीय.
“आता आपल्याला घरी जायला हरकत नाही. घरी आईलाही सांगून आलेलो नाही. ईश्वरी वाट पाहत असेल..”
स्वराज स्वतः पुटपुटला.
नंदिनीने तिच्या हातात घट्ट पकडलेला त्याचा हात अलगद सोडवून घेतला आणि सायलीचा निरोप घेऊन तो तिथून घरी जाण्यासाठी निघाला.
इकडे ईश्वरी पहाटे लवकर उठली. फ्रेश जाऊन देवपूजा आटपून ती सकाळच्या नाष्ट्याच्या तयारीला लागली. वेळेत कॉलेजला पोहचायचं होतं त्यामुळे ती भराभर कामे आवरत होती.
पुढे काय होतं? ईश्वरी तिचं शिक्षण पूर्ण करू शकेल का? नंदिनी आणि स्वराजचं लग्न होईल का?पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा