पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४८

पुन्हा बरसला श्रावण..


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४८


स्वराजचं बोलणं ऐकून सरदेसाईंचा पारा चढू लागला. त्याचं बोलणं कोणालाच रुचलेलं नव्हतं. 

“स्वराज, तू आमची परवानगी मागतोयस की तुझा निर्णय आम्हाला सुनावतोयस? नंदिनी उद्यापासून कॉलेज जाणार आहे असं म्हणतोयस पण हे कधी ठरलं की तुम्ही परस्पर ठरवलं?”

सरदेसाई रागाने कडाडले. भीतीने ईश्वरीच्या अंगावर काटा आला. तिला तिच्या बाबांची आणि आदित्यची आठवण झाली. तसंच रागावणं, तशीच चिडचिड.. सगळं काही तेच होतं, फक्त घर बदललं होतं. तिच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं.

“काय गरज आहे अजून शिकण्याची? लग्न झालं संपलं सगळं? शिकून काय करायचंय? घरच सांभाळायचंय ना? मग कशाला हवेत हे असले चोचले? कॉलेजला गेली की घरातलं कोण बघणार?”

गायत्रीने ईश्वरीच्या कॉलेजला जाण्याला विरोध दर्शवला. सार्थक तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला, 

“मला गायत्रीचा मुद्दा पटतोय. नंदिनी, घर सांभाळून कॉलेज करणं तुला वाटतं तितकं सोप्पं नाही. तारेवरची कसरत होईल तुझी. कसं करशील सगळं मॅनेज? त्यात आपली आईसुद्धा आजारी असते. सगळं तुला जमणार नाही. तू हा विषय तूर्तास तरी बाजूला ठेव.. पुढे बघू काय ते?”

“अरे, पण पुढे काय बघायचंय? सरदेसाईंच्या घरातल्या सुना अशा कॉलेज करत, नोकरी करत घराबाहेर पडत नाही. मला हा निर्णय मान्य नाही. नंदिनी, तू कॉलेजला जाणार नाहीस..”

सरदेसाईंनी फर्मान सोडलं. ईश्वरी हिरमूसली. तिने मोठ्या आशेने स्वराजकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिला अगतिकता दिसू लागली.

“संपलं सारं.. बाबांनी त्यांचा निर्णय दिला म्हटल्यावर पुढे काही बोलण्यासाठी जागाच उरली नाही. ईशू, विसरून जा हे शिक्षण, करियर वगैरे. इतर लोकांकडून नाही पण माझा शिकलेला नवरा माझ्या स्वप्नांना पंख देईल असं वाटलं होतं पण सारंच फोल ठरलं. तुझी स्वप्नं कधीच, कोणीच पूर्ण करू शकणार नाहीत.”

ईश्वरी हताशपणे आपल्या जागेवरून उठली आणि तेलाची वाटी ठेवण्यासाठी किचनकडे वळली.

“थांब नंदू..”

शालिनीताईंचा आवाज ऐकून ईश्वरी जागीच थबकली. सर्वांचं लक्ष शालिनीताईंकडे वळलं. शालिनीताई ईश्वरीकडे पाहून म्हणाल्या,

“मला वाटतं, नंदिनीने कॉलेजला जायला काही हरकत नाही. नंदू, मला सांग, घर आणि कॉलेज दोन्ही गोष्टी तुला जबाबदारीपूर्वक सांभाळता येतील?”

“हो आई, मी दोन्ही गोष्टी काळजीपूर्वक सांभाळीन. काहीही चुक होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. आई मला शिकायचं आहे त्यासाठी मी कितीही कष्ट सोसायला तयार आहे. मी माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडीन. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी करेन सगळं फक्त मला शिकण्याची परवानगी द्या?”

ईश्वरी आर्जवे करू लागली.

“अगं पण कशाला? नोकरी करणार आहेस का तू?”

गायत्री चिडून म्हणाली.

“काय हरकत आहे? ती तिच्या पायावर उभी राहिली तर चांगलंच आहे ना.. आणि तुम्ही कोणीही माझी काळजी करू नका. माझी प्रकृती अगदी ठणठणीत आहे. नंदिनी सगळं नीट करेल याची खात्री आहे मला.”

शालिनीताई गायत्रीकडे पाहून म्हणाल्या. आपल्या सासूबाईंच्या नजरेत आपल्याविषयी असलेला विश्वास पाहून ईश्वरीला गलबलून आलं. कृतज्ञता व्यक्त करू पाहणाऱ्या डोळ्यातल्या तिच्या आसवांना तिने वाट मोकळी करून दिली.

“अगं पण सरदेसाईंच्या सुनांनी कधी उंबरठा ओलांडून नोकऱ्या केलेल्या नाहीत. त्यांनी फक्त घरदार, चुल-मुल, पै पाहुणे इतकंच पाहायचं असतं. आजवर असंच घडत आलंय. तू का नवीन पायंडा पाडतेयस? का जुन्या परंपरा मोडीत काढतेयस?”

सरदेसाई शालिनीताईंवर जोरात बरसले.

“का नाही मोडीत काढायच्या? ज्या जुन्या चालीरिती जाचक असतील त्या का जोपासायच्या? अहो, आता आपला जमाना गेला. आपल्याला आपल्या मुलांचा विचार करायला हवा. त्यांच्या कलाने घ्यायला हवं. त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करायला हवी. त्या दोघांना वाटतंय तर करू द्या नां त्यांना त्यांच्या मनासारखं.. नंदिनीच्या आईवडिलांनी तिला इतकं शिकवलं ते काय फक्त घर सांभाळण्यासाठी? अहो, चिडू नका पण मला सांगा दोघेही शिकलेली आहेत. शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं दोघांनाही वाटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? सुन आहे म्हणून तिच्यासाठी वेगळा नियम का?”

बोलता बोलता शालिनीताईंना धाप लागली. सर्वजण घाबरले. शालिनीताईच्या प्रकृतीची सर्वांना काळजी वाटू लागली. ईश्वरी पटकन त्यांच्या जवळ आली आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली,

“आई, तुम्ही शांत व्हा बरं.. परत तुम्हाला त्रास होईल. अजिबात बोलायचं नाही तुम्ही. चला मी तुम्हाला तुमच्या खोलीत घेऊन जाते.”

ईश्वरी त्यांच्या हाताला धरून उठवत म्हणाली.

“नाही.. तू थांब जरा.. अहो ऐका नां.. तिची खूप इच्छा आहे तर तिला कॉलेजला जायला परवानगी द्या नां.. माझ्यासाठी.. प्लिज.. नाहीतर मी.. ”

“करा तुम्हाला काय करायचं ते.. पण स्वतःला त्रास करून घेऊ नका.. तुम्ही जे करताय ते ठीक नाहीये.. याचे परिणाम चांगले होणार नाहीत.. ऐकायचं असेल तर ऐका.. नाहीतर तुमची मर्जी..”

सरदेसाई तणतणत आपल्या खोलीत निघून गेले. शालिनीताईंना मनापासून आनंद झाला.

“स्वराज, उद्या तिला तिच्या कॉलेजवर सोडून मग तू तुझ्या ऑफिसला जा.. आणि नंदू तू लवकर उठून घरातलं सर्व आवरून मग जायचं कॉलेजला.. आणि माझी काळजीही तुलाच घ्यायची बरं.. ”

ईश्वरीकडे पाहून त्या म्हणाल्या. ईश्वरीला प्रचंड आनंद झाला होता. ती धावतच त्यांच्याकडे आली कडकडून मिठी मारत ती आनंदाने त्यांच्या कानात पुटपुटली.

“थँक्यू आई.. थँक्यू सो मच..”

“आई म्हणतेस आणि आभारही मानतेस.. ”

त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या शिक्षणाची इच्छा तिच्या आईसामान सासूबाई पूर्ण करणार होत्या.

“आजवर माझी आई कधी माझ्यासाठी असा स्टॅन्ड घेऊ शकली नाही. बाबा आणि दादासमोर माझ्यासाठी ती तिची भूमिका मांडू शकली नाही. कायम बाबांनी माझा दुःस्वास केला. शिस्त, संस्कार यांच्या नावाखाली दादाने मारलंही. आई त्यांना कधीही रोखू शकली नाही. चुकीच्या गोष्टींना ती चुक म्हणू शकली नाही. ती वाईट नाहीये. मला माहित आहे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण बाबा आणि दादाचा धाक तिला कायम मागे खेचत राहिला. ती कायम बुजलेली राहिली आणि त्यामुळे कदाचित मीही तशीच झाले पण इथे माझ्या सासूबाई माझ्या आई झाल्या. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. घरातल्या सर्व सदस्यांच्या विरोधाला न जुमानता त्या माझ्यासाठी ठामपणे बोलल्या. आई, लव्ह यू अँड थँक्यू सो मच..”

अनघाच्या विचारांनी अस्वस्थ झालेल्या ईश्वरीने आपल्या सासूबाईंचे मनोमन आभार मानले. डोळ्यातल्या अश्रूनी ती भूमिका चोख पार पाडली होती.

“आपली आई खरंच खूप ग्रेट आहे. तिच्या मनात आलं तर ती आपल्या माणसांसाठी काहीही करू शकते..”

स्वराजला आईच्या या भूमिकेचं कौतुक आणि आनंद वाटत होता.

“अजून काय काय पाहवं लागणार आहे देव जाणे! नवीन सुनेचे लाड पुरवताना कोणत्या नवनवीन गोष्टी निमूटपणे मान्य कराव्या लागतील कोणास ठाऊक! आता मॅडम जातील कॉलेजला आणि आम्ही आहे ‘रांधा, वाढा उष्टी काढा’ सारं करायला.. आमच्यासाठी नाही कोणी उभं राहिलं कधी..”

गायत्री नाक मुरडत म्हणाली.

“तू म्हणाली असतीस की मला पुढे शिकायचंय तर तुझ्यासाठीही उभी राहिले असते. आता करतेस का? सांग मला. तुम्ही दोघीही कॉलेजला गेलात तरी चालेल मला पण मुळात तुझी इच्छा आहे का शिकण्याची? त्यासाठी अभ्यास करावा लागतो. तो तर आपल्याला जमणार नाही मग कशाला चांगल्या कामात व्यत्यय आणायचा आपण? आणि दुसरी गोष्ट, तुला माझ्यासाठी काहीही जास्तीचं काम करावं लागणार नाही. तसंही नंदिनी येण्याआधी तरी कुठे फारसं काही करत होतीस? आणि तसंही आपल्याकडे प्रत्येक कामासाठी कामवाल्या मावशा आहेत. त्यामुळे कोणाला जास्त लोड होणार नाही. तिची इच्छा आहे तर ती नक्की शिकेल. कोणालाही असुया वाटण्याचं कारण नाही.”

शालिनीताईंनी कडक शब्दात गायत्रीला सुनावलं तशी ती वरमली. 

“तिथे कॉलेजमध्ये जाऊन काही दिवे लावले नाही म्हणजे मिळवलं.. सरदेसाईंचं नाक कापलं नाही म्हणजे झालं.. मला काय करायचं. आपण आपलं सावध करण्याचं काम केलं. बाकी तुमची मर्जी! असंही इथे आपल्या मताला कुठे काही किंमत आहे? चला ओ.. मी जाते झोपायला.. तुम्ही या निवांत..”

सार्थककडे पाहून गायत्री म्हणाली आणि तणतणत तिच्या खोलीत निघून गेली. तिच्या मागोमाग सार्थकही खोलीत निघून गेला. स्वराजने आनंदाने जवळ येऊन आईला मिठी मारली. ईश्वरी डोळ्यात पाणी आणून म्हणाली,

“आई, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम केलंत. मी आयुष्यभर तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. आई, गायत्री वहिनी म्हणाल्या तसं काहीही होणार नाही. मी आपल्या घराण्याच्या इभ्रतीला गालबोट लागेल असं काहीच वागणार नाही. मला फक्त शिकायचं आहे त्याव्यतिरिक्त माझ्या मनात कुठलेही विचार नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा आई..”

ईश्वरी काकूळतीला आली होती. तिच्या नजरेत शालिनीताईंविषयी असलेला आदर आणि शिक्षणासाठी असलेली ओढ स्पष्ट दिसत होती. तिच्या शब्दात प्रामाणिकपणा जाणवत होता.

“नंदू, तुला कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही बाळ, मी माणसं बरोबर ओळखते आणि तुला तर तुमच्या लग्नाच्या आधीपासून.. त्यामुळे मनात कसलाही विचार ठेवू नकोस. निश्चिन्त मनाने झोपायला जा.. मीही जाते.. उद्या लवकर उठावं लागेल तुला.. उद्या कॉलेजला जावं लागेल नां? स्वराज, उद्या तू नंदूला सोडवायला जा.. उगीच तिची दगदग नको व्हायला..”

शालिनीताईं प्रेमाने म्हणाल्या. स्वराजने होकारार्थी मान डोलावली. ईश्वरीने शालिनीताईंना औषधं दिली आणि ते दोघे त्यांच्या खोलीत आले. स्वराजने खोलीत आल्यावर चार्जिंगला लावलेला मोबाईल हातात घेतला. पाहतो तर मोबाईलवर नंदिनीचे तीस ते चाळीस मिसकॉल्स येऊन पडले होते.

“ओह्ह माय गॉड! इतके मिसकॉल्स.. आता प्रचंड चिडणार ती. उद्याच कॉल करतो नाहीतर माझ्यावर सगळा जाळ निघेल.”

स्वराज विचार करतच होता की पुन्हा त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने कॉल उचलून हॅलो म्हटलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..


क्रमशः

©निशा थोरे (अनुप्रिया)



🎭 Series Post

View all