पुन्हा बरसला श्रावण भाग ३

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या एका श्रावणाची.. श्रावणाच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..


पुन्हा बरसला श्रावण..

भाग ३

नाजूक बांध्याची, केतकीच्या रंगाची, चाफेकळी नाकाची, काळ्याभोर डोळ्याची एक सुंदर मुलगी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून सर्वांसमोर येऊन बसली. भाळावरची चंद्रकोर तिला अजूनच शोभून दिसत होती. पाहताक्षणी वसंतरावांना ती पसंत पडली होती. समोर बसलेल्या मुलाकडच्या लोकांकडे पाहत मुलीचे वडील विश्वासराव म्हणाले,

“तुमका काय प्रश्न इचारुचे आसतीत तर इचारा.”

जमलेल्या मंडळीतून एका वयस्कर व्यक्तीने प्रश्न केला.

“नाव काय चेडवा तुजा?”

“अनघा.. अनघा विश्वासराव निंबाळकर..”

तिने मंजुळ आवाजात उत्तर दिलं.

“रानूक येता मा?”

“हो..”

"बरा तर, काय काय यता बनवूक?"

“आयेन जा जा शिकवला हा ता सगळा.”

तिच्या या उत्तरावर सगळेच खळखळून हसले. कोणीतरी मधेच विचारलं,

“शाळा किती शिकलस?”

“सातवीपातूर..गावात सातवीपातुरच शाळा असा.”

तिने उत्तर दिलं.

“अरे वा. ह्या बेस झाला. इनायकासाऱ्या शिकलल्या पोराक ही व्हकाल शोभतली.”

“ता समदा ठीक असा.. पन शाळा नि पोरींचो काय संबंध? घरातला,भायरला काम इला..पुरे. बुका शिकान काय कामार जातली? आमच्या घरातल्या चेडवांका शाळा कसली ती ठाव्क नाय.”

असं म्हणत वसंतराव खळखळून हसले. सर्वांनी त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. थोडेफार जुजबी प्रश्न विचारून झाल्यावर वसंतरावांनी माईना बाहेर बोलवून अनघाची ओटी भरायला सांगितली. माईंनी तिची खणानारळाने ओटी भरली. मायेने डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला. वसंतरावांनी अनघाला आत घेऊन जायला सांगितलं. अनघाने सर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर माई आणि अनघाची आई तिला आत स्वयंपाक घरात घेऊन आल्या. बाहेर वसंतरावांचे शब्द कानावर पडत होते.

“विश्वासराव, आम्हाला तुमची मुलगी आमच्या विनायकसाठी पसंत आहे.”

हे ऐकून विश्वासरावांना आनंद झाला. त्यांनी आधीच विनायकला पाहिलं होतं. त्यामुळे तो त्यांना पसंत होता. देशमुखांसारख्या मोठ्या घरात आपली मुलगी लग्नं करून जातेय याचाच त्यांना जास्त आनंद झाला. विश्वासराव म्हणाले,

“अरे व्वा, हे छान झालं.. पण मुलाची पसंती? मुलाचा होकार आला की आपण पुढच्या देण्याघेण्याच्या गोष्टी ठरवून घेतल्या असत्या.”

वसंतरावांनी त्यांच्याकडे हसून पाहिलं. मिशीवरून हात फिरवत तोऱ्यात म्हणाले,

“विश्वासराव, अजून आम्ही जिवंत आहोत. आमच्या शब्दाबाहेर जाण्याची अजून तरी कोणी हिंमत नाही. आणि तसंही आमच्या देशमुख कुटुंबात आपल्या मुलांना किंवा बायकांना विचारून निर्णय घेतले जात नाहीत देशमुखांमध्ये तसा रिवाजच नाही आणि मुळात एखादा निर्णय घेण्यासाठी बायकांना तितकी अक्कल असते का? तेवढं डोकं असतं का? स्वयंपाक घरातलं त्यांचं टीचभर ज्ञान.. कोणता मोठा निर्णय घेता येईल का? हे पहा विश्वासराव, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. म्हणजे सर्वांनाच पसंत आहे. आमचा विनायक आमच्या शब्दाबाहेर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देण्याघेण्याचं म्हणालात. आम्हाला तुमच्याकडून काही नकोय रामेश्वराने आम्हाला भरपूर दिलंय. एक नारळ आणि मुलगी द्या. बस्स.. बाकी नको काही. लवकरच साखरपुडा आणि लग्नाचा मुहूर्त काढून घेऊ आणि देऊ लग्नाचा बार उडवून..”

वसंतराव मोठ्याने हसले. बसलेल्या सर्वांनी हसून त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. या बोलण्याने निंबाळकरांच्या घरात सर्वानाच खूप आनंद झाला. थोड्या वेळातच अनघाच्या आईने आलेल्या पाहुण्यांसाठी छान स्वयंपाक बनवला. सर्वांची जेवणं झाली. विश्वासरावांनी सर्वांना आहेर केला. अनघाच्या आईने मुलाकडच्या अनघाला पहायला आलेल्या बायकांची साडी, खणानारळाने ओटी भरली. ‘लवकरच मुहूर्त काढण्यासाठी भेटू‘ असं वसंतरावांनी आश्वासन दिलं आणि आलेल्या पाहुण्यांनी आनंदाने निंबाळकरांचा निरोप घेतला.

पाहुणे गेल्यावर निंबाळकरांच्या घरात सर्वांची जेवणं उरकली. बाहेरच्या पडवीत सारेजण गप्पा मारत बसले होते. अनघाच्या पाहुण्यांचाच विषय होता. आजीच्या पुढ्यात तिच्या पायांना कोमट तेल चोळत अनघा बसली होती. अनघाची आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली..

“नशीब काढल्यान पोरीनं.. एवढं मोठं, श्रीमंत घर गावल्यान.. सुखात रवतलं.”

आजीच्या डोळ्यातला आनंद स्पष्ट दिसत होता.

“हो गं आई, खरंय तुझं.. माझी अनघा खूप नशीबवान आहे. शिकलेला नवरा, इतकं मोठं तालेवर देशमुख घराणं.. खूप सुखात राहील माझी पोर..”

विश्वासरावही प्रचंड खुश होते. आपली लाडकी लेक देशमुखांसारख्या मोठ्या घरात जातेय ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोठी होती. त्यांचं बोलणं ऐकून तेलाची वाटी तिथेच टाकून अनघा तिच्या खोलीच्या दिशेने पळाली.

“बघा, कशी लाजतेय पोर..”

अनघाची आई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हसून म्हणाली. सर्वांच्या एकच हशा पिकल्या. निंबाळकर कुटुंबियांमध्ये आता नवीन उत्साह संचारला होता. सर्वजण पुढच्या तयारीला लागले.

अनघा धावतच आपल्या खोलीत आली. खोलीचं दार बंद करून पलंगावर येऊन बसली. खिडकीतून बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसत होतं. शेजारच्या वाड्यात देवीचा जागर सुरू होता. त्या वाड्यातल्या शांताकाकूंना चार मुलींच्या पाठीवर मुलगा झाला होता. वंशाला दिवा मिळावा म्हणून त्यांच्या सासूबाईंनी देवीला साकडं घातलं होतं. नवस बोलल्या होत्या. तोच नवस फेडण्याची तयारी सुरू होती. नवस पूर्ण करण्यासाठी देवीला बोकड वाहायचा होता. त्याचा बळी द्यायचा होता. अंगणात एका बोकडाला बांधून ठेवलं होतं. दोन दिवसापासून त्याला भरपूर खाऊ पिऊ घातलं होतं. बळी देण्यासाठी त्याला सज्ज करण्यात येतं होतं. त्याच्या गळ्यात फुलांचा हार कपाळावर कुंकू अगदी मळवट भरावा तसा भरला होता. त्याला हारफुलांनी सजवून घरातले सर्वजण वाजत गाजत ओढत देवीच्या मंदिराकडे नेत होते. जणू त्याच्या मृत्यूचा सोहळा सुरू होता. ते दृष्य पाहून अनघा अस्वस्थ झाली. त्या बोकडाची आणि तिची परिस्थिती सारखीच तर होती. लग्नाची तयारी सुरू असताना तिची पसंती कोणीच विचारात घेतली नव्हती. इतकंच काय तिला आता लग्न करायचं आहे का? हा साधा प्रश्नही कोणाच्या मनात आला नव्हता. राहून राहून वसंतरावांचे शब्द तिच्या मनात घोळत होते.

“शाळा नि पोरींचो काय संबंध? घरातला,भायरला काम इला..पुरे. बुका शिकान काय कामार जातली? आमच्या घरातल्या चेडवांका शाळा कसली ती ठाव्क नाय.”

वसंतरावांच्या या वाक्याने अनघा भेदरून गेली होती.

“म्हणजे बायकांच्या शिक्षणाला काहीच किंमत नाही? त्यांनी घराच्या चार भिंतीच्या आतच वावरायचं? मला पुढे शिकायचं आहे. शिक्षण कधी वाया जातं का? सावित्रीबाई फुले म्हणाल्या होत्या नं.. ‘एक मुलगी शिकली की सारं घर शहाणं होतं. सुशिक्षित होतं.’ मग ते काय खोटं होतं? इतरांना का नाही समजत हे? जिथे स्त्रियांच्या मताला काहीच किंमत नाही अशा घरात आपला निभाव कसा लागेल?”

या विचारांनी अनघा बेचैन झाली पण एकदम तिला तेंव्हा कोणीतरी बोललेलं आठवलं.

“इनायकासाऱ्या शिकलल्या पोराक ही व्हकाल शोभतली..”

मनात आशेचा अंकुर फुटला. चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.

“ते आहेत ना शिकलेले.. माझं मन त्यांना नक्कीच समजेल.. आनंदीबाई जोशीना नाही का त्यांच्या नवऱ्याने, गोपाळरावांनी पुढे शिकायला प्रोत्साहन दिलं? स्वतः पुस्तकं आणून दिली होती. विनायकही असेच असतील. ते मला नक्की समजून घेतील. मला पुढे शिकवतील..”

तिच्या मनानं कौल दिला.

इकडे सर्व मंडळी देशमुखवाड्यात परतली. पूर्ण प्रवासात सर्वजण मुलीचं, निंबाळकरांनी केलेल्या पाहुणचाराचं कौतुक करत होते. ही सोयरीक सर्वांनाच आवडली होती. अंगणातच सर्वांनी पायावर पाणी घेतलं. माईंनी सर्वाना चहापाणी दिलं आणि मग सर्वजण वसंतरावांचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले. विनायक त्याच्या खोलीत कुठलीशी कादंबरी वाचत बसला होता. वसंतरावांनी त्याला आवाज दिला.

“विनायक.. ए विनायक.. बाहेर ये जरा..”

वडिलांचे शब्द कानावर पडताच विनायक बाहेरच्या खोलीत आला. त्याच्याकडे पाहत स्मित हास्य करत वसंतराव म्हणाले,

“ऐकलंस का? तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बघ.. आम्ही तुझं लग्न ठरवून आलो आहोत. मुलगी खूप सुंदर, सुलक्षणी आहे. आम्हाला पसंत आहे. लवकरच जवळचा मुहूर्त धरून तुझ्या लग्नाचा बार उडवून टाकायचा विचार आहे..”

त्यांचं बोलणं ऐकताच विनायकच्या चेहऱ्याचा रंग बदलत चालला होता.

“पण बाबा.. मला अजून शिकायचं आहे.. इतक्यात मला लग्न…”

त्याचे पुढचे शब्द तोंडातच विरून गेले. तो काहीसा नाराज झाला. माईंना त्याच्या मनाची घालमेल स्पष्ट दिसत होती पण वसंतरावांपुढे माईंचं काहीच चालणार नव्हतं. पोटच्या मुलाची इच्छा माहित असताना त्या त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हत्या. त्या हतबल होत्या.

“हो शिकशील तू.. पण कितीही शिकलास तरी आपली घरचीच शेती सांभाळायची आहे तुला. हे विसरू नकोस..”

त्यांच्या वाक्याने विनायक अजूनच व्यथित झाला. कोणाच्या अनुमतीचा विचार न करता वसंतरावांनी चांगला मुहूर्त पाहून लग्नाची तारीख ठरवली आणि तसं निंबाळकरांना कळवूनही टाकलं. चैत्रातल्या अष्टमीच्या मुहूर्तावर लग्नसोहळा निश्चित झाला.

पुढे काय होतं? अनघा आणि विनायकचा विवाह निर्विघ्न पार पडेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)


🎭 Series Post

View all