पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३९

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३९

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, ईश्वरी आणि स्वराज यांच्यात बोलणं झालं. ईश्वरी स्वराजच्या घरी यायला तयार झाली. तिच्या दोन अटी तिने स्वराजसमोर ठेवल्या. स्वराजने तिच्या दोन्ही अटी मान्य केल्या आता पुढे..

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३९

“ईशु, इतके दिवस तुझ्या सासूबाई आजारी होत्या म्हणून कोणी काही विषय काढला नाही पण आता सगळेजण कुजबुज करू लागलेत. त्यामुळे आता बोलावंच लागेल मला.. काय ठरवलंस तू? पुढे काय करणार आहेस?”

अनघाने डायरेक्ट विषयालाच हात घातला होता.

“कशाचं आई? काय ठरवायचंय मी?”

अनघाला काय बोलायचंय हे ईश्वरीला उमगलं होतं तरी अजाणतेपणाचा भाव चेहऱ्यावर आणत तिने विचारलं.

“तू तुझ्या सासरी जाण्याबद्दल विचारतेय मी..”

हे बोलताना अनघा ईश्वरीच्या नजरेला नजर मिळवू शकली नाही.

“का आई? इतक्यात कंटाळलीस मला? इतकी डोईजड झालेय मी की या घरातून हाकलून देत आहेस?”

डोळ्यात पाणी आणत ईश्वरी अनघाला म्हणाली.

“नाही गं बाळ, तसं नाही काही.. लग्न झालेली मुलगी तिच्या घरी सुखात नांदत असलेली बरी नाही का? ती जास्त दिवस माहेरी राहिली की लगेच चर्चेला उधाण येतं. माहेरपणाला चार दिवस येणं वेगळं असतं बाई.. पण असं सासर सोडून माहेरी राहणं बरं दिसतं का? तुझ्या वहिनीला आजूबाजूचे लोक विचारू लागलेत दोन दिवसांपूर्वी तुझी वहिनी सांगत होती.”

“अच्छा, वहिनीच्या मनात आहे तर.. सरळ सांगायचं ना जा म्हणून.. कशाला आढेवेढे घेत बोलताय? इतरांची नावं कशाला पुढे करताय? आई, लग्नानंतर
मुलगी खरंच इतकी परकी होते का गं? इतकी वर्ष अगदी माझ्या लहानपणापासून माझं घर, माझी माणसं म्हणून मी मोठ्या तोऱ्यात मिरवत होते; ते घर, ती माणसं माझी नव्हती? मोठ्या भ्रमात होते मी..”

ईश्वरीच्या डोळ्यातलं आभाळ रितं होऊ लागलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून अनघाला खूप गलबलून आलं. लेकीच्या मायेने तिच्याही डोळ्यातून सरी बरसू लागल्या. तिने पटकन ईश्वरीच्या जवळ येत तिला घट्ट पोटाशी धरलं. मायेने डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली,

“ईशु, हीच जनरीत आहे बाळा, आपली परंपरा.. वर्षानुवर्षे जो पायंडा पडलाय तो असा मोडून काढता येत नाही गं.. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे लग्नानंतर मुलगी परकीच होते. ज्या घराला, त्या घरातल्या माणसांना ती आपलं मानते एक दिवस तेच घर, ती माणसं तिच्यासाठी परकी होतात पण एक नवीन घर, नवी नाती तिची वाट पाहत असतात हे विसरून कसं चालेल? मुलगी दोन घरांना, दोन संस्कारांना छान एकत्र गुंफत असते. दोन घराण्याचा नाव-लौकिक जपत असते. हेही खरंच आहे ना! एक सांगू बाळा तुला!”

कंठात दाटून आलेला उमाळा गिळत अनघा पुढे बोलू लागली,

“प्रत्येक स्त्रीला पुरुष नावाच्या संरक्षणाची गरज असते. लहान असताना वडील, भाऊ ढाल बनून उभे असतात आणि लग्नानंतर ‘नवरा’ नावाचं संरक्षण बाईसोबत असणं गरजेचं.. ज्या बाईसोबत नवरा नावाचा पुरुष असतो त्या स्त्रीकडे बघणाऱ्या नजरा आदरयुक्त असतात पण जिच्या घराला नराचं संरक्षण नाही, ज्या स्त्रीच्या पाठिशी पुरुष नाही अशा बाईला या समाजात काहीच किंमत नसते. तिच्याकडे सावज म्हणून पाहिलं जातं फक्त एक ‘सावज’ आणि मग हा समाज हे सावज कधी हेरेल, कधी खाऊन फस्त करेल सांगता येत नाही म्हणून बेटा, स्त्रीने आधी आपलं आयुष्य सुरक्षित करावं आणि त्यानंतर दुसरा विचार करावा. तिच्यासाठी नवरा हेच सुरक्षा कवच आहे म्हणून तुला मी तुझ्या घरी जाण्याबद्दल सांगतेय गं..”

अनघा मायेने तीला गोंजारत होती. ईश्वरीने स्वतःला आईपासून दूर केलं. गळयाभोवती खांद्यावर टाकलेल्या ओढणीने डोळ्यातलं पाणी पुसत ती उठून उभी राहिली. आईच्या डोळ्यातून ओघळलेली आसवं पुसत ती म्हणाली,

“आई, तू काळजी करू नकोस. उद्या स्वराज येणार आहे मला घेऊन जायला. जाईन मी उद्या.. आता कोणाला कसल्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागणार नाही.. चल मी माझी बॅग भरून ठेवते. परत जाण्याची तयारी करायला हवी ना..”

“तू प्लिज काही गैरसमज करून घेऊ नको हं बाळा..”

ईश्वरीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ती म्हणाली. ईश्वरीने नाही म्हटलं आणि ती बॅग भरू लागली.

दुसऱ्या दिवशी स्वराज ईश्वरीला घेऊन जाण्यासाठी घरी आला. अनघा, माईंनी त्याचं स्वागत केलं. अर्पिताने शालिनीताईंची चौकशी केली. विनायक, आदित्यने छान आदरतिथ्य केलं. सर्वांनी एकत्र रात्रीचं साग्रसंगीत जेवण केलं. ईश्वरी आणि स्वराजला आहेर केला. ईश्वरीच्या सोबत तिच्या सासरच्या लोकांसाठी घेतलेल्या भेटवस्तू दिल्या आणि ईश्वरीची पाठवणी केली.

ईश्वरी स्वराजसोबत पुन्हा सरदेसाईंच्या घरी आली. शालिनीताईंनी दोघांचं पुन्हा एकदा औक्षण केलं. हळूहळू ईश्वरी नव्या घरी रूळण्याचा प्रयत्न करत होती. नव्या नात्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होती. नवं घर, नवी नाती, सरदेसाईंच्या घरच्या चालीरिती, सारे कुलाचार नीट समजून घेत होती. आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेत होती. फार कमी अवधीत तिने संपूर्ण स्वयंपाकघराचा ताबा मिळवला होता. शालिनीताईंची तर ती सुन नसून लेक झाली होती. आपल्या लाघवी स्वभावाने तिने सर्वांना आपलंसं केलं होतं.

एक दिवस शालिनीताईंच्या केसांना तेल लावून देत असताना शालिनीताई ईश्वरीला म्हणाल्या,

“नंदिनी, तू फक्त आठवड्याभरातच तुझ्या प्रेमानं, तुझ्या लाघवी स्वभावानं सर्वांना आपलंसं केलंस! दिवस रात्र माझ्या सोबत राहिलीस.. नवीन लग्न झालंय तुझं.. किती स्वप्नं असतील तुझी पण तरी रात्रीअपरात्री मला कसला त्रास होऊन नये आणि झालाच तर तुला पटकन मदतीला येता यावं म्हणून तू माझ्यासोबत इथे माझ्या उशाशी बसून राहिलीस.. किती काळजी घेतेस गं माझी! तुला सांगू बाळा, माझ्या मनात कायम एक सल होती. पोटी मुलगी नाही म्हणून मी कायम दुखावलेली असायची पण ती कमी तू पूर्ण केलीस. लेकीची उणीव भरून काढलीस. नंदिनी, जेव्हा तू मला पहिल्यांदा आई म्हणालीस ना.. इतका आनंद झाला होता म्हणून सांगू!”

“हो, आई.. माहित आहे मला. मलाही तुमच्या प्रेमामुळे आईची उणीव जाणवत नाही. आईची माया मला मिळाली अजून काय हवंय?”

ईश्वरी स्मित हास्य करत म्हणाली.

“बाळ, तू खुश आहेस ना इथे? माझा स्वराज तुला जपतो ना?”

शालिनीताईंनी तिला विचारलं. स्वराजचं नाव ऐकताच ती चपापली. चेहऱ्यावरचे भाव लपवत ती म्हणाली.

“हो, आई.. मी खूप आनंदी आहे इथे.. चला.. ही औषधं घ्या तुमची आणि झोपा आता.. कसलाही जास्त विचार करायचा नाही. शांतपणे झोपायचं आहे.”

शालिनीताईंनी औषध घेतलं आणि मान डोलवत म्हणाल्या,

“तुही झोप आता.. किती दगदग करशील? रोज सकाळी लवकर उठतेस आणि सर्वात शेवटी झोपतेस तू.. दमली असशील ना.. जा आता विश्रांती घे.. उद्या रविवार आहे. स्वराज आणि सार्थकला सुट्टी असते. त्यामुळं त्यांचा टिफिन बनवण्याचीही चिंता नाही. थोडं जास्त वेळ झोपलीस तरी हरकत नाही. जा तुझ्या खोलीत जाऊन आराम कर..”

“आई, मी इथेच झोपू का तुमच्याजवळ..”

ईश्वरी चाचरत म्हणाली.

“नाही.. तुला तुझ्याच बेडरूममध्ये जावं लागेल. सारखं सासूची सेवा करत राहशील तर नवऱ्याची काळजी कोण घेणार?”

त्यांनी मिश्किलपणे तिला विचारलं. उसणं हसू ओठांवर आणत ती म्हणाली,

“झोपा आता.. गुड नाईट आई..”

असं म्हणून ती त्यांच्या खोलीच्या बाहेर पडली. आज तिला तिच्या बेडरूममध्ये जाण्याचा हुकूम तिच्या लाडक्या सासूबाईंनी दिला होता.

“आता आईंनी सांगितलंय म्हटल्यावर बेडरूममध्ये जावंच लागेल. नाहीतर उगीच शंका येईल सर्वांना आणि स्वराजला या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागेल.”

थोडा विचार करून ती स्वराजच्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली. दारावर टकटक केलं. आतून आवाज आला.

“कोण आहे? प्लिज कम इन..”

ती आत आली. स्वराज बेडवर टेकून बसला होता. हातात कुठलंसं नॉवेल होतं. ईश्वरीला समोर पाहताच तो बेडवरून खाली उतरून उभा राहिला.

“अरे, ईश्वरी तू.. ये ना..”

त्याने हातातल्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे बारा वाजायला आले होते.

“आईंनी आजपासून इथेच झोपायला सांगितलं आहे. तुम्ही वर बेडवर झोपा.. मी खाली चटई टाकून झोपते.”

असं म्हणत तिने शेजारी ठेवलेली चटई खाली अंथरली. बेडवरची उशी आणि चादर घेतली आणि खाली बसली.

“नको तू बेडवर झोप.. तुला सवय नसेल ना.. मी झोपतो इथे सोफ्यावर..”

“नाही नको.. मी इथेच ठीक आहे.. तुम्ही झोपा..”

ती आडवी झाली.

“कोणतं नॉवेल वाचत होतात? मी पाहू शकते?”

“हो.. हो.. का नाही? तुला आवडतं का वाचायला?”

टेबलावरचं नॉवेल उचलून तिच्या समोर धरत तो म्हणाला,

“हे एक इंग्लिश नॉवेल आहे ‘आऊटलँडर’ नावाचं, ‘डायना गँबलडॉन’ यांनी लिहिलेलं. लव्ह स्टोरी आहे. आवडेल तुला वाचायला?”

ईश्वरी पुन्हा उठून बसली. हातातल्या कादंबरीची पानं उलटत ती म्हणाली.

“हो.. मला वाचायला खूप आवडतं.. मी जास्त करून मराठी कादंबऱ्या वाचल्यात. इंग्लिशही आवडतात. कॉलेजमध्ये अकरावीला असताना ना.. आम्हाला मराठी शिकवायला एक प्रोफेसर होते. प्रोफेसर सुमित सुर्यवंशी म्हणून. त्यांनी मला खूप सारी पुस्तकं वाचायला दिली होती. खरंतर त्यांच्यामुळेच मला वाचनाची आवड निर्माण झालीय.. आता तर काही वाचल्याशिवाय झोपच येत नाही..”

आपल्या वाचनाच्या आवडीबद्दल भरभरून सांगताना तिचा उत्साह ओसंडून वाहत होता.

“मलाही वाचनाची प्रचंड आवड आहे. खूप वाचतो मी.. हे बघ माझी पुस्तकांची लायब्ररी. इथे तुला सर्व प्रकारची पुस्तकं वाचायला मिळतील. तुला वाचायची असतील तर तू यातून घेऊ शकतेस.”

त्याने त्याचं कपाट उघडून तिला दाखवलं. कपाट पुस्तकांनी भरलेलं होतं. सारी पुस्तकं छानपैकी शेल्फमध्ये दिमाखात बसली होती शिस्तीत एका रांगेत बसावी तशी. पुस्तकं पाहून तिला खूप आनंद झाला होता. तिला खूप सारी पुस्तकं वाचायला मिळणार होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला.

“आणि हे दुसरं कपाट.. खरंतर हे माझ्या कपड्यांचं पण ना ही जागा सुद्धा पुस्तकांनी भरून गेलीय. कपडे कमी आणि पुस्तकं जास्त असं झालंय बघ. त्याचं काय आहे..”

तो हसून बोलत होता. इतक्यात स्वराजच्या मोबाईलची रिंग वाजली. तो बोलता बोलता थांबला.

“एक्सक्युज मी..”

असं म्हणून त्याने मोबाईल स्क्रीनवर पाहिलं.

“स्वीटहार्ट..”

मोबाईलवर ठळक अक्षरात नाव चमकलं. तो मनोमन चरकला. त्याने पटकन कॉल घेतला आणि बाहेर गॅलरीत जाऊन बोलू लागला. अधूनमधून त्याच्या बोलण्याचे, हसण्याचे पुसटसे आवाज येत होते. त्याचा बदलेला चेहरा पाहून ईश्वरीला अंदाज आलाच. नाही म्हटलं तरी तिला थोडं वाईट वाटलंच.

“थँक्स डिअर.. थँक्यू सो मच.. बाय गुड नाईट..”

असं म्हणत तो आत आला आणि कॉल कट केला.

“छान आहे तुमची बुक्स लायब्ररी.. मस्तच..”

ईश्वरी विषय बदलत म्हणाली.

“चला.. झोपते.. बराच उशीर झालाय. गूड नाईट..”

असं म्हणून ती झोपण्यासाठी वळली.

“ईश्वरी.. फ्रेंड्स?”

स्वराजने उजवा हात तिच्यासमोर धरत विचारलं. सांशक नजरेने ईश्वरीने त्याच्याकडे पाहिलं.

“बारा वाजले.. दुसरा दिवस सुरू झाला आज ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजेच ‘जागतिक मैत्रीदिन’ माझ्याही लक्षात नव्हतं. आता आलेल्या फोनमुळे आठवण झाली. म्हणूनच विचारावंसं वाटलं. ईश्वरी, आपण मित्र होऊ शकतो?
बाकी काही नाही निदान आपल्यात मैत्री तर होऊ शकते ना?”

त्याने त्याचा हात तसाच तिच्यासमोर धरून ठेवला होता. स्वतःच्याही नकळत ईश्वरीने त्याच्या हातात हात मिळवला.

“हो.. का नाही? आपण नक्कीच चांगले मित्र होऊ शकतो.. हॅपी फ्रेंडशिप डे..”

ती हसून म्हणाली. त्याच्या आश्वासक स्पर्शात तिला एक वेगळीच उर्मी जाणवत होती. एका नवीन नात्याला सुरुवात होतं होती..

पुढे काय होतं? ईश्वरी आणि स्वराजचं नातं फुलेल का? ईश्वरी तिचं स्वप्न पूर्ण करू शकेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all