पुन्हा बरसला श्रावण.. भाग २४

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या तिच्या एका श्रावणाची.. त्याच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..


पुन्हा बरसला श्रावण..


पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, विनायक, आदित्य आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीय स्वराज आणि ईश्वरीचं लग्न ठरवण्यासाठी सरदेसाईंच्या घरी गेली. स्वराज आणि ईश्वरीच्या लग्नाची तारीख काढण्यात आली. विभाच्या प्रश्नांनी ईश्वरी थोडी विचारात पडली. आता पुढे..


भाग - २४


माई, विनायक आणि आदित्य बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बसले. ईश्वरीने सर्वांसाठी पाणी आणून दिलं. ईश्वरीने आदित्यच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. पाण्याचा ग्लास घेत आदित्य म्हणाला,


“काँग्रट्स ईशु, आता तुम्ही लवकरच देशमुखांची सरदेसाई होणार. लग्न ठरवून आलोय तुझं. काहीतरी गोड घेऊन ये सर्वांसाठी पटकन.. इतकी आनंदाची बातमी सांगितली मी तुला.. नशीबवान आहेस बाळा, इतकं चांगलं सासर तुला मिळालंय.. हो नां माई?”


माईंनी हसून मान डोलावली.


“हो ईशु, खूप श्रीमंत, तालेवर घर मिळालं आहे तुला. माणसंही खूप चांगली आहेत. माझी ईशु राणी बनून राहील तिथे..”


माईच्या बोलण्यावर ईश्वरीने किंचित हसून माईकडे पाहिलं.


“आता वेळ दवडून चालणार नाही. भराभर कामे उरकली पाहिजेत. आठ दिवसांवर साखरपुडा करायचा आहे आणि लगेच महिन्याभरात लग्न. आता आपल्याकडे तयारीसाठी जास्त वेळ शिल्लक नाहीये.. लवकर सगळं उरकलं पाहिजे.”


विनायकने त्यांच्या सुरात आपला सूर मिसळला.


“काय आठ दिवसात?”


ईश्वरी जवळ जवळ किंचाळलीच.. विनायकने तिच्याकडे रागाने पाहताच भानावर येत आदित्यकडे पाहून ती म्हणाली,


“पण दादा, फार घाई होतेय असं नाही का वाटतं तुम्हाला?”


“नाही.. काही घाई होत नाही आदी.. वेळेत होतंय सर्व.. उगीच भेटीगाठी वाढण्यापेक्षा, लोकांत चर्चा होण्यापेक्षा साखरपुडा उरकून टाकलेला बरा..”


विनायकने आदित्यकडे पाहून उत्तर दिलं.


“पण माझी परीक्षा तोंडावर आलीय.. या गोंधळात माझा अभ्यास कसा होईल?”


ईश्वरीने प्रश्न केला.


“अगं होईल मनू.. काळजी करू नको. तू तुझा अभ्यास कर आणि आम्ही आमची कामं करू. तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही.”


माई ईश्वरीला समजावणीच्या सुरात म्हणाली. माई लाडाने ईश्वरीला मनू, मन्या म्हणायची.


“आणि असंही आता काय फरक पडतो? परीक्षा दिलीस काय किंवा नाही दिलीस काय! एकच झालं ना? लग्नच करायचं आहे ना? लग्न करून नवऱ्याच्या घरीच तर जायचं आहे. पास झालीस तर ठीकच आहे आणि समजा नाही झालीस तरी कोणी तुला सुळावर लटकवणार नाही..”


माईच्या या बोलण्यावर विनायक आणि आदित्य आपलं हसू थांबवू शकले नाहीत. अनघा मात्र ईश्वरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती. माईच्या बोलण्याने ईश्वरी नाराज झाली होती. तिने मोठ्या आशेनं अनघाकडे पाहिलं पण ईश्वरीला तिच्या डोळ्यात फक्त आगतिकता दिसत होती. सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला अनघा विरोध करण्यास असमर्थ होती. अनघाने ईश्वरीला डोळ्यानेच शांत राहण्यास खुणावलं. चहाचा ट्रे बाहेर घेऊन येत ती माईंना म्हणाली,


“माई, आपली ईशु खूप हुशार आहे. ती पास होणारच.. आपल्या देशमुखांच्या नावाला बट्टा नाही लावू द्यायची आणि आपण हे विसरतोय की, आपली ईशु संपूर्ण देशमुख घराण्यातली एकमेव मुलगी आहे जी इथवर शिकली. पदवीधर झाली. तिच्या दादाने आणि बाबांनी तिला परवानगीच नसती दिली तर काय झालं असतं? आणि म्हणूनच त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांची आब राखण्यासाठी तुझं परीक्षा पास होणं खूप गरजेचं आहे मनू.. लग्न ठरलं म्हणून काय झालं? तुला ग्रॅज्यूएट व्हायलाच लागेल. ही परीक्षा पास व्हावीच लागेल. समजलं का बाळा?”


अनघाच्या बोलण्याने ईश्वरीला धीर आला. तिने होकारार्थी मान डोलावली.


“हो आई.. आणि तुही माझ्यासाठी खूप मेहनत घेतलीस.. मी नक्की पास होणार..”


ईश्वरी जोमानं परीक्षेच्या तयारीला लागली आणि घरातले बाकीचे सर्वजण साखरपुड्याच्या तयारीला लागले. विनायक, आदित्यने बाहेरच्या कामाची म्हणजेच कार्यलयाचं बुकिंग, कॅटर्सची बोलणी, मांडव सजावट ही कामं घेतली. दोन्ही घरांना, पाहुण्यांना सोईचा आणि घराच्या जवळ असलेल्या हॉल साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठीही बुक केला. आदित्यने ओळखीतल्या चांगल्या कॅटर्सशी बोलून घेतलं आणि सरदेसाईचं मत विचारात घेऊन उत्तम मेनू फायनल केला. माईंनी पूजेची तयारी केली. नेहमीच्या गुरुजींशी बोलून साखरपुड्याचा चांगला मुहूर्त काढला. त्यांच्या येण्याची वेळ ठरवून घेतली. अनघा आणि अर्पिताने जवळच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणं दिली. गावावरून ईश्वरीचे दोन्ही काका- काकू, भावंडं आली. घरात मंगलमय, आनंददायी वातावरण होतं. दोन्ही काकांनी घराची रंगरंगोटीचं, सजावटीचं काम हाती घेतलं. दोन्ही काकूंनी पाहुण्यांचा पाहुणचार, त्यांच्यासाठी भेटवस्तू, मानपान आणि बस्ता बांधण्याचं काम हाती घेतलं. ईश्वरीच्या दागिन्यांची, कपड्यांची खरेदी करण्यात आली. 


सरदेसाईंच्या घरी सुद्धा वर्दळ वाढली होती. पाहुणे येऊ लागले होते. आज साखरपुड्याच्या खरेदीला जायचं होतं. उद्या देशमुखांकडे साखरपुड्यासाठी जायचं होतं. 


“अगं आवरलं का तुझं? स्वराज आला का? चला लवकर..त्याच्या पसंतीनेच ईश्वरीची अंगठी फायनल करू..”


सरदेसाईनी स्वराजच्या आईला आवाज दिला.


“अहो, पण स्वराज कुठे आलाय घरी.. त्याला आज ऑफिसवरून यायला उशीर होणार आहे. खूप काम आहे म्हणे.. तुम्ही तुमच्या पसंतीने आणा म्हणाला आहे. आपण जाऊया.. आपली पसंती त्याला आवडेलच.. आता ईश्वरी नाही का आवडली?”


स्वराजची आई हसून म्हणाली.


“अगदी खरं बोललीस आई आणि ईश्वरी खरंच गोड मुलगी आहे.. आपल्या स्वराजला चांगलं संभाळून घेईल.” 


स्वराजचा मोठा भाऊ सार्थक आपल्या पत्नीसह त्याच्या खोलीतून बाहेर येत म्हणाला.


“सूनबाई, मानापानाच्या आहेराची यादी बनवलीस ना? उद्या आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे. वरपक्षाने द्यायच्या साहित्याची ही यादी बघ.. येताना घेऊन यायचं आहे. आधी सोनाराकडे जाऊ मग खरेदीला.. चला लवकर..”


स्वराजची आई आपल्या मोठ्या सुनेला म्हणाल्या. 


“हो आई, सगळं नीट लक्षात माझ्या आणि भावोजी कुठेत? काय हे? सारखं काम काम.. उद्या तरी वेळेवर येणार आहेत की नाहीत? की स्वतःच्याच साखरपुड्यात नवरामुलगाच गायब..”


स्वराजची वहिनी गायत्री मिश्किलपणे हसून म्हणाली तसं शालिनीताईंनी, स्वराजच्या आईने तिच्याकडे रागानं पाहिलं. तिने पटकन मान खाली घातली. सरदेसाईंनी सर्वांकडे पाहिलं आणि निघण्याची खूण केली. सर्वजण गाडीत बसून खरेदीसाठी बाहेर पडले. सर्वात आधी ईश्वरीसाठी, साखरपुड्यासाठी कांजीवरम साडी, पायातलं पैंजण, सोन्याचे एअरिंग्स, हिऱ्यांची अंगठी घेतली. स्वराजसाठी सफेद रंगाचा सलवार कुर्ता घेतला. पूजेचं साहित्य, पाच फळं, नवीन वस्त्र, पाहुण्यांना आहेर.. सारी खरेदी झाली. सर्वजण खूप आनंदात होते.


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्वजण हॉलवर जमा झाले. देशमुखांच्या पाहुण्यांची वर्दळ वाढू लागली होती. सोसायटीमधले शेजारीपाजारी सर्वजण त्यांच्या मदतीला धावून आले होते. आदित्यचे मित्र मदतीला हजर राहिले. सर्वांनी मिळून फुलांनी स्टेज सजवला होता. गुरुजीही पूजेची तयारी करत होते. अर्पिता,विभा, अर्चना, ईश्वरीच्या बाकीच्या मैत्रिणी ईश्वरीला तयार करत होत्या. थोड्याच वेळात सरदेसाईंची कार दारात येऊन थांबली. पाहुणे खाली उतरले. कोणीतरी जोरात ओरडलं,


“मुलाकडची माणसं आली वाटतं.. नवरा मुलगा किती रुबाबदार.. कसला हँडसम दिसतोय ना!”


ईश्वरीच्या मनात आनंदाचे तरंग उठत होते. त्याला पाहण्यासाठी तिचं मन अधीर झालं होतं. उधाणलेल्या मनाला आवर घालत ती तशीच बसून राहिली. विभा, अर्चना तिला स्वराजवरून चिडवत होत्या. पांढऱ्या रंगांच्या सलवार कुर्त्यात स्वराज खूपच छान रुबाबदार दिसत होता. विनायक, आदित्यने पाहुण्यांचे स्वागत केलं आणि पाहुण्यांना आत समोर मांडलेल्या खुर्च्यात बसायला सांगितलं. स्वराजच्या आईने गणपती पूजन आणि कन्यापूजनासाठी आणलेलं पूजेचं साहित्य अनघाच्या हाती दिलं. ईश्वरीसाठी आणलेली साडी, कानातले, पैंजण तिला घालायला संगितलं. अनघाने पूजेचं साहित्य माईंच्या हाती सोपवून बाकीचं अर्पिताला ईश्वरीला घालण्यासाठी दिलं. 


“गुरुजी, आता वेळ दवडू नका.. पूजेला सुरुवात करा..”


पूजेचे सामान गुरुजींना देत माईं म्हणाल्या. गुरुजींनी मान डोलावली आणि पूजेला सुरुवात केली. सार्थक आदित्यला पूजेच्या पाटावर बसवून शेजारी उभा राहिला. गुरुजींनी ईश्वरीला घेऊन यायला सांगितलं. अनघाने अर्पिताला खुणावलं. अर्पिता ईश्वरीच्या खोलीत आली. ईश्वरीला पाहून क्षणभर थबकली..


“किती गोड दिसते गं.. नजर नको लागायला कोणाची.. चला लवकर बाहेर गुरुजी बोलवताहेत..”


असं म्हणून अर्पिता ईश्वरीला घेऊन बाहेर आली.


जांभळ्या रंगाच्या भरजरी पैठणीत ईश्वरी खूपच गोड दिसत होती. निळ्या खड्यांचा डायमंड नेकलेस, त्यावर कानात सोन्याचे लोंबणारे इअरिंग्स,नाकात घातलेली सोन्याची नथ, दंडावर विराजित बाजूबंद, कमरेला शोभून दिसणारा कमरबंद तिच्यावर उठून दिसत होता. हातात चढवलेल्या हिरव्या रंगांच्या बांगड्या, नाजूक ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक, डोळ्यातून फिरवलेली काजळ कांडी, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, केसात माळलेले मोगऱ्यांचे गजरे तिच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होते. तिच्या येण्याची चाहूल देणारं तिच्या पायातलं चांदीचं नाजूक पैंजण, कमरेला मोठ्या तोऱ्यात बसलेला चांदीचा छल्ला तिच्या सौन्दर्यांची जणू पाखरण करत बसले होते..


“ओहो.. सुंदर..व्वा.. सुरेख..”


वरपक्षातील पाहुण्यांपैकी कोणीतरी बोललं. सर्वांच्या नजरा ईश्वरीच्या दिशेने वळल्या. स्वराजने तिच्याकडे पाहिलं. ती खूपच मोहक दिसत होती. एखाद्या परीकथेतील राजकुमारीसारखी सुंदर.. सर्वांच्या नजरा ईश्वरीवरच खिळून होत्या. स्वराजला इतकी छान मुलगी मिळाली म्हणून काहीजण स्वराजचं अभिनंदन तर काहीजण कौतुक करत होतं. ईश्वरीला स्वराजच्या शेजारी आणून बसवलं. साखरपुड्याचा विधी सुरू झाला. स्वराजच्या आईने ईश्वरीसाठी आणलेली अंगठी स्वराजच्या हाती दिली आणि अनघानेही ईश्वरीच्या हाती स्वराजला घालण्यासाठी अंगठी दिली. दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घातली. एकमेकांना मिठाई भरवली. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दोघांना नवीन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वराज आणि ईश्वरी हसून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते. देशमुख कुटुंबियांनी खूप उत्तम पद्धतीने पाहुण्यांचा पाहुणचार केला होता. जेवणाची उत्तम सोय केली होती. मोठ्या थाटामाटात ईश्वरी आणि स्वराजचा साखरपुडा संपन्न झाला.पुढे काय होतं? ईश्वरीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ दबा धरून बसलं होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे (अनुप्रिया) 


🎭 Series Post

View all