पुन्हा बरसला श्रावण.. भाग २२

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या तिच्या एका श्रावणाची.. त्याच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..


पुन्हा बरसला श्रावण..

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, ईश्वरीचं लग्न ठरल्याची बातमी अर्चनाने सर्व मित्रमैत्रिणीत सांगितली. सर्वांना आश्चर्यमिश्रित आनंद झाला. आराध्या आणि श्लोक यांना त्यांच्या भूतकाळातल्या जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. ईश्वरीने केलेल्या कष्टाची, चांगल्या मैत्रीपूर्ण वागण्याची त्यांना आठवण होत होती. ईश्वरी घरी परतल्यानंतर आईने स्वराजचा फोन आल्याची आणि तो घरी येणार असल्याची बातमी दिली. संध्याकाळी स्वराज घरी आला. अनघा, माईंनी त्याचं यथार्थ स्वागत केलं. घरात स्वराजला पाहून विनायक आणि आदित्यला आश्चर्य वाटलं. आता पुढे..

भाग २२

“हो.. हो.. सगळं ठीक आहे. आई बाबा एकदम मजेत आहेत. मी सहजच आलो होतो. माझा मित्र याच परिसरात राहतो म्हणून म्हटलं आलोच आहोत तर भेटून जावं.”

स्वराज आदित्यकडे पाहून म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून आदित्य आणि विनायकच्या मनावरचं दडपण कमी झालं.

“अच्छा.. असं आहे होय.. आम्हाला वाटलं की काही प्रॉब्लेम झालाय.. निवांत बसा.. माई, यांच्या चहापाण्याचं पाहिलंय का?”

विनायकने सोफ्यावर बसत माईला विचारलं. माईंनी होकारार्थी मान डोलावली. विनायक सोफ्यावर बसताच ईश्वरी उठून शेजारी उभी राहिली. आईने आदित्य आणि विनायकसाठी चहा आणि नाश्ता आणला. नाश्ता करत ते दोघेही स्वराजशी गप्पा मारू लागले. स्वराज त्यांच्या बोलण्याला फक्त हुंकार भरत होता. बराच वेळ झाला तरी त्यांचं बोलणं संपेना. स्वराजची चुळबुळ सुरू झाली. ज्या कामासाठी तो आला होता ते काम झालं नव्हतं. त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. बराच उशीर झाला होता. इतक्यात माई बाहेर आल्या. स्वराजची अस्वस्थता त्यांच्या लक्षात आली. त्या स्वराजकडे पाहून म्हणाल्या,

“जावईबापू, तुम्हाला ईशुशी काही बोलायचं होतं नां?”

स्वराजने मान हलवून होकार दिला. माईंच्या वाक्यावर प्रश्नार्थक मुद्रेने विनायकने स्वराजकडे पाहिलं. जणू काही स्वराजने जगावेगळी मागणी केली होती. मोठी माणसं घरात असताना एकटीशी तिच्यासोबत काय यांना वेगळं बोलायचंय? असाच त्याच्या नजरेचा रोख होता. माईंनी आदित्यला आत येण्यासाठी खुणावलं.

“हो, चालेल बोला नं तुम्ही.. काही हरकत नाही.. बाबा आपण आत जाऊन बसू.. दोघांना बोलू दे..

असं म्हणून आदित्यने बाबांना आत यायला सांगितलं. विनायकने नाखुशीने आदित्यकडे पाहत आत जाण्यासाठी जागेवरून उठला. इतक्यात स्वराजच्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. माथ्यावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले. त्याने कॉल घेतला.

“हो.. तू तिथेच थांब..मी आलोच लगेच..”

असं म्हणून त्याने कॉल कट केला. विनायक आणि आदित्यला थांबवत म्हणाला,

“सॉरी बाबा, मला निघावं लागेल. इमर्जन्सी आहे. माझा मित्र माझी वाट पाहतोय.. मी नंतर बोलेन तिच्याशी.. कॉल करेन तसा.. चला मी निघतो.”

असं म्हणून स्वराज जागेवरून उठला. विनायकला हायसं वाटलं.

“असं काय ईश्वरीशी गुपचूप बोलायचं होतं? जे काही बोलणं असेल ते आमच्यासमोर व्हायला हवं. असं नाही चालत आमच्या देशमुख समाजात.. मुलींनी लग्नाआधी असं नवऱ्या मुलाशी बोलणं बरोबर आहे का? आम्ही कुठे बोललो होतो? नाही नां.. आदीच्या आईचं तोंड तर मी डोक्यावर अक्षता पडल्यावर, अंतरपाट बाजूला झाल्यावरच पाहिलं होतं. मग यांना काय बोलायचंय? जे काही एकांतात बोलायचं असेल ते लग्नानंतर.. आता नाही.. आता पटकन त्यांच्या घरी जाऊन सोयरीक जमवून टाकतो. एकदाचं का हे लग्न उरकलं तर मग बसा बोलत म्हणावं हवा तितका वेळ कोणी तुम्हांला अडवणार नाही.”

विनायक मनातल्या मनात बडबडला. माई, अनघा स्वराजला निरोप देण्यासाठी बाहेर बाहेर आल्या.

“चला निघतो मी..”

असं म्हणून त्याने सर्वांचा निरोप घेतला. जाताना त्याने एकदा ईश्वरीकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. ईश्वरीने पटकन दुसरीकडे पाहिलं. स्वराज निघून गेला. विनायक आदित्यला म्हणाला,

“आदी, आपल्याला लवकरात लवकर सरदेसाईंच्या घरी जावं लागेल. लगेच आपण पुढच्या गोष्टी ठरवून टाकू. आपल्यात अजून काही ठरलं नाही. काहीच बोलाचाली नाही. चर्चा नाही. एकतर आपली मुलीची बाजू.. म्हणजे पडती बाजू.. जपूनच वागावं लागेल. उद्या जर त्यांनी आपल्या स्थळाला नकार दिला आणि हे असेच भेटत राहिले तर आपल्यालाच अडचण होईल. उगीच असं येणंजाणं नको. लोक नावं ठेवतील. निदान साखरपुडा तरी व्हायला हवा.”

आदित्यने मान डोलावली. माईंना आणि अनघालाही त्याचं म्हणणं पटलं.

“हो चालेल.. उद्या रविवार आहे उद्याच जाऊ. मी त्यांना आपण त्यांच्या घरी येणार असल्याचं फोन करून कळवलं होतं. फक्त कधी ते सांगितलं नव्हतं. लगेच कॉल करतो त्यांना.. आई, माई तुम्ही त्यांच्या मानपानाचं पहा.. उद्या जाताना सोबत घेऊन जायचं आहे. आई, तू माईच्या सांगण्याप्रमाणे यादी तयार कर.. सगळं आहे की नाही हे नीट तपासून पहा.. काही आणायचं असेल तर सांग मी सांगतो अर्पिताला. ती आता ऑफिसमधून निघाली असेल येता येता आणेल.”

अनघाकडे पाहून आदित्य म्हणाला. तिने त्याला ‘सगळं ठीक होईल. तू निश्चिन्त रहा.’ असं डोळ्यांनीच खुणावून सांगितलं. आदित्यने टेबलवरचा मोबाईल उचलून सरदेसाईंना फोन केला आणि उद्याच्या त्यांच्या भेटीची वेळ ठरवून टाकली. अनघा माईंनी सांगितलेल्या वस्तूंची यादी बनवू लागली. ईश्वरी तिथेच एका कोपऱ्यात उभी होती. कोणीही तिची इच्छा, मर्जी विचारत नव्हतं. सर्वांनी ईश्वरीच्या लग्नाचा जणू चंगच बांधला होता. ईश्वरी निमूटपणे तिच्या खोलीत निघून गेली. स्वराज काहीच न बोलता निघून गेला म्हणून ती थोडी नाराज झाली. तिला स्वराजशी बोलायचं होतं. तिच्या पुढच्या शिक्षणाबद्दल विचारायचं होतं.

“का आला असेल बरं तो? काय सांगायचं असेल त्याला? तो असा अचानक का गेला असेल? काय झालं असेल?”

ईश्वरीच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. मनात विचाराचं वादळ घोंगावू लागलं.

“ईश्वरी, काय गं झालं हे? का मुलगी असण्याची ही शिक्षा? किती कष्टाने तू शिकलीस! किती संघर्ष केलास तुझं तुलाच माहित! या शिक्षणाच्या ध्यासापाई तू आप्पांचा रोष पत्करला होता. दहावी पास झाल्यावरच त्यांनी तुझ्यासाठी मुलगा पहायला सुरुवात केली होती. पहिल्यांदा तू त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. कोणालाही न जुमानता तू घरापासून दूर श्रीवर्धनला रघुमामाच्या गावी गेलीस. आईपासून पहिल्यांदाच दूर राहिलीस.. मामी काळजी घेत होती पण तरीही तुला आईची खूप आठवण यायची. मनावर दगड ठेवून तू मामाकडे राहिलीस. तब्बल दोन वर्षे! ज्याच्यासाठी इतका अट्टहास केला ते तुझं शिक्षण आता संपुष्टात येणार.. हे लग्न झालं की तुझं शिक्षण थांबणार.. तुझ्या सी. एस. होण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागणार.. मग कसलं शिक्षण आणि कसलं करियर? सगळं विसरावं लागेल तुला.. का असं? तेंव्हा आप्पांना ठामपणे सांगितलं होतंस तसं आता का नाही सांगू शकत? का इतकी हतबल तू?

ईश्वरीच्या मनात नाना विचार थैमान घालत होते. काय करावं तिला सुचत नव्हतं. बराच वेळ ती तशीच तिच्या खोलीत बसून राहिली. आईने तिला जेवणासाठी आवाज दिला.

“ईशु, ए ईशु.. जेवायला ये चल..”

आईच्या आवाजाने ईश्वरी भानावर आली. बाहेर येऊन तिने भूक नसल्याचं सांगितलं आणि पुन्हा तिच्या खोलीत येऊन बसली. बाकीच्या सर्वांची जेवणं उरकली. त्यानंतर थोड्या वेळात आई ईश्वरीसाठी जेवणाचं ताट घेऊन तिच्या खोलीत आली. ईश्वरी पलंगावर डोळे मिटून पडली होती. बंद डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या.

“ईशु, उठ चल.. थोडं खाऊन घे..”

आईने आवाज दिला.

“आई, मला भूक नाहीये..” - ईश्वरी

“हो.. कळलं मला.. तरीही उठ आणि थोडं खाऊन घे.”

आईने ईश्वरीच्या हाताला धरून उठवून बसवलं. नाखुशीनेच ईश्वरी उठून बसली.

“काय झालं बाळा? अशी का नाराज? असा जेवणावर राग काढू नये. अन्नाचा अपमान करू नये. चल दोन घास खाऊन घे.”

ईश्वरीच्या डोळ्यातून मेघ बरसू लागले.

“आई मला अजून शिकायचंय गं.. मला इतक्यात नाही लग्न करायचं. तू सांग नां बाबांना.. आई, आजवर तू नेहमी मला साथ दिलीस. माझ्या शिक्षणासाठी माझ्यामागे ठामपणे उभी राहिलीस. माझ्यामुळे बाबांनी, आप्पांनी पदोपदी केलेला अपमान सहन केलास. तुला त्यांची बोलणी खावी लागली. इतकं असूनही तू कायम माझ्या पाठीशी उभी राहिलीस मग आताही साथ दे आई.. तूच माझा आधार आहेस. तूच मला समजून घेऊ शकतेस. फक्त अजून दोन वर्षे.. ही दोन वर्षे माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. हे झालं की सगळं नीट होईल. लग्न झालं की नाही होणार काही. सगळी स्वप्नं संपून जातील. मला माझं करियर करू दे आई.. या नंतर मी तुला काहीच मागणार नाही. प्लिज आई, हे लग्न थांबव. तू बाबांना, दादाला समजून सांग नां.. प्लिज आई.. इतकं माझ्यासाठी कर नां..”

ईश्वरी आर्जवे करत होती. अनघाचेही डोळे पाणावले. तिला घास भरवत ती म्हणाली,

“ईशु, आजवर मी तुला साथ दिली. तुझ्या शिक्षणासाठी ठामपणे तुझ्या पाठीशी उभी राहिले. त्यामागे बरीच कारणं आहेत. बाळ, मला शिक्षणाचं महत्व माहित होतं. शिक्षणच आपल्याला संस्कारी बनवेल. कुटुंबाला सुशिक्षित बनवेल. घरातली एक स्त्री शिकली की सारं कुटुंब शहाणं होईल. हे ठाऊक होतं मला. लहानपणापासून मला शिक्षणाची आवड होती पण घरची परिस्थिती बेताची होती. त्यात खाणारी तोंडं जास्त. तुझ्या आजोबांची फार परवड व्हायची आणि पूर्वी फार लहान वयात लग्न व्हायची मग काय.. तुझ्या बाबांचं स्थळ आलं आणि अवघ्या चौदाव्या वर्षी माझं लग्न झालं. माझं शिक्षण थांबलं. माझी सारी स्वप्नं अपूर्ण राहिली. तेंव्हा वाटलं होतं लग्नानंतर माझी शिकण्याची इच्छा पूर्ण होईल पण संसाराच्या नादात, कुटुंबाच्या जबाबदारीमुळे शिकण्याची इच्छा मागे राहिली. त्यात तुझ्या बाबांचीही साथ कधी मिळाली नाही.”

बोलता बोलता अनघा क्षणभर थांबली. डोळ्यातलं पाणी पुसत ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

“ईशु बेटा, तुझा जन्म झाला नं तेंव्हा सर्वात जास्त आनंद मला झाला होता. मी तेंव्हाच ठरवलं होतं. मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. माझी सारी स्वप्नं अर्धवट राहिली पण मी माझ्या मुलीला खूप शिकवेन. माझी सारी स्वप्नं मी तुझ्यात पाहत होते. माझ्या शिक्षणाची आवड तुझ्या रूपाने पूर्ण करत होते. ईशु, माझी इच्छा पूर्ण झाली नाही कारण तुझे बाबा.. त्यांनाच कधी माझं शिकणं आवडलं नव्हतं. घराच्या स्त्रियांचं ज्ञान, हुशारी फक्त स्वयंपाकघरापुरतीच मर्यादित असते असं त्यांना वाटायचं. तेंव्हाचा काळही तसाच होता. जाऊ दे.. जे घडून गेलंय ते आता बदलता येणार नाही पण आता जमाना खूप बदललाय. आधुनिक बदल होतोय. बाळ, एक सांगू? यावेळीस तुझ्या बाबांचं, दादाचं काही चुकलेलं नाही. त्यांची निवड योग्यच आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवाने सांगते, स्वराज खूप चांगला मुलगा आहे. नव्या दमाचा, नव्या विचारांचा मुलगा आहे. तुझ्या बाबांसारखा संकुचित विचारांचा मुळीच नाही. तसुभरही त्याच्यात पुरुषी अहंकार नाही. तो तुला नक्की साथ देईल. तुला समजून घेईल. तुझं पुढचं शिक्षण तो पूर्ण करेल. मला खात्री आहे. बघशील तू.. माझं बोलणं खरं होईल.”

असं हसून म्हणत अनघाने ईश्वरीला ताटातला शेवटचा घास भरवला. बोलता बोलता अनघाने तिला पूर्ण जेवण भरवलं. ईश्वरी आईचं बोलणं ऐकत होती.

पुढे काय होईल? ईश्वरी लग्नाला तयार होईल? ईश्वरीची स्वप्नं स्वराज पूर्ण करू शकेल का? स्वराजला कोणाचा कॉल आला होता? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all