पुन्हा बरसला श्रावण भाग ११३ (अंतिम)

पुन्हा बरसला श्रावण
पुन्हा बरसला श्रावण भाग ११३ (अंतिम)


विनायकने हात जोडून बोलायला सुरुवात केली.

“केळकरसाहेब, मी खरंच तुम्हा दोघा उभयत्यांची हात जोडून माफी मागतो. तुम्ही इतक्या मोठ्या मनाने तुमच्या मुलाचं स्थळ ईशूसाठी घेऊन आलात. माझ्या मुलीचा हात मागितलात, ही आमच्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे; पण साहेब, माझ्या मुलीच्या मनात नसेल तर आम्ही तुमचा प्रस्ताव स्विकारू शकणार नाही. आजवर मी कधीच माझ्या मुलीसाठी काही केलं नाही. तिला कोणतंच सुख दिलं नाही. कधी तिचं मन जपलं नाही. साहेब, आज आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या मुलीच्या मनाचा विचार करतोय. तिला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करतोय. साहेब, माझ्या मुलीला जर शिवराजशिवाय दुसरं कोणाशी किंबहुना तुमच्या मुलाशी लग्न करायचं नसेल तर मी तिच्यावर सक्ती करणार नाही. तिच्या इच्छाविरुद्ध मी पुढे जाणार नाही. प्लिज मला माफ करा साहेब..”

विनायकच्या तोंडून हे शब्द ऐकताच माई, अनघा, आदित्य आणि अर्पितालाही आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता.

“अरे व्वा! आज बाबा आपल्या ईशूशी किती छान वागताहेत! तिच्याबद्दल किती मायेने बोलताहेत! अखेरीस त्यांच्या पोटी जन्मास आलेल्या त्यांच्या लेकीनेच त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणायचं.”

आदित्य स्वतःशीच पुटपुटला. देशमुख कुटुंबियांना खूप आनंद झाला होता. बाबांचं बदलेलं रूप पाहून ईश्वरीला खूप नवल वाटत होतं.

“मद्याचा एक घोटही न घेता बाबा माझ्याबद्दल इतकं चांगलं कसं काय बोलताहेत? त्यांच्यात झालेला हा कायापालट सर्वांसाठीच एक सुखद धक्का असणार आहे. सकारात्मक विचारांची जपवणूक हीच तर खऱ्या अर्थाने नवीन पर्वाची नांदी असू शकणार आहे.”

ईश्वरी आनंदाने स्वतःशीच बडबडली. भिंतीवरच्या घड्याळाचा काटा जसंजसा पुढे सरकत होता तसंतसं सर्वाची उत्कंठा वाढत होती. केळकरसर काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“थांबा, मी पाहते..”

असं म्हणून ती दाराच्या दिशेने वळली आणि तिने दार उघडलं. समोर पाहते तर काय! शिवराज गोड स्माईल देत दारात उभा होता.

“तू? इथे?”

त्याला समोर पाहून ईश्वरी जवळजवळ उडालीच. तिला कसलीही कल्पना न देता निघून गेलेला शिवराज अचानकपणे तिच्या समोर उभा होता. त्याच्या अचानक निघून जाण्याने ती आधीच खूप दुखावली गेली होती. शिवराजवरचा रागही उफाळून येत होता आणि तो परत आलेला पाहून तिला खूप आनंदही होत होता. मनात संमिश्र भाव दाटून आले. ईश्वरीला घरातल्या तिच्या माणसांचा, परिस्थितीचा विसर पडला आणि अधीर होऊन तिने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

“कुठे गायब झाला होतास? मला सांगितलंही नाहीस. मला कॉल केला नाहीस. मी केला तर उचलला नाहीस. का शिवराज? इतकं परकं केलंस मला?”

तिच्या डोळ्यात दाटून आलेली आसवं त्याला जाब विचारत होती.

“अगं हो.. हो.. मला आत तर येऊ देशील की नाही? की तुझे सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस?”

शिवराज मिश्किलपणे हसून म्हणाला. त्याच्या त्या वाक्याने ईश्वरी भानावर आली. आपले आईबाबा, माई, दादावहिनी केळकरसर आणि त्यांच्या मिसेस समोर आहेत याची तिला आठवण झाली. चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ सांभाळत तरीही ती पुन्हा चिडून म्हणाली,

“का? आता कशाला आला आहेस? कोणी आमंत्रण दिलं होतं तुला? तुझ्या जाण्याने कोणाला काहीच फरक पडलेला नाही. समजलं?”

तिच्या डोळ्यातल्या आसवांनी अखेर विद्रोह केलाच.

“तेच सांगायचंय गं. आधी घरात तरी येऊ देशील? मग मला हवं तेवढं रागव. मग तर झालं? प्लिज ना मिस. फुलझडी..”

शिवराज तिला अजूनच चिडवत हसून म्हणाला. लटक्या रागाने त्याच्याकडे पाहत तिने त्याला खुणेनेच आत यायला सांगितलं. पायतले शूज दाराबाहेरच्या शूरॅकमध्ये काढून ठेवत तो आत आला. ईश्वरी त्याला हॉलमध्ये घेऊन आली. त्याने सर्वांना हसून नमस्कार केला. शिवराजला पाहून प्रत्येकजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागला.

“आई, बाबा.. मी ओळख करून देते. हा के. शिवराज. आमच्या कंपनीत अकाउंट्स, फायनान्स आणि मार्केटिंग तिन्ही विभागाचा हेड आहे. खूप चांगलं काम करतो. खूप आत्मविश्वासाने सगळे व्यवहार पार पाडतो. आणि ना.. त्याचं वागणं बोलणं इतकं इंप्रेसिव्ह आहे ना.. काय सांगू!”

ईश्वरी शिवराजबद्दल भरभरून सांगत होती. तो परत आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. विनायक तिला मधेच थांबवत उदगारला,

“अगं पण हाच तर..”

“हो, हाच तो शिवराज.. ज्याच्यामुळे तुमच्या नंदिनीने माझ्या सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि गुणी रुबाबदार मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.”

विनायकला मधेच अडवत केळकरसर म्हणाले तसं ईश्वरी गोंधळून गेली. आतापर्यंत इतके दिवस शिवराजपासून त्याच्याबद्दलची मनात लपवून ठेवलेली भावना अशा रितीने केळकरसरांमुळे शिवराजसमोर उघडकीस आली होती. जणू तिची चोरी पकडली गेली होती. तिला काय बोलावं कळेना. तिची उडालेली त्रेधातिरपीट पाहून शिवराज मात्र गालातल्या गालात हसत होता. मनोमन सुखावला होता. जो तो भांबवलेल्या नजरेने केळकरसरांकडे पाहत होता. अजूनही कोडं उलगडलेलं नव्हतं. शिवराजने समोर उभे असलेल्या केळकरसरांकडे आणि त्यांच्या मिसेसकडे पाहून हसून अभिवादन करत विचारलं,

“अरे बापरे! काय सांगता? तुमच्या हरहुन्नरी मुलाला नंदिनीने नकार दिला? का असं केलंस तू नंदिनी? आणि तेही माझ्यामुळे? मी काय केलं बुवा?”

त्याला असं खांदे उडवत मिश्किलपणे बोलताना पाहून ईश्वरीचा पारा अजूनच चढला. त्याच्यावर डाफरत तिने त्याला विचारलं,

“त्याआधी तू मला सांग, मला काहीही न कळवता तू असा अचानक मधेच कुठे गायब झाला होतास? आणि माझा कॉल का घेत नव्हतास?”

“त्याशिवाय मला तुझ्या मनातलं प्रेम कसं समजलं असतं? माझ्या नसण्याने तुझ्या मनात निर्माण झालेली ओढ मला कशी जाणवली असती?”

तो खळखळून हसला.

“म्हणजे? काय म्हणायचंय काय तुला? तुला वाटतं तसं काही नाही. उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढून जास्त भाव खाऊ नकोस. समजलं?”

ईश्वरी चाचपडत म्हणाली.

“मिस. फुलझडी, तू मागच्या अर्ध्या तासापासून जे काही बोलत होतीस, ते सर्व मी ऐकलंय.”

तो पुन्हा हसला. ती लाजून गोरीमोरी झाली तरी उसणं अवसान आणून म्हणाली,

“काय? काहीही.. मी काही बोललेच नाही.”

ईश्वरीची भांबावलेली अवस्था पाहून शिवराजला गंमत वाटत होती आणि तो तिला अजूनच चिडवू लागला. इतका वेळ शांत बसलेला आदित्य गोंधळलेल्या अवस्थेत पुढे येत म्हणाला,

“केळकरसर, आम्हाला कळेल का, हा काय मामला आहे हा? मगाशी तुमच्या मिसेसनी मोबाईलमध्ये दाखवलेल्या फोटोमध्ये तर हाच मुलगा होता. काय चाललंय खरंच काहीच कळत नाहीये मला.”

आदित्यचं बोलणं ऐकून ईश्वरीने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन जवळजवळ किंचाळतच विचारलं,

“काय? हे काय बोलतोयस दादा?”

“बरोबर बोलतोय आदित्य.. नंदिनी, माझा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हा शिवराजच आहे. ”

केळकरसरांनी सत्याचा उलगडा केला. त्यांचं वाक्य ऐकून आता फक्त तिला भोवळ येण्याचीच बाकी होती.

“होय, मी के शिवराज म्हणजेच शिवराज केळकर.. नाम तो सुना ही होगा|”

दोन्ही हात पसरवत फिल्मी स्टाईलमध्ये शिवराज म्हणाला.

“नौटंकी कुठला! जरा शांत राहशील?”

केळकरसर त्याच्याकडे पाहून हसले आणि त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.

“हा शिवराज म्हणजे माझा मोठा मुलगा. उच्च शिक्षण संपवून तो भारतात परतला; पण बिझनेस सांभाळण्यासाठी तो तयार झालाय याची मला खात्री वाटत नव्हती. त्यामुळे मग त्याला डायरेक्ट बॉस म्हणून आयती खुर्ची द्यायची नव्हती. ती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत सगळी माहिती असावी लागते म्हणून मग त्याने आधी नोकरी करावी. एम्प्लॉयी बनून लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात. धंद्यातले खाचखळगे त्याला समजावेत. प्रॉडक्ट नॉलेज, माणसांचे स्वभाव, निर्णयक्षमता यांचे त्याला अनुभव यावेत. तो बिझनेस सांभाळण्यासाठी सक्षम व्हावा म्हणून मीच त्याला जॉब करण्याचा सल्ला दिला. त्याला आपल्याच ऑफिसमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी जॉईन करून घेण्याचं ठरवलं; पण एक अडचण होती. तो माझा मुलगा आहे हे समजल्यावर लोकांपर्यंत त्याला सहज पोहचता आलं नसतं. बॉस आणि एम्प्लॉयी ही दरी राहिलीच असती म्हणून मग शिवराजनेच ही गोष्ट गोपनीय ठेवायला सांगितली. स्वतःच्या आडनावाचं इ्निशियल वापरून त्याने सत्य गुलदस्त्यात ठेवलं आणि एक ट्रेनी बनून एम्प्लॉयीसारखा तुमच्यात मिसळून गेला. तुम्हीही त्याला तसंच ट्रीट केलंत. सहा महिने पूर्ण झाले आणि मला तो बिझनेस सांभाळण्यास तयार झाला आहे अशी मला खात्री वाटू लागली. मग माझ्या सांगण्यावरून त्याने अकॉउंट्स अँड फायनान्स हेड या पदाचा राजीनामा दिला. तू त्याला आवडतेस हे त्याने आम्हा दोघांना एकत्रपणे सांगून टाकलं. तुला तुझ्या भूतकाळासकट स्वीकारून तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आम्हाला तर तू आधीपासूनच आवडत होतीस. आमची त्याला परवानगी होतीच. आम्ही विचार केला, तुझे आईबाबा पुण्यात आलेच आहेत तर मग तुला मागणीच घालावी म्हणून आम्ही तुझ्या घरी आलो. आणि हं.. अजून एक महत्वाची गोष्ट, तू परत आल्यावर तो डायरेक्टर म्हणून तुझ्यासमोर यावा आणि तुला एक छान सरप्राईज द्यावं असा आमचा प्लॅन होता; पण नंदिनी, अचानक गायब होण्याची योजना या शिवराजनेच आखली. का ते माहित नाही. आता तुच ठरव तुला अशा चंचल शिवराजशी लग्न करायचंय की आमच्या लाडक्या सुपुत्राशी? चॉईस ईज युवर्स..”

केळकरसरांनी हसून तिला प्रश्न केला. त्यांनी एका दमात सारं बोलून टाकलं आणि सर्व गोष्टींचा उलगडा केला. इतक्यात मिसेस केळकर ईश्वरीकडे पाहत हसून म्हणाल्या.

“नंदिनी, मी मगाचपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते; पण शिवराजच्या बाबांनी मला अडवलं. आणि खरं सांगू का? तू माझ्या मुलाबद्दल इतकं छान बोलत होतीस नं की, मला फक्त तुला ऐकत राहावंसं वाटलं. माझा मुलगा इतका गुणी आहे हे आम्हा दोघांनाही माहित नव्हतं बरं!”

त्या खळखळून हसल्या आणि पुढे म्हणाल्या,

“मी मगाशी तुझ्या आईबाबांना, दादा वहिनीला शिवराजचाच फोटो दाखवत होते. त्याच्याबद्दलच सांगत होते. पण तुझ्या मनात शिवराजविषयीच्या भावना इतक्या प्रबळ होत्या की, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तुझी वहिनीही तुला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण तू पाहण्यास साफ नकार दिलास. तुझ्या बाबांनी आमच्या मुलाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलवायला सांगितलं तेंव्हा मी माझ्या शिवराजलाच फोन केला आणि त्याला इथे यायला सांगितलं. शिवराजने मला माझा फोन तसाच चालू ठेवायला सांगितला. मी कॉल कट न करता मोबाईल तसाच हातात धरून ठेवला आणि त्यामुळे तुझं सगळं बोलणं त्याच्या कानावर पडत होतं. आणि त्यामुळे नंदिनी, शिवराजला आता सगळं समजलंय.”

मिसेस केळकरांच्या तोंडून सारा वृत्तांत ऐकल्यावर ईश्वरीने लाजून खाली मान घातली.

“नंदिनी, मी मुद्दाम तुला उलटसुलट प्रश्न विचारत होतो. शिवराजविषयी काही बाही खोटंच बोलत होतो. खरंतर मी तुझी परीक्षाच घेत होतो. संपत्ती, पैसा ऐश्वर्य याला भुलून तू माझ्या मुलाशी लग्न करायला तयार झाली असतीस तर मात्र मी नक्कीच विचार केला असता; पण नंदिनी, मला तुझा प्रामाणिकपणा दिसला. तुझं शिवराजबद्दलचं प्रेम जाणवलं. त्याची जन्माची जोडीदार म्हणून तुच योग्य आहेस. आमच्या किंबहुना आमच्या मुलाच्या निवडीचा आज आम्हाला खरंच अभिमान वाटतो. त्याने जोडीदार म्हणून सुयोग्य मुलगी निवडलीय.”

मंजिरी पुढे येऊन ईश्वरीच्या गळ्यात पडून आनंदाने म्हणाली,

“नंदू, अभिनंदन डियर.. बेस्ट सरप्राईज मिळालं. मला खूप खूप आनंद झालाय यार.. तुम्ही दोघं एकमेकांसाठी खरंच खूप अनुरूप आहात. खूप शुभेच्छा..”

ईश्वरी गालातल्या गालात हसली; पण लगेच दुसऱ्या क्षणाला गंभीर होतं तिने शिवराजला प्रश्न केला,

“शिवराज, तू माझ्याशी लग्नाचा विचार सहानुभूती म्हणून तर करत नाहीस ना? समाजप्रबोधन वगैरे असं काही डोक्यात नाही ना? तसं तुझ्या मनात काही असेल तर आताच सांग. मला कोणाची सहानुभूती नकोय. उपकार नकोत मला. मी एकटीही जगू शकते. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच क्लियर केलेलं बरं..”

ईश्वरीचे डोळे पुन्हा भरून आले. तिचा स्पष्टोक्तीपणा पाहुन शिवराजला तिचं कौतुक वाटलं.

“नंदू, मला तू पाहता क्षणीच आवडली होतीस; पण सुरुवातीला आपल्यात खटके उडत होते. माझी चिडचिड होत होती; पण मंजुच्या पार्टीत योगिनीकडून मला तुझा भूतकाळ समजला. आणि अचानक मला तुझ्या विचित्र, फटकळ वागण्यामागचं कारण समजलं. मग हळूहळू तुझा स्वभाव समजत गेला. दिवसागणिक तू मला अधिकच आवडू लागलीस. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. तुझी ओढ वाटू लागली. जेंव्हा तू सुट्टीवर गेलीस ना, तेंव्हा मला समजलं की, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचंय. तुला भरभरून सुख द्यायचंय. नंदू, माझ्याशी लग्न करशील?”

शिवराजने मान झुकवून खाली वाकत प्रश्न केला. ती फक्त हसली. इतक्यात तिला काहीतरी आठवलं आणि क्षणभर थांबून ती शिवराजला म्हणाली,

“शिवराज, माझ्या निर्णयात माझ्या आईबाबा, दादावहिनी, माई यांच्या इतकंच अजून एका व्यक्तीची अनुमती महत्वाची आहे. माझ्या आईबाबांनी मला जन्म दिला. दादावहिनीच्या छत्रछायेखाली मी वाढले. त्यामुळे माझ्या आयुष्याचा चांगला वाईट निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहेच पण जरी यांची परवानगी मिळाली तरी त्या एका स्पेशल व्यक्तीच्या परवानगीशिवाय मला पुढे जाताच येणार नाही.”

“कोण? कोण आहे ती व्यक्ती? कोणाबद्दल बोलतेयस तू?”

शिवराजसह सर्वांनाच हा प्रश्न पडला होता.

“माझ्या सासूबाई, माझी दुसरी आई, शालिनीताई सरदेसाई.. जन्मदातीपेक्षा त्यांनीच मला जास्त जीव लावलाय. मला संकटसमयी साथ दिलीय. त्यांच्या अनुमतीशिवाय मला काहीच करता येणार नाही. त्यांची परवानगी तर लागेलच.”

तिने शिवराजला स्पष्टपणे सांगितलं.

“हो नक्कीच.. आपण त्यांना विचारूनच पुढंचं पाऊल टाकू.”

शिवराजने हसून ईश्वरीच्या डोळ्यात पाहून तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतून गेल्या.

“मग काय म्हणता विनायकराव, जवळचा मुहूर्त पाहून उडवून टाकायचा का यांच्या लग्नाचा बार?”

केळकरसरांनी विनायक आणि अनघाकडे पाहत हसून विचारलं तसं ती दोघं भानावर आले. दोघांच्याही चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. केळकरसरांच्या बोलण्यावर विनायकने होकारार्थी मान डोलावली आणि आनंदाने अनघाकडे पाहत म्हणाला,

“अनघा, इतकी आनंदाची गोष्ट घडतेय. सर्वांचं तोंड गोड करणार की नाही? जा.. सर्वांसाठी काहीतरी गोड बनव पटकन.”

अनघा आनंदाने मान डोलवत पटकन किचनकडे वळली. आज सर्वजण खूप आनंदात होते. बाहेर उनपावसाचा लपंडाव सुरू झाला. रिमझिम श्रावणसरी बरसू लागल्या. आणि आज कित्येक वर्षांनी एका विरहिणीच्या आयुष्यात पुन्हा एकदा श्रावण बरसू पाहत होता. तिचा श्रावण तिला नव्याने भेटत होता.

समाप्त.
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all