पुन्हा बरसला श्रावण भाग १११
केळकरसरांच्या मुलाचा फोटो सर्वांना आवडला होता. मिसेस केळकरांनी आपल्या मुलाला कॉल करून भेटायलाही बोलवलं होतं. मिसेस केळकरांच्या सांगण्यावरून मुलगा अतिशय चांगला, सुशिक्षित, संस्कारी, परदेशात आपलं उच्चशिक्षण घेऊन आलेला होता. केळकरसरांना त्यांच्या बिझनेसमध्ये त्याने नुकतंच जॉईन केलं होतं. इतकं चांगलं स्थळ सांगून आलंय म्हटल्यावर विनायकनेही जुन्या रूढी, परंपरा समाज काय म्हणेल या गोष्टी मागे टाकून त्याने ईश्वरीची साथ देण्याचं ठरवलं होतं. आपल्या मुलीच्या सुखासाठी त्याने तिच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी देण्याचं ठरवलं. आदित्य, अर्पिता, अनघा आणि माई सर्वजण आलेल्या स्थळामुळे आनंदी होते. केळकर कुटुंबीय ईश्वरीच्या भूतकाळासकट तिला स्वीकारायला तयार होते; त्यामुळे देशमुखांकडून नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वजण बोलण्यात गर्क असताना ईश्वरीने त्यांना मध्येच थांबवलं.
“ईशू, काय झालं बाळा? काय बोलायचंय तुला?”
विनायकने प्रश्न केला. सर्वांच्या नजरा तिच्यावरच वेधल्या होत्या. ईश्वरीने सर्वांकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि केळकरसरांकडे पाहून बोलायला सुरुवात केली,
“सर, तुमचा प्रस्ताव माझ्यासाठी खूप धक्काजनक, अनपेक्षित आहे. मला कधीच वाटलं नव्हतं, तुम्ही असं काही माझ्यासमोर प्रश्न उपस्थित कराल. धर्मसंकटात टाकाल. सर, मी तुमच्या भावनांचा मनापासून आदर करते. आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप केलंत. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला कामात नवनवीन संधी उपलब्ध करून दिलीत. सर, त्यासाठी मी कायम तुमच्या ऋणात. उभं आयुष्य जरी मी तुमच्या पायाशी वाहिलं तरी त्या उपकारांची कधीच परतफेड होऊ शकत नाही; पण सर मला माफ करा. मी तुमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही.”
ईश्वरीचं बोलणं ऐकून सर्वजण जागेवरून उठून उभे राहिले. तिच्या बोलण्याचं सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. इतक्यात दारावरची बेल वाजली.
“आले वाटतं आमचे चिरंजीव..”
मिसेस केळकर म्हणाल्या. अनघाने पटकन पुढे येऊन दार उघडलं. सर्वांना वाटलं केळकर सरांचा मुलगा आलाय; पण त्यांचा भ्रमनिरास झाला. समोर मंजिरी आणि दिनेश उभे होते. ईश्वरीने पुढे येत म्हणाली.
“ये मंजू, आत ये..”
“असं अचानक का बोलवून घेतलंस?”
मंजिरीने ईश्वरीला प्रश्न केला.
“काही नाही.. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर तू होतीस. प्रत्येक निर्णयाची, सुखदुःखाची तूच तर साथीदार होतीस. आजही असाच महत्वाचा निर्णय घ्यायचाय. मग तुझ्याशिवाय तो पूर्ण कसा होईल? तुच त्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार आहेस. तुला ऐकवल्याशिवाय आनंद पूर्ण होणारच नाही. आज माझ्या आयुष्यातला निर्णायक क्षण आहे. माझ्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या क्षणी तू मला माझ्यासोबत हवी आहेस आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवून घेतलं. आता तुच याचा न्याय निवडा कर..”
“हो गं.. मी कायम तुझ्यासोबत असणार आहे; पण मला सांगशील का नेमकं काय झालंय?”
मंजिरीने ईश्वरीला विचारलं आणि तिचं लक्ष समोर उभे असलेल्या केळकरसरांकडे गेलं.
“सर, तुम्ही इथे?”
“हो मंजू, केळकरसाहेब, आपल्याकडे त्यांच्या मुलासाठी ईश्वरीचा हात मागायला आलेत. पण..”
अनघा आनंदाने म्हणाली पण दुसऱ्या क्षणी उदास झाली.
“पण काय काकू? ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही अशा उदास का?”
“ईशू त्यांच्या प्रस्तावाला नकार देतेय.”
मंजिरीने आश्चर्याने ईश्वरीकडे पाहिलं. अर्पिता ईश्वरीजवळ येत तिला काकुळतीला येऊन म्हणाली,
“अगं पण का ईशू? इतकं छान स्थळ असं का नाकरतेस? तू एकदा मुलाचा फोटो तर बघ.. तुला नक्की आवडेल तो.. बघ तर एकदा..”
“नाही वहिनी, मला खरंच केळकरसरांचं मन दुखवायचं नाहीये; पण मी खरंच त्यांच्या मुलाशी लग्न करू शकत नाही.”
विनायकने तिच्याकडे पाहिलं आणि तिला शांतपणे विचारलं,
“काय मनात आहे तुझ्या? का तुला त्यांच्या मुलाशी लग्न करायचं नाही?”
ईश्वरीने अनघा आणि विनायककडे पाहून बोलायला सुरुवात केली,
“आई.. बाबा, तुम्ही माझं स्वराजशी लग्न लावून दिलंत. मी कसलाही विचार न करता, माझ्या इच्छाना तिलांजली देऊन तुमच्या पसंतीने त्याच्याशी लग्न केलं. वाईट काहीच झालं नाही. तुम्ही माझं चांगलंच करून दिलं होतं; स्वराज खरंच खूप चांगला मुलगा होता. नावं ठेवण्यासारखं त्याच्यात एकही अवगुण नव्हता. पण नियतीने घात केला आणि स्वराज अपघातात गेला. माणूस आयुष्यातून जाणं म्हणजे नेमकं काय असतं ते मी खऱ्या अर्थाने अनुभवलं. स्वराज असताना त्याने मला दिलेला जिव्हाळा, प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. आई, स्वराज मला सोडून गेला आणि मी खऱ्या अर्थाने पोरकी झाले. एकटी झाले. माझी स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, माझी जगण्याची आशाही पार मावळून गेली. त्याच्या आधाराशिवाय जगणं मला निव्वळ अशक्य होतं. सासरच्यांनी साथ सोडली होती आणि माहेरच्यांची परिस्थिती तर तुम्हां सर्वांना माहितच आहे.फक्त माझ्या सासूबाई माझ्या सोबत होत्या. त्यांनी मला स्वराजच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी सोबत केली. आई, मी तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही त्या परिस्थितीत जसं वागायला हवं तसंच वागलात. पण त्यात सर्वांत जास्त नुकसान माझंच झालं ना? बाबा, मी एकटी पडली होते. समाजाची बोलणी, पुरुषांच्या त्या अश्लील नजरा, बायकांचं ते खोचकपणे बोलणं सारं निमूटपणे सहन करत होते. कोंडमारा होत होता. अशावेळीस मंजिरी आणि दिनेश सोबत अजून एक व्यक्ती माझ्या पाठीशी सदैव उभी होती. आज मी ज्या स्थानावर विराजमान आहे, ते केवळ त्याच्या साथीने.. त्याने मला दिलेल्या उर्मीशिवाय दुःखाने खचून न जाता माझं स्वतःच्या पायावर उभं राहणंही निव्वळ अशक्य होतं. बाबा, त्या व्यक्तीचं नाव आहे के. शिवराज..”
ईश्वरी क्षणभर थांबली. केळकरसर आणि त्यांच्या पत्नीने एकमेकांकडे पाहिलं. ईश्वरी बोलू लागली.
“शिवराज, आमच्या ऑफिसमध्ये माझा एक असिस्टंट म्हणून जॉईन झाला होता. सुरुवातीला आमच्या दोघांत सारखे खटके उडत होते. भांडणं होत होती. त्याचा मनमोकळा स्वभाव मला खटकत होता. खरं सांगायचं तर, एका विधवा स्त्रीकडे पुरुषांचा पाहण्याचा दृष्टिकोन पाहून, मला आलेला अनुभव पाहता मला त्याच्याशी बोलायला भीती वाटत होती. त्याने माझ्याशी केलेली चेष्टामस्करी मला आवडत नव्हती. मीच त्याच्याशी तुसडेपणाने वागत होते. तो नेहमी मला चिडवण्यासाठी मस्करी करायचा. मुद्दाम माझी खोडी काढायचा. मी त्याला टाळतेय म्हटल्यावर मुद्दाम सलगीने बोलायचा. माझी फार चिडचिड व्हायची; पण मग मंजूच्या घरच्या पार्टीनंतर तो एकदमच बदलला. खूप गंभीर आणि शांत झाला. जणूकाही तो चेष्टामस्करी विसरूनच गेला होता! त्यानंतर तो माझ्याशी नीट बोलू लागला. लक्ष देऊन काम समजून घेऊ लागला. माझ्यासोबत मिटींग्सना येऊ लागला. कंपनीच्या प्रगतीमध्ये लक्ष देऊन काम पाहू लागला. त्याच्यात झालेला बदल पाहून हळूहळू माझाही त्याच्यावरचा राग निवळू लागला. आमच्यात छान मैत्रीचं नातं फुलू लागलं. पण ऑफिसमध्ये मात्र या नात्यावरून चर्चेला उधाण आलं. लोक आमच्या मागे आमच्याबद्दल काहींबाही बोलू लागले. एकदा माझ्याबद्दल रागिणी आणि राणेमॅडम वाईट बोलत होत्या ते ऐकून त्याचा इतका संताप झाला होता की, तो माझ्यासाठी रागिणी आणि राणेमॅडमशी माझ्यासाठी भांडलाही होता.”
हे सांगताना तिच्या ओठांवर अलगद हसू आलं. तिने अनघाकडे पाहिलं आणि म्हणाली,
“आई, ज्यावेळीस मला तुझी जास्त गरज होती. तुझ्या कुशीत शिरून रडायचं होतं, तुझ्या आधाराची सर्वांत जास्त गरज होती, तेंव्हा तू नव्हतीस आई.. मी एकटी होते आई, त्यावेळीस मंजू आणि दिनेश सोडलं तर ज्याच्या खांद्यावर क्षणभर डोकं ठेवून रडून मोकळं व्हावं, आपलं म्हणावं अशी एकही व्यक्ती माझ्या आयुष्यात नव्हती. कोणीच माझं असं नव्हतं.”
ईश्वरीच्या बोलण्याने अनघाचे डोळे ओसंडून वाहू लागले. मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. ईश्वरी बोलत होती.
“जो तो आपापल्या व्यापात व्यस्त होता. दादा वहिनी त्यांच्या संसारात रममाण झाले होते. आई बाबा, तुम्ही तुमच्या नातवंडात व्यस्त झाला होतात. माझी त्याबद्दल मुळीच तक्रार नाही. तुम्ही माझ्याशी चुकीचे वागलात असंही नाही; पण मी एकटी पडत चालले होते. लोकांच्या बोलण्याने पुरती खचून गेले होते. पुरुषांच्या वासनाधीन नजरांनी, बायकांच्या टोमण्यांनी अगदी त्रस्त झाले होते. आता एकटेपणाची भीती वाटू लागली होती. स्वराजच्या आठवणी येऊ नयेत म्हणून मी दिवसरात्र काम करू लागले. स्वतःला बिझी ठेवू लागले. एखाद्या यंत्राप्रमाणे काम करत होते. भावनाशून्य झाले होते. शिवराज आयुष्यात आला. सुरुवातीला विचित्र वाटणारा व्यक्ती नंतर मला आवडू लागला होता की काय, देव जाणे! पण त्याचं सोबत असणं मला छान वाटू लागलं. तो माझ्याबरोबर असला की वेळ चांगला जाऊ लागला. त्याने मला आधार दिला. लोकांशी, समाजाशी लढण्याचं बळ दिलं. माझ्या पाठीशी तो कायम सावलीसारखा उभा राहिला किंबहुना मी तर म्हणेन तो माझी सावली झाला. त्याने मला जगायला शिकवलं. स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. त्याचं बोलणं, हसणं, त्याचे विचार, त्याचा प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडू लागलं. त्याची सोबत हवीहवीशी वाटू लागली; पण माझ्या मनात सुरू असलेल्या भावनांना नेमकं काय म्हणावं ते मला समजत नव्हतं. त्याच्याविषयी वाटणाऱ्या ओढीला काय नाव द्यावं ते कळत नव्हतं. मी माझ्या रजेनंतर ऑफिस जॉईन केलं आणि पाहते तर शिवराज नोकरीचा राजीनामा देऊन निघून गेला होता. न सांगता.. मला काहीही न बोलता.. मी खूप अस्वस्थ झाले. सतत त्याची आठवण येऊ लागली. ऑफिसमध्ये त्याच्या नसण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्याचं नसणं मला खूप यातना देत होतं. असं का होतंय मला कळत नव्हतं. त्याच्यासाठी मी इतकी हळवी का होतेय माझं मलाच उमजत नव्हतं. आणि मग अचानक काल रात्री मला एका गोष्टीची म्हणजेच एका सत्याची जाणीव झाली. शिवराज माझ्यासाठी अर्चू, श्लोकसारखा फक्त एक मित्र नव्हता. माझ्या मनात त्याच्याबद्दल फक्त मैत्रीची भावना नव्हती. त्याहीपेक्षा मैत्रीहून थोडी अधिक भावना दाटून येत होती.”
सर्वजण शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकत होते. अनघा, माई साश्रुपूर्ण डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होत्या.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..