पुन्हा बरसला श्रावण भाग ११०

पुन्हा बरसला श्रावण
पुन्हा बरसला श्रावण भाग ११०


केळकरसरांनी बोलायला सुरुवात केली. सर्वांचे कान त्यांच्या बोलण्याकडे लागले होते.

“खरंतर मी बिझनेस मीटिंगच्या निमित्ताने जर्मनीला गेलो होतो. कालच परत आलो. मला जे सांगायचंय ते तुला कॉलवर सांगणं किंबहुना तुझ्याशी बोलणं मला योग्य वाटलं नाही.”

“अच्छा? बरं झालं सर, तुम्ही आलात. त्या निमित्ताने तुमची आणि माझ्या आईबाबांची ओळख तरी झाली. आणि सर मीटिंग कशी झाली?”

ईश्वरीने प्रश्न केला.

“खूपच छान झाली. आणि तसंही याआधी तू आणि शिवराज त्यांच्यासोबत मेल्सद्वारे पत्रव्यवहार करत होतातच आणि एकदा दोनदा तुम्ही दोघं माझ्यासोबत त्यांच्याशी गुगलमीटवर भेटलातही; त्यामुळे मला त्यांना आपल्या कंपनीबद्दल, प्रॉडक्टबद्दल फारसं सांगावं लागलं नाही. तुम्ही दोघांनी आपल्या कंपनीला छान प्रोजेक्ट केलं होतंत. आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता लवकरच आपल्याला त्या पार्टीकडून नवीन मोठी ऑर्डर मिळू शकते.”

केळकरसरांनी कांदेपोहेची डिश खाली ठेवत उत्तर दिलं. ते ऐकून ईश्वरीला आनंद झाला; पण त्यांच्या तोंडून शिवराजचं नाव ऐकताच ईश्वरी थोडी व्याकुळ झाली. गळ्यातला अवंढा गिळत तिने सरांना पुन्हा विचारलं,

“पण सर, सगळं ठीक असताना शिवराजने असा अचानक राजीनामा का दिला? मी नसताना त्याच्याकडून काही झालं का? त्याने मला कॉलही केला नाही, काही कळवलं नाही. मी कॉल करतेय तर तो घेत नाहीये. काय झालंय सर?”

केळकरसर एकदम शांत झाले.

“असं काही विशेष झालेलं नाही; पण तुला माहित आहे ना? त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता. आणि आपल्या कंपनीत तो फक्त काही महिने ट्रेनिंग घेण्यासाठी आला होता. त्याचं ट्रेंनिंग पूर्ण झालं आणि तो गेला.”

“पण कुठे? असं न सांगता का गेला? इतकंही त्याचं आपल्याशी नातं नव्हतं? लगेच परके झालो का आपण?”

ती मनातल्या मनात बडबडली. केळकरसरांनी पुढे बोलायला सुरुवात केली.

“नंदिनी, आज आम्ही तुझ्याकडे वेगळ्याच कामासाठी आलोय. खरंतर तुझ्या आईबाबांनाच भेटायला आलोय. योगिनीकडून तुझे आईबाबा तुझ्या घरी आल्याचं समजलं म्हणून इथेच आलो नाहीतर तुझ्या मुंबईच्या घरीच जाणार होतो. काम तसं महत्वाचं आहे.”

“हं.. बोला ना साहेब. तुमचं बोलणं ऐकतोय आम्ही.”

विनायक अदबीने म्हणाला. केळकरसर क्षणभर थांबले. चहाचा कप उचलून घेत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“नंदिनीचे बाबा, आम्ही आमच्या मोठ्या मुलासाठी तुमच्या नंदिनीचा हात मागण्यासाठी आलोय. माझ्या मुलाला तुमची नंदिनी फार आवडलीय.”

“काय?”

ईश्वरी एकदम उठून उभी राहिली. तिच्यासाठी हा खूप मोठा अनपेक्षित धक्का होता. केळकरसरांचं बोलणं ऐकून सारेजण एकदम स्तब्ध झाले. विनायकच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलून गेले. वातावरण एकदम गंभीर झालं. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन माईने शांतपणे प्रश्न केला.

“केळकरसाहेब, तुम्ही आमच्या मुलीला मागणी घालण्याआधी तिच्याबद्दल सर्व माहिती मिळवलीय का? तुम्हाला किंबहुना तुमच्या मुलाला आमच्या मुलीचा भूतकाळ माहित आहे?”

“हो माई.. आणि तिच्या भूतकाळाने आमच्या मुलाला आणि आम्हालाही काही फरक पडत नाही. तुमची मुलगी आज आहे तशी आम्हाला पसंत आहे.”

त्यांचं उत्तर ऐकून माईने विनायक आणि अनघाकडे पाहिलं. अनघाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते; पण विनायकचा चेहरा गंभीर दिसत होता. माई त्यांच्याकडे पाहून म्हणाली,

“तुम्ही आमच्या मुलीला मागणी घातलीत, तिच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे ही; पण माझ्या मनात राहून राहून एक शंका येतेय, तुम्ही एवढे मोठे उद्योगपती, गडगंज श्रीमंती, गाडी-बंगला, दिमतीला नोकरचाकर, तुमचं तालेवार घराणं इतकं सगळं असताना आमच्या ईशूसारखी साधारण मुलगी त्यात तिचा भूतकाळ माहित असूनही तुम्ही तिला कसं काय पसंत केलंत? तुमच्या मुलाला तिच्यापेक्षा चांगली मुलगी निश्चितच मिळू शकेल ना? मग ईशूच का?”

माईंच्या प्रश्नावर केळकरसर पुढे म्हणाले,

“माई, खरं सांगायचं तर नंदिनी आम्हाला सुरुवातीपासूनच आवडत होती. आम्ही तिला गेली दोन चार वर्षांपासून पाहतोय. आमच्या कंपनीत तिला नोकरीला लागल्यापासून ते आजपर्यंत तिने स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर जी प्रगती केलीय ती खरंच खूप प्रशंसनीय आहे. तिचा काम, प्रामाणिकपणा, तिचा स्वभाव आम्हाला प्रचंड आवडला होता. जी मुलगी इतक्या सचोटीने ऑफिसचं काम करतेय ती संसारही असाच नेटका करेल याची मला खात्री पटली होती. माझ्या मुलाने तिला पाहिलं, तिच्याबद्दल समजून उमजून घेतल्यावरच त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. आम्हाला नंदिनी आधीपासून आवडत होती आणि आता आमचा मुलगा लग्न करेन तर नंदिनीशीच नाहीतर दुसऱ्या कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही असं म्हणतोय आणि आम्हालाही आमच्या मुलाची आवड पसंत आहे.”

केळकरसरांचं बोलणं ऐकून सर्वजण अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. आदित्यच्या मनात विचारांचं वावटळ घोंगावू लागलं.

“एवढ्या मोठ्या डायरेक्टरांचा मुलगा ईशूला मागणी घालतोय.. सरप्राइझिंग! खरंतर खूप आनंदाची गोष्ट आहे ही.. एक चांगला जोडीदार मिळाला तर ईशु सुखी होईल. काहीही चुक नसताना नियतीने तिच्यावर लादलेला विधवापणाचा कलंक मिटला जाईल. ती तिच्या आयुष्यात पुढे जाईल; पण बाबा? ते ऐकतील? रूढी, परंपरा मोडून ते इतक्या चांगल्या स्थळाला होकार देतील?”

आदित्यला प्रश्न पडला. केळकरसरांच्या प्रस्तावाने ईश्वरीलाही मोठा धक्का बसला होता. कोणीच काही बोलत नव्हतं. सर्वजण एकमेकांकडे पाहत होते. थोडा वेळ शांततेत गेला. हाताची मूठ तोंडावर ठेवून घसा साफ करत विनायकने बोलायला सुरुवात केली.

“केळकरसाहेब, तुमच्या मनाचा मोठेपणा की, तुम्ही आमच्या मुलीला मागणी घातलीत. तुमच्याशी नातेसंबंध जोडावेत इतकी आमची योग्यताही नाही. साहेब, काही दिवसांपूर्वी जर तुम्ही हा प्रस्ताव घेऊन आले असता ना, तर कदाचित तुम्हाला माझं वेगळं रूप पाहायला मिळालं असतं; पण आता माझ्या मुलीनेच माझे डोळे उघडलेत. आजवर मी रूढी, परंपरा, समाजातली प्रतिष्ठा, आमचा मानसन्मान यांना जपत आलो. हे जपताना आपल्याच माणसांना किती यातना होत असतील याचा विचारही कधी मनात आला नाही. लोक काय म्हणतील या विचारांनी आपलंच कुटुंब या रूढी परंपरेच्या ज्वाळेत जळून भस्मसात होताना मी उघड्या डोळ्यांनी पाहत बसलो. पण आता नाही.. आता सारं पुरे झालं. आता मी माझ्या माणसांच्या मनाचा विचार करणार आहे. त्यांच्या सुखाचा विचार करणार आहे. तुमच्यासारख्या सभ्य, सुसंस्कृत व्यक्तीने माझ्या मुलीला त्यांच्या मुलासाठी मागणी घातली ही आमच्यासारख्या साधारण लोकांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. माझी मुलगी तुमच्या घरी सुखात राहणार असेल तर माझी आणि माझ्या परिवाराची मुळीच हरकत नाही. आणि आमची मुलगीही आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही; पण साहेब, तुमच्या मुलाला पाहिल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णयापर्यंत जाता येणार नाही. त्याला भेटल्याशिवाय, त्याच्या बोलून तो आमच्या मुलीला नीट सांभाळेल याची खात्री पटल्याशिवाय आम्ही होकार कसा देणार? माझा मुलगा आदित्य घरातले सगळे लहानमोठे निर्णय घेतो. त्यामुळे त्याचं मत विचारात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही.”

विनायकचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मिसेस केळकरांनी आपला मोबाईलमधला मुलाचा फोटो काढून विनायकसमोर मोबाईल धरला. विनायकने मोबाईल हातात घेतला. आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरू लागला. विनायकने मोबाईल अनघाच्या हाती दिला. मग माई, आदित्य, अर्पिता सर्वांनी मुलाचा फोटो पाहिला. मिसेस केळकर त्यांच्या मुलाबद्दल सांगायला लागल्या. मुलाचं शिक्षण, मुलाचा स्वभावसारं त्या भरभरून बोलत होत्या आणि सर्वजण त्यांचं बोलणं ऐकत होते. सर्वांना मुलगा आवडला आहे हे सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. इतक्यात मिसेस केळकर म्हणाल्या,

“तुम्ही म्हणत असाल तर आम्ही आता त्याला तुम्हाला भेटायला बोलावू शकतो. तुम्हीही त्याला पाहून घ्या. शेजारीपाजारी आमच्या मुलाची चौकशी करा. आम्हाला वाटलं, आधी तुमच्या मनाची तयारी करावी आणि मग त्याला बोलवून घ्यावं. पण तुम्ही म्हणाल तसं.. काय म्हणता? बोलवू का त्याला?”

“हो चालेल.. म्हणजे कसं फोटो आम्हाला आवडलाय. प्रत्यक्षात भेट झाली तर सोन्याहून पिवळं होईल. तेही काम लवकरच उरकून घेऊया बोलवा तुम्ही..”

विनायकने मिसेस केळकरांना त्यांच्या मुलाला बोलवून घ्यायला सांगितलं. देशमुख कुटुंबीय केळकरसरांच्या प्रस्तावामुळे खूप आनंदी होते. सर्व मोठी माणसं गप्पांमध्ये रंगून गेली होती. आपल्या मुलीचा सुखी संसाराच्या कल्पनेने अनघा, माईदेखील खूप खूष होत्या; पण या साऱ्या गोंधळात कोणाचं ईश्वरीकडे लक्षच नव्हतं. ईश्वरी विचारात गढून गेली.

“हे काय नवीन माझ्या आयुष्यात घडतंय? केळकरसर त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मला मागणी घालताहेत. केळकरसरांचा मुलगा? कसा आहे? कोण आहे? त्याने मला कधी पाहिलं? देव जाणे! पण त्याहीपेक्षा माझ्या आयुष्यात अजून कोणीतरी महत्वाचं आहे. मला शिवराजसोबत राहायचंय.. अगदी आयुष्यभर. पहिल्यांदा मनानं त्याच्याबद्दल प्रेमाचा कौल दिलाय; मग असं कसं मी केळकरसरांच्या मुलाशी लग्न करू? शिवराज, कुठे आहेस. प्लिज लवकर ये.. मला तुझ्याशी बोलायचंय. माझ्या मनातलं तुझ्याविषयी असलेलं प्रेम कबूल करायचंय.. भले तुझ्या मनात नसेलही काही; पण मी तुला सांगितलं नाही. बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटायला नको. आयुष्यभर त्याची टोचणी लागायला नको म्हणून मला तुला भेटायचंय.. एकदा, फक्त एकदा तुझ्याशी बोलायचंय.. प्लिज शिवराज..”

ईश्वरीच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. ज्या आतुरतेने तिने तिच्या श्रावणाची वाट पाहिली होती; तो तिचा श्रावण शिवराजच आहे तिच्या मनाला खात्री झाली होती. धीर एकवटून ईश्वरीने तिच्या बाबांना आवाज दिला.

“बाबा, एक मिनिट.. थांबा. मला तुमच्याशी काही बोलायचंय. महत्वाचं..”

सर्वांच्या नजरा ईश्वरीकडे वळल्या.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया.

🎭 Series Post

View all