पुन्हा बरसला श्रावण भाग १०९

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग १०९

सर्वजण एकदम शांत झाले. वातावरण अचानक भावुक झालेलं पाहून ते हलकंफुलकं करण्यासाठी माई म्हणाली,

“चला, आता सर्वांच्या मनातली किल्मिषे दूर झाली. एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली. भूतकाळातल्या कडवट गोष्टी उगाळत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून जाऊन पुढे जाऊया. विनायका, आता अनघाला कधीच दुखावू नकोस. दोघांचंही उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने घालवा. आदी, अर्पिता आनंदाने सुखाचा संसार करा. आता फक्त काळजी आहे ती माझ्या नातीची.. माझ्या ईशूची.. आदी आता स्थिरवला आहे. पण माझी ईशू? तुम्ही सर्वजण सुखात असाल मी आनंदाने डोळे मिटून शकेन ना?”

माईने डोळ्याला पदर लावला.

“प्लिज हं माई, असं काही बोलू नकोस. मी ठीक आहे गं.. तू आहेस ना माझ्यासाठी?”

असं म्हणत ईश्वरी माईला बिलगली.

“आता असंच बोलत राहणार आहात का? ईशू, अनघा.. यांच्या चहापाण्याचं बघणार आहात की नाही?”

ईशूला मायेने गोंजारत माईने विचारलं. अनघाने हसून मान डोलावली आणि सर्वांसाठी चहा बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली. थोड्याच वेळात अनघा चहा आणि बिस्किटांचा ट्रे टेबलवर ठेवत म्हणाली,

“आधी चहा घ्या मग बोला. प्रवासातून दमून आला असाल.”

“नाही फारसं नाही आई, दोन तीन तासांचा तर प्रवास.. काही त्रास नाही झाला.”

अनघाच्या बोलण्यावर अर्पिता म्हणाली आणि सर्वांना तिने चहा दिला. सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत चहा बिस्किटांचा आस्वाद घेत होते. इतक्यात ईश्वरी आदित्य आणि अर्पिताकडे पाहून म्हणाली,

“आता चार दिवस मस्त रहा. आपण बाहेर फिरायला जाऊ. पुण्यातली प्रसिद्ध अशी दोनचार ठिकाणं पाहू. आम्हा बायकांना एखादं दिवस रात्रीच्या स्वयंपाकाला सुट्टी देऊ. बाहेर एखाद्या चांगल्या रेस्टोरंटमध्ये जेवायला जाऊ. काय म्हणता दादा वहिनी?”

तिचं बोलणं ऐकून अर्पिताला आनंद झाला. ती उत्साहाने म्हणाली,

“आदी राहूया ना, परत आहेच मग ऑफिस घर आणि संसार.. हेच काही दिवस थोडे निवांत राहता येईल. मी लगेच आमच्या ऑफिसला मेल करून कळवते. तुही तुझ्या ऑफिसला कळव ना प्लिज.”

“चार दिवस नको गं.. इतके दिवस सुट्टी मिळणार नाही. ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम सुरू आहे; पण इतक्या वर्षांनी आपण सर्वजण आनंदाने एकत्र आलोत. तर राहूया दोन दिवस.. फारफार तर एखाद दुसरा दिवस मॅनेज होईल. मी तसं ऑफिसला कळवतो.”

आदित्यच्या होकारामुळे सारेचजण ईश्वरीच्या घरी राहणार होते. इतक्या वर्षांनी जणू सुखाची बरसात होत होती. अनघाला न्याय मिळाला होता. आज देशमुखांच्या घरी आनंदीआनंद होता. थोड्याच वेळात सर्वजण नाष्टा करून घराबाहेर पडले. सर्वांत आधी ते सिंहगडावर गेले. माईला गड चढणं शक्य नव्हतं; त्यामुळे माई गाडीतच बसून राहिली. तिच्यासोबत ईश्वरी मुलांना घेऊन थांबली. त्यानंतर सारसबाग, शनिवारवाडा आणि पुण्यातली काही प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली. मग रात्री एका चांगल्या रेस्टोरंटमध्ये जाऊन जेवण केलं आणि मग सर्वजण घरी परतले. ईश्वरीने सर्वांची आरामाची व्यवस्था केली आणि ती हॉलमध्ये गादी टाकून आडवी झाली. सारं काही छान होतं. बिछान्याला पाठ टेकताच ईश्वरीच्या मनात विचार घोंगावू लागले.

“आजचा दिवस किती छान गेला! माई, आई, बाबा, दादा, वहिनी सर्वजण किती खूष आहेत! हेच तर सारं हवं होतं मला.. आता एकदोन दिवसांत ते घरी जातील. आपापल्या कामात व्यस्त होतील. रोजचा दिनक्रम सुरू होईल. पण मी? माझं काय?”

एकटेपणाचा उग्र दर्प सर्वत्र पसरला आणि तिचा जीव कासावीस झाला. ईश्वरी काहीशी उदास झाली. शिवराजच्या अचानक जाण्याने तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली.

“कुठे गेला असेल? काय झालं असेल? काहीच कळायला मार्ग नाही. केळकरसरही परदेशी गेलेत. त्यांच्याशिवाय त्याच्याबद्दल कोणालाच माहित नाही. त्याने स्वतःहून तर कॉल करून मला सांगितलं तर नाहीच पण मी त्याला कॉल करतेय तर तो उचलत नाहीये. काय चालू आहे त्याच्या मनात? का असं वागतोय? काय चुकलंय माझं?”

ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं.

“आता कुठेतरी मी सावरायला लागले होते. हरवलेला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत होते. शिवराजच्या साथीने मी जगायला लागले होते. स्वराजला विसरणं केवळ अशक्यच पण शिवराजच्या जोडीने स्वराजच्या आठवणींना सोबत घेऊन मार्गस्थ होत होते. आयुष्यावर प्रेम करायला शिकले होते. एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून तो आवडायला लागला होता. त्याची साथ हवीहवीशी वाटू लागली होती. त्याचं हसणं, बोलणं, सोबत असणं छान वाटू लागलं होतं. किती आधार होता त्याचा! माझ्यासाठी तो साऱ्या जगाशी लढायला तयार होता. ठामपणे माझ्या बाजूने उभा होता. मग अचानक असं काय झालं? कुठे गेला तो?”

शिवराजच्या आठवणींनी ईश्वरी व्याकुळ झाली. तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं. अचानक तिच्या मनात प्रश्न आला.

“पण मी का शिवराजचा इतका विचार करतेय? त्याच्यासाठी इतकी का व्याकुळ होतेय? काय होतंय मला? तो मला आवडू लागलाय? की त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलंय? असं कसं शक्य आहे? आणि त्याचं काय? त्याचंही माझ्यावर प्रेम असेल? की मीच मैत्रीला प्रेम समजले. नाही.. असं काही नाही. माझं त्याच्यावर प्रेम असू शकत नाही. खरंतर स्वराजची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण त्याची कमतरता, उणीव सारखीच भासत राहते. शिवराजने ती कमतरता भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय; पण तो मित्र म्हणूनच ठीक आहे. कदाचित तो मैत्रीच निभावत असेल आणि मी उगीच त्या भावनेला प्रेम समजले असेल; पण मग श्लोकच्या मैत्रीपेक्षा शिवराजची मैत्री इतकी वेगळी आणि खास का वाटतेय मला? श्लोकने मला प्रपोज केलं होतं. लग्नासाठी मागणी घातली होती; पण त्यावेळीसही माझ्या मनात श्लोकबद्दल मैत्रीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. ती प्रेमभावना कधी मनात आलीच नाही; मग आज मला हे काय होतंय? शिवराजविषयी मला इतकी ओढ का वाटतेय?”

प्रश्नांचा ससेमिरा ईश्वरीची पाठ सोडत नव्हता. ती बैचेन झाली. बरीच रात्र झाली तरी डोळ्यास डोळा लागत नव्हता. सारी रात्र कुस पालटण्यातच जात होती. आणि अचानक तिच्या मनाला एका सत्याचा स्पर्श झाला. साऱ्या प्रश्नांची उत्तरं जणू तिला गवसू लागली होती.

“येस्स, माझ्या मनातली शिवराजविषयीची भावना ही नक्कीच मैत्रीच्या पुढची आहे. मला त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलंय. मला त्याच्याशी एकदातरी बोलायला हवं. त्याच्याही मनात हेच असेल का? हे जाणून घेण्याआधी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचणं म्हणजे केवळ मूर्खपणाचं ठरेल ते. स्वराजनंतर पहिल्यांदा मला कोणाबद्दलतरी प्रेम, जिव्हाळा वाटू लागलाय. त्यामुळे मला त्याच्याशी बोलून हे सगळं त्याला सांगायला हवं. त्याच्या मनात माझ्याबद्दल याच भावना आहेत का? हे जाणून घ्यायला हवं. आणि त्यासाठी मला आधी केळकरसरांशी बोलायला हवं. तो कुठे गेलाय हे त्यांना नक्कीच माहीत असेल. केळकरसर एकदोन दिवसांत येतीलच. त्यांना विचारेन पण त्याला जाब विचारेनच. इतक्या वर्षांनी पहिल्यांदा कोणाबद्दल प्रेमाचा बीजांकुर रुजू पाहतोय. मग त्याला मी असं कोमजू देणार नाही. त्याच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी केळकरसरांशी बोलायला हवं.”

ईश्वरीच्या मनात खळबळ माजली होती. विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलंच नाही.

सकाळी पाखरांच्या चिवचिवाटाने तिला जाग आली. सकाळी उठल्यावर ती पटकन तयार झाली. अनघा, ईश्वरी, अर्पिता सर्वांच्या नाश्त्याच्या तयारीला लागल्या. आदित्य, विनायक फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये बसले माई मुलांना खेळवत बसली होती. ईश्वरीने सर्वांना चहा आणि नाष्टा दिला. सर्वजण गप्पा मारत नाष्टा करत होते. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आता कोण आलं?”

ईश्वरीला प्रश्न पडला. तिने पटकन येऊन दरवाजा उघडला. समोर केळकरसर आणि एक स्त्री उभी होती.

“अरे सर तुम्ही? इथे? या ना.. या ना सर..”

केळकरसर आणि ती स्त्री आत आली. ईश्वरीने त्यांना सोफ्यावर बसायला सांगितलं.

“दादा, बाबा.. हे आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर केळकरसर आहेत. आणि..”

“ही माझी सहचारिणी मिसेस समृद्धी केळकर..”

केळकरसर हसून म्हणाले. त्यांनी हसून नमस्कार केला.

“आणि सर, हे माझा बाबा विनायक देशमुख, आणि हा दादा आदित्य देशमुख आणि माझी वहिनी अर्पिता, आई अनघा आणि ही आमची माई.. ”

सर्वांनी केळकरसरांना अभिवादन केलं. अनघा पाण्याच्या ग्लासचा ट्रे घेऊन समोर आली. अर्पिताने त्या दोघांसाठी चहा आणि नाष्टा आणला. चहाचा ट्रे टेबलवर ठेवत ईश्वरीने पोह्यांची डिश पुढे करत केळकरसरांना प्रश्न केला,

“सर, माझ्याकडे काही काम होतं का? असं अचानक येणं केलंत? कॉल केला असता तर मी स्वतः आले असते सर. बोला ना सर..“

ईश्वरीने त्यांच्याकडे पाहिलं. पोह्यांचा चमचा तोंडात टाकत केळकरसर हसून म्हणाले,

“नंदिनी, आज माझं तुझ्याकडे काम नाहीये. मी तुला भेटायला आलोच नाही.”

“मग?”

ईश्वरीने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या होत्या.

पुढे काय होतं? केळकरसरांच्या येण्याचं प्रयोजन काय होतं? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all