पुन्हा बरसला श्रावण भाग १०८

पुन्हा बरसला श्रावण
पुन्हा बरसला श्रावण भाग १०८

सर्वजण आत आले. ईश्वरी उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिचा हेतू साध्य होताना दिसत होता. तिने पटकन पुढे होऊन स्वराला उचलून घेतलं. मायेने जवळ घेत स्वराच्या गालावर चुंबन घेतलं. इतक्यात माई बाहेर येऊन सोफ्यावर बसली. विनायकने उठून तिला वाकून नमस्कार केला. अर्पिता आणि आदित्यनेही अनघा आणि माईंना नमस्कार केला. दोन्ही मुलं आजीला जाऊन बिलगली होती. अनघा मुलांना कुशीत घेऊन त्यांना गोंजारत बसली होती. मुलांना पाहून तिचं काळीज सुपाएवढं मोठं झालं होतं. सर्वजण हॉलमध्ये सोफ्यावर बसले. ईश्वरी सर्वांसाठी पाणी घेऊन आली.

“दादा, असं अचानक? फोन पण केला नाहीस. सगळं ठीक आहे ना?”

ईश्वरीच्या प्रश्नावर आदित्यने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

“अशी काय बोलते ही? किती कॉल्स केले, एकतरी कॉल घेतला का हिने? जाऊ दे आता तिच्याशी वाद घालायला नको. आधी आईविषयी बोलून घेतो.”

आदित्य मनातल्या मनात पुटपुटला. तो अनघाकडे आणि ईश्वरीकडे पाहत म्हणाला,

“ईशू, मी आईला घरी परत घेऊन जायला आलोय.”

“का? मी तुला त्या दिवशीच सांगितलं ना? आई हे घर सोडून कुठेही जाणार नाही.”

ईश्वरी निक्षुन म्हणाली तसं अनघाने चमकून तिच्याकडे पाहिलं. आदित्यने रागावर नियंत्रण ठेवत संयमी स्वरात बोलायला सुरुवात केली.

“ईशू, तुझा राग रास्तच आहे. तू त्यादिवशी जर तू आईसाठी उभी नसती राहिलीस आणि आईला इकडे घेऊन नसती आलीस तर आम्हाला आईबद्दल कधीच काहीच वाटलं नसतं; पण ईशू, आम्हाला आईची गरज आहे.”

आदित्य व्याकुळ होऊन बोलत होता.

“कशासाठी हवीय आई? गरज आहे म्हणून आईला घेऊन जातोयस? कसली गरज? कामापुरती आई हवीय? दादा, गरज म्हणून कुठलंच नातं असू शकत नाही. नात्यात प्रेम हवं. जिव्हाळा हवा तरच नाती फुलतात, बहरतात.”

ईश्वरी शांतपणे म्हणाली.

“पण एक मुलगा म्हणून आईबाबांना सांभाळणं हे माझं कर्तव्य नाही का?”

ईश्वरीच्या बोलण्यावर आदित्य उद्विग्न होऊन म्हणाला.

“कर्तव्य? कर्तव्य, जबाबदारी म्हणून करणार असशील तर तू नकोच करू काही.. त्यासाठी मुलगा आणि मुलगी हा भेद करण्याची गरज नाही. मुलींचंही तितकंच कर्तव्य असतं. पण दादा, मी कर्तव्य म्हणून नाही तर माझं प्रेम आहे दोघांवर आणि म्हणून आईला मी माझ्याकडे घेऊन आले. जबाबदारीचं तुझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. तेंव्हा आई आणि माई माझ्याचकडे राहतील. तू तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबासमवेत खूष रहा.”

ईश्वरीच्या स्पष्ट बोलण्याचं आदित्यला खूप नवल वाटलं आणि प्रचंड रागही आला होता.

“कधी तोंड वर करून न बोलणारी ईशू आज आपलं मत परखडपणे मांडतेय. किती स्पष्ट बोलतेय! किती सोर्टेड विचार करतेय! कुठून आला हा आत्मविश्वास? इतकी खंबीर ती कधी झाली? की कोणी हिला शिकवतंय? कोण गुरू भेटलाय हिला?”

आदित्यला अनेक प्रश्न पडत होते. ईश्वरीच्या असं तोडून बोलण्याने अर्पितालाही वाईट वाटत होतं; पण ईश्वरी काहीच चुकीचं बोलत नव्हती त्यामुळे तिला थांबवण्याचं धारिष्ट्य कोणी करू शकलं नाही. विनायकने तर शरमेने मान खाली घातली होती. दीर्घ श्वास घेत आदित्यने विचारलं,

“मग तुझं काय म्हणणं आहे? आई मुंबईला परत येणार नाही?”

“नाही.. आई आणि माई माझ्यासोबत राहतील. गरज म्हणून परत घेऊन जाणार असशील तर..…”

“अगं, फक्त गरज म्हणून नाही; पण मी माझ्या बायकोशिवाय राहू शकत नाही म्हणून मला तिला माझ्यासोबत घेऊन जायचंय.”

तिचं बोलणं मधेच तोडत अधीरपणे विनायक म्हणाला. ईश्वरीचा चेहरा आनंदाने भरून गेला.

“बाबा.. याचीच तर मी वाट पाहत होते. याचसाठी तर सगळा हा प्रपंच केला. आईविषयी असलेलं प्रेम मला तुमच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं.”

ईश्वरी मनातल्या मनात पुटपुटली. डोळ्यात आनंदाश्रू जमा होऊ लागले. विनायक पुढे म्हणाला,

“ईशू, मी आजवर तुझ्या आईला खूप त्रास दिला, मारहाणसुद्धा केली. कळत्या वयापासून जे संस्कार झाले त्यानुसार मी घडत गेलो. पुरुष म्हणून स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी मी तिला कमी लेखत आलो. तिला पायाखाली दाबून ठेवत स्वतःचा अहंमभाव कुरवाळत बसलो. खरंतर मुलगी म्हणून मी तुझ्यावरही अन्यायच केला. वंशाचा दिवा म्हणून आदीला जास्त प्रेम देत राहिलो. कधी तुला प्रेम दिलं नाही. कायम तुझा दुस्वास केला. आता मला कळतंय, मी खरंच खूप चुकलो गं.. ईशू, त्यादिवशी तू तुझ्या आईला पुण्याला घेऊन गेलीस आणि मला जाणवलं, तुझ्या आईशिवाय मी खूप एकटा आहे. तिच्याशिवाय माझं जगणं कठीण आहे. तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. खरंतर मला तुझी आणि तुझ्या आईची माफी मागायची आहे. म्हणूनच मी आदीला घेऊन तुझ्याकडे आलो. मला माहित आहे, माझी चुकच इतकी मोठी आहे की, तू मला कधीच माफ करू शकणार नाही. तुला तुझ्या आईला घरी परत पाठवायचं नसेल तर पाठवू नकोस पण ईशू, प्लिज मला क्षमा कर.. तू माझे डोळे उघडलेस. तुझ्यामुळेच मला तुझ्या आईचं मोल समजलं. चुकलो मी अनघा. प्लिज मला माफ कर.”

विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. अनघाला काय बोलावं ते सुचेना. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.

“आज पहिल्यांदा हे घडतंय. इतकी वर्षे कधीही यांनी मला मान दिला नाही. कधी प्रेमाने वागवलं नाही. आज ते सर्वांसमोर माझी क्षमा मागताहेत. आपली चुक कबूल करताहेत. देवा, आयुष्य सार्थकी लागलं! ज्या प्रेमळ शब्दांची मी आयुष्यभर वाट पाहिली. त्यांच्या प्रेमासाठी आसूसलेले होते. तो क्षण आज माझ्या पुढ्यात येऊ घातलाय. यांनी त्यांचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं. इतक्या वर्षांनी का होईना पण त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली हे का कमी आहे?”

अनघाने सद्गदित होऊन ईश्वरीकडे पाहिलं. ईश्वरी तिच्याकडे पाहून भरल्या डोळ्यांनी गालातल्या गालात हसत होती.

“ईशू, बाळा.. हे सारं तुझ्यामुळेच शक्य झालं. माझ्या हक्कासाठी तू उभी राहिलीस. आपल्या मुलांसाठी, त्यांच्या सुखासाठी, मुलांच्या संकट समयी तर प्रत्येक आई उभी राहतेच; पण आज माझी लेक माझ्यासाठी माझी आई झाली. माझ्या समोर माझी ढाल बनून उभी राहिली. गुणाची गं माझी लेक!”

अनघा कृतज्ञतेने ईश्वरीकडे पाहत होती. आपल्या लेकीच्या धाडसाचं तिला कौतुक वाटत होतं. आपल्या वडिलांना पहिल्यांदा इतकं भावुक झालेलं पाहून आदित्यला नवल वाटलं आणि आनंदही झाला. अनघाच्या जवळ येऊन आदित्य म्हणाला,

“आई, मीही चुकलो. तुला वाईट वाटेल असं बोललो. मलाही क्षमा कर आई.. पुन्हा असं घडणार नाही.“

“आई, तुम्ही आम्हाला हव्या आहात. गरज म्हणून नव्हे तर तुमचा मला खूप आधार वाटतो. तुमची माया सदैव मिळावी म्हणून तुम्ही मला आपल्या घरी हव्या आहात. तुमच्याशिवाय घराला घरपण नाही आई.. आई, माझं चुकलं.. तुम्ही माझ्यावर आपल्या लेकीसारखी माया करत होतात पण मी कमनशिबी ते प्रेम समजू शकले नाही. उलट तुमचाच राग राग करत राहिले. आम्ही तुम्हाला गृहीत धरलं. आदीच्या आडमूठपणे वागण्याला काही अंशी मीही जबाबदार आहे. मला माफ करा आई. चुकले.. खूप चुकले आई..”

अर्पिताला गळ्यात दाटून हुंदका अनावर झाला. तिचे डोळे ओसंडून वाहू लागले.

“आई, मुलांना आजीची माया हवीय. तुमच्याशिवाय ती राहू शकत नाही. या आठ दिवसांत स्वराने तर तुमची आठवण काढून दोसरा काढला. चार दिवसांत तापाने फणफणली होती. क्रोसीन सिरप दिल्यावर तिला थोडं बरं वाटलं. म्हणून आम्ही इकडे येऊ शकलो. आई प्लिज आता राग सोडा आणि चला आपल्या घरी. आपलं घर तुमची वाट पाहतंय. तुमच्याशिवाय त्या घरात चैतन्य नाही. तुम्ही नाहीत तर बाल्कनीतली तुमची फुलझाडंही कोमेजून गेलीत. राग सोडा आई, आम्हाला क्षमा करा आणि चला घरी. आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. प्लिज आई..”

अर्पिता काकुळतीला येऊन म्हणाली. गालावर आलेले पाण्याचे ओघळ पुसत ईश्वरी आईला येऊन बिलगली.

“आई, पाहिलंस सर्वजण तुझ्यावर किती प्रेम करतात ते! त्या प्रेमाची जाणीव करून द्यायची होती. मला माहित होतं. सर्वांना तुझी उणीव भासल्याखेरीज राहणार नाही. आई, मुद्दामच तुझ्याकडून आठ दिवसांची मुदत मागून घेतली होती. तुला जाणूनबुजून मी कोणाला कॉल करू दिला नाही. मला पाहायचं होतं, तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव यांना होते का? मला तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची होती. आई, मी म्हणत नाही घरात वाद व्हायला हवेत. पण आपल्या हक्कासाठी बोलायला हवं. आजवर तू सारं निमूटपणे सहन केलंस आणि त्या दिवशी मी जर बोलले नसते तर यापुढेही सहन करत राहिली असतीस. आई, आपल्यावर अन्याय करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच तो सहन करणाराही गुन्हेगारच असतो गं.. बाबा, दादा.. तुम्हाला वाटेल, मी इतकं कशी बोलतेय? इतकं धारिष्ठ कुठून आलं? आई, स्वराजच्या जाण्याने मी पार कोलमडून गेले होते. कसं वागावं, काय करावं काहीच कळत नव्हतं; पण मंजिरी, दिनेश आणि शिवराज यांच्या आधाराने मी उभी राहिले. त्यांनी मला खंबीर बनवलं. समाजात वागण्याबोलण्याचं भान आणून दिलं. त्यांच्यामुळेच आज मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि मी सक्षम झाले. बाबा, दादा, मलाही तुम्ही क्षमा करा. फारच रुक्ष वागले मी.. तुमच्याशी उलटसुलट बोलले; पण हे सारं मला आईसाठी करावं लागलं. आईच्या सन्मानासाठी मला थोडं कडवट बोलावं लागलं. प्लिज मलाही क्षमा करा. आई आपल्या सर्वांची आहे. तिलाही तुमच्याशिवाय करमत नव्हतं. तिच्या जीवाची घालमेल मी स्वतः पाहिलीय. दादा तू आईला निश्चिन्तपणे घेऊन जा. मी तुला अडवणार नाही.”

ईश्वरी डोळ्यातलं पाणी ओढणीने टिपत म्हणाली. ईश्वरीच्या बोलण्याने साऱ्यांनाच गहिवरून आलं होतं. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. माई मात्र सर्वांकडे आनंदाने भरल्या डोळ्यांनी पाहत होती. आज कित्येक वर्षांनी देशमुख घराण्यात एका स्त्रीला एका स्त्रीमुळे सन्मानाची वागणूक मिळत होती. आणि ती स्त्री तिची लेक होती यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नव्हती.

पुढे काय होतं? शिवराजचं काय झालं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all