पुन्हा बरसला श्रावण भाग १०६

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग १०६


बघता बघता ईश्वरीने अनघाला दिलेली आठवडाभराची मुदत संपत आली होती. अर्पिता, आदित्य आणि विनायक यांना आपली चुक उमजली होती; पण पुढाकार कोण घेणार? हा प्रश्न होता. ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे अनघाने कोणाचेही फोन कॉल्स घेतले नव्हते. आदित्य आणि अर्पिताने तर ईश्वरीच्या मोबाईलवरही कॉल करून अनघाशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण ईश्वरी ऑफिसमध्ये असल्याने ती अनघाला मोबाईल देऊ शकली नाही किंबहुना तिनेही मुद्दामच त्यांचा फोन तिला देणं टाळलं होतं. अनघाच्या कष्टाची, तिच्या त्यागाची, तिच्या अस्तित्वाची सर्वांना जाणीव व्हावी इतकीच ईश्वरीची इच्छा होती. आईची होणारी तगमग तिला जाणवत होती. तिचे घराकडे वेध लागले होते हेही ईश्वरीला कळत कळत होतं; पण आता अनघाच्या हक्कासाठी, तिचे अधिकार तिला परत मिळवून देण्यासाठी ईश्वरीला आईसोबत थोडं कठोर व्हायला हवं होतं.

इकडे संध्याकाळी मंजिरी आणि दिनेश माईंना भेटण्यासाठी ईश्वरीच्या घरी आले. अनघाला नमस्कार करत तिने विचारलं,

“कशा आहात काकू? तब्येत ठीक आहे ना? आणि आपली बच्चे कंपनी?”

“सगळे छान आहेत. मी पण ठीक आहे. तू सांग, तू कशी आहेस बाळा? काम कसं सुरू आहे?”

अनघानेही तिची, दिनेशची विचारपूस केली. त्यानंतर ईश्वरी त्या दोघांना आतल्या खोलीत घेऊन गेली. माई पलंगावर आडवी झाली होती. ईश्वरीने माईला आवाज दिला,

“माई, ए माई उठ बघू.. बघ तुला भेटायला कोण आलंय?”

तिच्या आवाजाने माई उठून बसली. ईश्वरी मंजिरीची ओळख करून देत माईंकडे पाहून म्हणाली,

“माई, ही माझी जिवलग मैत्रीण मंजिरी आणि हे तिचे मिस्टर दिनेश.. पुण्यात मला यांचाच तर आधार आहे. संकटाच्यावेळी नेहमी धावून येतात. हे दोघे नसते तर माझा पुण्यात निभाव लागणं कठीण होतं बघ.”

“पुरे, पुरे झालं.. उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. आम्ही काही केलं नाही माई.. तुमची नात आहेच खूप गुणी! खूप खंबीरही. एकटी सगळं मॅनेज करते. खरंतर मला तिचंच जाम कौतुक वाटतं.”

मंजिरी माईंजवळ बसत म्हणाली. तिच्या बोलण्याला हसून दुजोरा देत माई म्हणाली,

“अगदी खरंय बघ मंजू, आमची ईशू खरंच खूप धीराची आहे. तिच्याजागी दुसरी कोणी असती तर आतापर्यंत कधीच हार मानून आसवं गाळत बसली असती; पण तुमच्यासारखी लोकं तिच्यापाठीशी होते, आहेत म्हणून निभावून नेलं तिने. तुम्ही होतात म्हणून ती पुन्हा खंबीरपणे उभी राहू शकली.”

“हे काय माई, तुम्ही दोघींचंही कौतुक केलंत. कोणालाच राग यायला नको.”

मंजिरी हसत म्हणाली.

“बाय द वे नंदू, तू मला जे काम सांगितलं होतं ना, ते झालंय. मी तुला म्हटलं होतं ना, दिनेशच्या मित्राची बायको एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. ”

“हो, मग त्याचं काय?”

ईश्वरीने तिच्याकडे पाहून विचारलं.

“अगं, तिच्या ओळखीची बाई आहे. उद्यापासून येईल ती. माझं बोलणं झालंय तिच्याशी. आईला आणि तुला मदत होईल तिची. शकुंतला मावशी नाव आहे तिचं. मी तिचं आधारकार्ड, पॅनकार्ड, ऍड्रेस प्रूफ सारं चेक केलंय. विश्वासू वाटली. छान काळजी घेईल ती माईंची. उद्या आल्यावर तिच्या पगाराचं तेवढ बोलून घे. तेवढंच राहिलंय.”

मंजिरीचं बोलणं ऐकून ईश्वरीला आनंद झाला.

“चालेल, मी उद्या बोलून घेईन तिच्याशी. आता माई माझ्याजवळ हवे तितके दिवस राहू शकते.”

तिने आनंदाने माईला मिठी मारली. माईनेही मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. थोड्याफार गप्पा झाल्या. दिनेशनेही माईंची विचारपूस केली. इतक्यात जागेवरून उठत ईश्वरी म्हणाली,

“चल मंजू, तुझ्यासाठी कॉफी बनवते.. चल बाहेर.. आता माईला थोडा आराम करू दे.”

असं म्हणत ती मंजिरी आणि दिनेशला खोलीबाहेर घेऊन आली. तिला डायनींग टेबलजवळच्या खुर्चीत बसवत ईश्वरी म्हणाली,

“तुझ्या आवडीचे थालीपीठ बनवलेत. गरम आहेत तोवर खाऊन घे पटकन, नाहीतर थंड होतील..”

दिनेश आणि मंजिरी डायनींग टेबलपाशी बसले. ईश्वरीने तिच्यासाठी तिच्या आवडीचं थालिपीठ बनवलं होतं. तिखट मिठाचं थालीपीठ.. त्यावर गोड लोणचं, लोण्याचा गोळा असा छान बेत होता. तिने दिनेश आणि मंजिरीला थालीपीठ खायला दिलं. थालीपीठाचा एक घास तोंडात टाकताच मंजिरी डोळे मिटून बोटांचा मोर नाचवत म्हणाली,

“अप्रतिम.. काय यम्मी झालेत.. मस्तच. किती छान झालेत अगं!”

मंजिरी आवडीने खात होती. सोबतीला तिची बडबड सुरूच होती. ईश्वरीने सर्वांसाठी कॉफी बनवली. कॉफीचे घोट घेता घेता मस्त गप्पा रंगल्या होत्या. गप्पांच्या ओघात संध्याकाळ कधी उलटून गेली कोणालाच समजलं नाही. मंजिरीने तिच्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं आणि ईश्वरीला अलगद मिठी मारत मंजिरी म्हणाली,

“चल बाय नंदू, उद्या ऑफिसमध्ये भेटू.”

ईश्वरीने मान डोलावली. थोड्याच वेळात सर्वांचा निरोप घेऊन मंजिरी आणि दिनेश घरी जाण्यासाठी निघाले. ती दोघे गेल्यावर ईश्वरीने तिघींची जेवणाची ताटं तयार केली आणि माईंना बाहेर घेऊन आली. गप्पा मारता मारता तिघींनी आपली जेवणं उरकली. त्यानंतर अनघा आणि ईश्वरीने स्वयंपाकघर आवरलं आणि त्या तिघी झोपी गेल्या. ईश्वरी तिच्या बेडरूममध्ये आली. पलंगावर आडवी झाली. डोक्यात विचारचक्र सुरू होतं त्यामुळे पडल्या पडल्या झोप लागणं शक्य नव्हतं. मनात शिवराजचा विचार आला.

“इतक्या दिवसांत शिवराजने कॉल कसा केला नाही? खरंच मला विसरला की काय?”

तिच्या ओठांवर हसू फुललं. शिवराजसोबत घालवलेले क्षण मनात रुंजी घालू लागले.

“नसेल लागली गरज त्याला, म्हणून कॉल नसेल केला. इतकं काय वाईट वाटून घ्यायचं! आता तो एकटा सगळं मॅनेज करतोय. संपूर्ण डिपार्टमेंट सांभाळतोय. चांगली गोष्ट आहे ना? जाऊ दे.. उद्या ऑफिसला गेल्यावर समजेलच.”

तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी लवकर उठून तयार झाली. देवपूजा आटोपून आई आणि माईला नमस्कार केला. अनघाने तिच्या नाष्टा आणि दुपारचा टिफिन तयार केला. खांद्यावर पर्स अडकवत ईश्वरी घाईने म्हणाली,

“चल आई, निघते मी..”

“अगं नाष्टातरी करून जा. इतकी काय घाई? लवकर उठूनही तुझं आपलं तेच.. तुला खायचा का इतका कंटाळा देव जाणे!”

आई तिला दाटावत म्हणाली.

“आता नको आई, खूप उशीर झालाय. ऑफिसमध्ये गेल्यावर खाईन काहीतरी.. चल निघते मी. बाय आई.. माईंची काळजी घ्यायला ती मावशी येईल. तिला तिचं काम नीट समजावून सांग. कामात हलगर्जीपणा नकोय मला. पगाराचं मी नंतर बोलेन तिच्याशी.”

पायात चपला अडकवत ईश्वरी म्हणाली. माई आणि अनघाचा निरोप घेऊन ईश्वरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आली. गाडी बाहेर काढून तिने गाडी स्टार्ट केली. आता गाडीने चांगलाच वेग पकडला होता. गाडी चालवत असताना ईश्वरीच्या डोक्यात ऑफिसमधल्या कामाचेच विचार चालू होते. पेंडिंग कामाची लिस्ट डोक्यात तयार होत होती. थोड्याच वेळात ती ऑफिसमध्ये पोहचली. ऑफिसच्या पार्किंमध्ये गाडी पार्क करून ती तिच्या केबिनच्या दिशेने चालू लागली. जवळपास आठ दहा दिवसांनी ती ऑफिसमध्ये येत होती. सर्वजण तिचं हसून स्वागत करत होतं. खुशाली विचारत होतं. ईश्वरी त्यांना हसून उत्तर देत होती. ईश्वरी तिच्या केबिनमध्ये पोहचली. समोरच्या छोट्या गणेशाला नमस्कार करून तिने कामाला सुरुवात केली.

“आठवड्याभरात बँकेच्या कामाचं काय स्टेट्स असेल? शिवराजने सगळ्या मिटींग्स, सर्व कामे नीट केली असतील?”

आठवड्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तिने इंटरकॉमवर शिवराजला कॉल केला; पण तिथे कोणीच कॉल उचलत नव्हतं. नुसती रिंग जात होती.

“बाहेर जाऊनच बघते. कुठे गेला असेल तो?”

असा विचार करून ती रिसिव्हर ठेवणार इतक्यात समोरून फोन उचलला गेला. फोनवर हॅलोचा आवाज आला. रागिणीने कॉल घेतला होता.

“रागिणी, शिवराजला आत पाठवून दे जरा..”

“अगं तो नाहीये.”

ईश्वरीच्या बोलण्यावर रागिणीने उत्तर दिलं.

“म्हणजे कुठे बाहेर गेलाय का? की अजून आलेलाच नाही?”

ईश्वरीने पुन्हा प्रश्न केला.

“अगं, असं काय करते? तुला माहित नाही का? शिवराजने नोकरी सोडली.”

“काय?”

ईश्वरी जवळजवळ किंचाळलीच.

“कधी? हे कधी घडलं?” ईश्वरीने भांबावून विचारलं.

“म्हणजे त्याने तुला सांगितलं नाही? तू सुट्टीवर गेल्यानंतर लगेच दोन दिवसांनी त्याने त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला. तुला खरंच काही माहित नाही?”

रागिणीने खोचकपणे प्रश्न केला.

“नाही तो मला काहीच बोलला नाही; पण का? काय झालं अचानक? असा तडकाफडकी राजीनामा? ऑफिसमध्ये त्याचं काही बिनसलं होतं का?”

ईश्वरीने रागिणीला पुन्हा विचारलं.

“नाही तसं काही.. ऑफिसमध्ये त्याचं कोणाशी काही बिनसलं नाही; पण योगिनीने आम्हाला त्याच्या राजीनाम्याविषयी सांगितलं. कारण कोणालाच माहित नाही. केळकरसरांना माहित असेल तर माहित नाही.“

रागिणीने माहिती दिली. ईश्वरी विचारात पडली.

“असा अचानक कुठे गेला? मला साधं कळवावं सुद्धा वाटलं नाही? स्वतःला माझा मित्र म्हणवत होता ना तो? मग असा असतो मित्र? अशी असते मैत्री?”

ईश्वरीला खूप वाईट वाटत होतं.

पुढे काय होतं? शिवराजचं काय झालं? ईश्वरीची आणि त्याची पुन्हा भेट होईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all