पुन्हा बरसला श्रावण भाग १०४

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग १०४

“माझ्या पोटी जन्म घेतलेली, कधी तोंड वर करून बोलायचं माहित नसलेली, आजवर मी तिच्यासोबत जे काही केलं ते निमूटपणे सहन करणारी, मी, आदित्य म्हणेल ती पूर्व दिशा मानून सरळ नाकासमोर चालणारी माझी मुलगी इतका रौद्रावतार धारण करेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मग ती अशी रणचंडिका का झाली? तिच्या संतापाचा इतका उद्रेक का झाला? स्वतःच्या बापाला तुरुंगात पाठवायला निघाली होती? अनघा, तू हे संस्कार दिलेस तुझ्या मुलीला? हेच वळण लावलंस?”

विनायक मनातल्या मनात अनघाला दोष देत होता. इतक्यात अर्पिताच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.

“कधी कधी जोरदार आघातच माणसाला गाढ झोपेतून जागं करतो. आयुष्यात असा आघात होणं गरजेचंच असावं.”

तो स्वतःशीच पुटपुटला. अर्पिता दोन मुलांच्या मागे धावत होती. शौर्य आणि स्वरा फारच अवखळ झाले होते. स्वरा तर सारखी आज्जीची आठवण काढून रडत होती. चार दिवसातच अर्पिताची फारच धांदल उडाली होती. अनघाशिवाय घर सांभाळणं अशक्य झालं होतं. घरातली कामं, मुलांचं आवरणं यात तिची दमछाक झाली होती.

“बापरे! किती त्रास देतात ही मुलं! शौर्य तर एका जागी स्थिर बसत नाहीये आणि ही स्वरा सारखीच आज्जी,आज्जी करून रडतेय. त्यात अजून स्वयंपाक बनवायचाय. कपडे, भांडी सारीच कामे ‘आ’ वासून माझी वाट पाहताहेत. काय करावं कळत नाहीये. तरी नशीब ऑफिसला मी दोन दिवसांसाठी सुट्टी वाढवून घेतली होती नाहीतर हे सगळं सांभाळून ऑफिसला जाणं मला शक्यच नव्हतं; पण पुढे काय? आता उद्या कामावर रुजू तर व्हावंच लागेल. नाहीतर पुन्हा वरिष्ठांकडून ओरडा खावा लागेल किंवा मग कायमचंच घरी बसावं लागेल.”

अर्पिता स्वतःशीच बडबडत होती. तिला अनघाची प्रचंड आठवण झाली,

“आई असताना किती निर्धास्त होते मी! घराची कसलीच काळजी नव्हती. मुलांनाही त्या छान सांभाळत होत्या. त्यांनी कधीच कसलीच कुरबुर केली नाही. मुलांचं, घरातलं त्या सारं आनंदाने करत होत्या. आई घरीच असतात. त्यांना कुठे काय काम असतं असं वाटायचं मला; पण आता कळतंय मुलांना, घराला सांभाळणं इतकं सोप्पं नाही. आईंना मी खरंच फार वाईट वागवत होते. त्या दिवशी मी आईंना इतकं बोलायला नको होतं. मी त्यांचा फार पाणउतारा केला. त्यांना गृहीत धरून नाही नाही ते बोलले. चुकीची वागले मी, आईशिवाय घराला घरपण नाही. सॉरी आई, मला क्षमा करा. आता विसरा सगळं आणि परत आपल्या घरी या. आम्ही सगळे, तुमची नातवंडं तुमची वाट पहाताहेत. मी चुकले आई.. मी हात जोडून तुमची माफी मागते. प्लिज आई, आपल्या घरी परत या.”

अनघाच्या आठवणींनी अर्पिता हळवी झाली. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. अनघा घरी परत यावी म्हणून मनोमन ती तिला विनवत होती.

“फोन करते.. सॉरी म्हणते. त्या खूप चांगल्या आहेत. आपल्या मुलांवर फार काळ नाही रागवणार. त्यांच्याशी बोलते मी आणि घरी यायला सांगते.”

असा विचार करून तिने अनघाला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. अनघाच्या फोनची रिंग जात होती पण कोणी फोन घेत नव्हतं. तिने ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल केला पण तिचा फोन बंद लागत होता. शेवटी तिने कंटाळून, वैतागून आदित्यला कॉल केला. आदित्यने ‘हॅलो’ म्हणताच अर्पिताच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

“आदी, घरी कधी येतोयस? अरे ही मुलं बघ मला काहीच सुचू देत नाहीयेत. स्वरा सारखीच आज्जी हवीय म्हणून रडतेय. घरातली सगळी कामं तशीच पडलीत. तू लवकर घरी ये. आणि हो, दोन दिवसांची सुट्टी घेऊन ये. मला उद्या ऑफिसला जावं लागेल. महत्वाची मिटिंग आहे. त्यामुळे तुला घरी थांबावं लागेल. तू ऑफिसमधून सुट्टी घे. प्लिज.”

“अगं, पण मी असं अचानक सुट्टी कशी घेऊ? काय कारण सांगू? मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम पाहतोय. मला असं अचानक सुट्टी घेता येणार नाही. अर्पिता, मुलं ही आपल्या बाबांपेक्षा, म्हणजेच माझ्यापेक्षा आपल्या आईकडे, आय मीन तुझ्याकडेच चांगली राहतील. तुला कमी त्रास देतील. खरंतर मुलांना तुझ्या माझ्यापेक्षाही आपल्या आईची जास्त सवय आहे. त्यामुळे सुट्टी कोणीही घ्या पण मुलं काही करून ऐकणार नाहीतच. त्यामुळे प्लिज तूच काहीतरी मॅनेज कर.”

आदित्यने अर्पितालाच मुलांना सांभाळण्याची विनंती केली.

“अरे असं काय करतोस? मग मी नोकरी सोडून देऊ का? तुम्ही सगळं असं बायकांवर टाकून मोकळे होता. नाही हं.. असं चालणार नाही. आदी, आपण दोघेही नोकरी करतो. दोघेही एका महत्वाच्या पदावर काम पाहतोय. त्यामुळे तिथल्या जबाबदाऱ्या दोघांनाही पार पाडायच्या असतात. आणि ते आपण उत्तम रितीने पार पडतोयच., पण त्याचबरोबर आपलं कुटुंब हे सुद्धा आपल्या दोघांची तितकीच आणि समान जबाबदारी आहे. त्यामुळे आपली मुलं, त्यांच्या संगोपणाची जबाबदारी आपल्या दोघांची आहे. मग असं असताना मी एकटीनेच का ती जबाबदारी पार पाडायची? तू त्यांचा बाबा आहेस, तुझी पण त्यांच्यासाठी काही कर्तव्ये आहेतच ना? मग या खेपेस तू सुट्टी घे. आणि हो मला असं या मुलांना घेऊन, त्यांना सांभाळत रात्रीचा स्वयंपाक करणं जमणार नाही. बाहेरून जेवण मागवूया आज. मी ऑर्डर करते. तू लवकर घरी ये.”

असं म्हणत अर्पिताने कॉल कट केला. अर्पिताने फोन ठेवून दिल्यावर आदित्य विचार करू लागला.

“आजपण बाहेरचं जेवण? काय चाललंय तुझं अर्पिता? सकाळी टिफिनसुद्धा दिला नाहीस आणि आता रात्रीचं जेवण सुद्धा बाहेरूनच मागवायचं? गेली दोन दिवस हॉटेलमधूनच जेवण ऑर्डर करतोय. किती दिवस असं बाहेरचं, हॉटेलमधलं जेवण मागवायचं? आई ईश्वरीकडे गेल्यापासून सगळंच गणित बिघडलंय. घरात आई नाहीये तर घर किती अस्ताव्यस्त झालंय! साऱ्या घराची घडीच विस्कळीत झालीय. आई सारं छान निभावून न्यायची. सगळं कसं वेळच्यावेळी, जागच्या जागी असायचं. घर अगदी स्वच्छ, टापटीप असायचं. आई नाहीये तर असं वाटतंय घराचं घरपणच निघून गेलंय.”

आदित्य आईच्या आठवणींनी अजुनच व्याकुळ आणि गंभीर झाला.

“खरंच आपण आईला किती गृहीत धरलं! आपली आई कधीच बाबांना, आपल्या घराला सोडून जाऊच शकत नाही. असंच वाटलं मला. घर सोडून कुठे जाणार ती? नाहीच जाणार. जणू मला तिच्याबद्दल खात्रीच होती! पण मी चुकीचा होतो. आईला गृहीत धरण्याची चुक केली. तिच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला. आई सोसत राहिली आणि मी नुसती बघ्याची भूमिका घेत पाहत बसलो. ईशूला जे जमलं ते खरंतर मीच करायला हवं होतं. बाबांना याआधीच अडवायला हवं होतं. मी शांत बसून एकप्रकारे त्यांच्या वागण्याला खतपाणीच घातलं. माझं चुकलंच.“

आदित्यला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. आतापर्यंत आईशी केलेल्या गैरवर्तनाने त्याला खूप ओशाळल्यासारखं झालं होतं. त्याचे डोळे पाण्याने गच्च भरले होते.

“आईला फोन करतो. चुकलं माझं. माफ कर मला असं म्हणतो. आईच ती.. लगेच विरघळून जाईल आणि मला क्षमा करेल.”

असा विचार करून त्याने अनघाला कॉल केला. आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या आईला गृहीत धरण्याची चुक केली. अनघा कॉल घेईल आपल्या मुलाला माफ करेल असं आदित्यला वाटलं होतं; पण त्याचा भ्रमनिरास झाला. त्याच्या फोनची रिंग जात होती पण अनघाने कॉल घेतला नाही. ईश्वरीला तिने शब्द दिला होता त्यामुळे शब्दाच्या बंध सैल पडू द्यायचा नव्हता. अनघाने आपला शब्द पाळला होता. आदित्यच्या मनातला सल तसाच राहिला होता.

अर्पिताच्या सांगण्यावरून आदित्य लवकर घरी आला. विनायक हॉलमध्ये बसून होता. त्यानेच दार उघडलं. आदित्यने आत येताच हातातली बॅग टेबलावर ठेवत अर्पिताला आवाज दिला,

“अर्पिता, ए अर्पिता, बाहेर ये जरा..”

अर्पिता दोन्ही मुलांना कडेवर घेऊन बाहेर आली. तिचा अवतार पाहून त्याला हसूच आलं.

“अरे बापरे! काय अवस्था झालीय तुझी! मुलांनी फारच त्रास दिलेला दिसतोय तुला.. बरं ठीक मी आलोय न आता. मी फ्रेश होतो आणि घेतो त्यांना. तू पटकन आवर सगळं. आणि हो, आज रात्रीचा स्वयंपाक तू बनवू नकोस. आपण सगळेच बाहेर जाऊ. बाबा तुम्ही येताय ना?”

आदित्यने विनायककडे पाहिलं. त्याने नकारार्थी मान डोलावली.

“नको, तुम्ही या जाऊन. मी घरातच थांबतो. दुपारचं थोडंफार शिल्लक असेलच ना? तेच खाईन.. तुम्ही जा..”

विनायकने आदित्य आणि अर्पिताला बाहेर जायला सांगितलं.

पुढे काय होतं? विनायकला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all