पुन्हा बरसला श्रावण भाग १०३
ईश्वरी आपल्या आई अनघाला आणि माईंना घेऊन पुण्याला आली. घरी येताच तिने मंजिरीला कॉल केला. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर ईश्वरीने मूळ विषयाला हात घातला.
“मंजू, मी माई आणि आईला आपल्या घरी घेऊन आलेय. माईची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते आता. वय झालंय ना तिचं.. मला तिच्यासाठी तिची काळजी घेणारी नर्स किंवा मावशी असेल तर सांगशील का? आई आहे गं.. पण तिचंही वय झालंय आता. तिलाही हे सगळं झेपणार नाही गं. तसं घरातली कामं करायला कामवाल्या मावशी आहेतच. पण तरीही आईला मदतीला अजून एक माणूस हवाच.”
“हो, बरोबर आहे तुझं.. मी एक दोन दिवसांत सांगते तुला. दिनेशच्या एका मित्राची बायको नर्स आहे. तिच्या ओळखीची कोणी असेल तर सांगेन तुला. आणि हो, आज संध्याकाळी माईंला भेटायला मी आणि दिनेश येणार आहोत. चालेल ना?”
मंजिरी हसून म्हणाली.
“अगं असं का विचारतेस? माझ्या घरी यायला तुला परवानगी कधीपासून लागायला लागली? जास्त नाटकं करू नकोस. ऑफिसवरून तडक इकडेच ये. मी तुझ्या आवडीचे मस्त थालीपीठं करते म्हणजे मग कसं आपल्या गप्पा होतील आणि खाणंही.”
ईश्वरीने मंजिरीला सरळ घरीच यायला सांगितलं. थोडं बोलून ईश्वरीने कॉल कट केला. केळकरसरांना ती पुण्यात आल्याचं कळवलं. तशी तिची रजा अजून संपली नव्हती. तरीही एक दोन दिवसात कामावर रुजू होते असं सांगून तिने कॉल ठेवून दिला. अनघा आतल्या बेडरूममध्ये माईंजवळ बसली होती. ईश्वरी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली होती. चहाचा ट्रे टेबलवर ठेवत ईश्वरी आईला पाहून म्हणाली,
“आई, चहा आणलाय.. माई उठ बरं.. चहा घे.”
ईश्वरीने दोघींना चहा दिला. चहाचा घोट घेत अनघा ईश्वरीकडे पाहून म्हणाली,
“ईशू, तू मला इथे घेऊन आलीस. माझी त्या त्रासातून सुटका केलीस; पण बाळा, माझ्या नातवंडांचं काय? इतक्या लहान बाळांना सोडून मी इथे कशी राहू? अर्पिताला त्यांचं सगळं करणं जमणार नाही. आदीचं म्हणशील तर तो माझा मुलगा आहे गं. आपल्या मुलाच्या चुका आईलाच आपल्या पोटात घ्याव्या लागतील ना? असं किती दिवस मी लेकीच्या दारी राहणार गं?”
“आई, तू कुठेही जाणार नाहीयेस. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. समजलं? मला कळतंय आई, तुला त्या चिमुकल्या जीवांची काळजी लागून राहिली असेल. आजी आजोबांचं प्रेम म्हणजे अगदी दुधावरची साय.. पण आई, वहिनीला जमणार नाही असं कसं म्हणतेस? तू कोणी नसताना आम्हाला वाढवलंसच ना? हो, आता म्हणशील मी गृहिणी होते म्हणून शक्य झालं ते पण अर्पिता नोकरी करते तिला कसं जमणार? पण आई, तूच म्हणतेस ना, एकदा जबाबदारी अंगावर पडली की जमतं सगळं; मग तिलाही जमेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबांना, दादा वहिनीला तुझी किंमत समजायलाच हवी ना? त्यांनी तुला असं गृहीत धरलेलं मला चालणार नाही. आजवर तू आमच्यासाठी खूप सहन केलंस; पण आता नाही आई.. जोपर्यंत त्यांना ते समजत नाही, तुझ्या त्यागाची किंमत कळत नाही तोपर्यंत तू..”
ईश्वरी निक्षुन म्हणाली.
“बाळा, बाईच्या जातीला कसली आलीय किंमत? अगं, बाईचं मन तिच्या संसारातच रमतं. तिचं सुख त्यांच्या सुखातच असतं. आपल्या माणसांनी कितीही दूर लोटलं तरी मन फिरून फिरून तिथेच जातं. त्यांना जेंव्हा समजायचं असेल तेंव्हा समजू दे; पण ईशू, मी एक आई आहे गं.. दोन चिमुकल्या बाळांची आजी आहे, हे कसं विसरू मी? त्यांच्या चुकांची शिक्षा त्या चिमुकल्यांना का देऊ? त्या बिचाऱ्यांचा यात काय दोष? मला जायला हवं ईशू.. त्यांचे हाल झालेले मी कधीच पाहू शकत नाही. माई, निदान तुम्ही तरी ईशूला समजावून सांगा. हे असं वागणं एका घरंदाज स्त्रीला शोभतं का? नवरा कसाही असला तरी असं नवऱ्याचं घर सोडून लेकीच्या घरी राहणं योग्य आहे का? तुम्हीच सांगा आता..”
अनघाने मोठ्या आशेने माईंकडे पाहिलं. माई उठून बसत अनघा आणि ईश्वरीकडे पाहून स्मित हास्य करत पाहिलं आणि ईश्वरीला म्हणाली,
“ईशू, तू तुझ्या आईसाठी जे केलंस ते खरंच कौतुकास्पदच आहे; पण बाळा, एका बाईसाठी तिचा नवरा, तिचं कुटुंब हेच तिचं सर्वस्व असतं. तिचा जीव त्यांच्याभोवतीच घुटमळत राहतो. ती तिच्या घराचा उंबरठा कायमचा ओलांडते ते फक्त तिच्या अंतिमयात्रेलाच. अनघा जरी इथे राहिली तरी ती सुखासमाधानाने राहू शकणार नाही कारण तुझ्या आईचं मन तिच्या संसारात गुंतलंय गं. तिचा नवरा तिचं घर, तिचा संसार, तिची नातंवंडं हे सर्व तिच्यासाठी तिचा श्वास आहेत. त्यांच्याशिवाय तिचा श्वास बंद पडेल. तिचं जगणं फक्त एक श्वासांची घरघर उरेल. इथे ती फक्त देहानेच तुझ्याजवळ राहील पण चित्त मात्र सदैव विनायक, आदी आणि तिची नातवंडं यांच्याजवळच असेल. मग सांग, तुझी आई इथे सुखात कशी राहू शकेल? तिचं इथे असं असून नसण्याला काही अर्थ आहे?”
माईंच्या बोलण्यावर ईश्वरी क्षणभर थांबली. थोडा विचार करून ती म्हणाली,
“माई, मला तुझं म्हणणं पटतंय. आई बाबांची ताटातूट करण्याचा माझा हेतू नव्हता. कधीही नसेल; पण आईचा त्रास मी उघड्या डोळ्यांनी कसा पाहायचा होता? नाही आई, आता नदी पुलावरून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यांना समजल्याशिवाय मी तुला परत मुंबईला पाठवणार नाही.”
ईश्वरीचं बोलणं ऐकून अनघा हिरमूसली. तिचा पडलेला चेहरा पाहून ईश्वरीला वाईट वाटलं.
“सॉरी आई, मला माहित आहे, तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय; पण आई, हे सगळं मी तुझ्यासाठी, तुझ्या हक्कांसाठीच करतेय. जर एखादी व्याधी समूळ नष्ट करायची असेल तर गोड औषध देऊन चालणार नाही त्यासाठी कडू गोळ्याच द्याव्या लागतील. म्हणूनच आई, मला तुझ्याशी नरमाईने वागून चालणार नाही. मला थोडं कठोर होऊनच तुझ्याशी बोलावं लागेल. थोडे दिवस आई, फक्त काही दिवस कळ काढ. प्लिज आई..”
मनातले विचार प्रयत्न करूनही काही केल्या थांबत नव्हते. ईश्वरी आईकडे पाहत म्हणाली,
“ठीक आहे आई, उदास होऊ नकोस. मला तुला असं रडवेलं पहायला आवडत नाही. तुला घरी परत जायचंय तर खुशाल जा. मी तुला अडवणार नाही; पण त्यासाठी माझी एक अट आहे. ती तुला मान्य असेल तर मी तुझ्या बोलण्याचा विचार करेन.”
“अट? कसली अट? ईशू, असं नियम आणि अटी घालून संसार करता येत नाही बाळ.. पण ठीक आहे, बोल तू.. काय अट आहे तुझी? आता मुलांचं ऐकण्यापलीकडे आमच्याकडे दुसरा काही पर्याय उरलाय का?”
अनघा हताशपणे म्हणाली. आईला असं हताश झालेलं पाहून ईश्वरीचा जीव व्याकुळ झाला. मायेने तिला अलगद जवळ घेत ती अनघाला म्हणाली,
“आई, प्लिज असं बोलू नकोस गं.. हे सारं तुझ्यासाठीच करतेय मी. बरं ठीक आहे.. नाही काही अट ठेवत. नाही कुठल्या बंधनात अडकवत तुला. पण आई, मुलगी म्हणून तुला एक विनंती तरी करू शकते ना?”
अनघाने होकारार्थी मान डोलावली.
“तू फक्त आठ दिवस इथे रहा. मग मीच तुला घरी सोडून येईन; पण आई, या आठ दिवसांत तू कोणालाही कॉल करायचा नाहीस आणि कोणाचे कॉल्स घ्यायचेही नाहीत. मंजूर? प्रॉमिस दे मला. फक्त आठ दिवस आई, फक्त आठ दिवस.. ऐकशील माझं प्लिज?”
ईश्वरीच्या डोळ्यातली आर्जवे अनघाला स्पष्टपणे दिसत होती.
“हो चालेल. तू म्हणशील तसं.. पण आठ दिवसांनी मात्र मी माझ्या घरी जाईन. चालेल ना तुला?”
अनघा ईश्वरीला मिठीत घेत म्हणाली. ईश्वरीने हसून होकार दिला.
“बरं चल आता, मंजिरी आणि दिनेश घरी येणार आहेत ना. थालीपीठ करून देते असं म्हणाले होते मी तिला. तिला आवडतात नं? आणि जेवणाचंही बघते हं. उद्यापासून ऑफिसला जॉईन करावं लागेल. इतक्या दिवसांची कामं मागे राहिलीत ना ते पाहावं लागेल.”
आईच्या मिठीतून दूर होत ईश्वरी हसून म्हणाली.
“अगं, असं काय करतेस? किती काळजी त्या ऑफिसची! तुझ्या एकटीच्या खांद्यावर अशी सगळी मदार आहे का? बाकीचेही असतील ना ऑफिसमध्ये? तू एकटीच सगळं पाहतेस?”
अनघा ईश्वरीला मिश्किलपणे म्हणाली.
“अगं तसं नाही. सगळे चांगले सहकारी आहेत गं. पण आपल्यावर काही जबाबदारी असते ना गं.. आणि तो वेडा शिवराज, इतका धांदरट आहे म्हणून सांगू! कसं सांभाळत असेल देव जाणे! तसं मी सर्वांना फोनवरून सूचना देतच होते. बघू, उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर समजेल.”
ईश्वरी चहाच्या मोकळ्या कपांचा ट्रे उचलत म्हणाली.
“हं.. बरोबर आहे. चल मीही येते स्वयंपाक घरात तुझ्या मदतीला. पटकन स्वयंपाक बनवूया. जेवण करू आणि लवकर उरकून झोपी जाऊ म्हणजे सकाळी लवकर तुला ऑफिसला जाता येईल. माई, तुम्ही आराम करा हं.. आम्ही आलोच.”
असं म्हणत अनघा उठून उभी राहिली.
इकडे अनघा घर सोडून गेल्यापासून विनायक बराच शांत झाला होता. ईश्वरीचा रौद्रावतार त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता.
पुढे काय होतं? आदित्य, विनायकला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल का? पाहूया पुढील भागात..
पुढे काय होतं? आदित्य, विनायकला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा