पुन्हा बरसला श्रावण भाग १०२

पुन्हा बरसला श्रावण..
पुन्हा बरसला श्रावण भाग १०२

ईश्वरीने संपूर्ण हॉलभर नजर फिरवली. त्याच्या मित्रांजवळ जाऊन विचारपूस केली; पण विनायक कुठेच दिसला नाही. कार्यक्रम छान पार पडला. सर्वांनी भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. मग थोडया वेळाने सर्वांनी देशमुख कुटुंबियांचा निरोप घेतला आणि ते आपापल्या घरी परतले. अनघा माई, ईश्वरी, अर्पिता आणि आदित्य आपल्या मुलांसमवेत घरी परतले; पण अजूनही विनायकचा तपास नव्हता.

“ईशू, अगं तुझ्या वडिलांना फोन तरी लावून बघ. कुठेय गेलाय तो? नाहीतर सदाला फोन कर त्याला माहित असेल.”

माई काळजीच्या सुरात म्हणाली.

“हो माई, मी बघते. तू काळजी करू नकोस. उगीच तुझी तब्येत बिघडायची.”

असं म्हणत तिने कॉल करण्यासाठी मोबाईल उचलला.

“माई, बाबांचा कॉल लागत नाहीये आणि सदाकाका कॉल घेत नाहीयेत. काय करावं? दादाला विचारायला हवं.”

ईश्वरी स्वतःशीच पुटपुटली आणि आदित्यच्या खोलीत जाण्यासाठी जागेवरून उठली. इतक्यात दारावरची बेल वाजली. ती पटकन दार उघडलं. समोर विनायक झोकांड्या घेत उभा होता. भपकन दारूचा उग्र वास तिच्या नाकात शिरला. ईश्वरी पटकन बाजूला झाली. विनायक आत येऊन तोल सावरत सोफ्यावर बसला. ईश्वरी काही न बोलता आत निघून गेली. माईने त्याच्यावर आवाज चढवला.

“कुठे होतास विनू? मुलांचा वाढदिवस होता आणि तू बेपत्ता? काय हे?”

माईंच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता किंबहुना तो ऐकण्यासाठी शुद्धीतच नव्हता. नवऱ्याची अवस्था पाहून अनघा न राहून काहीशी चिडून म्हणाली,

“आता पुरे झालं आदीचे बाबा, आता हे सगळं तुम्हाला बरं दिसतं का? सुन आली, नातवंडं आली तरी तुमचं अजून सुरूच आहे. त्यांच्यासमोर तरी स्वतःची शोभा करून घेऊ नका.”

अनघाचं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच विनायकने उठून तिच्या कानशिलात लगावून दिली. ती धडपडली. जीव कळवळला. गालावर हात ठेवून ती बाजूला उभी राहिली. विनायक झोकांड्या घेत उभा राहण्याचा प्रयत्न करत ओरडून म्हणाला,

“मला शहाणपणा शिकवतेस.. फार अक्कल आलीय का तुला? जीभ फारच चुरूचुरू चालायला लागलीय तुझी? बघतोच तुला. म्हातारा झालो म्हणजे तुला काय वाटलं तुझा गुलाम होईल? तुझ्या पुढे पुढे लोटांगण घालेन? देशमुख आहोत आम्ही! बायकांची जागा आमच्या चपलेखालीच. त्यांनी पुरुषांना जास्त अक्कल शिकवायची नसते. इतकंही कळत नाही तुला? फार तोंड आलंय तुला.. थांब तेच झोडून काढतो..”

विनायक तावातावाने बोलत होता. अनघाला अर्वाच्य भाषेत शिव्या देत होता. त्यांच्या आवाजाने आदित्य आणि ईश्वरी बाहेर आले.

“काय चाललंय आई, अर्पिता आणि मुलं आताच झोपलीत. काय गोंधळ सुरू आहे तुमचा? बाबा दारू प्यायलेत, त्यांना एक कळत नाही; पण तुलाही कळत नाही का? की बाबांची दारू तुला चढलीय. प्यायलेल्या माणसांच्या नादी लागू नये इतकंही साधी गोष्ट तुला कळत नाही?”

आदित्य अनघावरच डाफरत म्हणाला. अनघाने आदित्यकडे पाहिलं,

“माझा आदी मला बोलतोय. या दोन मुलांसाठी मी आयुष्यभर नवऱ्याचा मार खाल्ला. शिव्या पचवल्या. आयुष्यभर मानहानी सहन केली. मुलांसाठी मी घराचा उंबरठा ओलांडला नाही, तेंव्हा तो निर्णय घेतला असता तर मुलांना वाऱ्यावर सोडून गेले असते मी.. जगले असते मी; पण माझ्यातली आई कशी जिवंत राहीली असती? तेंव्हा उंबरठा ओलांडला नाही कारण तेंव्हा मुलांची चिंता होती. त्यांच्या संगोपणाची काळजी होती. त्यांच्यासाठीच मी सारं निमूटपणे सोसत राहिले. आणि आज तोच माझा मुलगा मला प्रश्न विचारतोय. माझी अक्कल काढतोय. त्याच्या मनात माझ्याबद्दल आदर नाही. त्याला आई हवी फक्त घरातल्या कामांसाठी, मुलांना सांभाळण्यासाठी. एका मोलकरणीसारखी अवस्था झालीय माझी.. एक चोवीस तास फुकट राबणारी बाई हवीय त्याला. आईने सहन केलेलं दुःखाचा त्याला विसर पडलाय. कित्येक दिवस आई आणि मुलामध्ये साधा संवादही नाही. मी तेंव्हा उंबरठा ओलांडू शकले नाही आणि आजही ओलांडू शकत नाही. तेंव्हा चिंता मुलांची होती आज नातवंडांची आहे. तेव्हा आईची माया होती आणि आज आजीची सावली.. दुधावरची मऊसुद साय.. प्रत्येक वेळीस उंबरठा अजूनच मजबूत होत गेला.”

“अरे पण.. यात आईची काय चुक?”

ईश्वरीने मधेच आदित्यला प्रश्न केला. तिच्या प्रश्नाने अनघाची तंद्री भंग पावली. ईश्वरीला समोर पाहून विनायकला चेव चढला.

“मला तोंड वर करून बोलायला शिकलीस? मला माहितीये, तुला तुझ्या या लाडक्या लेकीची फूस आहे. ही तुला माझ्याविरोधात बोलायला शिकवते? नवरा बायकोत भांडण लावते. याआधी तोंड नाही उघडलं आणि आताच बरं..”

माईं त्याला ओरडत होत्या पण तो कोणालाच जुमानत नव्हता. माईंकडे पाहून तो चवताळून म्हणाला,

“ही अपशकूनी बाई तुम्ही माझ्या गळ्यात बांधली. काहीच चांगलं झालं नाही. एवढ्या तालेवार घराण्यातला मुलगा असूनही मी आयुष्यभर दारिद्र्यात दिवस काढले. आयुष्यभर कष्ट करत राहिलो. सुख तर मिळालंच नाही. ही अवदसा माझ्याजवळ राहिली. मेली असती तर बरं झालं असतं. थांब, मीच तुझा जीव घेतो.. थांब..”

असं म्हणत अनघाला मारण्यासाठी तो आजूबाजूला वस्तू पाहू लागला. इतक्यात त्याला कोपऱ्यात काठी दिसली. मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने अनघाला काठीने मारायला सुरुवात केली.

“आईई गं! नको, नको..”

अनघा कळवळली. अनघाचा आक्रोश कानठळ्या बसवणारा होता. हृदय पिळवटून टाकत होता. आता मात्र आईच्या वेदना ईश्वरीला सहन होत नव्हत्या. तिच्यात बळ कुठून आलं कोणास ठाऊक! जणू धरतीवर वीज कडाडली, वाऱ्याच्या वेगाने ती विनायकच्या अंगावर धावून गेली. त्याच्या हातातली काठी हिसकावून घेत जोरात ओरडली,

"खबरदार! माझ्या आईला मारलंत तर.. सोडा तिला. मी तुमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करेन. परत जर तिला हात लावलात तर तुरुंगात पाठवेन. समजलं?”

ईश्वरीचं पहिल्यांदाच असं रौद्र रूप पाहून विनायक जरा दचकला. तिच्या हातातली काठी त्याला चंडिकेच्या शस्त्रासारखी भासली. तो गुपचूप सोफ्यावर जाऊन बसला. ईश्वरीच्या वागण्याचं माईला खूप नवल वाटलं. आदित्यही तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. अनघा अश्रू गाळत बसली होती. ईश्वरीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली,

“आई, उठ गं.. तू आता मुळीच रडायचं नाहीस. यापुढे तू काहीच सहन करणार नाहीस. आई, मी आहे तुझ्यासोबत आणि कायम तुझ्यासोबतच राहीन. दादा हे तू करायला हवं होतंस. आई आयुष्यभर आपल्यासाठी सारं निमूटपणे सहन करत राहिली. तू काय केलंस दादा? तिला ही वागणूक दिलीस? घरात तिला एका वस्तूइतकी तिची किंमत नाहीये. आई, घाबरू नकोस गं.. चल माझ्यासोबत.. आता तू या घरात एक क्षणही राहायचं नाहीस. चल या उंबरठ्याबाहेर.. अगं आई, हे जग खूप सुंदर आहे.. मी दाखवेन तुला ते.. मोकळं आभाळ तुझं आहे फक्त. कोणीही तुला त्या घरातून हुसकावून लावणार नाही. आता कोणीही तुला त्रास देणार नाही. दादा, आईने आजवर खूप सहन केलंय पण आता नाही. मी माई आणि आईला पुण्याला घेऊन चाललेय. तू आणि वहिनी तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यास सक्षम असालच. तुला आता आईची गरज नाही. त्यामुळे आता तू तुझ्या संसारात सुखी रहा. माझं उरलेलं आयुष्यही तुला मिळो दादा.. चल आई..”

आणि ईश्वरीने त्या दोघींची बॅग पॅक केली. आणि आपल्या आईला घेऊन घराबाहेर पडली. पार्किंगमधली गाडी बाहेर काढली. सामान डिकीत ठेवलं. माईला मागच्या सीटवर बसवलं आणि आईला पुढच्या सीटवर बसवून तिने गाडी स्टार्ट केली. अनघाने कारच्या खिडकीची काच खाली घेतली. थंड वाऱ्याची झुळूक आत आली. अनघाने बाहेर तोंड करून डोळे मिटून घेतले आणि दीर्घ श्वास घेतला. तिला आता खूप मोकळं वाटत होतं. आता ती मोकळा श्वास घेऊ शकणार होती. तिने गाडी चालवणाऱ्या आपल्या मुलीकडे ईश्वरीकडे पाहिलं.

“किती मोठी झाली माझी लेक! जणू माझीच आई झालीस! माझ्याच मुलीने माझ्या कारावासातून मुक्तता केली. जुन्या रूढी परंपरा असलेल्या प्रत्येक वेळीस भक्कम होत जाणारा उंबरठा ओलांडायला अखेर तिनेच मला मदत केली. सुखी रहा बाळा..”

अनघाच्या डोळ्यातून आपोआप अश्रूधाऱ्या वाहू लागल्या.

पुढे काय होतं? आदित्य, विनायकला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all