पुन्हा बरसला श्रावण भाग १०१

पुन्हा बरसला श्रावण भाग

पुन्हा बरसला श्रावण भाग १०१


ईश्वरी आपल्या परीक्षेच्या तयारीला लागली. अर्चनाने तिच्या नोट्स ईश्वरीला अभ्यास करण्यासाठी दिल्या होत्या. एकीकडे ईश्वरी परीक्षेची तयारी करत होती आणि दुसरीकडे अनघा आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीय मुलांच्या नामकरण समारंभ आणि पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागले होते. मुलांचा पहिला वाढदिवस.. थाटामाटात साजरा करायचा होता. आदित्यने जंगी तयारी केली. कार्यक्रमासाठी छोटासा हॉल बुक केला होता. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांना आमंत्रित केलं होतं. जेवणासाठी बाहेरच्या चांगल्या कॅटरर्स ऑर्डर दिली होती. पाहुण्यांच्या, मित्रपरिवाराच्या मानपानाची, आहेराची व्यवस्था केली होती.

इकडे ईश्वरीची परीक्षा संपत आली होती. आज शेवटचा पेपर होता. सगळे पेपर्स छान गेले होते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ईश्वरी पोस्ट ग्रॅज्यूएट होणार होती. अर्चना आणि श्लोक होतेच सोबतीला. शेवटचा पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर पडत असताना कॉलेजच्या आवारात तिघांची भेट झाली. भरल्या डोळ्यांनी अर्चनाने बोलायला सुरुवात केली.

“ईशू, आता एम कॉमच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षाही झाल्या. आता परत आपली भेट कधी गं? कॉलेज, शिक्षण, परीक्षा या निमित्ताने कमीतकमी गाठीभेटी तरी होतं होत्या. आता भेटण्याचं काय कारण असणार ना?”

“अगं, असं का बोलतेस अर्चू? आपण कायम सोबत असणार आहोत. मला सांग रोज भेटलो तरच मैत्री असते का? मैत्री मनात जपावी गं. खूप सुंदर ऋणानुबंध आहेत हे.. इतक्या सहजासहजी नाही तुटणार.. मला तुमची कायम आठवण येत राहील. असं लहान मुलांसारखं रडू नकोस वेडाबाई..”

तिला जवळ कुशीत घेत ईश्वरी डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली. इतक्यात तिचं लक्ष श्लोककडे गेलं. त्याचे डोळेही पाणावले होते. त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली,

“श्लोक, निदान तू तरी समजून घे. अर्चूसारखं तू तरी वेडेपणा करू नकोस. श्लोक आपली तिघांची मैत्री अशीच टिकून राहील. आपण कधीही एकमेकांपासून दूर जायचं नाही. कायम संपर्कात राहायचं. काय समजलं ना?”

ईश्वरीच्या दटावण्याने श्लोक गालातल्या गालात हसला. डोळ्यातलं पाणी आवरत तो म्हणाला,

“ईशू, मागच्यावेळीस मी जो वेडेपणा केला, त्याबद्दल खरंच खूप सॉरी.. मैत्री आणि प्रेमात गल्लत करत होतो. मैत्रीला प्रेम समजण्याची चुक करत होतो. बरं झालं, तू मला वेळीच सावरलंस. ती सूक्ष्म रेषा मला समजावून सांगितलीस. आता मी बऱ्यापैकी सावरलोय. आपल्यातलं नातं खऱ्या अर्थाने मला समजू लागलंय. आई म्हणाली होती, प्रेम असं ओढून, हिरावून, जबरदस्तीने नाही करता येत. ओढ दोन्ही बाजूनी असायला हवी; पण ईशू, मी आता खरंच शांत झालोय. मला कळून चुकलंय आपल्यात मैत्री व्यतिरिक्त दुसरं काही असूच शकत नाही. वन्स अगेन सॉरी यार..”

“अरे यार, किती विचार करतोस! हे बघ मी विसरूनही गेले होते सारं. आपली तिघांची मैत्री चिरंतर राहणार आहे. त्यामुळे सॉरी किंवा आभाराचे भार कशाला हवेत? श्लोक, आपण कायम एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र असणार आहोत. समजलं? आता चला, प्लिज डोळे पुसा आणि हसा बघू..”

ईश्वरी हसून म्हणाली. सर्वांनी प्रेमाने एकमेकांच्या हातात हात मिळवला.

“बाय दि वे.. उद्या आपल्या दोन हसऱ्या, गोजिऱ्या बाळांचा नामकरण आणि पहिला वाढदिवस समारंभ आहे. तुम्ही दोघांनी यायचं आहे आणि काकूंनाही सोबत घेऊन या. नाहीतर मी तुमच्याशी बोलणारच नाही. समजलं? मी तुम्हाला हॉलचा ऍड्रेस मेसेज करेन. तुम्ही नक्की या.. मी वाट पाहीन. चला आता निघूया घरी? उशीर होईल.”

श्लोक आणि अर्चनाने ईश्वरीच्या बोलण्यावर माना डोलावल्या. त्यानंतर भरल्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या घरी परतले. ईश्वरी घरी आली तशी अनघाला मदत करू लागली. अनघा श्वास घेण्यासही वेळ नव्हता. तिच्या वयोमानानुसार तिला जमेल तितकं ती करत होती. कामे पटापट उरकण्याचा प्रयत्न करत होती. ईश्वरी होतीच मदतीला. आदल्या दिवशी रात्र जागून ईश्वरी आणि अनघाने पाहुण्यांची यादी तयार केली. त्यांच्या मानापानाच्या वस्तूंची तयारी केली होती. त्यांच्या चहापाण्याची, नाष्ट्याची सोय करायची होती. मुलांच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. अर्पिता सकाळीच पार्लरला गेली. समारंभासाठी, फेशियल, ब्लिच, हेअरकट करायचा होता. घरी येईपर्यंत दुपार झाली. अनघा घरातली कामे उरकत होती. ईश्वरीने स्वयंपाकाची संपूर्ण तयारी केली. पोळीभाजी, वरणभात, कोशिंबीर, लोणचं पापड असा छान बेत होता. स्वयंपाक आवरून ईश्वरी मुलांशी खेळत, त्यांना खेळवत बसली होती. इतक्यात अर्पिता घरी आली. अर्पिताने घरी आल्या आल्या फर्मान सोडलं.

“आई, ओ आई, मला खूप भूक लागलीय. जेवण वाढा पटकन. जेवते आणि पडते थोडावेळ. रात्रीच्या कार्यक्रमासाठी फ्रेश राहायला हवं ना.. मला वाढा पटकन..”

अनघाने मान डोलावली. अर्पितासाठी जेवणाचं ताट वाढून आणलं. त्रासिक चेहरा करत तिने ताटाकडे पाहिलं आणि ती वैतागून म्हणाली,

“आई, हे काय? शेवयांची खीर कुठेय? इतक्यात संपलीसुद्धा? लाडक्या लेकीला दिलीत का सगळी?”

“अगं काहीही काय बोलतेस? खीर बनवलीच नाही. सकाळपासून मला थोडी कणकण जाणवतेय. म्हणून मी स्वयंपाकाचं काही पाहिलं नाही आज संपूर्ण स्वयंपाक ईशूनेच केलाय.”

अनघा किचनमधूनच तिच्याकडे पाहत म्हणाली.

“झालं.. आता आज कार्यक्रम आहे म्हटल्यावर यांची नाटकं सुरू झाली. काय आई हे! मुलांना सांभाळावं लागू नये म्हणून निदान अशी कारणं तरी शोधू नका. घरात बसून फक्त मुलांना सांभाळायचं तर असतं त्यातही तुम्हाला कंटाळा.. आमच्यासारखी नोकरी करून घर सांभाळावं लागलं असतं मग तुम्हाला समजलं असतं.”

अर्पिता तावातावाने बोलत होती. ईश्वरी सासूसुनेचा संवाद शांतपणे ऐकत होती. खरंतर वाद करण्यासाठी कसलंच कारण नव्हतं. उगीचच तिने भांडण उकरून काढलं होतं. घरी आल्यापासून ईश्वरी अर्पिताचं अनघाशी, तिच्या आईशी असलेलं वागणं बोलणं पाहत होती. अर्पिता आईला कायम तोडून, तुसडेपणाने बोलत होती. आईचा पदोपदी होणारा अपमान ईश्वरीला दिसत होता. ती विचार करू लागली.

“काय हा आईचा जन्म! माझ्या कळत्या वयापासून नुसतं तिला सोसणंच माहित. एक बाई दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही. ईर्षा करते. तीच एका स्त्रीची सर्वांत मोठी शत्रू असते. वाटलं होतं, आयुष्यभर बाबांनी आईला त्रास दिला. दारू पिऊन मारहाण केली. पदोपदी तिचा अपमान केला. आता संपेल सगळं. नवऱ्याच्या राज्यात नाही तर निदान मुलांच्या राज्यात तरी आईला सुख मिळेल पण.. ”

ईश्वरीच्या डोळ्यातून टपाटप पाणी गळू लागलं. मनातले विचार अश्रूवाटे वाहू लागले.

“ज्या घरात नवराच आपल्या बायकोला किंमत देत नाही. सर्वांसमोर तिचा पदोपदी अपमान करतो, तर मग बाकीच्या लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? बाबाच जर आपल्या लेकासमोर, सुनेसमोर आईचा मान राखत नाहीत. आईला शिवीगाळ करतात, मारहाण करतात. अशा घरातली आणि त्यासोबत बाहेरची माणसं का मान देतील? का नाही अपमान करणार? आई, किती सहन करशील? किती शांत राहशील गं? बोलायला हवं तुला. निमूटपणे सहन करू नकोस. आधी आजोबा मग बाबा, दादा आणि आता ही वहिनीही उलटं बोलायला लागलीय. तुझ्या सोशिक स्वभावाचा फायदा घेतेय. आई बोल.. नको अशी निमूटपणे सगळं सहन करू.. उठ आई.. बोल आई..”

ईश्वरीचा जीव आईसाठी तुटत होता. अनघा मात्र काहीही न बोलता निमूटपणे भांडी घासत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी तिची व्यथा सांगत होतं.

“आजचा समारंभ निर्विघ्नपणे पार पडू देत. मग दादाशी या विषयावर सविस्तर बोलेन.”

ईश्वरी मनातल्या मनात बडबडली आणि तिच्या खोलीत आरामासाठी निघून गेली. संध्याकाळी सर्वजण छान तयार होऊन हॉलवर गेले. छान कार्यक्रम साजरा झाला. मुलांचं नामकरण झालं. त्यांच्या लाडक्या आत्याने हळूच कानात मुलांचं नामकरण केलं. शौर्य आणि स्वरा अशी मुलांची नावं ठेवण्यात आली समारंभ थाटामाटात पार पडला. सर्वजण आनंदात होते. शे दोनशे पाहुणेमंडळी, सगेसोयरे कार्यक्रमास उपस्थित होते. अनघा, आदित्य, अर्पिता ईश्वरी सर्वजण पाहुण्यांचं आदरतिथ्य करण्यात व्यस्त होते. त्यांना हवं नको ते पाहत होते; पण या गोंधळात विनायक मात्र कुठेच दिसत नव्हता. अनघाच्या जीवाची घालमेल सुरू झाली. तिची भिरभिरती नजर संपूर्ण हॉलमध्ये विनायकला शोधू लागली.

“कुठे गेले असतील हे? मगाशी तर सदा भावोजींसोबत बोलताना पाहिलं; पण आता दोघेही नाहीयेत. असं न सांगता कुठे जातात देव जाणे! पण माझ्या जीवाला उगीच घोर लावतात. आता एवढ्या पाहुण्यांच्या गर्दीत त्यांना कुठे शोधू?”

अनघा काळजीत पडली. आईला चिंतीत पाहून ईश्वरीने आईच्या जवळ येऊन विचारलं,

“आई, काय झालं गं? टेन्शनमध्ये दिसतेय. काय शोधतेयस?”

काळजीच्या स्वरात अनघाने ईश्वरीला विचारलं,

“ईशू, तू बाबांना पाहिलंस का गं? बराच वेळ झाला दिसले नाहीत. थोडी काळजी वाटतेय. पुन्हा दारू पिऊन आले तर पाहुण्यारावळ्यात नाचक्की व्हायला नको. तू बघ ना जरा..”

“अगं काही वेळापूर्वी त्यांना सदाकाकांबरोबर पाहिलं होतं. असतील त्यांच्यासोबत. तू काळजी करू नकोस. मी पाहते.”

असं म्हणून ईश्वरी तिच्या बाबांना शोधू लागली; पण विनायक कुठेच दिसला नाही.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया..

🎭 Series Post

View all